Wednesday, December 10, 2025

 वृत्त क्रमांक 1288

माळेगाव यात्रेत भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करा

-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

श्री क्षेत्र माळेगाव यात्रा पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

यात्रेच्या सर्वांगीण सुविधेसाठी सर्व विभागाचे सुक्ष्म नियोजन व समन्वय आवश्यक
                                                                                                                                                                                                                                                                                                     
नांदेड, दि. 10 डिसेंबर : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील श्री खंडोबा देवस्थान, माळेगाव येथील यात्रा दिनांक 18 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रेत सर्व सुविधा उपलब्ध राहतील, यासाठी संबंधित सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करून समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.         
                                                                                                                                                                                                                                                                                                                                       
यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 18 डिसेंबर रोजी देवस्वारी व पालखी पूजन होईल व दुसऱ्या दिवशी पशुप्रदर्शन व दुग्धस्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात्रेच्या कालावधीत भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करण्यात येणार आहेत. यात्रेच्या सोयीसुविधांबाबत पशुसंवर्धन, कृषी, पोलीस प्रशासन, बीएसएनएल, महावितरण, परिवहन, आरोग्य विभाग आदींच्या कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी दूर दृश्य प्रणालीद्वारे घेतला.

या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अपर जिल्हाधिकारी रत्नदिप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत , माळेगावचे सरपंच प्रतिनिधी हनुमंत धुळगंडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आदीची उपस्थिती होती.       
                                                    
यात्रेत विविध विभागाचे स्टॉल

यात्रेत भाविकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळावी म्हणून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, महाविस्तार ॲप, ॲग्रीस्टॅक, आयुष्यमान भारत, महिला व बाल विकास विभाग,पशुसंवर्धन विभाग यांचे स्टॉल उभारण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.
तसेच भाविकांना इंटरनेट सेवा अखंडित मिळावी यासाठी बीएसएनएलने वायफाय व नेटवर्क व्यवस्थेचे विशेष नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

महत्त्वाच्या सुविधा व कामे
यात्रेच्या काळात पुढीलप्रमाणे सुविधा उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिली. यात सीसीटीव्ही, वॉशरूम, बॅरिकेट व्यवस्था, मंदिराकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याची दुरुस्ती, हेलिपॅड, स्वच्छतेसाठी मोबाईल व्हॅन, विविध स्पर्धा व पशुप्रदर्शनासाठी लागणारा निधी याबाबतची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध विभागांना यात्रेच्या अनुषंगाने करण्यात आलेले नियोजनाची माहिती यावेळी दिली.

यात्रा परिसरातील कला महोत्सव, मंदिर परिसर, कुस्ती मैदान, कृषी व पशुप्रदर्शन विभाग, बसस्टॅण्ड येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची व नियोजनाची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिली.यात्रेच्या अनुषंगाने लागणाऱ्या सुविधा उपलब्ध होण्या बाबत माहिती माळेगावचे सरपंच श्री. धुळगुंडे यांनी यावेळी केली.
००००००  







                                                                                                                                                                                          

वृत्त क्रमांक 1287

बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन

नांदेडदि. 10 डिसेंबर : वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाइट्ससंशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

ड्रायव्हिंग लायसन्सवाहन नोंदणीई-चालान यांसारख्या सेवांच्या नावाखाली अनेक नागरिकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. फसवणूक करणारे मोबाईल एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेशांद्वारे चलन बाकी आहेपरवाना सस्पेंड होणार आहे अशा धमकीपर संदेशांसह अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. परिवहन विभागाने याबाबत स्पष्ट सांगितले कीआरटीओ कार्यालय किंवा परिवहन विभाग नागरिकांना कधीही व्हॉट्सअॅप वरून पेमेंट लिंक पाठवत नाही, याची सर्वानी नोंद घ्यावी.

तसेच RTO Services.apkmParivahan_Update.apkeChallan Pay.apk अशी अज्ञात एपीके फाईल्स डाऊनलोड केल्यास मोबाईलमधील ओटीपीबँकिंग माहिती आणि इतर संवेदनशील माहिती चोरी होण्याचा धोका आहे.

नागरिकांनी #VAHAN (वाहन नोंदणी सेवा) https://vahan.parivahan.gov.in, #SARATHI (ड्रायव्हिंग लायसन्स सेवा) https://sarathi.parivahan.gov.inपरिवहन सेवा पोर्टल https://www.parivahan.gov.in तसेच #ई-चालान पोर्टल https://echallan.parivahan.gov.in या gov.in डोमेनच्या अधिकृत सरकारी संकेतस्थळांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे .com, .online, .site, .in किंवा इतर कोणत्याही डोमेन वरील वेबसाइटवर वाहनधारकांनी माहिती नोंदवू नये.

कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यानंतर तात्काळ नॅशनल #सायबरक्राईम पोर्टलचे https://www.cybercrime.gov.inसायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक १९३० किंवा जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवावीअसे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले आहे.

00000

Tuesday, December 9, 2025

 वृत्त क्रमांक 1286

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार भटक्या श्वानांवर जिल्हा परिषदेची अंमलबजावणी मोहीम

नांदेड, दि. 9 डिसेंबर:- आज यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद नांदेड येथे भटक्या श्वानांसंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

ही कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 

कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा उपआयुक्त डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, तसेच डॉ. प्रविणकुमार घुले, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन प्रमुख उपस्थित होते.

या कार्यशाळेत सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तसेच पशुधन विकास अधिकारी यांनी सहभाग घेतला.

बैठकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी भटक्या श्वानांबाबत तातडीने आणि समन्वयाने कार्यवाही कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

भटक्या श्वानांच्या व्यवस्थापन, जनजागृती, लसीकरण, निर्बीजीकरण, तसेच सार्वजनिक आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने अंमलात आणावयाच्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली.

०००००









वृत्त क्रमांक 1285

दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर  

नांदेड दि. 9 डिसेंबर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. 

इयत्ता १२ वी (सर्वसाधारण, व्दिलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी मंगळवार १० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार १८ मार्च २०२६ पर्यंत आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी शुक्रवार २३ जानेवारी २०२६ ते सोमवार ९ फेब्रुवारी २०२६ हा आहे. 

इयत्ता १० वी परीक्षा लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार १८ मार्च २०२६ राहील. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा (शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी सोमवार २ फेब्रुवारी २०२६ ते बुधवार १८ फेब्रुवारी २०२६ हा आहे. 

दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच सोशल मिडीया किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1284

कौटुंबिक न्यायालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी नोटीस प्रसिद्ध   

 

नांदेड दि. 9 डिसेंबर :-  कौटुंबिक न्यायालय नांदेडच्या आस्थापनेवर तीन वर्ष कालावधीसाठी डाटा एन्ट्री ऑपरेटरचे एक पद भरण्यासाठी मान्यताप्राप्त कंत्राटदार यांच्याकडून मनुष्यबळ पुरविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

 

त्याबाबतीत जिल्हा न्यायालय नांदेड यांच्या https://districts.ecourts.gov.in/nanded या संकेतस्थळावर निविदा सूचना आणि जाहिर नोटिस प्रकाशित करण्यात आली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय नांदेड यांनी केले आहे.

000000

वृत्त क्रमांक 1283

अवैध रेती उत्खननावर पहाटे महसूल विभागाची धडक कारवाई

18 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट

नांदेड, दि. 9 डिसेंबर :- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज महसूल विभागाच्या पथकाने कल्लाळ व पिंपळगाव निमजी परिसरात पहाटे 5 वाजता अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी धडक कारवाई केली.

या कारवाईत उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, मंडळ अधिकारी कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, मोहसीन सय्यद, तसेच ग्राम महसूल अधिकारी मनोज जाधव, माधव भिसे, श्रीरामे, रमेश गिरी, मनोज सरपे, महेश जोशी, कल्याणकर, सचिन उपरे, मुंगल, गजानन होळगे, संजय खेडकर आणि महसूल सेवक बालाजी सोनटक्के, शिवा तेलंगे, जानोळे, हिंगोले यांचा समावेश होता.

कारवाईत जप्त व नष्ट केलेला मुद्देमाल

गस्तीदरम्यान पथकाला अवैध उत्खननासाठी वापरली जाणारी 3 गुडगुडी, 1 इंजिन, 15 तराफे सापडले. मजुरांच्या साह्याने पथकाने 3 गुडगुडी आणि 1 इंजिन जिलेटीनने स्फोट करून नष्ट केले. 15 तराफे जाळून नष्ट केले असा एकूण 18 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला.

अडथळे असूनही पथकाची धडक मोहीम

अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी रस्त्यावर जाणूनबुजून पाणी सोडून दिले होते, ज्यामुळे पायी किंवा साध्या वाहनाने पुढे जाणे अशक्य होते. तरीही पथकाने ट्रॅक्टरचा वापर करून उत्खनन पॉईंटपर्यंत पोहोचत कारवाई पूर्ण केली. अवैध रेती उत्खननाविरोधात सक्तीने व सातत्याने कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे.

00000

    































 वृत्त क्रमांक 1282

नंबर प्लेट शिवाय वाहन चालवू नका – प्रादेशिक परिवहन अधिकारी

विशेष तपासणी मोहिमेत 22 दोषी वाहनांवर कारवाई

नांदेड, दि. 9 डिसेंबर :-नांदेड शहरात विना नंबर प्लेट हायवा/टिप्पर वाहने धावत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेडच्या वायुवेग पथकातर्फे 7 ते 8 डिसेंबर 2025 या कालावधीत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान एकूण 184 वाहने तपासण्यात आली. त्यापैकी 22 वाहनांवर नंबर प्लेट नसणे, तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना आवाहन केले आहे की, वाहनावर नंबर प्लेट लावल्याशिवाय वाहन चालवू नये, मोटार वाहन कायदा व नियमांचे पूर्ण पालन करणे बंधनकारक आहे.

या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

००००

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...