वृत्त क्र. 570
फिनिशिंग स्कुल कार्यक्रमाद्वारे उद्योगक्षेत्राला
अपेक्षित मनुष्यबळाची निर्मिती व्हावी - सहसंचालक उमेश नागदेवे
· ग्रामीण टेक्निकल कॅंम्पसमध्ये प्लेसमेंट फेस्टिवल 2024 चे थाटात उद्घाटन
· 34 उद्योगसमूहांमध्ये नोकरीसाठी 948 विद्यार्थ्यांनी दिल्या मुलाखती
नांदेड, दि. 9 जुलै :- जीवनातील अडचणीतून संधी शोधणाऱ्याला यशाचा मार्ग सापडतो. आजच्या समाजातील बेकारीची समस्या सोडवण्यासाठी उद्योगक्षेत्र आणि ऍकेडेमिया यांच्यातील दरी कमी करून फिनिशिंग स्कुल प्रोग्रॅमद्वारे उद्योगक्षेत्राला अपेक्षित मनुष्यबळाची निर्मिती व्हावी, असे मत तंत्रशिक्षण संचालनालय, विभागीय कार्यालयाचे सह-संचालक उमेश नागदेवे यांनी व्यक्त केले.
नांदेड शहरातील ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्लेसमेंट फेस्टिवल 2024 च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
एकीकडे शिक्षणानंतर नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारी वाढत असल्याचे बोलले जाते तर दुसरीकडे उद्योगक्षेत्राला तांत्रिक व व्यावसायिक कौशल्याने परिपूर्ण मनुष्यबळ मिळत नाही. या समस्येवर तोडगा काढत मराठवाड्यातील तरुणांना तब्बल 40 पेक्षा अधिक नामवंत कंपन्यात नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी "ग्रामीण" संस्थेने पुढाकार घेत प्लेसमेंट फेस्टिवलचे आयोजन दिनांक 9 व 10 जुलै 2024 दरम्यान केले आहे. विद्यार्थ्याला तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण-प्रशिक्षणासोबतच फिनिशिंग स्कुल प्रोग्रॅमच्या अंतर्गत उद्योगक्षेत्राला अपेक्षित कौशल्यांचे किमान 1 ते 2 महिन्यांसाठी प्रशिक्षण दिल्यास सक्षम मनुष्यबळ निर्माण होईल असे ते म्हणाले. कोणताही विद्यार्थी हा कमकुवत नसतो, त्यास योग्य प्रशिक्षणाची जोड देऊन त्याचे भविष्य उज्वल केले जाऊ शकते. विद्यार्थी हा प्रेसेंटेबल असला पाहिजे, आपल्याकडील ज्ञानाचे सादरीकरण त्याला प्रभावीरीत्या करता आले पाहिजे, यासाठी आऊटकम बेस्ड करिकुल्युम प्रभावीपणे राबविल्यास उद्योगक्षेत्राच्या अपेक्षा उद्याच्या भावी अभियंत्यात उतरविल्या जाऊ शकतात असे ही ते म्हणाले.
प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी विशिष्ट मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यासाठी शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची तपशीलवार माहिती दिली. रोजगार मेळावे, तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण, मुलाखत कौशल्ये यांचे प्रशिक्षण देत विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी उद्योजकता विभाग नेहमीच तत्पर असल्याचे त्या म्हणाल्या.
शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे प्राचार्य, डॉ एन. एल. जानराव म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. परंतु अद्यावत तांत्रिक ज्ञान व कौशल्यात पारंगत असणारांचे हात कधीच रिकामे राहू शकत नाहीत. कौशल्याधिष्ठीत युवकांना उद्योगक्षेत्राची दारे नेहमीच खुली असतात. किंबहुना उद्योगक्षेत्र त्यांचे रेड कार्पेटद्वारेच स्वागत करते. विद्यार्थ्यांनी विविध ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अद्यावत ज्ञान मिळवावे. मल्टिपल एंट्री व एक्झिटद्वारे विद्यार्थी शिक्षणाचा प्रवाह निरंतर प्रवाहित ठेऊ शकतात असे ते म्हणाले.
फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी आयटीआय, पॉलिटेक्निक व इंजिनीअरिंग बीए, बीकॉम, बीएस्सी, हॉटेल मॅनेजमेंट, फूड टेक्नॉलॉजी, डीएमएलटी, पीजी डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी व बीएमआयटी आदी अभ्यासक्रमांच्या 948 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व हैद्राबाद येथून मिंडा सेन्सर व मिंडा लाइटिंग, आदित्य ऑटो, टाटा टोयो, जीएमसीसी सुपा व केएसजी सुपा, व्हेरॉक, कनेक्ट बिजनेस सोल्युशन्स, एम्क्युर फार्मसीयूटिकल्स, टाटाअटोकॉम्प, टाटा प्रेस्टलाईट, टाटा कॅटकोन, टाटा टीजीय, सुला वाईन्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, सारलोहदावं मटेरियल, करारो इंडिया, सण इलेक्ट्रो डिव्हाइसेस, प्राईम ग्रुप, अँफेनॉल, लुपिन, बायोरेड, ट्रुथ ऍटोमेशन, देशी फार्म, हॉटेल ऑर्चिड, हॉटेल आयबीईएस, हॉटेल लेमन ट्री, एआयजी हॉस्पिटल्स, हिमगिरे हॉस्पिटल्स, इत्यादी उद्योग समूहांचे प्रतिनिधी आलेले होते. प्लेसमेंट फेस्टिवलमध्ये 34 कंपन्यांचे 41 एचआर प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.
प्रास्तविकातून प्राचार्य, डॉ. विजय पवार यांनी संस्थेच्या गुणवत्ता वाढीचा आलेख विशद करून नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाची उपयुक्तता अधोरेखित केली. उद्घाटनप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेडचे प्राचार्य मॅकलवार, शिक्षणतज्ञ महेश पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पवार आदींची उपस्थिती होती. आयोजनासाठी उपप्राचार्य संजय देऊळगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी विकासकुमार नरवाडे, यांनी पुढाकार घेतला होता. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ ओमप्रकाश दरक यांनी केले.
0000
No comments:
Post a Comment