Tuesday, August 18, 2026

 (कृपया सोबतच्या मुख्यालयाच्या विशेष लेखास आपल्या वृत्तपत्राद्वारे विनामूल्य व्यापक प्रसिद्धी द्यावी, ही विनंती.)

 

विशेष लेख :

जलदूत बनून पाण्यासाठी चालूया; जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र येऊया...

 

महाराष्ट्र समृद्ध, हिरवागार आणि जलसमृद्ध व्हावा, यासाठी जलसंधारण ही केवळ शासनाचीच जबाबदारी न राहता ती लोकचळवळ होणे आवश्यक आहे. याच व्यापक उद्देशाने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनसाजरा करण्यात येतो. त्यानिमित्त राज्यभर विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा केला जातो. यंदा १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताहआयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत जलसंधारणाचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातील प्रमुख उपक्रम म्हणजे २१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणारी महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’. हा उपक्रम या राज्यव्यापी उपक्रमातून जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्याबरोबरच नागरिकांमध्ये पाण्याच्या संवर्धनाची जबाबदारी आणि त्यातील आपली भूमिका याविषयी जागर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

वॉक फॉर वॉटरलोकजागृती अभियानाचे प्रतीक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना या महत्त्वपूर्ण जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः तरुणांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जलसंधारणाचा संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. वॉक फॉर वॉटरही केवळ एक वॉकेथॉन नसून, पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या व्यापक लोकजागृती अभियानाचे प्रतीक आहे. पाण्याची उपलब्धता, त्याचे संवर्धन आणि भविष्यातील पाणी सुरक्षेसाठी आजपासूनच सामूहिक प्रयत्न करण्याची गरज या माध्यमातून अधोरेखित केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

 

महावॉकेथॉन २०२६ आणि मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा

मृद व जलसंधारण विभागामार्फत स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण सप्ताह व अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत महावॉकेथॉन २०२६ आणि मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महावॉकेथॉन २०२६ मध्ये ३ कि.मी. चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पाणी वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा हा संदेश देण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम पुरस्कार २५ हजार रुपये आणि गौरव चिन्ह, द्वितीय पुरस्कार १५ हजार रुपये आणि गौरव चिन्ह तर तृतीय पुरस्कार १० हजार रुपये आणि गौरव चिन्ह देण्यात येणार आहे. तसेच ईश्वरी चिठ्ठीद्वारे सात सहभागींना प्रत्येकी ३ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

 

व्यापक लोकसहभाग आवश्यक

महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण आणि भौगोलिक परिस्थिती जिल्हानिहाय वेगळी आहे. काही भागांत अतिवृष्टी तर काही भागांत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे उपलब्ध पावसाच्या प्रत्येक थेंबाचे योग्य व्यवस्थापन, पाणी अडविणे, पाणी जमिनीत मुरविणे आणि भूजल पातळी वाढविणे यासाठी व्यापक लोकसहभाग आवश्यक आहे. पाणी अडवा, पाणी जिरवाहा केवळ घोषवाक्यापुरता मर्यादित न राहता तो दैनंदिन जीवनाचा आणि सामूहिक प्रयत्नांचा भाग बनणे ही काळाची गरज आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि नागरिकांचे जीवनमान यांना दीर्घकालीन आधार मिळू शकतो. त्यामुळे पाण्याचे संवर्धन ही भविष्यातील पिढ्यांसाठी जबाबदारीदेखील आहे.

 

जनजागृती अभियानाला आधुनिक माध्यमांची जोड

जनजागृती अभियानाला आधुनिक माध्यमांची जोड देत युवा पिढीपर्यंत जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून तरुणांनी जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि जलस्रोतांचे संरक्षण यांसारख्या विषयांवर सर्जनशील पद्धतीने जनजागृती करावी, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. युवा पिढीची सर्जनशीलता आणि डिजिटल माध्यमांची पोहोच यांचा प्रभावी संगम या माध्यमातून साधला जाणार आहे.

 

मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये स्पर्धेच्या नियमानुसार पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे असा आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदाची इन्स्टाग्राम रील्स करावी. व्हीडिओ रिलच्या सुरूवातीला रीलचा उद्देश, स्वत:चे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. रील्स स्वत:च्या पब्लिक इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करावी. रील मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटला टॅग करावी. #Save Soil Save Water हे अधिकृत हॅशटॅग वापरणे अनिवार्य आहे. रील्स बनविण्यासाठी १. माती संवर्धन, मातीची धूप रोखणे २. पाणी बचत आणि जलसंधारण ३. पावसाच्या पाण्याचे संकलन ४. शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास ५. वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण ६. गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे ७. पारंपारिक मृद व जलसंधारण पद्धती ८. माती व पाणी वाचवण्याच्या नावीन्यपूर्ण कल्पना ९. आजचे संवर्धन, उद्याचे सुरक्षित भविष्य असे विषय देण्यात आले आहे. उत्कृष्ट रील्सना २५ हजार रुपयांचा प्रथम १५ हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार आणि १० हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार देण्यात येत आहे. पुरस्कारासोबत गौरवचिन्ह ही देण्यात येणार आहे. 

 ‘महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटरमध्ये सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या जाहिराती तसेच समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेल्या अधिकृत क्यूआर कोडच्या माध्यमातून नागरिकांना आपला सहभाग नोंदविता येणार आहे.

त्यामुळे केवळ वॉकेथॉनमध्ये सहभागी होणे एवढ्यापुरतेच हे अभियान मर्यादित न ठेवता प्रत्येकाने आपल्या कुटुंबात, परिसरात, गावात आणि समाजात जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. लोकसहभागातून निर्माण झालेली जनजागृतीच जलसंधारणाच्या प्रयत्नांना अधिक व्यापक आणि परिणामकारक बनणार आहे.

जलसंधारणाच्या या राज्यव्यापी मोहिमेच्या माध्यमातून राज्य शासन आणि नागरिक यांच्यातील सहभागाचे नवे पर्व सुरू होत आहे. पाण्याचा प्रश्न केवळ शासकीय योजनांमधून सुटणार नाही, तर त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने यात सामील होऊन जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. आज वाचवलेला प्रत्येक थेंब उद्याच्या महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र येत जलसंधारणाचा संदेश देणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटरमध्ये सहभागी व्हावे आणि जलदूत बनून पाण्याच्या संवर्धनाचा संदेश घराघरात पोहोचवावा. चला, एकत्र येऊया, पाण्यासाठी चालूया आणि पाणी अडवा, पाणी जिरवाया मूलमंत्राला लोकचळवळीचे स्वरूप देत समृद्ध, हिरवागार आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया...

वर्षा फडके - आंधळे

उपसंचालक (वृत्त)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.

 

0000




 वृत्त  

नांदेड शहरात लवकरच सुरू होणार घरगुती पीएनजी गॅस पुरवठा 

पहिल्या टप्प्यात 4 हजार घरांना जोडणी 

एलपीजीच्या तुलनेत 10 ते 15 टक्के बचत

24 तास अखंडित सुरक्षित गॅस पुरवठा मिळणार  

नांदेड, 18 ऑगस्ट : जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी असून नांदेड शहरात लवकरच घरगुती पीएनजी गॅस पुरवठा सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (PNGRB) अधिकृत केलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL-गेल आणि बीपीसीएलचा संयुक्त उपक्रम) कंपनीमार्फत सिटीगॅस वितरण (CGD) प्रकल्पांतर्गत पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) नेटवर्क उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.  

पहिल्या टप्प्यात नांदेड शहरातील फरांदेनगर, तिरुमलानगर, छत्रपती चौक, कॅनॉल रोड, डीमार्ट परिसर, तरोडा खुर्द, कौठा आणि रवीनगर या भागात सुमारे 15 किलोमीटर लांबीची एमडीपीई गॅस पाईपलाईन टाकण्यात येत आहे. या माध्यमातून सुमारे 4 हजार घरांना थेट पाइपलाइनद्वारे गॅस जोडणी देण्यात येणार आहे.  

पीएनजी गॅसचे मुख्य फायदे व वैशिष्ट्ये

खर्चात बचत : पीएनजी गॅस सध्याच्या एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत सुमारे 10 ते 15 टक्के स्वस्त असून सर्वसामान्यांच्या घरगुती खर्चात बचत होणार आहे. 

किचन पर्यंतच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च मोफत : ग्राहकांच्या घराच्या, किचनच्या बाहेरील भिंतीपर्यंत गॅस पाईपलाईन व आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचा संपूर्ण खर्च MNGL कंपनी करणार असून, ग्राहकांकडून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

• 24 तास अखंडित पुरवठा: पाईपलाईनद्वारे 24 तास अविरत व सुरळीत गॅस पुरवठा सुरू राहणार असल्याने सिलिंडर संपण्याची भीती किंवा सिलिंडर बुकिंग व डिलिव्हरीची वाट पाहण्याची गरज उरणार नाही.

अत्यंत सुरक्षितः पीएनजी हा नैसर्गिक वायू वायुरूपात (Gaseous form) पुरवला जातो त्यामुळे तो घरगुती एलपीजी सिलिंडरपेक्षा अधिक सुरक्षित आहे.

पर्यावरणपूरक (Green Fuel) : हा गॅस पूर्णपणे पर्यावरणपूरक, धूरमुक्त आणि प्रदूषणरहित आहे.

नांदेड श‍हरामध्‍ये ज्या भागांत पाईपलाईनचे काम सुरू आहे. तेथील नागरिकांनी सुरक्षित, स्वस्त आणि अखंडित गॅस पुरवठ्‌यासाठी पुढे येऊन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

00000 

 

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता प्रसारित होणारी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत पाहा…

पत्रकार परिषद निमंत्रण

ई-मेल संदेश दि. 18 ऑगस्ट 2026 

प्रति ,

मा. संपादक / प्रतिनिधी

दैनिक वृत्‍तपत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया   

नांदेड जिल्‍हा 

महोदय,

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री मा. श्री. रामदास आठवले हे उद्या बुधवार, दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तरी आपण पत्रकार परिषदेस उपस्थित राहावे, ही विनंती. 

पत्रकार परिषद दिनांक     :- बुधवार 19 ऑगस्ट 2026

वेळ                           :-  दुपारी 4 वा.

स्थळ                         :-  शासकीय विश्रामगृह, नांदेड         

प्र. जिल्‍हा माहिती अधिकारी,

            नांदेड

वृत्त क्रमांक 

शालेय बस व शालेय व्हॅन धारकांनी आवश्यक सुधारणा कराव्यात 


·    महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) (पहिली सुधारणा) नियम 2026  प्रसिद्ध 

नांदेड, दि. 18 ऑगस्ट :  शासन अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) (पहिली सुधारणा) नियम 2026  प्रसिद्ध झाली आहे. या अधिसूचनेतील नियम 6A व्यतिरिक्त इतर सर्व बाबी शालेय बस व शालेय व्हॅनशी संबंधित आहेत. 

त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व शालेय बस व शालेय व्हॅन धारकांनी या सुधारित नियमांनुसार आपल्या शालेय बस, शालेय व्हॅन तसेच संबंधित व्यवस्थापनामध्ये आवश्यक त्या सुधारणा कराव्यात. या सुधारणा 16 जुलै 2026 पासून तीन महिन्यांच्या आत पूर्ण कराव्यात, अशा सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व संबंधित शालेय बस व शालेय व्हॅन धारकांनी महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) (पहिली सुधारणा) नियम 2026 चे पालन करून निर्धारित मुदतीत आवश्यक सुधारणा करून घ्याव्यात.

00000

 #माती आणि #जलसंधारण चा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये

‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राज्यव्यापी उपक्रमात सहभागी होण्यासाठी मंत्री संजय राठोड यांनी अभिनेते संजय दत्त यांना निमंत्रित केले असून, त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.
जलसंधारणाचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचावा आणि हा उपक्रम लोकचळवळीचे स्वरूप धारण करावा, या उद्देशाने लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी, कलाकार, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांना ‘महा वॉकेथॉन’मध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे.
‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, #जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश घेऊन होणाऱ्या या उपक्रमातून जलसंधारणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे.

वृत्त क्रमांक 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातर्गत 'कृषी जारे बँक' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन  

नांदेड, दि. 18 ऑगस्ट :  राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने रावविण्यात येत असलेल्या 'नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA) टप्पा-२ अंतर्गत गावस्तरावरील शेती कामांच्या यांत्रिकीकरणाला गती देण्यासाठी 'कृषी औजारे बँक' ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेऊन गावातील महिला बचत गटांनी स्वतःचे उत्पन्न वाढवावे आणि शेतकऱ्यांना माफक दरात सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 

इच्छुक महिला बचत गटांनी 'FPO-DBT Portal' या वेब प्लॅटफॉर्म किंवा मोबाईल अॅप्लिकेशनवरून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि बॅक विवरणपत्र जोडणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख सोमवार 31 ऑगस्ट 2026 असून अधिक माहितीसाठी संकेतस्थळ www.ndksp.mahapocra.gov.in ला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

योजनेचे मुख्य उद्देश

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना महागडी कृषी यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसते. अशा शेतकऱ्यांना गावस्तरावरच पेरणीपासून काढणीपर्यंतची यंत्रे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे, शेतीकामातील महिलांचे कष्ट कमी करणे आणि हवामान वदलाच्या परिस्थितीत शेती अधिक फायदेशीर करणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. 

पात्रता आणि अटी

प्रकल्प गावातील उमेद (MSRLM) किंवा माविम (MAVIM) पुरस्कृत महिला बचत गट आणि गाव संघ या योजनेसाठी पात्र आहेत (एक वर्ष पूर्ण असलेला व एका वर्षाचे सनदी लेखापाल यांचेद्वारे लेखा परीक्षण झालेले असावे ज्यामध्ये प्रकल्प रक्कमेच्या 5 टक्के उलाढाल व 5 टक्के भागभांडवल हवे). बचत गटात वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 सदस्य असणे आवश्यक आहे. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास ऑनलाईन लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल. ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही योजनेतून कृषी औजारे बँकेचा लाभ घेतला आहे. ते या योजनेस पात्र राहणार नाहीत. 

अनुदानाचे स्वरूप

या योजनेअंतर्गत कृषी औजारे बँकेसाठी प्रकल्प मूल्याच्या 60 टक्के अनुदान देय आहे ('बैंक एंडेड सबसिडी'). अनुदानाची कमाल गर्यादा 24 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. 3.20 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रकल्प मूल्य असल्यास बँक कर्ज घेणे बंधनकारक आहे. 

निवडता येणारी यंत्रे

बचतगट त्यांच्या गावातील पीक पद्धतीनुसार ट्रॅक्टर, वीवीएफ (BBF) यंत्र, बेड मेकर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र यांसारखी हवामान अनुकूल तंत्रज्ञानास प्रोत्साहन देणारी औजारे निवडू शकतात. ट्रॅक्टर खरेदी करावयाचा असल्यास त्यासोबत किमान तीन ट्रॅक्टरचलित औजारे खरेदी करणे आवश्यक आहे (टेस्ट रीपोर्ट असणारे), अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दत्तकुमार कळसाईत प्रकल्प संचालक आत्मा नांदेड यांनी दिली आहे.

00000

वृत्त क्रमांक भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद • सहा विभागांना याच महिन्यात भेटी  • विद्यार्थी, उमेद...