Monday, May 22, 2023

वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणारे 1 हजार 383 ग्रामपंचायत उमेदवार अनर्ह

 वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणारे

हजार 383 ग्रामपंचायत उमेदवार अनर्ह 

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- आरक्षित जागेतून निवडून आलेले जिल्ह्यातील हजार 383 उमेदवार आपले जातीचे वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करु न शकल्याने त्यांना अनर्ह ठरविण्यात आले. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 (1-अ) अन्वये जे उमेदवार आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर करतील त्या उमेदवारांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची तरतूद आहे. या उमेदवारांना संधी देवूनही ते आपल्या प्रमाणपत्राची वैधता सादर करू न शकल्यामुळे अशा हजार 383 उमेदवारांची निवड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रद्द केली.   

 

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी 2021 रोजी मतदान व 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी पार पडली होती. माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागेतून निवडणूक लढवून आल्यानंतर शासनाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 17 जानेवारी 2023 पर्यत अंतिम मुदतवाढ दिली होती. अखेर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 18 मे 2023 रोजीच्या आदेशान्वये हजार 383 उमेदवार अनर्ह केले आहे.

 

अनर्ह केलेल्या तालुकानिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. नांदेड 15, अर्धापूर 54, भोकर 138, मुदखेड 53, हदगाव 108, हिमायतनगर 70, किनवट 34, माहूर 19, धर्माबाद 99, उमरी 142, बिलोली 61, नायगांव 112, देगलूर 121, मुखेड 139, कंधार 91, लोहा 127 अशी एकूण हजार 383 अनर्ह उमेदवार आहेत.

0000

 खरीप हंगामासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- शेतकऱ्यांनी एचटीबीटी बियाणाबाबत जागरूक राहून अशा कुठल्याही अनधिकृत बियाणांची पेरणी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. खरीप हंगाम चांगला होण्याच्या दृष्टीने त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

 

या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे,  जिल्हा पोलीस अधिक्षक  प्रतिनिधी ए.जी. सातपुते, उपविभागीय कृषि अधिकारी पी.ए. गायके, तंत्र अधिकारी बी.बी. गिरी, जिल्हा गुण नियंत्रण निरिक्षक जी.एन. हुंडेकर, मोहीम अधिकारी विपिन कासलीवाल, सचिव माफदा सदाशिव पुंड जिल्हा अध्यक्ष कृषि निविष्ठा धारक, तालुका कृषि अधिकारी पी.आर. माने, खत कंपनी प्रतिनिधी, बियाणे कंपनी प्रतिनिधी, कामगार आयुक्त प्रतिनिधी पाठक, प्रकल्प संचालक आत्मा अनिल प्रमोद गवळी आदी उपस्थित होते.

 

एचटीबीटी बियाणाबाबत शेतकऱ्यांनी जागरूक असले पाहिजे. शेतकऱ्यांनी कुठल्याही अनधिकृत बियाण्याची पेरणी करता कामा नये. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव खरीप हंगामात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी 1 जूननंतर पाण्याचा अंदाज घेवून कापूसाची पेरणी केली पाहिजे. सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासणी करुन 100 मि.मि. पेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतरच पेरणी केली करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

कृषी विभागातर्गत असलेल्या सर्व जिल्हास्तरीय  तालुकास्तरीय भरारी पथकामार्फत कृषि सेवा केंद्राची खरीप हंगामात वेळोवेळी तपासणी करुन शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

कृषि विकास अधिकारी यांनी जिल्हयातील रासायनिक खते  बियाणे यांच्या खरीप हंगाम दृष्टीने मागणी आवंटन  शिल्लक बाबतीत सादरीकरण केले. तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी खरीप हंगाम पूर्वतयारी बैठकीचे सादरीकरण करून खरीप हंगामामधील विषयावर सविस्तर माहिती दिली.

0000

Sunday, May 21, 2023

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड (जिमाका) दि. 21 :- नांदेड जिल्ह्यात रविवार 28 मे 2023 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात रविवार 14 मे रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 28 मे 2023 च्या  मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

Saturday, May 20, 2023

कौटुंबिक भावनांना सावरत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहूरच्या विकासाला चालना

·     श्रीक्षेत्र माहूरगड येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी लिफ्टसह स्कायवॉकच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- नागपूर येथून माहूर येथे पोहचण्यासाठी लहानपणी आम्हाला आठ तास लागायचे. आजच्या घडीला नागपूर ते माहूर हे अंतर अवघ्या अडीच तासात पार करणे सुकर झाले असून माझ्या आई-वडिलांची उतरत्या वयात जी इच्छा होती ती आता पूर्णत्वास येत असल्याने मला मनस्वी आनंद होत असल्याची भावना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. श्रीक्षेत्र माहूर गडावर अबाल वृद्धांसह दिव्यांग व सर्व भक्तांना सुकर ठरणाऱ्या लिफ्टसह स्कायवॉकचे बांधकाम योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना स्मरत भावनेचा बांध मोकळा केला.

माहूर येथे आज त्यांनी सपत्निक परिवारासह श्री रेणुका देवीची पुजा करून माहूरच्या विकासाला व रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्प श्रीक्षेत्र माहूरगड श्री रेणुका देवी मंदिर लिफ्टसह स्कायवॉकचे बांधकामाचे भूमिपूजन केले. माहूर गडाच्या पायथ्याशी या भूमिपूजन समारंभानिमित्त उभारण्यात आलेल्या व्यासपिठावरून ते बोलत होते. यावेळी श्री रेणुका देवीसंस्थाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर, खासदार हेमंत पाटील, आमदार भिमराव केराम, आमदार राम पाटील रातोळीकर, आ. डॉ. तुषार राठोड, आ. शामसुंदर शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, किनवटच्या उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर , माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फेरोज दोसानी, व्यंकटेश गोजेगावकर, श्री रेणुका देवीसंस्थाचे सर्व सन्माननिय ट्रस्टी सदस्य आदी उपस्थित होते. 

सन 2004 साली एका अपघातात माझ्या पायाला चार फॅक्चर झाले होते. त्यानंतर मी दर्शनाला खुर्ची घेऊन गेलो होतो. आज गडावर मी श्री रेणुकादेवी मातेच्या दर्शनाला पायी गेलो. माझ्या आईला उरत्या वयात गडावर येऊन दर्शन घेणे सोपे नव्हते. भावनेचा हा धागा पकडत त्यांनी लिफ्टसह स्कायवॉक प्रकल्पाचे भूमिपूजन करतांना माझ्या मनात कृतज्ञतेच्या भावना अधिक असल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. 

तीर्थक्षेत्राच्या विकासासमवेत पर्यटन व अनुषंगिक सेवाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होते. तीर्थक्षेत्र व पर्यटनासाठी पहिली अट ही स्वच्छतेची असते. शेगाव, शिर्डी, तिरूपती हे तीर्थक्षेत्रातील स्वच्छतेचे आदर्श मापदंड असून माहूर हे तीर्थक्षेत्र सुद्धा स्वच्छतेच्यादृष्टिने नावाजले जावे यासाठी नगरपरिषदेने व माहूरच्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. माहूर येथे वनसंपदा, जैवविविधता आणि सुंदर डोंगराळ भाग असल्याने पर्यटन क्षेत्रातही मोठी संधी उपलब्ध आहे. माहूरच्या पायथ्याशी मोठा तलावही उपलब्ध आहे. सर्वांच्या प्रयत्नातून याठिकाणी तलावातील पाण्याची पातळी चार मीटर पेक्षा अधिक आपण आणू शकलो तर या विस्तारीत तलावाच्या पाण्यावर प्रवाशी विमानसेवाही आपण उपलब्ध करू असा दुर्दम्य आत्मविश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलून दाखविला. या भागाला अनेक जैवविविधता लाभलेली आहे. येथील सत्व लक्षात घेता नगरपरिषदेने रस्त्याच्या दुर्तफा किमान 3 हजार झाडे लावावीत व याचबरोबर माहूर नगरातील प्रत्येक कुटुंबानी किमान तीन तरी झाडे लावावीत, असे कळकळिचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

या भागातील बेरोजगारांच्या हातांना कामे मिळावीत, आव्हानात असलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्न इतर साधणे मिळावीत, येथील ऐतिहासिक वारसा स्थळाला नव्या पिढीपर्यंत पोहचता यावे ऐवढी साधी मनिषा असून यासाठी मी श्री रेणुका देवीला प्रार्थना केल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 

कंत्राटदारांनो काम व्यवस्थित नाही झाले तर केवळ बडतर्फी नसून कठोर कारवाई करू

देशभरातील विविध विकास प्रकल्पांच्या कामांमध्ये काही ठिकाणी कंत्राटदारांचे अतीशय वाईट अनुभव येतात यात नांदेड जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या काम करणाऱ्या काही कंत्राटदारांचाही समावेश आहे. नांदेड-किनवट मार्गातील इस्लापूर येथील पुलाच्या कामाबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. किनवटचे आमदार भिमराव केराम यांनीही यासंदर्भात जाहीर तक्रार केली आहे. याची गंभीर दखल घेऊन संबंधीत कंत्राटदारांवर बडतर्फीची कारवाई केल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. काम व्यवस्थीत झाले नाही तर आम्ही संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची पाऊले उचल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या भागातील सुशिक्षित बेरोजगारांना

रोजगारासाठी पर्यटनाला चालना दिल्याशिवाय पर्याय नाही

- खासदार हेमंत पाटील

किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यातील बहुसंख्य लोक हे माझ्या मतदारसंघातील आहेत. या भागातील शेती, शेतकरी आणि युवक यांना स्वयंरोजगाराच्या कक्षेत आणण्यासाठी पर्यटन, कृषि पर्यटन व इतर शेतीपुरक उद्योगाशिवाय पर्याय राहिलेला नाही. यादृष्टिने सर्वच पातळ्यांवर एकत्रीत विचारविम्रस होऊन सामुहिक कृतीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले. 

आदिवासी व दुर्गम भास्क लक्षात घेता सुविधांच्या निर्मितीवर भर आवश्यक

- आमदार भिमराव केराम

किनवट, माहूर या भागात चांगल्या रस्त्याची सुविधा अपेक्षित आहे. यादृष्टिने जिल्ह्यातील आदिवासी वाड्यापर्यंत भक्कम रस्त्याचे जाळे अत्यावश्यक आहे. किनवट ते आदिलाबाद, किनवट ते नांदेड (इस्लापूर), उनकेश्वर, हिमायतनगर व विदर्भाला जोडणाऱ्या भक्कम रस्त्याचे जाळे निर्माण करण्याची मागणी आमदार भिमराव केराम यांनी केली. 

प्रारंभी या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजन निमित्त कोनशिलेचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित अनावरण करण्यात आले. श्री रेणुका देवीसंस्थाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हाती घेतलेल्या विविध विकास कामांना व भूमिपूजन समारंभाला शुभेच्छा दिल्या.

000000

(छायाचित्र : सदा वडजे, नांदेड)









Friday, May 19, 2023

 जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त सायकल रॅली संपन्न

 

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- सातवा युएन जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह-2023 हा 15 ते 21 मे 2023 दरम्यान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व प्रजापिता ब्रह्माकुमारी वसंतनगरच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन आज 19 मे रोजी सकाळी 6.30 वा. करण्यात आले होते. या सायकल रॅलीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत व प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या श्रीमती स्वाती बहनजीश्रीमती अनिता बहनजी यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केली. 

 

यावेळी सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसेप्रा. डॉ. परमेश्वर पौळसंतोष मुगटकरराजेंद्र मंडीप्रल्हाद हिंगोलेगणेश साखरेडॉ. सुरेश दागडीया, क्षीरसागर, मोटार वाहन निरिक्षक मंगेश इंगळेपंकज यादवगणेश तपकिरे आदींची उपस्थिती होती. 

 

वाहनाच्या इंधनामुळे प्रदुषणात होत असून यामुळे उष्णतेची पातळी वाढत आहे. आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांनी सार्वजनिक वाहनाचा व सायकलचा वापर केल्यास प्रदुषण रोखण्यास आपली मदत होईल, असे प्रतिपादन  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले. ही सायकल रॅली नांदेड शहरातील जुनामोंढा येथून निघुन महावीर चौकजिल्हाधिकारी कार्यालयछत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयकलामंदीरशिवाजीनगरआयटीआय येथून विसावा उद्यान येथे रॅलीचा समारोप झाला. या सायकल रॅलीत जवळपास शंभर सायकल स्वारांनी सहभाग घेतला होता.

00000

 केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा सुधारीत दौरा

 

नांदेड, (जिमाका) दि. 19 :-  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शनिवार 20 मे 2023 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

 

शनिवार 20 मे 2023 रोजी नागपूर येथून वाहनाने सकाळी 8.30 वा. श्री रेणुका देवी मंदीर येथे आगमन. सकाळी 8.30 ते 10.30 वाजेपर्यंत दर्शन व राखीव. सकाळी 10.40 ते 11.50 वा. पर्यंत श्रीक्षेत्र माहूरगड श्री रेणुकादेवी मंदीर लिफ्टसह स्कायवॉकचे बांधकामाचे भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ माहूर येथील पुसद मार्गावर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या समोरील प्रांगण. दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत प्रस्तावित वनविभागाच्या विश्रामगृहाच्या सादरीकरणाचे अवलोकन स्थळ- सा. बां. विभागाचे शासकीय विश्रामगृह माहूर. दुपारी 12.30 ते 2.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. शासकीय विश्रामगृह माहूर येथून दुपारी 2.30 वा. वाहनाने हिवरा (संगम) ता. महागाव जिल्हा यवतमाळकडे प्रयाण करतील.  

000000    

Thursday, May 18, 2023

 केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा 

नांदेड, (जिमाका) दि. 18 :-  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शनिवार 20 मे 2023 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

शनिवार 20 मे 2023 रोजी नागपूर येथून वाहनाने सकाळी 8.30 वा. श्री रेणुका देवी मंदीर येथे आगमन. सकाळी 8.30 ते 10.30 वाजेपर्यंत दर्शन व राखीव. सकाळी 10.40 ते 11.50 वा. पर्यंत श्रीक्षेत्र माहूरगड श्री रेणुकादेवी मंदीर लिफ्टसह स्कायवॉकचे बांधकामाचे भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ माहूर येथील पुसद मार्गावर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या समोरील प्रांगण. दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत प्रस्तावित वनविभागाच्या विश्रामगृहाच्या सादरीकरणाचे अवलोकन स्थळ- माहूरगड. दुपारी 12.30 ते 2.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 2.30 वा. वाहनाने वर्धाकडे प्रयाण करतील.  

000000    

वृत्त क्रमांक मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन नांदेड (जिमाका), दि. 16 :- मराठवाडा मुक...