Tuesday, September 1, 2026

वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यासाठी आज ‘यलो अलर्ट’

विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. १ : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी उद्या दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी एका दिवसासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

दि. २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणा व नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

आकाशात वीज चमकत असल्यास घ्यावयाची काळजी

विजांच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास जवळपास सुरक्षित इमारत उपलब्ध नसल्यास सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. झाडांखाली किंवा धोकादायक ठिकाणी थांबू नये. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर उभे राहणे टाळावे. घरामध्ये असताना विद्युत उपकरणे सुरू असल्यास ती त्वरित बंद करावीत. तारांचे कुंपण, विजेचे खांब तसेच इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे. पाण्यात उभे असल्यास तात्काळ पाण्याबाहेर पडावे.

आकाशात वीज चमकत असताना घरातील लँडलाइन दूरध्वनीचा वापर करू नये. शॉवरखाली अंघोळ करणे तसेच घरातील नळ, पाण्याच्या पाइपलाइन अथवा इतर विद्युत उपकरणांना स्पर्श करणे टाळावे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे सुरू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये. उंच झाडाखाली तसेच धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नये. घरात असल्यास उघड्या दरवाजातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहणे टाळावे. बाहेर थांबण्यापेक्षा घरात सुरक्षित राहणे अधिक सुरक्षित आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी कळविले आहे.

***

वृत्त क्रमांक 

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिन

जनतेच्या तक्रारी व अडचणींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी आयोजन

नांदेड(जिमाका), दि. १ : सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकानुसार सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी व अडचणींना न्याय व तत्परतेने सोडवणूक मिळावी, यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा लोकशाही दिन सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ ते ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे होणार आहे.

या लोकशाही दिनासाठी महसूल, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, सहकार विभाग, कृषी विभाग तसेच पाणीपुरवठा समन्वय अधिकारी आदी जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी व त्यांच्या कार्यालयांकडे प्रलंबित असलेली प्रकरणे घेऊन संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

लोकशाही दिनाच्या दिवशी निवेदनांची नोंदणी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार असून, त्यानंतर प्राप्त अर्ज व निवेदनांवर ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी व अडचणी एकत्रितरीत्या समजून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.

***

वृत्त क्रमांक 

‘तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानास नांदेड जिल्ह्यात प्रारंभ

• 30 वर्षांवरील नागरिकांची असंसर्गजन्य आजारांसाठी मोफत तपासणी

नांदेड (जिमाका), दि. 1 : राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ‘तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ हे 100 दिवसांचे आरोग्य अभियान दि. 1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील 30 वर्षे व त्यावरील सर्व महिला व पुरुषांची असंसर्गजन्य आजारांसाठी मोफत तपासणी या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.

या अभियानाचा मुख्य उद्देश असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान करून बाधित व संशयित रुग्णांना तातडीने योग्य उपचार उपलब्ध करून देणे हा आहे. अभियानांतर्गत 30 वर्षे व त्यावरील ज्या महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी झालेली नाही, अशा नागरिकांची यादी व नोंदणी करण्यात येणार आहे.

या अभियानात मधुमेह व उच्च रक्तदाबाचे लवकर निदान करण्याबरोबरच तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत संशयित आढळणाऱ्या रुग्णांना पुढील तपासणी व उपचारासाठी संदर्भित करण्यात येईल. तपासणीपासून निदान, उपचार आणि पाठपुराव्यापर्यंतची माहिती संबंधित पोर्टलवर अद्ययावत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.

हे अभियान जिल्ह्यातील गावपातळीवर मिशन मोडवर राबविण्यात येणार असून 30 वर्षे व त्यावरील 100 टक्के नागरिकांची असंसर्गजन्य आजारांसाठी तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या संकल्पनेसाठी हे अभियान महत्त्वपूर्ण असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी सांगितले.

ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका, एएनएम व एमपीडब्ल्यू यांच्यामार्फत घरोघरी भेटी देण्यात येणार आहेत. दररोज सुमारे 40 ते 45 घरांना भेटी देऊन तपासणी न झालेल्या नागरिकांची यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर समुदाय वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांच्या माध्यमातून गावनिहाय पथके तयार करून नागरिकांची प्रत्यक्ष आरोग्य तपासणी करण्यात येईल.

तपासणीनंतर आवश्यकतेनुसार नागरिकांना समुपदेशन तसेच पुढील उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निदान झालेल्या रुग्णांना उपचार मिळत आहेत की नाही, याबाबत नियमित पाठपुरावाही करण्यात येईल.

या अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व तपासण्यांची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यात येणार असून तपासणी, निदान, उपचार व पाठपुराव्याची माहिती पोर्टलवर अद्ययावत केली जाणार आहे. तसेच डॅशबोर्डच्या माध्यमातून अभियानाच्या प्रगतीवर नियमित देखरेख ठेवण्यात येणार आहे.

नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसण्याची वाट न पाहता वयाच्या 30 वर्षांनंतर नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि ‘तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.

***

Monday, August 31, 2026

वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

मतदारांनी 30 सप्टेंबरपूर्वी दावे व हरकती नोंदवाव्यात-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

नांदेड(जिमाका), दि. 31 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम  राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत आज दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रारूप मतदार यादी सर्व तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये तसेच संबंधित मतदान केंद्रांवर नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रारूप मतदार यादीसोबत अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदार यांची यादी जिल्ह्याच्या अधिकृत https://nanded.nic.in या संकेतस्थळावर⁠ प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दावे व हरकतींसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत

प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीची तारीख 31 ऑगस्ट 2026 असून, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 असा आहे. दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदारांनी यादीतील नाव तपासावे

जिल्ह्यातील सर्व मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव, पत्ता व इतर तपशील अचूक असल्याची खात्री करावी. मतदारांना आपले नाव भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर⁠ किंवा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://voters.eci.gov.in  किंवा https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर⁠ ऑनलाइन तपासता येईल. तसेच संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), तहसील कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयातही मतदार यादीची पाहणी करता येईल.

नवमतदारांसाठी विशेष संधी

ज्या नागरिकांचे वय 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण होत आहे, ते नवमतदार म्हणून नोंदणीस पात्र आहेत. पात्र नागरिकांनी नमुना 6 चा अर्ज घोषणापत्रासह व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.

मतदारांसाठी विविध नमुना अर्जांची तरतूद करण्यात आली आहे. नमुना 6 नवीन मतदार नोंदणीसाठी, नमुना 6A परदेशस्थित भारतीय मतदारांच्या नोंदणीसाठी, नमुना 7 मतदार यादीतील नावाला हरकत घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी, तर नमुना 8 नाव, वय, पत्ता आदी तपशीलात दुरुस्ती, अपंगत्वाचे चिन्हांकन किंवा मतदाराचे नाव स्थलांतरित करण्यासाठी वापरता येईल.

नोटीस प्राप्त मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहावे

मतदार यादीतील नाव, वय, इतर तपशीलातील विसंगती किंवा अनमॅपिंगच्या अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी सुनावणीस उपस्थित राहताना जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.

1 जुलै 1987 पूर्वी भारतात जन्मलेल्या व्यक्तींनी स्वतःची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे आवश्यक कागदपत्र सादर करावे. 1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 दरम्यान भारतात जन्मलेल्या व्यक्तींनी स्वतःसोबत वडील किंवा आई यांची जन्मतारीख आणि जन्मस्थळ सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 2 डिसेंबर 2004 नंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तींनी स्वतःसोबत वडील व आई यांची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

पालकांपैकी कोणीही भारतीय नागरिक नसल्यास मतदाराच्या जन्माच्या वेळी संबंधित व्यक्तीचा वैध पासपोर्ट व व्हिसाची प्रत सादर करणे आवश्यक आहे. भारताबाहेर जन्म झाल्यास विदेशस्थित भारतीय दूतावास किंवा मिशनने जारी केलेल्या जन्म नोंदणीच्या पुराव्याची प्रत, तर नोंदणीकरण अथवा नागरिकीकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले असल्यास नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करावी.

मान्य कागदपत्रांमध्ये विविध पुराव्यांचा समावेश

जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी सूचक व सर्वसमावेशक नसलेल्या कागदपत्रांच्या यादीमध्ये केंद्र व राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारकांना दिलेले ओळखपत्र अथवा निवृत्तीवेतन प्रदान आदेश, शासन किंवा स्थानिक प्राधिकरण, बँका, टपाल विभाग, एलआयसी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांनी भारतात निर्गमित केलेले दिनांक 1 जुलै 1987 पूर्वीचे ओळखपत्र अथवा दस्तऐवज, सक्षम प्राधिकरणाचे जन्म प्रमाणपत्र, पारपत्र, मान्यताप्राप्त मंडळ अथवा विद्यापीठाचे मॅट्रिक्युलेशन/शैक्षणिक प्रमाणपत्र, कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, इतर मागासवर्गीय/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अथवा इतर जात प्रमाणपत्र, लागू ठिकाणी राष्ट्रीय नागरिक नोंदवही, शासकीय अधिकाऱ्यांनी जतन केलेली कौटुंबिक नोंदवही तसेच शासनाकडून निर्गमित जमीन/घर वाटप प्रमाणपत्र आदींचा समावेश आहे.

आधारबाबत भारत निवडणूक आयोगाच्या पत्र क्र. 23/2025-ERS/Vol. II दिनांक 9 सप्टेंबर 2025 (परिशिष्ट-II) अन्वये निर्गमित निर्देश लागू राहतील.

पात्र नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा

“लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विशेषतः तरुण नवमतदारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील व परिसरातील सर्व पात्र मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. नजरचुकीने एखादा पात्र मतदार वगळला गेला असल्यास नमुना 6 चा अर्ज घोषणापत्रासह व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. कोणतीही त्रुटी अथवा नाव वगळले असल्यास 30 सप्टेंबर 2026 पूर्वी संबंधित बीएलओ किंवा पोर्टलवर दावे व हरकती नोंदवाव्यात.”

मतदार यादीच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीत मतदार नोंदणी अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील करता येईल. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.

****



वृत्त क्रमांक 

भटके-विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रमाणपत्रांचे विशेष शिबिर

हस्सापूर येथील आश्रमशाळेत भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा

नांदेड(जिमाका), दि.31 : भटके-विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली विविध शासकीय प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी हस्सापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक आश्रमशाळा तसेच जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 31 ऑगस्ट हा भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांना क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे समग्र वाङ्मय हा ग्रंथ भेट देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग काकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार (महसूल) सुनील माचेवाड उपस्थित होते.

याप्रसंगी प्राध्यापक, लेखक व कवी अशोक कुबडे यांनी भटके-विमुक्त जमातीचा इतिहास, सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक प्रगती तसेच विद्यार्थ्यांसमोरील विविध संधी व आव्हाने याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध संधींचा लाभ घेऊन आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नायब तहसीलदार सुनील माचेवाड यांनी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासह आवश्यक विविध शासकीय प्रमाणपत्रे मिळविण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेण्यासाठी करावयाची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राचे चालक गणेश मॅकल यांच्या माध्यमातून आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रमाणपत्रे काढताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होऊन शासकीय प्रक्रियेत सुलभता निर्माण होणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस. एल. गायकवाड तसेच प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व्ही. आर. कदम यांचे सहकार्य लाभले. श्रीमती एस. एस. शेळके यांनी स्वागतगीत सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी. आर. कळसे यांनी केले.

या विशेष शिबिरामुळे भटके-विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांना शासकीय कागदपत्रे तसेच विविध शासकीय योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण विकासाला या उपक्रमाचा निश्चितच लाभ होणार आहे.

***





 वृत्त क्रमांक 

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

‘खेलेगा भारत, जितेगा भारत’च्या घोषवाक्यासह ४५० खेळाडूंचा सामुदायिक रॅलीत सहभाग

नांदेड(जिमाका), दि. ३१ : महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या अतुलनीय क्रीडायोगदानाची स्मृती जपण्यासाठी तसेच युवकांमध्ये खेळ व क्रीडा संस्कृतीची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन नांदेड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन तसेच विविध एकविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित खेळाडूंना क्रीडा शपथ देण्यात आली. सायंकाळच्या सत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांनी खेळाडू व प्रशिक्षकांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. “मैदान आपली वाट पाहत आहे. तुमची मेहनत आणि जिद्द दाखवा. जिंकलात तर विनम्र राहा आणि हरलात तर अधिक शिकून पुन्हा मैदानावर उतरा,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच कुटुंबीय व मित्रांना दररोज एक तास खेळ आणि फिटनेस उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नांदेड कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी किशोर पाठक, नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. इम्तियाज खान, उपाध्यक्ष विनोद गोस्वामी, सचिव रवी बकवाड, राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, चंद्रकांत पुलकंटवार, विजय गावंडे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिरसाठ आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमास विविध क्रीडा संघटनांचे खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक, एकनाथ पाटील अकॅडमीचे प्रतिनिधी व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘खेलेगा भारत, जितेगा भारत’च्या घोषवाक्याने सामुदायिक रॅली
राष्ट्रीय क्रीडा दिन सप्ताहाच्या अनुषंगाने ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता सामुदायिक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांचे खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शक तसेच एकनाथ पाटील अकॅडमीचे खेळाडू आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे अधिकारी-कर्मचारी अशा सुमारे ४५० खेळाडूंनी सहभाग घेतला. ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या घोषवाक्याने रॅली उत्साहात संपन्न झाली.

संपूर्ण कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमप्रमुख क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, संजय चव्हाण, हनमंत नरवाडे, इक्रम शेख, मोहन पवार, सुभाष धोंगडे, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे, सोनबा ओव्हाळ आदींनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले, तर आभार क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांनी मानले. 
**




Friday, August 28, 2026

वृत्त क्रमांक 

रक्षाबंधनानिमित्त ‘रोड सेफ्टी राखी-२०२६’ उपक्रमाचे आयोजन

वाहतूक नियमांचे पालन करून रस्ते सुरक्षित करण्याचे पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांचे आवाहन

नांदेड, दि. २८ : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहर वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि ‘सेफर इंडियन रोड्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रोड सेफ्टी राखी-२०२६’ या अभिनव जनजागृती उपक्रमाचे आज येथील वझीराबाद सर्कल रोड, पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी वाहनचालक व नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे तसेच रस्त्यावरील इतर वापरकर्त्यांचा आदर करण्याचे आवाहन केले. जीवघेणे रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. वाहनचालकांनी सतर्क व सुरक्षित वाहन चालविण्याचे कौशल्य आत्मसात करावे, असे त्यांनी सांगितले.

बहुतांश जीवघेणे अपघात हे मानवी चुका तसेच रस्ते सुरक्षेच्या नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे घडतात. त्यामुळे नागरिकांनी रस्ता सुरक्षेबाबतच्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या आपल्या कुटुंबीय व प्रियजनांपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

पालकांनी अल्पवयीन मुलांना योग्य वाहन चालविण्याचे प्रशिक्षण आणि वैध वाहन परवाना मिळेपर्यंत कोणतेही वाहन चालविण्यास प्रोत्साहन देऊ नये. तसेच पादचाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी पदपथांचा वापर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नांदेड शहर वाहतूक पोलीस महानगरपालिका प्रशासनाच्या समन्वयाने शहरातील पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करीत आहेत. शहरातील रस्ते वाहनचालक, पादचारी आणि सर्व नागरिकांसाठी अधिक सुरक्षित करण्यासाठी नागरिकांनी पोलीस व महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने रस्ता सुरक्षेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणारा हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी नांदेड शहर वाहतूक पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच ‘सेफर इंडियन रोड्स’च्या सदस्यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमास वाहतूक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, ‘सेफर इंडियन रोड्स’चे सदस्य घनशाम ओझा, महेश तिवारी, सोनू उपाध्याय, अंबादास जोशी, तरुण तिवारी, सिमरन तिवारी, राजश्री अडबलवार, वरुण तिवारी, सय्यद जैद अली, नेताल तिवारी, सृष्टी उपाध्याय, राघव तिवारी यांच्यासह नांदेड शहर वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

****





वृत्त क्रमांक   जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण नांदेड (जिमाका), दि. 17: मराठवाडा मुक्ती संग्राम ...