Thursday, March 5, 2026

 वृत्त क्रमांक  275

नवीन सेवार्थ प्रणाली ई-बील संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी 6 मार्च तर इतर तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी 10 मार्च रोजी प्रशिक्षणाचे आयोजन 

नांदेड, दि. 5 मार्च :-जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत नांदेड जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी नवीन सेवार्थ प्रणाली ई-बील संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 6 व 10 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी परिसरातील कॅबिनेट हॉल, नियोजन भवन, येथे करण्यात आले आहे. तरी लेखा विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख यांनी केले आहे. 

नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांच्यासाठी शुक्रवार 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता तर नांदेड वगळता इतर सर्व तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी मंगळवार 10 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

संबंधित या प्रशिक्षण कार्यक्रमात नवीन सेवार्थ प्रणालीच्या कार्यपध्दती, अद्ययावत वैशिष्टे तसेच व्यवहारातील अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात अपर कोषागार अधिकारी वैशाली ताटपल्लेवार, अपर कोषागार अधिकारी नामदेव राठोड, नियुक्त मास्टर ट्रेनर तथा कनिष्ठ लेखापाल शंकर दुमाने, लेखालिपिक प्रमोद शिंदे, बसवेश्वर वाळके, सुनिल संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. तरी सर्व संबंधित विभागानी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व वेळेवर उपस्थित राहावे, असेही आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 

00000

वृत्त क्रमांक  274

गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज; 

14 वर्षांच्या मुलींसाठी 'एचपीव्ही' लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

                                                                                                                                                                        नांदेड, दि. 5 मार्च :- महिलांमधील गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यात विशेष एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ करण्यात आला. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनाने जिल्ह्यात ही लस 8 मार्च 2026 पासून राबविण्यात येणार आहे. राज्यात, जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये:

 लक्ष्य गट (Beneficiaries): ज्या मुलींनी वयाची 14 वर्षे पूर्ण केली आहेत (14 ते 15 वयोगटातील मुली), अशा सर्व मुलींना हे लसीकरण करण्यात येणार आहे.

 एकच डोस पुरेसा: या मोहिमेअंतर्गत 'क्वाड्रिवॅलेंट' एचपीव्ही लस दिली जाणार असून, या वयोगटातील मुलींसाठी लसीचा फक्त एकच डोस संरक्षणासाठी पुरेसा आहे.

 लसीकरण कोठे होईल ?: हे लसीकरण सर्व सरकारी आरोग्य केंद्रांवर (उदा. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि महापालिका रुग्णालये) उपलब्ध असेल.

 नोंदणी प्रक्रिया : पालकांना 'U-WIN' पोर्टलवर स्वतःहून नोंदणी करता येईल किंवा लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष जाऊनही नोंदणीची सोय उपलब्ध आहे.

                                                                                                                                                                        गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि लसीचे महत्त्व :

भारतामध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगामध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख आजार आहे. ९९.७ टक्के प्रकरणांमध्ये हा कर्करोग 'ह्युमन पॅपिलोमा व्हायरस' (HPV) च्या संसर्गामुळे होतो. प्रतिबंधात्मक लस घेतल्यास या कर्करोगापासून प्रभावी संरक्षण मिळू शकते.

पालकांना आवाहन:

"ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. लसीकरणानंतर ३० मिनिटे आरोग्य केंद्रावर थांबणे आवश्यक आहे. काहीवेळा हलका ताप किंवा इंजेक्शन दिलेल्या जागी थोडे दुखणे यांसारखी किरकोळ लक्षणे दिसू शकतात, जी २-३ दिवसांत आपोआप बरी होतात. आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्व पालकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या 14 वर्षांच्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे," असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी किंवा आशा स्वयंसेविकेशी संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000



