Saturday, November 4, 2023

फायदेशीर शेतीसाठी शेतकऱ्यांनी

सेंद्रिय व जैविक निविष्ठा वापरण्यावर भर द्यावा

-    जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड (जिमाका) दि. 4 :- उपलब्ध असलेल्या शेतीतून कमी खर्चात अधिकचे उत्पन्न काढणे ही काळाची गरज झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या मर्यादित वापरासह, किटक नाशका ऐवजी सेंद्रीय व जैविक खते व औषधी वापरण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.   

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कृषी विभागा अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान,  राष्ट्रीय कृषी विकास योजना महाराष्ट्र मिलेट सन 2023-24 अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण व सार्वभौम ग्रामसभेचे आयोजन कृषी विभाग व गुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच भोकर तालुक्यातील मौ. जामदरी येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, आत्माचे संचालक अनिल गवळी, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संदीप जायभाये, संदीप डाकुलगे, भूमाजी टेकाळे यांची उपस्थिती होती.

 

यावेळी गावातील महिलांनी दारूबंदी विषयी मागणी केली. गावातील अडी- अडचणी सोडवण्यासाठी या ग्रामसभेचा मुख्य उद्देश असून तसेच सार्वभौम  ग्रामसभा याविषयी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी मार्गदर्शन केले. 

रब्बी हंगाम पिके तसेच पिकाच्या वाण निवडी पासून ते खत व पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र पोखरणीचे संदीप जायभाये यांनी केले.

 

महाराष्ट्र शासनाचा पुढील काळात 13 लाख पेक्षा अधिक क्षेत्र हे सेंद्रिय शेती खाली आणण्यासाठी आपला मानस असून तो आपल्या माध्यमातून पुढील कालावधीत पूर्ण  करण्याचे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा अनिल गवळी यांनी केले. 

सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून आपण स्वतः सेंद्रिय शेती करत  आहोत असे मालेगाव येथील प्रगतशील शेतकरी संदीप डाकुलगे यांनी आपल्या मनोगत सांगितले. शेतकऱ्यांनी रासायनिक व खतांचा व औषधांचा वापर पिकाच्या उत्पादन वाढीसाठी न करता जैविक औषधांचा व खतांचा वापर करावा. तसेच जैविक खते व औषधी स्वतः तयार कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

 

गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य माऊली महाराज पार्डीकर यांनी मनुष्याने निर्व्यसनी राहावे, आत्महत्या करू नये, कृती करावी, सेवा करावी असा संदेश दिला. शेतकरी हा दिवसेंदिवस आळशी होत चाललेला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढत आहेत. आत्महत्या पर्याय नसून शेतकऱ्यांनी स्वावलंबी बनावे, व्यसन सोडून आत्मविश्वासाने जगले पाहिजे. शासनाच्या योजनेचा चांगला प्रकारे वापर करून प्रगतशील बनले पाहिजे, असे मत बाबुराव महाराज भांगे पार्डीकर यांनी व्यक्त केले.

 

राष्ट्र संतांचे विचार सर्वांनी अमलात आणावे. ईश्वर हेचि माझे घर म्हणून विश्वाची सुधारणा करायची असेल तर प्रथम गावाची सुधारणा करणे आवश्यक आहे असे गोविंद महाराज साबळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले.

0000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...