Wednesday, December 26, 2018


दारु विक्री बंदचा आदेश
नांदेड, दि. 26 :- नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर अपचलनगर साहिब मंडळाचे तीन सदस्य निवडणुकीसाठी शुक्रवार 28 डिसेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी शनिवार 29 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने मतदान व मतमोजणी हद्दीत दारु विक्री बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना काढला आहे.
नांदेड शहर महानगरपालिका व नांदेड शहराच्या परिसरातील वाजेगागव व धनेगाव ग्रामपंचायत हद्दीत मतदान दिवस 28 डिसेंबर रोजी सायं 5.30 वाजेपर्यंत मतदान संपेपर्यंत तर मतमोजणीच्या दिवशी 29 डिसेंबर रोजी मतमोजणी संपेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
निवडणुकीची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनूचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी नांदेड यांनी मतदान होत असलेल्या ठिकाणची सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल/बिआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000

राज्‍यात आणि  जिल्‍हयात येणा-या दिवसात तापमान घसरुन
थंडीच्‍या लाटेची शक्‍यता निर्माण होवु शकते.

      नांदेड, दि. 26 :-  भारतीय हवामान खाते, यांनी येणा-या दिवसात थंडीमध्‍ये वाढ होऊन तापमान खाली येण्‍याची शक्‍यता वर्तविली आहे. थंडीच्‍या लाटेवर करावयाच्‍या प्रतिबंधात्‍मक उपायोजना राष्ट्रीय आपत्‍ती व्यवस्‍थापन प्राधिकरण यांच्‍याकडुन सूचविण्‍यात आलेल्‍या आहेत. जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण नागरीकांना आवाहन  करते की थंडीच्‍या कालावधीत गरम कपडे वापरावे आणि काम न असता थंडीत बाहेर जाण्‍याचे टाळावे. आपल्‍या परिसरात एकटे राहणारे व्‍यक्‍ती अथवा वृध्‍द नागरीक यांची काळजी घ्‍यावी. रॉकेलचे स्‍टोव अथवा कोळश्‍याची शेगडी तापमान वाढविण्‍यासाठीवापराल्‍यास त्‍याचा धुर घरात कोंडु नये व योग्‍यरित्‍या बाहेर निघेल याची काळजी घ्‍यावी. योग्‍य आहार घ्‍यावा आणि थंडीचा त्रास जास्‍त वाटल्‍यास वैदयकिय उपचार वेळेवर घ्‍यावे. नागरीकांना विनंती आहे  की त्‍यांनी त्‍यांच्‍या घरातील निकामी किंवा जुने कपडे, गरम कपडे आणि पांघरुन फुटपाथ,बसस्‍टॅंड, मंदीर परिसर, इत्‍यादी ठिकाणी राहणा-या गरजु बेवारस लोकांना उपलब्‍ध करुन दयावे.
00000



माध्यम प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांसाठी
ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक


नांदेड, दि. 26 :-  आगामी लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएम, व्हीव्हीपॅट या नवीन मशीनचा वापर मतदानासाठी करण्यात येणार आहे. या नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्राबाबत नांदेड जिल्ह्यात जनजागृती मोहिम राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे उपस्थितीत माध्यम प्रतिनिधी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बचत भवन येथे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनद्वारे कसे मतदान केले जाते याचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले.
या मशीनच्या वापरामुळे मतदारांनी ज्या उमेदवाराला मत दिले त्याचा अनुक्रमांक, त्यांचे नाव व चिन्ह ही माहिती सात सेंकदापर्यंत मतदाराला दिसणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारास पडले आहे याची खात्री करुन घेता  येणार आहे. यामुळे कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी पत्रकारांना यंत्राबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी माध्यम प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान करुन माहिती घेतली. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दिपाली मोतियळे, उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, नायब तहसिलदार अश्विनी जगताप, तहसील कार्यालयाचे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन जनजागृती मोहिमेचे पथक तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी, संपादक, पत्रकार व कर्मचारी उपस्थित होते.
000000


पंडित दीनदयाल उपाध्याय
रोजगार मेळाव्याचे आयोजन
नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शुक्रवार 28 डिसेंबर रोजी महात्मा फुले मंगल कार्यालय, फुले मार्केट आयटीआय जवळ नांदेड येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात रायटर सेफग्राऊंड प्रा. लि. मुंबई, धुत ट्रान्समिशन प्रा. लि. औरंगाबाद, नवभारत फलर्टिलायझर प्रा. लि. औरंगाबाद, सिपेट एमआयडीसी औरंगाबाद या कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
एटीएम ऑपरेटर, सिटी बायकर, ऑफीसर रिपेरटर्स ऑफीस कॉल सेंटर, ड्रायव्हर, ट्रेनी ऑपरेटर, फिल्ड ऑफीसर, ट्रेनी या पदाकरीता किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यावेळी उमेदवारांनी सेवायोजन नोंदणी कार्ड व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती सोबत घेऊन यावे, असे आवाहन सहायक संचालक उल्हास सकवान यांनी केले आहे.
00000

Monday, December 24, 2018


नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ
 निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या
अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

नांदेड, दि. 24 :- नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्या निवडणूकीसाठी शुक्रवार 14 डिसेंबर 2018 रोजी गुरु ग्रंथ साहिब भवन नांदेड येथे आयोजित प्रशिक्षणास गैरहजर असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष, क्षेत्रिय अधिकारी तसेच इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस नांदेडचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बजावली आहे.
संबंधीत जिल्हाधिकारी यांचेमार्फत त्यांना खुलासा सादर करण्यास कळविले आहे. गैरहजेरीचा खुलासा सादर  न करणाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी नांदेड यांची अधिसूचना 26 नोव्हेंबर 2018 नुसार नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्य निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूकीसाठी 14 डिसेंबर रोजी आयोजित या प्रशिक्षणास नांदेड, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व अप्पर जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, संबंधीत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी उपस्थित होते.                                                                                      00000


निवडणूक विषयक पहिले प्रशिक्षण संपन्न

नांदेड, दि. 24 :- जिल्हाधिकारी नांदेड यांची अधिसूचना दि. 26 नोव्हेंबर 2018 अन्वये नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री. हुजूर अपचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्य निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. सदरील निवडणूकीसाठी दि. 14 डिसेंबर 2018 रोजी श्री. गुरु ग्रंथ साहिब भवन, नांदेड येथे , सर्व अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण संपन्न झाले . सदरील प्रशिक्षणामध्ये नांदेड, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर , उस्मानाबाद , परभणी , हिंगोली व चंद्रपुर जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक , संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी हे उपस्थित होते. निवडणूक प्रक्रीयेबाबतचे सविस्तर प्रास्ताविक श्री. अरुण डोंगरे , जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले . तसेच निवडणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याबाबतचे मार्गदर्शन श्री. संजय जाधव, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी उपस्थितांना केले. मतदान प्रक्रीयेबाबत आणि मतमोजणी करण्याबाबतचे प्रशिक्षण श्रीमती अनुराधा ढालकरी , उपजिल्हाधिकारी यांनी दिले.
सदरील निवडणूकीचे दुसरे प्रशिक्षण व निवडणूक साहित्य वाटप दि. 25 डिसेंबर 2018 रोजी श्री. गुरु ग्रंथ साहिब भवन, नांदेड येथे होणार असल्याबाबत सर्व संबंधितानी नोंद घ्यावी, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या वतीने कळविले आहे.
000000

Saturday, December 22, 2018


24 डिसेंबर 2018 रोजी राष्‍ट्रीय ग्राहक दिन
              नांदेड, दि. 22:- ग्राहकांच्‍या हक्‍कांची व ग्राहक संरक्षण कायदा याची जनतेत जागृती होण्‍याच्‍या उद्देशाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सोमवारी दिनांक 24 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता राष्‍ट्रीय ग्राहक दिन तहसिल कार्यालय, नांदेड येथे साजरा करण्‍यात येत आहे.
              या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे  राहतील व कार्यक्रमाचे अध्‍यक्ष, जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्‍यक्ष किशोरकुमार रं. देवसरकर राहतील. तसेच प्रमुख वक्‍ते नांदेड जि.ग्र..नि.मंच सदस्‍य रविंद्र बिलोलीकर, सदस्‍य श्रीमती कविता कौ. देशमुख,  अशासकीय सदस्‍य जिल्‍हा ग्राहक संरक्षण परिषदेचे डॉ. श्री.बा.दा. जोशी, जिल्‍हाध्‍यक्ष,.भा. ग्राहक पंचायत विभाग तथा सदस्‍य पुरुषोत्‍तम अमिलकंठवार, अन्‍न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण निधी व्‍यवस्‍थापन समिती, महाराष्‍ट्र हे  राहतील.
     सर्व जनता व ग्राहकांनी 24 डिसेंबर 2018 रोजी साजरा होणाऱ्या राष्‍ट्रीय ग्राहक दिनाच्‍या कार्यक्रमास तहसिल कार्यालय, नांदेड येथील सभागृह येथे सकाळी 11.00 वाजता उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जिल्‍हा पुरवठा अधिकारी, नांदेड यांनी केले आहे. 
****
 
 

वृत्त क्रमांक   जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण नांदेड (जिमाका), दि. 17: मराठवाडा मुक्ती संग्राम ...