Thursday, April 23, 2026

 वृत्त क्रमांक 

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दौरा 

नांदेड दि. 23 एप्रिल :- राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शुक्रवार 24 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शुक्रवार 24 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वा. शिरूर ताजबंद येथून आगमन व कंधार तालुक्यातील मोहिजा परंडा येथे इच्छापुर्ती महादेव मंदिर व संत सदाशिव महाराज मंदीर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.30 वा. मोहिजा परंडा येथून अहमदपूरकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथून लोहा-नांदेड मार्गे भोकरकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 3.30 वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड उत्तर विभागाच्यावतीने व समर्थ कॉ.ऑपरेटिव्ह सोसायटी भोकरच्यावतीने सत्कार समारंभास उपस्थिती. स्थळ- मंजुळानगर भोकर. दुपारी 4 वा. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक लि. नांदेड भोकर शाखा नवीन वास्तुचा लोकर्पण सोहळा समारंभास उपस्थिती. स्थळ- मार्केट कमिटी परिसर भोकर. सायं. 6 वा. भोकर येथून गोरठा ता. उमरीकडे प्रयाण. सायं. 6.20 वा. कैलास गोरठेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ- गोरठा ता. उमरी. सायं. 7 वा. गोरठा येथून शिरूर ताजबंदकडे मोटारीने प्रयाण करतील.

0000

वृत्त क्रमांक

पूरग्रस्त भागातील तरुणांसाठी नाविन्यपूर्ण ड्रोन पायलट प्रशिक्षण 

नांदेड दि. 23 एप्रिल:- पूरग्रस्त भागातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी यांच्या विशेष पुढाकारातून एक नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या अंतर्गत दक्षा RPTO, उद्यमिता लर्निंग सेंटर येथे पूरग्रस्त भागातील २० तरुणांना ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात आले.

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली होती. या नैसर्गिक आपत्तीमुळे स्थानिक नागरिकांचे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर प्रभावित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा उपक्रम प्रत्यक्षात साकार झाला. 

या प्रशिक्षणामध्ये हसनाळ, रावणगाव, भिंगोली आणि भाटापूर या गावांतील एकूण २० तरुणांनी सहभाग घेतला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना डीजीसीए कडून १० वर्षांसाठी  ड्रोन ऑपरेटर परवाना प्रदान करण्यात आला आहे. अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. 

प्रशिक्षणानंतर संबंधित तरुणांना ड्रोन पायलट म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, यासाठी त्यांना दक्ष RPTO कडून मार्गदर्शन देखील दिले जाणार आहे. याशिवाय, ड्रोनद्वारे शेती फवारणीसारखा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याची संधीही त्यांना प्राप्त झाली आहे.

ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगारक्षम बनविण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा हा विशेष उपक्रम आहे.

00000






वृत्त क्रमांक

दिशा समितीच्या  बैठकीत जलजीवन मिशन, महावितरण, रस्ते विकासासह विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा व सूचना 

नांदेड दि. 23 एप्रिल : जिल्ह्यातील विविध विकास योजना तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना, उद्दीष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावेत, असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार रविंद्र चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आज दिशा समितीच्या बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार शिवाजी काळगे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार आनंदराव तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, लोहा व भोकर नगराध्यक्ष यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती. 

या बैठकीत सुरवातीला 24 एप्रिल 2025 रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले व त्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या विविध योजनेच्या कामाचा विस्तृत आढावा घेण्यात आला. 

प्रत्येक विभागाने बैठक झाल्यानंतर अनुपालन अहवाल समितीला सादर केला पाहिजे अशा सूचना खासदार रविंद्र चव्हाण यांनी सुरवातीला सर्व विभागांना केल्या. त्यानंतर जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या पुर्ण, अपूर्ण कामाबाबतची यादी सादर करणे, स्त्रोत नाही तिथे काम झाले का, निधीचा प्रश्न, आतापर्यत किती कामे पूर्ण झाली याबाबत खासदार अशोक चव्हाण यांनी विचारणा केली. याबाबत जलजीवन मिशन योजनेबाबतचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. 

