Wednesday, August 10, 2022

 नांदेड जिल्ह्यात 7 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 63 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3नांदेड ग्रामीण 2, देगलूर 1, बिलोली 1  एकूण 7 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 318 एवढी झाली असून यातील 1 लाख 568 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 58 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 3  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 30, खाजगी रुग्णालय 1 असे एकूण 34 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 40, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 13, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4खाजगी रुग्णालय 1 असे एकुण 58 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 14 हजार 635
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 93 हजार 917
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 318
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 568
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.33 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 04
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-58
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00
0000

 कारागृहातील कैद्यांकरीता; प्रबोधनात्मक, सांस्कृतिक व समुपदेशनात्मक कार्यक्रमांचे आयोजन 

एकाच दिवशी एकाच वेळी, संपूर्ण राज्यातील ३६ प्रमुख "जिल्हा मध्यवर्ती कारागृहात" संपन्न होणार "जीवन गाणे गातच जावे..." हा कार्यक्रम

मुंबई, दि. (९ ऑगस्ट): राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख "जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील" कैद्यांसाठी; दिनांक ११ ऑगस्ट रोजी, "जीवन गाणे गातच जावे..." या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाने दिली आहे. समुपदेशन, प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमातून सदर कार्यक्रम सादर होणार आहे.

देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात ही विविध कार्यक्रम/उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गतच "स्वराज्य महोत्सव" निमीत्त, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया मार्फत विविध सांस्कृतिक, देशभक्तीपर, थोर संत, जेष्ठ साहित्यीक व कवी, थोर महापुरुष  यांच्या जीवनकार्यावर आधारीत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संपुर्ण राज्यभर करण्यात येत आहे.

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैदयांना; स्वातंत्र्य, देशभक्ती, योगाचे महत्व, प्रबोधन व समुपदेशन करणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक ११ ऑगस्ट, रोजी सकाळी ११.०० वाजता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. 

कैदयांकरीता आयोजित या कार्यक्रमात, महाराष्ट्रच्या लोककले सोबतच, कैदयांचे प्रबोधन, योगा चे महत्व, देशभक्ती भावना जागृत करणाऱ्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग व गृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राज्यभर आयोजित करण्यात आलेला आहे. 

या कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असणाऱ्या कैदयांनाही त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आयोजित  आजपर्यत एकाच वेळी ३६ जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैदयाकरीता कार्यक्रम करण्याचा महाराष्ट्र तसेच देशातील  हा पहिलाच अभिनव असा उपक्रम आहे.

0000

 देश का सिपाही हू चा नारा देत

6 लाख विद्यार्थ्यांनी दिला घरोघरी तिरंगाचा संदेश

 

जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम,

जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी,

अवघ्या 2 दिवसात केले नियोजन,

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आज नव्या आत्मविश्वासाने गलबलून गेल्या. निमित्त होते भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व घरोघरी तिरंगा उपक्रम. जिल्ह्यातील सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सामुहिक गीत गायनाच्या माध्यमातून देशाप्रती कृतज्ञता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अत्यंत कल्पकतेतून सर्व अधिकारी, मुख्याध्यापकांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वी करून दाखविला. जिल्ह्यातील खासगी शाळांसह एकुण 3 हजार 739 शाळा या अभिनव उपक्रमात सहभागी झाल्या. सुमारे 6 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी आपली कृतज्ञता या उपक्रमातून दृढ केली तर 24 हजार 400 शिक्षकांनी यात उर्त्स्फूत समन्वय साधत शाळांच्या क्रीडांगणांना देशभक्तीने सजवले.   

 

मी याच शाळेत शिक्षण घेऊन लोकप्रतिनिधी झालो. या अभिनव उपक्रमात सहभागी होतांना मला विशेष आनंद होत असून प्रत्येक नागरिकांनी देशाप्रती कृतज्ञता बाळगून घरोघरी तिरंगासाठी पुढे सरसावे, असे आवाहन आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी केले. या उपक्रमाच्या प्रातिनिधीक शुभारंभाच्या निमित्ताने ते बोलत होते. येत्या 13 ते 15 ऑगस्ट कालावधीत आपण घरोघरी तिरंगा हे अभियान राबवित आहोत. त्यात लोकांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

 

शाळेचे विद्यार्थी हे देशाची संपत्ती आहे. निर्मळ भावना घेऊन विद्यार्थी देशाप्रती सदैव तत्पर असतात. घरोघरी तिरंगा हे अभियान संपूर्ण जिल्हाभर यशस्वी करण्यात जिल्ह्यातील विविध शाळांचे सुमारे 6 लाख 80 हजार विद्यार्थी आपल्या घरावर तिरंगा फडकवून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला कृतज्ञतेने साक्षीदार होतील असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलासराव हंबर्डे, सरपंच संध्याताई देशमुख, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर व मान्यवर उपस्थित होते.

 

या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने आपले बँड पथक खास सादरीकरणासाठी नियुक्त केले होते. या पथकाने विजयकुमार धोंडगे व श्री. वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रगीताची धून व देशभक्तीपर गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी एक लय व ताल सुरात देशभक्तीपर दहा गाणे सादर केली. यात वंदे मातरम, जयोस्तुते श्री मह्ममंगले, नन्ना मुन्ना राही हू, आओ बच्चो तुम्हे दिखाये, छोडो कल की बाते, हम होंगे कामयाब, सारे जहाँ से अच्छा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, बलसागर भारत होवो व ये देश है वीर जवानों का.. या देशभक्‍तीपर गीतांचा  समावेश होता.

0000






Monday, August 8, 2022

 गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला मुख्यमंत्र्यांची भेट

सर्वसामान्यांना उभारी देणाऱ्या मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी 

बँका होण्यासाठी शासन मदत करणार

   - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची या क्षेत्रातील कामगिरी अभिमानास्पद असून सर्वसामान्य माणसाला उभं करणाऱ्या अशा संस्थांचे बँकेत रुपांतर व्हावे यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. तसेच यासंदर्भात केंद्र शासनाकडेही पाठपुरावा केला जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्यालयास त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

 

याप्रसंगी माजी मंत्री आमदार संजय राठोड, खासदार हेमंत पाटील, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, गोदावरी अर्बन सोसायटीच्या अध्यक्षा राजश्री पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर घुगे, गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, यांची उपस्थिती होती.

 

मुख्यमंत्री शिंदे  म्हणाले की, लोककल्याणासाठी एखादी संस्था चालवणे आणि त्यात सातत्य टिकवून ठेवणे हे सर्वांनाच जमत नाही. मात्र गोदावरी अर्बन संस्थेने अवघ्या दहा वर्षात पाच राज्यात विस्तार केला आहे. तो अतिशय अभिमानास्पद असाच आहे. त्यामुळे गोदावरी अर्बन सोसायटी ही पतसंस्था न राहता तिचे बँकेत रूपांतर झाले पाहिजे यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. या संदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करु असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

मुख्यमंत्र्यांनी पाहिली  'उंच भरारी तुमच्या सोबत गोदावरी' ही चित्रफीत

गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्यालयात ' घ्या उंच भरारी तुमच्यासोबत गोदावरी'  ही गोदावरी अर्बनच्या कार्याचा आढावा घेणारी 15 मिनिटाची चित्रफित मुख्यमंत्र्यांनी पाहिली. पाच राज्यात विस्तार, 85 शाखा ही संस्थेची कौतुकास्पद कामगिरी पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आणि  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

0000000





 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे

नांदेड विमानतळावर स्वागत 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी येथील श्री गुरुगोबिंदसिंजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांचे स्वागत केले. याचबरोबर खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहनराव हंबर्डे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदी मान्यवर उपस्थित होते. 

0000



नांदेडच्या विकास कामांसाठी

निधी कमी पडू देणार नाही

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

·       नांदेडला जोडणाऱ्या पुर्णा, हिंगोली रस्त्यांसाठी 192 कोटीचा निधी

·       नांदेड शहरातील  रस्तेविकासासाठी शंभर कोटीचा निधी 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- नांदेड महानगराच्या विस्तारामुळे उत्तर नांदेड अर्थात तरोडा, वाडी या भागाचे मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. अर्ध्या तासाच्या अंतरावर पुर्णासारखे मोठे रेल्वे जंक्शन, वसमतसारखी मोठी कृषि बाजारपेठ व इतर कृषि क्षेत्रात परिपूर्ण असलेल्या गावांचे अंतर लक्षात घेता पुर्णा, हिंगोली रस्ते विकासासाठी भरीव तरतूद केलेली आहे. 192 कोटीच्या होणाऱ्या रस्ते विकासातून या भागातील वाहतुक सुलभतेसाठी मोठी सुविधा निर्माण होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

नांदेड महापालिकांतर्गत शहरातील उत्तर मतदारसंघातील मुलभूत सुविधा, हिंगोली जिल्हा सीमा ते आलेगाव-निळा-नांदेड व परभणी जिल्हा सीमा ते पूर्णा नांदेड रस्त्याचे दुपदरीकरण, आसना नदीवरील पासदगाव जवळील नवीन पुलाच्या कामाचे प्रातिनिधीक भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. येथील भक्ती लॉन्स येथे झालेल्या या प्रातिनिधीक भूमिपूजन समारंभास खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत व इतर मान्यवर उपस्थित होते. 

पासदगावजवळील पूल हा दरवर्षी पुराच्या पाण्याने वेढला जातो. पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत असल्याने ते ओसरेपर्यंत या रस्त्यावरची वाहतूक खोळंबून राहते. सध्या आहे त्या पुलाऐवजी नवीन पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. राज्य शासनाच्या हायब्रीड ॲन्युटी धोरणाअंतर्गत परभणी जिल्ह्यातून नांदेडकडे येणाऱ्या पोखर्णी (परभणी)-बोरवड-लिंबाळा-ताडकळस-पुर्णा ते नांदेड या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता नांदेड जिल्हा सीमेपर्यंत आहे. मात्र या सीमेपासून नांदेड शहरापर्यंत रस्ता अधिक चांगला होणे बाकी होते. याचीही सुधारणा करणे व हायब्रीड ॲन्युइटीच्या धर्तीवर हा उरलेला मार्गही पूर्ण करणे आवश्यक होते. याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातून नांदेडकडे येणाऱ्या उमरा-सोडेगाव-बोल्डा-कुरुंदा-वसमत ते नांदेड हा जिल्हा सीमा रस्ता प्रगतीपथावर आहे. याही रस्त्याचे काम नांदेडच्या जिल्हा सीमेपर्यंत मर्यादित होते. नांदेड शहर याला चांगल्या मार्गाने जोडल्या न गेल्यामुळे या वाहतुकीला मोठा आडथळा निर्माण झाला होता. याची सुधारणा करणे अत्यंत आवश्यक होते. या तीनही कामांमुळे वाहतुक सुविधेत मोठी सुलभता आता येणार  आहे.

0000

 



 

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 19.20 मि.मी. पाऊस

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यात सोमवार 8 ऑगस्ट रोजी सकाळी वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 19.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 823.40 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 
जिल्ह्यात सोमवार 8 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 21.40 (826.40), बिलोली-16 (788.90), मुखेड- 16.60 (740.30), कंधार-10.60 (756.60), लोहा-14.20 (754.60), दगाव-27.50 (783.20), भोकर-22.50 (938.60), देगलूर-16.70 (697.70), किनवट-28.20 (910.10), मुदखेड- 25.60 (996.60), हिमायतनगर-29.90 (1108.10), माहूर- 30.80 (737.50), धर्माबाद- 7.50 (957.70), उमरी- 8.90(987.90), अर्धापूर- 24.40 (783.90), नायगाव-8.60 (742.40) मिलीमीटर आहे.


0000

वृत्त क्रमांक मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन नांदेड (जिमाका), दि. 16 :- मराठवाडा मुक...