Wednesday, July 10, 2024

वृत्त क्र. 576 

कंधार शहरात 16 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही 

नांदेड, दि. 10 जुलै :- कंधार शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 9 जुलै रोजी कंधार शहरात अचानकधाडी टाकून एकूण 16 तंबाखू विक्रेत्यांकडून 8 हजार 400  रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही  जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील व वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजु टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

या पथकात नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील, जिल्हा सल्लागार डॉ. उमेश मुंडे, दंत शल्यचिकित्सक डॉ. महेश पोकळे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक अरविंद वाटोरे व केस रजिस्ट्री सहाय्यक सुनील तोटेवाड तसेच  कंधार  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  शेख व पोलीस नाईक प्रकाश टाकरस उपस्थित होते.  

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000




No comments:

Post a Comment

विकसित महाराष्ट्र २०४७ Vision Document तयार करण्याच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात सर्वसामान्य जनतेचा सहभाग महत्वाचा असून शासनाकडू...