Wednesday, July 8, 2026

 वृत्त क्रमांक 

फळ पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांचे आवाहन

नांदेड, दि. 8 जुलै : राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना (मृग बहार) सन 2026-27 अंतर्गत नांदेड जिल्ह्यात लिंबू, मोसंबी, सीताफळ, चिकू, पेरू, संत्रा आणि हळद या अधिसूचित पिकांसाठी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

या योजनेची अंमलबजावणी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. अधिसूचित महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे.

योजनेअंतर्गत लिंबू (विमा संरक्षित रक्कम 80 हजार रुपये), मोसंबी व संत्रा (प्रत्येकी 1 लाख रुपये), सीताफळ, चिकू व पेरू (प्रत्येकी 70 हजार रुपये) तसेच हळद (1 लाख 80 हजार रुपये) या पिकांसाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे. संबंधित पिकानुसार शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागणार असून लिंबू, मोसंबी, चिकू, पेरू, संत्रा व हळद या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जुलै 2026, तर सीताफळासाठी 31 जुलै 2026 आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील अधिसूचित महसूल मंडळांमध्ये हवामान जोखमीच्या प्रकारानुसार ही योजना लागू राहणार आहे. कमी पाऊस, पावसाचा खंड, जादा पाऊस, जादा आर्द्रता, अवेळी पाऊस व जास्त तापमान यांसारख्या हवामान जोखमींविरुद्ध संबंधित पिकांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

या योजनेत अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांची लागवड करणारे मालक, कुळ, भाडेपट्टीधारक तसेच इतर पात्र शेतकरी सहभागी होऊ शकतात. पिककर्जधारक तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजनेत सहभाग ऐच्छिक आहे.

बिगर कर्जदार शेतकरी www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर किंवा बँक तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मार्फत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जासाठी आधार कार्ड, 7/12 उतारा, 8-अ उतारा, पिक लागवड स्वयंघोषणा पत्र, जिओ-टॅग केलेला फळबागेचा फोटो, बँक पासबुक आणि Farmer ID आवश्यक राहणार आहे.

शासनाच्या 11 एप्रिल 2025 च्या निर्णयानुसार Farmer ID (शेतकरी ओळखपत्र क्रमांक) या योजनेसाठी अनिवार्य असून, योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी करणेही बंधनकारक आहे.

बोगस कागदपत्रे, खोट्या पिक नोंदी किंवा अनधिकृत भाडेकराराच्या आधारे विमा काढल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही कृषी विभागाने दिला आहे.

मृग बहार 2026-27 अंतर्गत अधिसूचित फळपिकांसाठी शासन निर्णयातील अटी व शर्ती समजून घेऊन अंतिम मुदतीपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित विमा कंपनी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

००००००

वृत्त क्रमांक 

खरीप हंगाम अंतर्गत मृग बहार फळपिक विमा योजनेत हळद पिकाचा समावेश

मोसंबी, पेरू व हळद या पिकासाठी 14 जुलैपर्यंत विमा भरण्याचे आवाहन

नांदेड दि. 8 जुलै : अर्धापूर तालुक्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत  खरीप 2026- मृग बहारसाठी मोसंबी, पेरू ,या फळ पिकासह यंदा प्रथमच हळद या पिकाचा ही समावेश करण्यात आला आहे. मृग बहार अंतर्गत मोसंबी पेरू व हळद या पिकासाठी 14 जुलै पर्यंत विमा अर्ज सादर करता येणार आहेत. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन अर्धापूर तालुका कृषि अधिकारी विशाल बिऱ्हाडे यांनी केले आहे. 

या योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टक योजनेअंतर्गत फार्मर आयडी शेतकरी ओळख पत्र अनिवार्य आहे. अर्धापूर तालुक्यात यंदा पुनर्रचित हवामानावर आधारित फळविमा योजना भारतीय कृषीविमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत केवळ उत्पादनक्षम फळ पिकानाच विमा संरक्षण लागू राहणार आहे. अधिसूचित फळपिकापैकी एका फळ पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग किंवा आंबिया बहार या दोन्हीपैकी कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण घेता येणार. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँका व आपले सरकार सेवा केंद्र यांच्या माध्यमातून विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर करू शकतात. 

समाविष्ट महसूल मंडळे व अधिसूचित फळपिके 

अर्धापूर  :  हळद 

मालेगाव :  हळद , मोसंबी, पेरू .

दाभड   :  हळद ,पेरू 

मृग बहार   २०२६ फळपिक रक्कम हेक्टरी  ( रुपयात )

शेतकऱ्यांनी भरावयाचे हप्ता व विमा संरक्षित रक्कम

हळद  फळपीकासाठी 9 हजार रु. विमा हप्ता असून, विमा संरक्षित रक्कम१ लाख ८० हजार रुपये आहे.  मोसंबी फळपीकासाठी 5 हजार रुपये हप्ता असून विमा संरक्षित रक्कम 1 लाख आहे. पेरूसाठी ३ हजार ५००  हप्ता असून ७० हजार रूपये विमा संरक्षण आहे. 

00000

वृत्त क्रमांक 

कर्जमुक्ती योजनेत पारदर्शक कार्यपद्धती ;

शेतकऱ्यांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा

नांदेड, दि. 8 जुलै  : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जातून दिलासा मिळणार असून, योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. 

या योजनेची संपूर्ण कार्यपद्धती सुलभ, सोपी आणि पूर्णपणे पारदर्शक असून, शेतकऱ्यांनी कोणत्याही मध्यस्थ अथवा दलालांच्या संपर्कात न राहता, ज्या बँक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कृषी पतसंस्था किंवा सहकारी बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्या संस्थेशी थेट संपर्क साधावा.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित बँकेतील आपल्या कर्ज खात्याची माहिती अद्ययावत असल्याची खात्री करून घ्यावी. कर्ज खाते क्रमांक, कर्जाची रक्कम, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते आणि इतर तपशील अचूक असणे आवश्यक आहे. संबंधित संस्थेने मागणी केल्यानुसार आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर केल्यास पुढील प्रक्रिया सुरळीत पार पडणार आहे.

यासाठी आधार कार्ड, आधारशी संलग्न बँक खाते, बँक पासबुक, कर्ज खात्याचा तपशील, सातबारा (७/१२), ॲग्रीस्टॅक नोंदणीची माहिती, ई-केवायसी विशेषतः आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी या दोन बाबी महत्वाच्या आहेत.  ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी. शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि कोणत्याही अफवा, दिशाभूल करणारे संदेश किंवा अवैध दाव्यांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या कर्जमुक्ती प्रक्रियेबाबत नियमितपणे संबंधित बँकेशी संपर्क ठेवावा. आवश्यक कागदपत्रे केवळ अधिकृत संस्थेकडेच जमा करावीत. कोणत्याही अनोळखी व्यक्ती, एजंट किंवा दलालाकडे वैयक्तिक माहिती अथवा कागदपत्रे देऊ नयेत. शासन, संबंधित बँका, कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन केल्यास कर्जमुक्तीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शकपणे पूर्ण होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

00000


 

 

वृत्त क्रमांक 

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ ॲप कार्यान्वित; सर्व सेवांसाठी वापराचे आवाहन – जिल्हा कोषागार अधिकारी शोभा मुंढे

नांदेड, दि. ८ जुलै : महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनासंबंधित विविध माहिती व सेवा एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी ‘महा-उपलब्धी (MAHA UPLABDHI)’ हे मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले असून, १ जुलै २०२६ पासून ते कार्यान्वित करण्यात आले आहे. या ॲपचा सर्व निवृत्तीवेतनधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती शोभा मुंढे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या १६ जून २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार विकसित करण्यात आलेल्या या ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध डिजिटल सेवा सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

या ॲपमध्ये मासिक निवृत्तीवेतनाचा तपशील, महागाई भत्त्याचा फरक, आयकर कपात दाखला (फॉर्म क्र. १६), उत्पन्नाचा दाखला (Income Certificate), तसेच निवृत्तीवेतन विषयक शासन निर्णय यांसारख्या महत्त्वाच्या सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे संबंधितांना कोषागार कार्यालयात वारंवार प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

प्रथम टप्प्यातील सुविधांमध्ये Pension Payment History हा महत्त्वाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुविधेद्वारे वित्तीय वर्ष २०२४-२५ पासून अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई अथवा कोषागार कार्यालयामार्फत अदा करण्यात आलेल्या मासिक व वार्षिक निवृत्तीवेतनाचा सविस्तर तपशील पाहता येणार असून तो PDF स्वरूपात डाउनलोड व जतन करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

या ॲपचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे निवृत्तीवेतनधारकांना Single Digital Platform वर सर्व सेवा उपलब्ध करून देणे, कोषागार व अधिदान कार्यालयातील प्रत्यक्ष भेटी कमी करणे, सुरक्षित व वापरण्यास सुलभ डिजिटल सेवा प्रदान करणे आणि निवृत्तीवेतनासंदर्भातील महत्त्वाच्या सूचना वेळेवर उपलब्ध करून देणे हे आहे.

‘महा-उपलब्धी’ ॲपचा User Manual आणि FAQ हे निवृत्तीवेतन वाहिनी प्रणालीवर तसेच ॲपच्या लॉगिन पृष्ठावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ॲपच्या वापराबाबतची सविस्तर माहिती तेथे पाहता येणार आहे.

सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घेऊन ‘महा-उपलब्धी’ ॲपचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती शोभा मुंढे तसेच अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) नामदेव राठोड यांनी केले आहे.

000000

Tuesday, July 7, 2026

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६’ ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात



 

 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' च्या प्रक्रियेला वेग

वृत्त क्रमांक भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद • सहा विभागांना याच महिन्यात भेटी  • विद्यार्थी, उमेद...