Tuesday, April 28, 2020


कोरोनाचा एक संशयित रुग्ण निगेटिव्ह ;
नांदेड जिल्ह्यासाठी दिलासादायक परिस्थिती ;
799 नमुने तपासणीसाठी त्यापैकी 729 नमुने निगेटिव्ह
62 नमुन्यांचा अहवाल बाकी तर 5 नाकारण्यात आली
नांदेड दि. 28 :- जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचे एकुण दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळली होती. त्यापैकी नांदेड पिरबुऱ्हाणनगर येथील व्यक्तीचा सहा दिवसाच्या उपचारानंतर तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक परिस्थिती असून आतापर्यंत क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची एकूण संख्या 985 एवढी आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 285 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 81 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 108 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 877 अशी संख्या आहे.
तपासणीसाठी एकुण 799 नागरिकांचे नमुने घेण्यात आली होती. त्यापैकी 729 नमुने निगेटीव्ह आली आहेत. तर 62 नमुन्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने  नाकारण्यात आली आहेत.
नांदेड जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 82 हजार 271 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.
00000




पिरबुऱ्हाणनगर येथील कोरोना बाधित व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह
नांदेड शहरात 19 हजार 856 व्यक्तींची थर्मल मशीनने तपासणी  
या व्यक्तींमध्ये ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे नाहीत
अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडतांना मास्क, स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करा महानगरपालिकेचे आवाहन

नांदेड दि. 28 (जिमाका):-  शहरातील पिरबुऱ्हाणनगर येथील कोरोना बाधित व्यक्तीचा सहा दिवसाच्या उपचारानंतर तपासणी अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. पिरबुऱ्हाणनगर कन्टेंमेंट झोनमध्ये आज सातव्या दिवशी 4 हजार 159 घरातील 17 हजार 996 व अबचलनगर कन्टेंमेंट झोनमध्ये 467 घरातील 1 हजार 860 व्यक्तींची ताप, सर्दी व खोकला आदी लक्षणाबाबत आरोग्य विभागामार्फत थर्मल मशीनने तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्या या नागरिकांना वरीलपैकी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आली नाहीत.
महानगरपालिका क्षेत्रातील अबचलनगर येथील एका 44 वर्षीय नागरीकाला कोरोनाची बाधा झाल्यामुळे सोमवार 27 एप्रिल 2020 पासून अबचलनगर व लगतचा परिसर हा कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित करुन सील करण्यात आला आहे. आरोग्य विभागातर्फे अबचलनगर येथील कोरोना बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील तीन व्यक्तींना एनआरआय निवास येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील 11 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.  
मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अजीतपालसिंघ संधु व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन हे अबचलनगर व पिरबुऱ्हाणनगर कन्टेंमेंट झोनवर लक्ष ठेवून आहेत.  नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वारंवार हात स्वच्छ धुवावे, अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडतांना मास्क किंवा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करावा, असे आवाहन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.  
000000


कोरोना विषयी माहिती देणारा
आरोग्‍य सेतू अॅप डाउनलोड करुन घेण्याचे आवाहन
नांदेड, दि. 28 (जिमाका) :- भारत सरकारने कोविड-19 ची माहिती सर्वसामान्‍य जनतेला उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी अॅन्‍ड्रॉईड व आयओएस (अॅपल मोबाईल) प्रणालीधारक भ्रणध्‍वनी धारकांसाठी बहूभाषिक (एकुण 11 भाषांमध्‍ये उपलब्‍ध) आरोग्‍य सेतू अॅप विकसित केला आहे. कोरोना विषयी माहिती देणारा हा आरोग्‍य सेतू अॅप डाउनलोड करुन घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
या अॅपची सर्वसाधारण वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. हे अॅप ब्‍्ल्‍यूटूथ टेक्‍नॉलॉजीवर आधारीत आहे. याव्‍दारे कोविड-19 बाधीत रुग्‍णांच्‍या भ्रमणध्‍वनी क्रमांकाच्‍या संकलित माहितीच्‍या आधारे जी.पी.एस. टेक्‍नॉलॉजीव्‍दारे कोविड बाधीत रुग्‍ण आस-पास आल्‍यास (साधारणतः सहा फुटाच्‍या अंतरावर) वापरकर्त्यास धोक्‍याची सूचना देण्यात येते. या अॅपमधून कोविड-19 बाधेची स्‍वःचाचणी सुविधा, प्रतिबंधात्‍मक उपाययोजना, सामाजिक अंतर बाळगणे व प्रतिबंधासाठी काय करावे किंवा काय करु नये या बाबतची प्रमाणित माहिती वापरकर्त्‍यास मिळते.  स्‍वःचाचणीमध्‍ये वापरकर्ता अति धोकादायक स्थितीत आढळल्‍यास या अॅपद्वारे जवळच्‍या कोविड तपासणी केंद्राचा क्रमांक उपलब्‍ध करुन दिला जातो. अथवा तात्‍काळ 1075 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्‍याबाबत वापर कर्त्‍यास या अॅपद्वारे सुचविण्‍यात येते. या अॅपव्‍दारे कोविड-19 बाधेच्‍या अनुषंगाने वापरकर्त्याच्‍या सर्वसाधारण प्रश्‍नांची प्रमाणित उत्‍तरे दिली जातात. तसेच सर्व राज्‍यातील हेल्‍पलाईन क्रमांक उपलब्‍ध करुन दिला जातो. या अॅपव्‍दारे लॉकडाऊन काळात वापरकर्त्‍यास अपरिहार्य परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्‍याची आवश्‍यकता भासल्‍यास ई-पासद्वारे अर्ज करुन पास मिळण्‍याची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.

हे अॅप खालीलप्रमाणे डाऊनलोड करण्‍याची सुविधा आहे.

Ios : itms-apps://itunes.apple.com/app/id505825357

00000


व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद
राज्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी 20 हजार कोटी रुपयांची    
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
नांदेड, दि. 28:- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील विविध  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सचिव यांच्याशी दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आज संवाद साधला. यावेळी राज्य शासनाच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यातील महामार्गाच्या कामांबाबत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे श्री. गडकरी यांच्याशी संवाद साधून राज्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी 20 हजार कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाला देण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी  यावेळी केली.
पालकमंत्री अशोक चव्हाण पुढे म्हणाले, राज्यातील महामार्गाच्या कामातील अडचणी लक्षात घेऊन त्या दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करावी. या समितीमार्फत महामार्गाच्या कामांचे प्रश्न सोडविता येतील. अनेक कामे वेळेवर कंत्राटदारांकडून पूर्ण होत नसल्याने या कामांना विलंब होत असल्याचे लक्षात घेऊन त्या कंत्राटदारांची कामे काढून उर्वरित कामांसाठी निविदा प्रक्रियाद्वारे नवीन कंत्राटदारांना कामे सोपवून वेळेत ती पूर्ण करुन घेण्याची कार्यवाही करावी. 
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अंकलेश्वर-चोपडा-बऱ्हाणपूर, गेवराई-शेवगाव-नेवासा-संगमनेर-शहापूर,पोलादपूर-महाबळेश्वर-शिरुर, सागरीमार्ग-खोल-अलिबाग-रत्नागिरी-वेंगूर्ला-रेड्डी-गोवा राज्य सिमा रस्त्यांना राष्ट्री महामार्गाचा दर्जा देवून कामे मंजूर करण्याची मागणी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
000000

Monday, April 27, 2020


आपले सरकार सेवा केंद्रामार्फत
शासकीय हमीभाव खरेंदी केंद्रासाठी
शेतकरी बांधवांनी नोंदणी करावी
नांदेड, दि. 27 :- शासनाने घोषित केलेल्या हमीभावानुसार चना खरेदीसाठी नाफेड मार्फत राज्य पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ व महाफार्मस्‍ यांचेवतीने नांदेड जिल्ह्यात एकंदर 15 सबएजंट संस्थांची / शेतकरी उत्पादक कंपन्याची नेमणूक करण्यात आली असून सद्यस्थितीत शासनाने घोषीत केलेल्या हमीभावापेक्षा (रु. 4,875/- प्रति क्विंटल) बाजार भाव रु. 900 ते 1,000/- पेक्षा कमी असल्यामुळे शेतकरी त्यांच्या पिकाची नोंदणी करण्यासाठी सबएजंट संस्थेकडून स्थापन केलेल्या केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत.
सध्या कोव्हिड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी (Lock Down) घोषीत करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सबएजंट संस्थांकडे असलेले अपुरे तांत्रिक व सक्षम मनुष्यबळ तसेच पुरेसे संगणक, स्कॅनर, आदिंची अनुपब्धता विचारात घेता शेतकऱ्यांच्या शेतमालाची नोंदणी गाव पातळीवर उपलब्ध असलेल्या आपले सरकारसेवा केंद्रांद्वारे झाल्यास गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यास निश्चितच मदत होणार आहे व शेतकऱ्यांनाही ते सोईचे ठरणार आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील गाव पातळीवर उपलब्ध असलेल्या आपले सरकारसेवा केंद्रांस सामाजिक अंतर (Social distancing) चे पालन करुन नोंदणी करणेसाठी परवानगी दिलेली आहे.
नांदेड जिल्ह्यात सध्या प्रायोगीक तत्त्वावर देगलूर तालुक्यातील गवंडगाव, बिलोली तालुक्यातील कासराळी, हदगाव तालुक्यातील मनाठा, निवघा, तळणी व तामसा किनवट तालुक्यातील दिगडी (एम), कोठारी (चि.), मांडवा (कि.), मांडवी व सारखनी येथील आपले सरकारसेवा केंद्रांवर नोंदणीची कार्यवाही सुरु करण्यात आले असून जिल्ह्यातील इतर ठिकाणी येत्या दोन-तीन दिवसात आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नोंदणी सुरु केली जाणार आहे.
तेंव्हा शेतकऱ्यांनी आपले सरकारसेवा केंद्रांवर नोंदणीसाठी येताना त्यांचे आधार ओळखपत्र, पीक पेऱ्याची Online नोंद असलेला गाव नमुना क्र. 7/12 चा उतारा, वैयक्तिक संगणकीकृत पेरा प्रमाणपत्र, आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक बचत खात्याच्या पहिल्या पानाची छायाप्रत व बँक खात्याशी जोडलेला भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन यावा. शेतकऱ्यांनी सदर नोंदणी केंद्रावर गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच गावातील आपले सरकारसेवा केंद्रांवर कमीत-कमी गर्दी होईल यासाठी संबंधित गावातील पोलीस पाटील, सरपंच, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, इ. यंत्रणेने त्यांचे स्तरावरुन आवश्यक ते सहकार्य करावे. नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांची एकदम गर्दी होणार नाही या दृष्टीने संबंधित घटकांशी समन्वय ठेवून आपले स्तरावर नियोजन व अंमल करावा. तेव्हा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी गावपातळीवर असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन चना शेतमालाची नोंदणी करुन घ्यावी.
000000





https://www.facebook.com/100009273684447/videos/2564369513882146/?id=100009273684447


नांदेड आरोग्य यंत्रणा कोविड19 च्या प्रतिबंधासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि सर्व अधिकारी व कर्मचारी सज्ज असून आरोग्य टीमच्या यशस्वी कार्यासाठी साठी शुभेच्छा#stayhome staysafe#coronafighters
नांदेड जिल्ह्यात 1 हजार 15 संशयितांची झाली नोंद
घेण्यात आलेले 737 नमुन्यांपैकी 677 जण निगेटिव्ह ;
53 जणांचा अहवाल प्रलंबित तर दोन कोरोना रुग्ण पॉझीटिव्ह   
नांदेडदि. 27 (जिमाका) :- कोरोना विषाणु संदर्भात आज सोमवार 27 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकुण 1 हजार 15 संशयितांची नोंद झाली आहे. यापैकी घेण्यात आलेले स्वॅब एकुण 737 आहेत, त्यापैकी 677 निगेटिव्ह असून 53 स्वँब अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण 5  स्वँब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे.
आतापर्यंत एकूण घेण्यात आलेले स्वँब 737 असून त्यापैकी 2 रुग्णांचा स्वँब पॉझीटिव्ह आढळला आहे. हे रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारासाठी दाखल आहेत.
नांदेड शहरातील पिरबुऱ्हाणनगर येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल बुधवार 22 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला आहे.  या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व दमा यासारखे गंभीर आजार असल्यामुळे प्रकृती गंभीर आहे. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण 80 व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले, या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  
नांदेड शहरातील अबचलनगर येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल रविवार 26 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला असून या रुग्णाची प्रकृती स्थीर आहे. तसेच त्याचा निकटवर्तीय संपर्कातील 16 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता कोणत्याही अफवावर विश्वासु ठेवु नका, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
000000

वृत्त क्रमांक   भरती परीक्षा सुधारणांवर उच्चस्तरीय समितीशी संवाद !   विद्यार्थी , उमेदवार व संबंधित घटकांनी उपस्थित राहावे   नांदेड, दि. 19 ...