जिल्ह्यात व शहरात सध्या महावितरणच्या अनेक समस्याबाबत सर्वच लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले. लोडशेडींगसह अचानक विज गायब होण्याच्या घटनेने नागरिक त्रस्त असून याबाबत महावितरणने कायमस्वरुपी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच येत्या 5 वर्षाच्या कालावधीत शहरात सर्व केबल अंडरग्राऊड करण्याचे काम पूर्ण व्हावे अशा सूचना खासदार रविंद्र चव्हाण यांनी दिल्या. 

विजेच्या समस्या सोडविण्याबाबत तरोडा भागात 8 नवे ट्रान्सफार्मर बसविले असून इतर भागातही  ट्रान्सफार्मर बसविण्याची कार्यवाही सुरु असल्याचे महावितरण विभागाकडून सांगण्यात आले. यासह इतरही समस्या लवकरच सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल व सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यात येईल, असे महावितरणचे अधिक्षक अभियंता यांनी सांगितले. 

यावर्षी नांदेड जिल्ह्याला प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 813 कोटी रुपयांचा पिकविमा परतावा मंजूर झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी व कृषी विभागाचे यावेळी अभिनंदन केले. खताचे लिंकीग, भरारी पथके, खताचा तुटवडा होवू नये यासाठी खबरदारी, खताचा पुरेसा साठा, युरियाचा पुरवठा, मागणी प्रमाणे उपलब्धता, विक्री या विविध विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला. लिंकीगमुळे शेतकऱ्यांना खताच्या बाबतीत त्रास होवू नये याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. 

शहराला दैनंदिन पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, अमृत मिशन 2 यासह विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. नुकतेच इस्लामपुरा भागात चार शाळकरी मुलांचा खड्डयात पडून मृत्यू झाला याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती खासदार रविंद्र चव्हाण यांनी महापालिकेकडून घेतली. या मृत्त मुलांना योग्य ती मदत मिळेल याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.  

महामार्गाच्या पायाभुत सुविधा, दूरसंचार पायाभूत सुविधा कार्यक्रम, राष्ट्रीय महामार्ग, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, अमृत मिशन 2.0, पाटबंधारे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पीएम सुर्यघर योजना, रेल्वे विभाग यासह सर्व योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. अध्यक्ष खासदार रविंद्र चव्हाण यांनी नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी व विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावाणीसाठी संबंधित यंत्रणेने त्वरीत कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. या शिवाय आवश्यकतेनुसार महत्वाच्या विभागांचा आढावा स्वतंत्र बैठक घेवून घेण्यात येईल अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 

बारूळ धरण सिमेंट कॅनल बांधकाम सुरु असून संबंधित बांधकाम करत असताना नवीन मुरूम ऐवजी बाजूच्या शेतातील माती काढून कॅनल बांधकाम चालू आहे. भविष्यात शेतीचे नुकसान होऊ नये या करिता धानोरा, कांडाळा, होटाळा येथील शेतकऱ्याची उखरलेली जमीन भरून देण्यात यावी असे खासदार डॉ. काळगे यांनी सांगितले. 

यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रस्ते विकास, वीज समस्या, रस्ते अपघात, खताचा तुटवडा, खत लिंकींग याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.  

यावेळी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. शिवाजी काळगे, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव तिडके, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार श्रीजया चव्हाण यांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्या सोडविण्यासाठी विविध विभागामार्फत करण्यात येणार कामे व सुरु असलेल्या विकास कामांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करुन उपाययोजनाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. 

00000










Wednesday, April 22, 2026

 #नारीशक्तीवंदन










यशकथा

मिनी ट्रॅक्टर योजनेमुळे महिला बचत गटांची आर्थिक भरारी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयं सहाय्यता बचत गटांसाठी राबविण्यात येणारी मिनी ट्रॅक्टर योजना अनेक कुटुंबांसाठी आर्थिक उन्नतीचा मजबूत आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्ती क्षमतेचा मिनी ट्रॅक्टर व उपसाधने उपलब्ध करून दिली जातात. विशेष म्हणजे या योजनेत ९० टक्के शासकीय अनुदान व १० टक्के स्वयंसहाय्यता गटाचा सहभाग असून, लाभाची रक्कम थेट गटांच्या आधार संलग्न संयुक्त खात्यात जमा केली जाते.

नांदेड जिल्ह्यात या योजनेचा सातत्याने प्रभावी अंमलबजावणी होत असून, सन 2023-24 मध्ये 10 व सन 2024-25 मध्ये 73 बचतगटांना याचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे.

याचाच एक प्रेरणादायी नमुना म्हणजे राणी महिला बचत गट, आनंदनगर. सन २०२४-२५ मध्ये या गटाची निवड झाल्यानंतर त्यांना मिनी ट्रॅक्टर, ट्रेलर व रोटॅव्हेटर मिळाले. गटाने खरीप व रब्बी हंगामात शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर करून सुमारे १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. तसेच उर्वरित काळात ट्रॅक्टरला पाणी टँकर जोडून वापर केल्यामुळे आणखी १ लाख रुपयांची कमाई झाली. या उत्पन्नामुळे गटाच्या सदस्यांचा आत्मविश्वास वाढला असून आर्थिक स्थैर्यही प्राप्त झाले आहे असे राणी महिला बचत गटांच्या अध्यक्ष व सदस्यांनी सांगितले.  

तसेच ममता महिला बचत गट, गौतमनगर यांनीही या योजनेचा प्रभावी वापर करून आपली प्रगती साधली आहे. या गटालाही मिनी ट्रॅक्टर व संबंधित उपकरणे मिळाल्यानंतर शेती मशागतीतून सुमारे १ लाख रुपये उत्पन्न मिळाले. याशिवाय, ट्रॅक्टरच्या इतर वापरातून सुमारे १.१० लाख रुपयांची अतिरिक्त कमाई झाली. त्यामुळे गटाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.

या दोन्ही बचत गटांनी शासनाच्या मदतीचा योग्य उपयोग करून केवळ आर्थिक उन्नती साधली नाही, तर ग्रामीण महिलांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. या योजनेमुळे महिलांना स्वावलंबी बनण्याची संधी मिळत असून, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहेत. “शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेतल्यास प्रगती निश्चित आहे,” हे या यशकथांमधून स्पष्टपणे दिसून येते.

श्रीमती अलका पाटील ,

उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

00000



लेख

 १९६२ हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा

वर्षभरात ४,०१,९९२ कॉल्स, ३.७८ लाख तक्रारींचे निवारण

दुर्गम भागातील ३४९७९ पशुपालकांना लाभ 

'गोल्डन अवर' मधून ६४७५९ पशुधनाला जीवदान 

पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. जनावरांचे आरोग्य धोक्यात आले की, शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडते. मात्र, आता अद्ययावत तंत्रज्ञान आणि १९६२ मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना मोठा आधार मिळाला आहे. या सुविधेमुळे केवळ उपचारांमधील वेळच वाचला नाही, तर दुर्गम भागातील हजारो पशुधनास वेळेत 'गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. '1962 कॉल सेंटर' आणि मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्यातील तांत्रिक समन्वयामुळे पशुपालकांना आपल्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या आहेत, जे ग्रामीण समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

वर्षभरात या कॉल सेंटरकडे एकूण ४,०१,९९२ कॉल्स प्राप्त झाले. अत्यंत कौतुकास्पद बाब म्हणजे, यापैकी ३,७८,०३५ पशुधनाच्या आजारविषयक समस्यांचे यशस्वीरित्या निराकरण करण्यात आले आहे. दुर्गम व डोंगराळ भागातील पशुपालकांसाठी ही सेवा 'लाईफलाईन' ठरली असून, तब्बल ३४,९७९ पशुपालकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. हे केवळ आकडे नसून, पशुसंवर्धन क्षेत्रातील समर्पित पशुवैद्यकीय सेवेचे निदर्शक आहे. 

अपघात, विषबाधा किंवा कठीण प्रसूती अशा आपत्कालीन स्थितीत 'गोल्डन अवर' (पहिली महत्त्वाची घटका) मध्ये उपचार मिळणे अनिवार्य असते. कॉल आल्यानंतर अवघ्या १.५ तासात पशुवैद्यकीय पथक प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचते. या तत्परतेमुळे एकूण ६४,७५९ पशुधनाचे प्राण वाचले आहेत. यामध्ये २९,१३० मोठे पशुधन व ३५,५६९ लहान पशुधनाचा समावेश आहे. पशुवैद्यकीय शास्त्रात 'गोल्डन अवर' मधील उपचारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण या काळात मिळालेले उपचार पशुधनाच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करतात.

  पूर्वी किरकोळ आजारासाठीही पशुधनाला दवाखान्यात नेणे जिकिरीचे व महागडे ठरत असे, परंतु आता तज्ज्ञ पशुवैद्यक स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहेत. यामुळे केवळ आजार बरे होत नाहीत, तर वेळेवर मिळालेल्या मार्गदर्शनामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही सुलभ झाले आहे. परिणामी, दुग्धव्यवसाय हा केवळ उपजीविकेचे साधन न राहता एक शाश्वत व फायदेशीर व्यवसाय म्हणून आकारास येत आहे. शेतकऱ्यांमधून या सेवेबाबत समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

१९६२ हेल्पलाईनद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवा

🏥 औषधोपचार: आजारी जनावरांवर तातडीने उपचार.

✂️ शस्त्रक्रिया: छोट्या व मोठ्या शस्त्रक्रियांची सुविधा.

🐂 खच्चीकरण: शास्त्रीय पद्धतीने खच्चीकरण सेवा.

  कृत्रिम रेतन: पशुपैदास सुधारणेसाठी कृत्रिम रेतन.

🐛 जंतनाशक उपाययोजना: जनावरांच्या पोटातील जंतांवर नियंत्रण.

🛡️ लसीकरण: विविध साथरोगांपासून बचावासाठी लसीकरण.

 मार्गदर्शन: पशुआरोग्य व योग्य आहार व्यवस्थापन सल्ला.

वंध्यत्व तपासणी: जनावरांमधील वंध्यत्व तपासणी व निर्मुलन.

अपघात सेवा: नैसर्गिक आपत्तीत सहाय्य, भाजणे, सर्पदंश, व इतर सर्व आपत्कालीन समस्यांबाबत तात्काळ प्रतिसाद व उपचार.

योजनांची माहिती: पशुसंवर्धन विभागाच्या विविध शासकीय योजना.

 व्हॉटसअप चॅटबॉट: चॅटबॉटद्वारे सहज माहिती मिळवण्याची सुविधा.

 तंत्रज्ञानाची जोड व भविष्यातील वाटचाल: 

कॉल सेंटरमध्ये वापरले जाणारे अद्ययावत सॉफ्टवेअर, कॉल रेकॉर्डिंग व फीडबॅक सिस्टीम यामुळे सेवेचा दर्जा सुधारला आहे. आगामी काळात ही सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित प्राथमिक सल्ला व व्हॉट्सॲप चॅटबॉट यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचे नियोजन आहे. या प्रगत प्रणालीमुळे प्रत्येक कॉलचे अचूक ट्रॅकिंग व पशुवैद्यकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे सुलभ होणार आहे. रुरल कनेक्टिव्हिटी व डेटा ॲनालिटिक्सच्या जोडीने, दुर्गम भागातील पशुवैद्यकीय गरजांचे विश्लेषण करुन आवश्यक कार्यवाही नियोजनपूर्वक करता येईल. प्रस्तावित एआय तंत्रज्ञानामुळे पशुपालकांना तातडीच्या परिस्थितीत प्रथमोपचार व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती काही सेकंदात उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. डिजिटल क्रांतीची ही जोड पशुवैद्यकीय सेवांच्या कार्यक्षमतेत आमूलाग्र बदल घडवून आणणारी ठरेल, ज्यामुळे पशुधनाची हानी कमी होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. 

डॉ. किरण पाटील

 आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य

वृत्त क्रमांक

गुरुद्वारा परिसरात 17 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही 

नांदेड, दि. 22 एप्रिल:- नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 21 एप्रिल 2026 रोजी नांदेड येथील गुरुद्वारा परिसरात विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून एकूण 17 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही केली. या कार्यवाहीत  ८ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. 

सदर कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके,  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.राजाभाऊ बुट्टे व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ. संजीवनी जाधव, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड, केस रजिस्ट्री सहाय्यक सुनील तोटेवाड व एमजीवीएसचे मंगेश गायकवाड तसेच वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  कॉन्सटेबल ज्ञानेश्वर पांचाळ उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे.

00000




  भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR