Wednesday, August 19, 2026

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत वयस्कर तसेच बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सहकार आयुक्त तथा सहकारी संस्था निबंधक दिपक तावरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत.

लाभार्थी शेतकऱ्यांनी यादीतील विशिष्ट क्रमांकासह जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात आधार कार्ड व बँक पासबुक सोबत घेऊन जावे. यादीतील विशिष्ट क्रमांक अथवा आधार क्रमांकाद्वारे पोर्टलवर कर्जाबाबतची माहिती पाहून मान्य अथवा अमान्य पर्यायाची नोंद केल्यानंतर बोटांच्या ठशांद्वारे प्रमाणीकरण करण्यात येईल.
एका बोटाचा ठसा उमटत नसल्यास वेगवेगळ्या बोटांनी किमान तीन वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करावा. त्यानंतरही प्रमाणीकरण न झाल्यास ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ हा पर्याय सेवा केंद्र चालकाने निवडावा. त्यानंतर सेवा केंद्र चालक स्वतःच्या बोटाद्वारे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित तक्रार तहसीलदार यांच्याकडे ऑनलाइन पाठविण्यात येईल. संबंधित शेतकऱ्याने तहसील कार्यालयात आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२ उतारा आदी स्वतःची ओळख निश्चित करणारी कागदपत्रे सादर करावीत.
तालुकास्तरीय समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणी करून व्यक्तीची ओळख निश्चित केली जाईल. संबंधित व्यक्तीचा आधार क्रमांक योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर समितीमार्फत तक्रार मान्य करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र वयस्कर तसेच बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात योजनेच्या निकषांनुसार कर्जमुक्तीच्या लाभाची रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण वरील प्रक्रियेनुसार तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधितांना आवश्यक सूचना देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश सहकार आयुक्त तथा सहकारी संस्था निबंधक दिपक तावरे यांनी दिले आहेत.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या मात्र आधार प्रमाणीकरणापूर्वी मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत शासनाने मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. संबंधित मृत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर वारसांची नोंद करून, त्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असून, पात्र वारसांना योजनेच्या निकषांनुसार कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ही योजना सुरू केली आहे. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येत असून महाआयटीमार्फत १६.९६ लाख पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी १३.४८ लाख लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून उर्वरित लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण सुरू आहे.
पहिल्या यादीतील काही शेतकरी आधार प्रमाणीकरणापूर्वीच मृत झाल्याचे बँकांच्या निदर्शनास आले आहे. शासन निर्णयानुसार आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमुक्तीचा लाभ देता येत नसल्याने अशा कर्जखात्यांसाठी वारस नोंद करून सुधारित माहिती योजना पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.

 मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथील वरळी प्रोमेनेड येथे तर सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालय ठिकाणी होणार आहे. राज्यभर होत असलेल्या या जलसंधारण लोकचळवळीत सर्वांनी सहभाग घेऊन महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी निर्धार करुया आणि पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश सर्वत्र पोहचवूया, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉनमध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तर प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रायोजकाच्या माध्यमातून एकूण ७१,००० रुपये रक्कमेची रोख बक्षीस देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम पुरस्कार २५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार १५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार १० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे, तसेच प्रत्यक्ष सहभागींच्या मधून ईश्वरी चिठ्ठीद्वारे सात सहभागींना प्रत्येकी तीन हजार रुपयांचा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
महा वॉकेथॉन हा व्यापक जलसंधारण अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबवण्यात येत आहे. या कालावधीत पाणी अडविणे, पाणी जिरविणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण, मृदसंधारण आणि पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

 वृत्त  

महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

· अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार

मुंबई, दि. १९ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करून राबविण्यात येणाऱ्या या प्रक्रियेत मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण आणि प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासंबंधीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उद्देशाने वेळापत्रकात ही सुधारणा करण्यात आली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

प्रारूप मतदार यादीसंदर्भात ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येऊ शकतील. तसेच ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्राप्त दावे व हरकतींबाबत नोटीस देणे तसेच त्यांचा निपटारा करण्यात येईल.

या संपूर्ण प्रक्रियेनंतर महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.
0000

संजय ओरके/विसंअ



वृत्त क्रमांक

जलसंधारण दिनानिमित्त नांदेडमध्ये  ‘वॉक फॉर वॉटर’ महावॉकथॉन

नांदेड, दि. १९ -- माती व जलसंवर्धनाचे महत्त्व जनमानसात रुजविण्यासह जलसंधारणाच्या उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने २१ ऑगस्ट २०२६ रोजी जलसंधारण दिनानिमित्त नांदेड येथे ३ किलोमीटर अंतराची ‘वॉक फॉर वॉटर’ महावॉकथॉन आयोजित करण्यात आली आहे.

शासकीय तंत्रनिकेतन मैदान, नांदेड येथे सकाळी ६ वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. सकाळी ६ वाजता सहभागींचे आगमन व नोंदणी, ६.१५ वाजता वॉर्म-अप व पूर्वतयारी, ६.४५ वाजता मृद व जलसंधारणाची शपथ आणि ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते महावॉकथॉनचा शुभारंभ होईल.

सकाळी ७ ते ८ या वेळेत ३ किमी ‘वॉक फॉर वॉटर’ महावॉकथॉन होणार असून, त्यानंतर सांगता समारंभात मान्यवरांचे जलसंधारणविषयक मार्गदर्शन, संदेश तसेच रील स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव व प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे.

‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ हा संदेश देत आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमातून माती व पाण्याचे संवर्धन, जलसंधारणाची गरज आणि त्यातील लोकसहभाग याबाबत व्यापक जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे.

“पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा” आणि “माती वाचवा – पाणी वाचवा – सुरक्षित भविष्य घडवा” हा संदेश घेऊन होणाऱ्या या महावॉकथॉनमध्ये विद्यार्थी, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि जलसंधारणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मृद व जलसंधारण विभाग, नांदेड यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

00000



सुधारित वृत्त क्रमांक

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विविध विभागांच्या योजनांचा घेतला आढावा  

नांदेड , दि. 19 : केंद्रीय सामाजिक न्याय व  सक्षमीकरण राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी विविध शासकीय विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत योजनांची सद्यस्थिती, अंमलबजावणीतील प्रगती तसेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला. 

शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीत महानगरपालिकेच्या घरकुल योजनेचा, समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांचा, जाती पडताळणी समितीच्या कामकाजाचा, ॲट्रॉसिटी प्रकरणांच्या नोंदी व त्यावरील कार्यवाहीचा तसेच दिव्यांग कल्याण विभागाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचतो आहे का, तसेच अंमलबजावणीत काही अडचणी आहेत का, याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यात आली. 

बैठकीस उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव,  मनपा अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य डॉ. छाया कुलाल, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी राजेश एडके, जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक तेलंग, लीड बँकेचे व्यवस्थापक सोनकांबळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

****






वृत्त क्रमांक 

माहूरमध्ये आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी #इमारत भाडेतत्त्वावर हवी

नांदेड दि. 19 ऑगस्ट : सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांच्या अधिनस्त असलेल्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृह माहूरसाठी इमारत भाडेतत्त्वावर घेणे आवश्यक आहे.
75 प्रवेश क्षमतेच्या या वसतिगृहासाठी #माहूर शहरात सर्व सोयी-सुविधांनी युक्त, 20 ते 25 खोल्या असलेली तसेच बारमाही पाणी उपलब्ध असलेली इमारत आवश्यक आहे. इच्छुक इमारत मालकांनी आपली इमारत उपलब्ध असल्यास गृहपाल, आदिवासी मुलांचे शासकीय #वसतिगृह, माहूर (रेणुका भक्त निवासच्या पाठीमागे) यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 7038649239 वर संपर्क साधावा, असे आवाहन आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह माहूर जिल्हा #नांदेड यांनी केले आहे.
00000

वृत्त क्रमांक भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद • सहा विभागांना याच महिन्यात भेटी  • विद्यार्थी, उमेद...