वृत्त क्रमांक
मध्यपूर्व देशात अडकलेल्या नांदेडकरांसाठी प्रशासनाचा पाठपुरावा;
घाबरू नये, सुरक्षित परतीसाठी प्राधान्य
पालकमंत्री अतुल सावे जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात, प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना
नांदेड, दि.४ मार्च:- आज 04 मार्च 2026 रोजी सायंकाळी 05 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील एकूण 54 नागरिक हे दुबई, शारजाह, कतार, बहरीन, सौदी अरेबिया या ठिकाणी असून ते सर्व सुरक्षित असल्याबाबतची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे.
पालकमंत्री अतुलजी सावे हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून ते परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार व राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र, मंत्रालय, मुंबई यांच्याशी सतत संपर्कात आहेत. या परिस्थितीबाबत त्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी चर्चा केली व आवश्यक सुचना दिल्या आहे.
नांदेड जिल्हयातील जे 54 नागरीक मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये अडकून पडले आहेत अशा नागरीकांशी व त्यांच्या नातेवाईकांशी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र हे प्रत्यक्ष संपर्क ठेवून असून मध्यपूर्व मध्ये अडकलेल्या नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन व केंद्र शासन यांच्या सुचनेनुसार कार्यवाही करण्यासाठी सतर्क व सज्ज राहण्याच्याही सुचना पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.
मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या नांदेड जिल्हयातील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे.
जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र हे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
मध्यपुर्व देशांमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्हयातील नागरिकांसाठी आवश्यक सूचनाः
सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक हालचाल टाळावी.
भारतीय दूतावास/कॉन्स्युलेटच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.
आपले लोकेशन व स्थिती कुटुंबीयांना सतत कळवावी.
मोबाईल चार्ज ठेवावा व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत.
सोशल मीडियावर अफवा, अप्रमाणित संदेश किंवा चुकीची माहिती पसरवू नये.
दूतावासाकडे नोंदणी (Registration) करणे अत्यावश्यक.
महाराष्ट्र शासन व भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (MEA) एकत्रितपणे परदेशातील नागरिकांच्या सुरक्षिततेवर 24x07 लक्ष ठेवून आहेत. नागरिकांचे संरक्षण, माहिती समन्वय, आवश्यक ती मदत आणि परिस्थितीनुसार स्थलांतरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
तरी नांदेड जिल्हयातील जे कोणी नागरीक हे कतार, संयुक्त अरब अमिरात, बहरीन या देशांमध्ये अडकून पडलेले आहेत व ज्यांनी अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनास संपर्क साधला नसेल अशा नागरिकांनी व तसेच जे कोणी नागरिक हे त्याभागातून परतून घरी आलेले असतील त्यांनी, ते परत आल्याबाबतची माहिती संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथील हेल्पलाईन (02462) 235077 वर संपर्क साधून दयावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राहुल कर्डिले यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment