Wednesday, July 10, 2024

 वृत्त क्र. 572 

‍दिव्यांगानो मोफत संगणकिय

व व्यावसायिक प्रशिक्षणाचा लाभ घ्या 

नांदेड, दि. 10 जुलै :-  दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. या प्रशिक्षणासाठी गरजू दिव्यांगानी प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन मिरज शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे अधिक्षक यांनी केले आहे. 

प्रवेशासाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. 

अभ्यासक्रमाचे नाव, शैक्षणिक पात्रता- सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथएम.एस. ऑफिस (संगणक कोर्स) किमान इयत्ता 8 वी पास, मोटार ॲन्ड आमेंचर रिवायडींग, सबमसिंबल पंप सिंगलफेज, (इलेक्ट्रीक कोर्स) किमान इयत्ता 9 वी पास. वय 16 ते 40 वर्षे, प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष, फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो. 

सोई व सवलती- प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवण्याची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कीग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना. 

अर्ज केव्हा, कसे व कोठे करावेत – प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळीरोड, म्हेत्रेमळा, गोदड मळयाजवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली-416 410 दु.क्र.0233-2222908 मोबाईल क्र. 9922577561, 9595667936 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एसएससी मार्कशिट व प्रमाणपत्र, दिव्यांग असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला यांच्या झेराक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर  तज्ञ समितीद्वारे मुलाखती घेवून प्रवेश देण्यात येईल. माफक जागा असल्याने गरजू दिव्यांगानी लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 विभागीय माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध 

लातूर (विमाका) दि. 10 : विभागीय माहिती कार्यालय, लातूर येथील वृत्तपत्रांची रद्दी विक्रीसाठी काढण्यात आली आहे. ज्यांना रद्दी घ्यावयाची असेल त्यांना कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. ज्यांना रद्दी विकत घ्यावयाची  आहे, त्यांनी त्यांचे लिफाफाबंद दरपत्रक


मा. उपसंचालक (माहिती),  विभागीय माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, उत्तर बाजू, लातूर या पत्यावर दि. 18 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या  दिवशी  दाखल करावीत. या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामाच्या दिवशी पाहता येतील .


रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, लातूर यांना राहतील.

 *******

 वृत्त क्र. 571  

नांदेड मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये : जिल्हाधिकारी

नांदेड दि. १० : हिंगोली शहराचा केंद्रबिंदू असणाऱ्या आज सकाळी झालेल्या भूकंपाची रिश्टर स्केलवर 4.5 नोंद झाली आहे. हा अति सौम्य भूकंप असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.दि. 10 जुलै 2024 रोजी नांदेड शहर व नांदेडमधील सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ व भूकंप संदर्भात अभ्यास करणाऱ्या भूकंपशास्त्र केंद्रीय विभागाकडून अधिक अभ्यास केला जात आहे.

भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत. असे आवाहन श्री. अभिजीत राऊत यांनी केले आहे.
00000


 


आज सकाळी जिल्ह्यात जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याबाबत 
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निवेदन. 
नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन

मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर

जिल्हा प्रशासन व आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश

--उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती


हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीमसह

मराठवाडा, विदर्भात कुठेही जिवित किंवा वित्तहानीची माहिती प्राप्त नाही

--उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदन


भुकंप झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरुन न जाता

सतर्क राहून भुकंपकाळात बचाव उपाययोजना राबवाव्यात

--उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत आवाहन

मुंबई, दि. 10 :- राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झाली नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज  विधानसभेत दिली. 

विधानसभेत राज्य शासनाच्या वतीने निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची राज्य शासनाने गंभीर नोंद घेतली असून संबंधित जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच सर्व  प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये, मात्र सतर्क राहून बचावासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. गावांमध्ये ज्या घरांवर पत्र्याचे छत आहे, त्यावर आधारासाठी ठेवलेले दगड काढून टाकावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे. राज्य शासन संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या भूकंप आणि नुकसानीसंदर्भातील अधिकची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

०००००००

Tuesday, July 9, 2024

लेख

 10 जुलै- राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिवस  

भारताच्या एकूण जीडीपीच्या 1टक्के व कृषी जीडीपीच्या 5 टक्के वाटा मत्स्योत्पादनामार्फत येतो आणि हे सर्व शक्य झाले आहे केवळ आणि केवळ एका व्यक्तीमुळे ज्यांना भारतातील नीलक्रांतीचे जनक म्हणजेच फादर ऑफ ब्लू रेवोल्युशन  डॉ. हिरालाल चौधरी. 

भारताचा पूर्व उत्तरी हिस्सा हा त्याच्या विशिष्ट संस्कृती व समुदायामुळे प्रसिद्ध आहे याच भागातील एक राज्य आसाम; खरंतर हे राज्य चहाच्या मळ्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. आसाममधील एका ठिकाण शिलाटी येथे सन 1921 मध्ये डॉ.हिरालाल चौधरी यांचा जन्म झाला.शिलाटी हे ठिकाण सध्या बांगलादेशात श्रीहट्टा नावाने ओळखले जाते. श्रीहट्टामधील सुरमा घाटीला लागून असलेल्या कुबाजपुर या छोट्या गावात श्री गिरीश चंद्र चौधरी या सिविल इंजिनियरच्या घरात 21 नोव्हेंबर 1921 रोजी यांचा जन्म झाला.अत्यंत प्रतिभाशाली विद्यार्थी असलेले हिरालाल चौधरी यांनी सन 1941 मध्ये आपले बीएससी शिक्षण पूर्ण केले. सन 1943 मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या अंतर्गत त्यांनी झूलॉजी या विषयात एम एस सी पूर्ण केले. त्यानंतर सिलट येथील माणिकचंद महाविद्यालयात जैवविज्ञानिक विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली.सन 1947 मध्ये भारत पाक फाळणीच्यादरम्यान त्यांना नोकरी गमवावी लागली. 

सध्याच्या बांग्लादेशात स्थीत असलेले श्रीहट्टा हे तत्कालीन पुर्व पाकिस्तानात येत असे.सन 1948 मध्ये ते सेंट्रल इन्लॅंड फिशरीज रिसर्च इंस्टीट्युट, बरकपुर येथे कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर रुजु झाले. एके दिवशी बरकपूर येथे रहात असताना गंगेच्या किनारी आढळणाऱ्या मासळीचे फुगलेले पोट दिसून आले ते पोट दाबताच त्यातुन पारदर्शी अंडे बाहेर आले. निरीक्षणाकरीता त्यांनी ही अंडी एका भांड्यात त्यांनी जमा केली आणि निरीक्षणादरम्यान डॉ.चौधरी यांना कार्प माशांच्या प्रेरित प्रजननाची संकल्पना सुचली. 

कार्प प्रजाती आशिया व युरोप खंडातील मूळ निवासी मत्स्य प्रजाती मानली जाते.तलावातील बंदिस्त प्रणाली कार्प प्रजातीच्या प्रजननासाठी प्रतिकुल असल्याने अशा वातावरणाचा परिणाम माशाच्या पियुषिका ग्रंथी व जननग्रंथीवर होत असे.या दोन्ही ग्रंथीच्या अपु-या स्त्रावामुळे माशाचे बंदिस्त प्रणालीत प्रजनन होत नसे.त्याकाळात कार्प प्रजातीच्या संवर्धनाकरीता संपुर्णपणे नैसर्गिक बिजावर अवलंबुन राहावे लागत असे. 

मत्स्यबीज उत्पादनाची समस्या सोडविण्याकरीता प्रेरीत प्रजननाच्या तंत्रज्ञानाचा शोध लागला.या शोधामुळे भारतात आज रोजी मोठ्याप्रमाणात भुजलाशयिन मत्स्योत्पादन घेतले जाते.भूजलाशयीन मत्स्यप्रजातीमध्ये कार्प मासळीला जागतिक बाजारपेठेत अनन्य साधारण महत्व आहे.

सर्वप्रथम हा प्रयोग ‘स्मॉल मड गोबी प्रजातीच्या मास्यंवर करण्यात डॉ. चौधरी यांना यश मिळाले.त्याच वेळी सन 1950 मध्ये त्यांची वरीष्ठ संशोधन साहाय्यक या पदावर ‘सेंट्रल इंनलॅंड फिशरीज रिसर्च इंस्टीट्युटच्या पॉंड कल्चर सेक्शन मध्ये पदोन्नतीने नियुक्ती झाली.जेथे ते डॉ. अलीकुन्ही यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. डॉ.अलीकुन्ही यांनी डॉ.चौधरी यांना त्यांच्या प्रयोगाचे कार्य करण्याकरीता नेहमी प्रेरणा दिली त्याचबरोबर अमेरिकेतील अबुरान युनिव्हर्सिटीतील मत्स्य प्रेरीत प्रजनन या विषयात पारंगत असलेल्या जगभरात प्रख्यात डॉ.स्विंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्यांना अमेरिकेत पाठवले. सन 1955 मध्ये ptutory gland extract (पियुषिका ग्रंथीच्या अर्क) चा मत्स्य प्रजननावर होणारा परिणाम या विषयाच्या शोधनिबंध लिहिला व या निबंधाच्या साहाय्याने अमेरिकेतील अबुरान युनिव्हर्सिटीमधून मत्स्यपालन व्यवस्थापन या विषयातून मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली व त्यानंतर ते भारतात परतले.

 भारतात परतल्यानंतर सन 1955-56 मध्ये त्यांनी देशातील काही मुळनिवासी प्रजातींच्या मास्यांचे प्रेरीत प्रजनन यशस्वीरित्या  पुर्ण केले.  पुढे डॉक्टर आलीकुन्ही यांनी सेंट्रल इंनलॅंड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट येथे प्रेरित प्रजानाद्वारे मत्स्यबीज निर्मिती या विषयावर ओरिसा या ठिकाणी एक मोठा प्रकल्प राबवला व 10 जुलै 1957 रोजी या दोन शास्त्रज्ञांना प्रेरीत मत्स्यप्रजजननाच्या प्रयोगात यश मिळाले व त्यानंतर भारतातील मत्स्य शेतीचा चेहरा मोहरा बदलला.डॉ.हिरालाल चौधरी यांना मिळालेले हे यश भारतातील नीलक्रांतीची सुरुवात ठरली.

प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेल्या प्रेरीत प्रजननातून तयार झालेल्या मत्स्य जिऱ्यांना यशस्वीरित्या अर्ध बोटुकली व त्यानंतर बोटूकली आकारापर्यंत विकसित करण्यात आले.सन 1958 मध्ये डॉ.हिरालाल चौधरी यांनी जगात सर्वप्रथम लेबिओ, सि-हीनस व कटलासारख्या मत्स्य प्रजातींचे यशस्वीरित्या प्रजनन करून मोठ्या प्रमाणात मत्स्य बीज निर्मिती करण्याची संकल्पना जगापुढे मांडली. एवढेच नव्हे तर हे तंत्र मत्स्यकास्तकारांपर्यंत तातडीने पोहचवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात तेथील स्थानिक मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिका-यांना या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले व त्यांचा मदतीने अत्यंत अल्प कालावधीत हे तंत्रज्ञान सर्वसामान्य मत्स्यकास्तकारांपर्यंत पोहविण्याचे कार्य केले.

डॉ.चौधरी यांच्या यशस्वी प्रयोगामुळे भारतातील भूजलाशयिन मत्स्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे.डॉ.हिरालाल चौधरी यांची पुढे पदोन्नती मत्स्य व्यवसाय विस्तार अधिकारी या पदावर 1959 मध्ये झाली.त्यांना कलकत्ता युनिव्हर्सिटीने 1961 मध्ये आचार्य पदवी प्रदान केली.या पदवी अभ्यासक्रमात त्यांनी ‘पियुषिका ग्रंथी अर्काचा मासळीच्या प्रजननावर होणारा परिणाम हा शोध निबंध लिहिला.त्यानंतर सन 1971 ते 1975 मध्ये त्यांनी भुवनेश्वरमध्ये स्थित सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर येथे कार्य केले.

1975 मध्ये पॅसिफिक सायन्स काँग्रेस दरम्यान जपानचे प्रख्यात डॉ. कुरोनुमा यांनी त्यांना फादर ऑफ इंड्युस्ड ब्रीडिंग हा किताब बहाल केला.त्याचबरोबर डॉक्टर चौधरी यांना गॅमा-सिग्मा-डेल्टा पुरस्कार,चंद्रकला होरा मेमोरियल गोल्ड मेडल,रफी अहमद किदवाई,गोल्डन की,वर्ल्ड ॲक्वाकल्चर आवार्ड इत्यादी अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले.

1976 मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतल्यावर डॉ.चौधरी यांनी फूड अँड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन (FAO), साउथ ईस्ट एशियन फिस्टीज डेव्ह डेव्हलपमेंट सेंटर (SEAFDEC) सारख्या अनेक महत्त्वपूर्ण संस्थान बरोबर काम केले.डॉ.हिरालाल चौधरी यांना मिळालेले यश भारतातील नीलक्रांतीची सुरुवातीस कारणीभुत ठरले.सन 2001 मध्ये डॉ.हिरालाल चौधरी यांच्या कार्यास सन्मानित करण्यासाठी भारत सरकारद्वारे 10 जुलै हा दिवस “राष्ट्रीय मत्स्य-शेतकरी दिवस” म्हणून घोषित करण्यात आला.अशा महान व्यक्तीचे कार्य मत्स्य व्यवसायाशी निगडित प्रत्येक व्यक्तीच्या चीरस्मरणी राहावे म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. 

    अमिता रा.जैन

सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, अमरावती







 वृत्त क्र. 570  

वृत्त क्रमांक मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन नांदेड (जिमाका), दि. 16 :- मराठवाडा मुक...