मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर
जिल्हा प्रशासन व आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश
--उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती
हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीमसह
मराठवाडा, विदर्भात कुठेही जिवित किंवा वित्तहानीची माहिती प्राप्त नाही
--उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदन
भुकंप झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरुन न जाता
सतर्क राहून भुकंपकाळात बचाव उपाययोजना राबवाव्यात
--उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत आवाहन
मुंबई, दि. 10 :- राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झाली नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभेत राज्य शासनाच्या वतीने निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची राज्य शासनाने गंभीर नोंद घेतली असून संबंधित जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये, मात्र सतर्क राहून बचावासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. गावांमध्ये ज्या घरांवर पत्र्याचे छत आहे, त्यावर आधारासाठी ठेवलेले दगड काढून टाकावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे. राज्य शासन संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या भूकंप आणि नुकसानीसंदर्भातील अधिकची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
०००००००
No comments:
Post a Comment