Wednesday, March 4, 2026

वृत्त क्रमांक  273

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून चालना

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना घेता येणार लाभ
नांदेड दि. 4 मार्च :- राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास चालना देण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महिला सबलीकरणासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतून आर्थिक मदत मिळालेल्या महिलांना पतसंस्था स्थापनेच्या माध्यमातून बचत, गुंतवणूक आणि स्वयंरोजगाराचे दार खुले होणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी याचा मोठा फायदा होईल, असे आवाहन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी केले आहे.
याअनुषंगाने सहकार आयुक्त कार्यालयाने 11 जुन 2025 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार ८ मार्च २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये महिलासाठी वार्ड प्रभाग (मुंबई, ठाणे, नवी मुंबई) प्राथमिक सभासद संख्या १ हजार, नोंदणी वेळी भाग भांडवल १५ लाख रुपये, तर उर्वरित महानगरपालिका प्राथमिक सभासद संख्या ८००, नोंदणी वेळींचे भाग भांडवल दहा लाख, महानगरपालिका (मुंबई/ठाणे/ नवी मुंबई) प्राथमिक सभासद संख्या २०००, नोंदणी वेळी भाग भांडवल ३० लाख उर्वरित महानगरपालिका कार्यक्षेत्र प्राथमिक सभा संख्या १५०० नोंदणी वेळी भागभांडवल २० लाख, नगरपालिका सभासद संख्या ५००, नोंदणी वेळी भांडवल पाच लाख असणे आवश्यक आहे,
गाव कार्यक्षेत्र प्राथमिक सभासद संख्या २५०, नोंदणी वेळी भांडवल १.५० लाख, तालुका कार्यक्षेत्र प्राथमिक सभासद संख्या ५०० भाग भांडवल पाच लाख, जिल्हास्तरावर प्राथमिक सभासद संख्या १५०० भाग भांडवल १० लाख रुपये अशा प्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व त्याखालील नियम, १९६१ च्या तरतुदीनुसार ही नोंदणी केली जाणार आहे.
पतसंस्थेची नोंदणी करताना लाभार्थी महिलांची यादी महिला व बालविकास विभागाकडून प्रमाणित करून घ्यावी. प्रवर्तकांची पार्श्वभूमी तपासणीमध्ये मुख्य व इतर प्रवर्तकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र संबंधित पोलीस ठाण्याच्या जबाबदार अधिकाऱ्याकडून अद्यावत सादर करणे बंधनकारक राहील.
मुख्य प्रवर्तक व इतर प्रवर्तक यांनी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर पुढील मुद्दे समाविष्ट असलेले प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील. यामध्ये ग्राहकाचे 'आपला ग्राहक जाणा' याबाबत १०० टक्के KYC पूर्तता करणे, प्रवर्तक सावकारी किंवा तत्सम व्यवसाय करत नाही त्याची खात्री करणे, कोणत्याही सहकारी संस्थेचे थकबाकीदार नाहीत याची खात्री करणे, इतर सहकारी संस्थांचे संचालक नाहीत या नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांची नोंदणी नाकारण्यात येईल.
प्रत्येक नोंदणीकृत पतसंस्थेसाठी 'पालक अधिकारी' नेमणूक -सहकार विभागातील सहाय्यक निबंधक दर्जाचा अधिकारी संस्थेला मार्गदर्शन करणार असून यामध्ये हिशोब लेखन, ठेवी व कर्ज व्यवहार, सभा इतिवृत्त, लेखापरीक्षण आणि कायदेशीर बाबींबाबत मदत केली जाईल.
00000

 वृत्त क्रमांक  272

मध्यपूर्व देशात अडकलेल्या नांदेडकरांसाठी प्रशासनाचा पाठपुरावा; 

घाबरू नये, सुरक्षित परतीसाठी प्राधान्य

पालकमंत्री अतुल सावे जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात, प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना

नांदेड, दि.४ मार्च:- आज 04 मार्च 2026 रोजी सायंकाळी 05 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील एकूण 54 नागरिक  हे दुबई, शारजाह, कतार, बहरीन, सौदी अरेबिया या ठिकाणी असून ते सर्व सुरक्षित असल्याबाबतची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे. 

पालकमंत्री अतुलजी सावे हे सर्व पर‍िस्थितीवर लक्ष ठेवून असून ते परराष्‍ट्र व्‍यवहार मंत्रालय, भारत सरकार व राज्‍य आपत्‍कालीन कार्यकेंद्र, मंत्रालय, मुंबई यांच्‍याशी सतत संपर्कात आहेत. या पर‍िस्‍थितीबाबत त्‍यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्ड‍िले यांच्‍याशी चर्चा केली व आवश्‍यक सुचना द‍िल्‍या आहे.

नांदेड ज‍िल्‍हयातील जे 54 नागरीक मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये अडकून पडले आहेत अशा नागरीकांशी व त्‍यांच्‍या नातेवाईकांशी ज‍िल्‍हा आपत्‍कालीन कार्यकेंद्र हे प्रत्‍यक्ष संपर्क ठेवून असून मध्‍यपूर्व मध्‍ये अडकलेल्‍या नागरीकांच्‍या सुरक्षिततेसाठी राज्‍य शासन व केंद्र शासन यांच्‍या सुचनेनुसार कार्यवाही करण्‍यासाठी सतर्क व सज्‍ज राहण्‍याच्‍याही सुचना पालकमंत्र्यांनी ज‍िल्‍हा प्रशासनास दिल्‍या आहेत.

मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या नांदेड ज‍िल्‍हयातील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे. 

ज‍िल्‍हा आपत्‍कालीन कार्यकेंद्र हे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. 

मध्‍यपुर्व देशांमध्‍ये अडकलेल्या नांदेड ज‍िल्‍हयातील नागरिकांसाठी आवश्यक सूचनाः

सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक हालचाल टाळावी.

भारतीय दूतावास/कॉन्स्युलेटच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

आपले लोकेशन व स्थिती कुटुंबीयांना सतत कळवावी.

मोबाईल चार्ज ठेवावा व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत.

सोशल मीडियावर अफवा, अप्रमाणित संदेश किंवा चुकीची माहिती पसरवू नये.

दूतावासाकडे नोंदणी (Registration) करणे अत्यावश्यक.

महाराष्ट्र शासन व भारत सरकारचे परराष्‍ट्र व्‍यवहार मंत्रालय (MEA) एकत्रितपणे परदेशातील नागरिकांच्या सुरक्षिततेवर 24x07 लक्ष ठेवून आहेत. नागरिकांचे संरक्षण, माहिती समन्वय, आवश्यक ती मदत आणि परिस्थितीनुसार स्थलांतरण करण्‍यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

तरी नांदेड ज‍िल्‍हयातील जे कोणी नागरीक हे कतार, संयुक्त अरब अमिरात, बहरीन या देशांमध्ये अडकून पडलेले आहेत व ज्‍यांनी अद्यापपर्यंत ज‍िल्‍हा प्रशासनास संपर्क साधला नसेल अशा नागर‍िकांनी व तसेच जे कोणी नागर‍िक हे त्‍याभागातून परतून घरी आलेले असतील त्यांनी, ते परत आल्‍याबाबतची माहिती  संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथील हेल्पलाईन (02462) 235077 वर संपर्क साधून दयावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्‍यक्ष ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण राहुल कर्डिले यांनी केले आहे.

००००००

 वृत्त क्रमांक  271

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत 

नांदेड जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांची ७ मार्च रोजी कार्यशाळा

नांदेड दि.४ मार्च :- शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करून तक्रारींचा सत्वर निपटारा करण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ राबविण्यात येत आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांची कार्यशाळा शनिवार 07 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत नोंदणी व मुद्रांक विभाग तसेच सहकार विभागाशी संबंधित कायदे, नियम व कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

गृहनिर्माण संस्थांची निर्मिती झाल्यानंतर त्यांच्या उपविधीनुसार अध्यक्ष/सचिवांकडून भागधारकांना प्लॉट/सदनिका वाटप केले जाते. त्यानंतर होणारे पुनःहस्तांतरण संस्थेमार्फत केले जाते व त्यासंबंधी वाटपपत्र तसेच भागीदारी प्रमाणपत्र निर्गमित केले जाते. सदर वाटपपत्र दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करून त्यावरील मुद्रांक शुल्क भरणे बंधनकारक आहे.

Maharashtra Stamp Act, 1958 अन्वये गृहनिर्माण संस्थेकडील मूळ वाटपपत्रावर (मूळ सभासद) देय मुद्रांक शुल्क रक्कम 500 रुपये असून विलंब झाल्यास प्रति महिना 2 टक्के दराने कमाल 2 हजार रुपयापर्यंत दंड आकारला जातो.

तसेच पुनःहस्तांतरणाच्या प्रकरणात प्रचलित बाजारमूल्यानुसार मुद्रांक शुल्क आकारले जाते. वेळेत भरणा न केल्यास प्रति महिना 2 टक्के दराने दंड तसेच कमाल चारपट दंड लागू होऊ शकतो. पुनःहस्तांतरणाचे वाटपपत्र नोंदणीकृत/मुद्रांकित न केल्यास ते महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम 34 नुसार कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य राहत नाही. त्यामुळे भागधारकांना भविष्यात विक्री, हस्तांतरण, गहाणखत किंवा कर्जप्रकरणी अडचणी निर्माण होऊ शकतात.

या बाबींबाबत गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव व भागधारक यांच्यात जनजागृती व्हावी, या उद्देशाने मुद्रांक जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक (सहकार) यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेस सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी महेश वडदकर तसेच जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी केले आहे.

०००००

 वृत्त क्रमांक  270

नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ 

टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

नांदेड दि. ४ मार्च: नागरिकांना महसूल, सामाजिक सुरक्षा योजना, मोजणी, इतर शासकीय सेवा अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय, नांदेड यांच्यावतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्र. १ राबविण्यात येत आहे. 

मार्च ते मे २०२६ या कालावधीत तालुक्यातील विविध मंडळ स्तरावर शिबिरे आयोजित करून नागरिकांच्या दैनंदिन महसूल विषयक तक्रारी व प्रलंबित कामांचा तत्काळ निपटारा केला जाणार आहे.

या अभियानाअंतर्गत महसूल विभागासोबत ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, सामाजिक न्याय विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय तसेच पोलीस विभाग यांचा समन्वय साधून बहुविभागीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ व ‘सिंगल विंडो प्रणाली’चा अवलंब करून अर्ज स्वीकृती, पडताळणी व सेवा वितरणाची कार्यवाही करण्यात येईल.

अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट

लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी

नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारींचे तत्काळ निराकरण

डिजिटल सातबारा, ८-अ उतारे व इतर सेवांचा जलद पुरवठा

एकाच ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ

शिबिरात उपलब्ध सेवा

महसूल दस्तऐवज :

प्रलंबित फेरफार निकाली काढणे, सातबारा दुरुस्ती, डिजिटल सातबारा व ८-अ उतारा वितरण, ई-मोजणी अर्ज, घरकुल प्रकरणे, अतिक्रमण विषयक कार्यवाही इत्यादी.

प्रमाणपत्र सेवा :

उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्रे.

शेती व सामाजिक योजना :

पीएम किसान, संजय गांधी निराधार योजना, सामाजिक अर्थसहाय्य योजना आदींबाबत मार्गदर्शन व लाभ.

इतर विभागीय सेवा :

ग्रामविकास विभागामार्फत ग्रामपंचायत विषयक प्रकरणे

महिला व बालकल्याण विभागाच्या योजना

सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती व अनुदान योजना

पशुसंवर्धन विभागाच्या सेवा

दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत नोंदणी संदर्भातील मार्गदर्शन

पोलीस विभागाकडून आवश्यक कागदपत्रांबाबत सहाय्य

मंडळनिहाय वेळापत्रक

तालुक्यातील विविध मंडळांमध्ये खालीलप्रमाणे शिबिरे होणार आहेत

७ मार्च २०२६ – मंडळ तुप्पा

१४ मार्च २०२६ – मंडळ लिंबगाव

१० एप्रिल २०२६ – मंडळ विष्णुपुरी

१७ एप्रिल २०२६ – मंडळ नाळेश्वर

२४ एप्रिल २०२६ – मंडळ नांदेड ग्रामीण

३० एप्रिल २०२६ – मंडळ वाजेगाव

८ मे २०२६ – मंडळ तरोडा (बु.)

१२ मे २०२६ – मंडळ वसरणी

१५ मे २०२६ – मंडळ नांदेड शहर

प्रशासनाची तयारी

अभियानाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार संजय वारकड  यांच्या  अध्यक्षतेखाली दिनांक 2 मार्च रोजी बैठक घेण्यात आली . सदर बैठकीला ग्रामविकास विभाग  ,कृषी विभाग , पशुसंवर्धन विभाग , भूमी अभिलेख विभाग ,पाणीपुरवठा ,महावितरण, पुरवठा विभाग तसेच पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 सर्व प्रकरणे शिबिराच्या दिवशीच निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, प्रलंबित अर्जांची छाननी करून आवश्यक कागदपत्रांसह नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तहसीलदारांनी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले असून पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनाचा हा उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश दिले आहेत.

नांदेड तालुक्यातील नागरिकांसाठी ही शिबिरे ‘एकाच दिवशी, एकाच ठिकाणी’ विविध शासकीय सेवा मिळविण्याची सुवर्णसंधी ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या बैठकीस बळवंत मस्के उपाधीक्षक भुमिअभिलेख, स्वप्निल दिगलवार, रविंद्र राठोड, सुनील माचेवाड, मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी व इतर अधिकारी हजर होते.

00000



 वृत्त क्रमांक  269

पेट्रोल/डिझेल तुटवडा व दरवाढीबाबत पसरत 

असलेल्या अफवांबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे  आवाहन

नांदेड, ४ मार्च:-सध्या मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारत देशात पेट्रोलचा तुटवडा जाणवणार आहे व पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत, अशी अफवा जनतेमध्ये पसरत आहे. या अफवेमुळे नांदेड जिल्हा तसेच शहरामधील मधील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अनावश्यक गर्दी केल्याचे निदर्शनास आले आहे.

जिल्हा प्रशासन स्पष्टपणे कळविते की

पेट्रोल किंवा डिझेलचा कोणताही तुटवडा नाही तसेच इंधनदर वाढीचा कोणताही प्रस्ताव शासनाकडे प्राप्त नाही. ही माहिती पूर्णपणे खोटी असून नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. नांदेड जिल्ह्यात इंधन साठा सुरळीत असून पुरवठा नियमित पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे पेट्रोल/डिझेल भरण्यासाठी घाईगडबड करून गर्दी करण्याचे कोणतेही कारण नाही.

जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन 

कोणत्याही प्रकारच्या अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये.

अधिकृत माहिती फक्त शासन व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमांतूनच स्वीकारावी.

पेट्रोल पंपांवर शिस्त राखावी व अनावश्यक रांगा टाळाव्यात.

जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांनी भीती न बाळगता व अफवांना बळी न पडता दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवावेत.

०००००

  भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR