Wednesday, April 22, 2026

वृत्त क्रमांक

हवामान खात्याचा इशारा

नांदेड जिल्ह्यात तीन दिवस यलो अलर्ट जारी 

नांदेड, दि.22 एप्रिल :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 22,23 व 25 एप्रिल 2026 हे तीन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. हे तीनही दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

आकाशत विजा चमकत असल्यास 

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. 

या गोष्टी करु नका:

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

00000

लेख

'एल-निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

'जिल्हा चारा सुरक्षा आराखडा' तयार करण्याचे मा. मुख्यमंत्री यांचे निर्देश

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २०२६ च्या मान्सूनवर 'एल-निनो' (El-Nino) या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी व संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व तातडीचे निर्देश दिले आहेत.

राज्यात सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्याची ४३.९८% तर सुक्या चाऱ्याची २५.१२% तूट असते. 'एल-निनो'मुळे पाऊस कमी झाल्यास ही तूट वाढण्याची भीती आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने 'जिल्हा नियोजन व विकास समिती' अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना किंवा आपत्ती निवारण निधीतून चारा बियाणे खरेदीसाठी निधीला प्राधान्य द्यावे. बियाणांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या चारा बियाणांचे कार्यारंभ आदेश महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोला यांना तातडीने देण्याच्या सूचना मा. मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. ५ मे २०२६ पूर्वी हे आदेश देऊन बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. चारा उत्पादन वाढवण्यासाठी शासनाने वैरण बियाणे वाटप, हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्पादन, मिनी टीएमआर (TMR) आणि कडबाकुट्टी यंत्रांचे वाटप यासह विविध योजनांवर भर दिला आहे. 

विशेष 'जिल्हा चारा सुरक्षा आराखडा'

जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेऊन स्वतंत्र 'जिल्हा चारा सुरक्षा आराखडा' तयार करावा, असे निर्देश मा. मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. यात प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश असेल:

• धरणांचे गाळपेरा क्षेत्र व नदीपात्रालगतच्या जमिनींवर चारा लागवडीची विशेष मोहीम राबवणे.

• टंचाईच्या काळात चाऱ्याची उपलब्धता राहण्यासाठी मुरघास प्रकल्पांना गती देणे.

• भविष्यात चारा छावण्यांची वेळ येऊ नये, यासाठी आतापासूनच चारा साठवणुकीचे अचूक नियोजन करणे.

पशुसंवर्धन विभागाने जिल्हा उपआयुक्त व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने या मोहिमेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पशुपालकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

"राज्यात 'एल-निनो'च्या प्रभावामुळे उद्भवू शकणाऱ्या संभाव्य चारा टंचाईबाबत पशुसंवर्धन विभाग पूर्णपणे सजग आहे. मी सर्व पशुपालकांना आवाहन करतो की, त्यांनी शासनाच्या 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने'चा लाभ घ्यावा व पावसाळा सुरू होताच चारा पेरणीचे नियोजन करावे. तसेच, मुरघास निर्मितीसारख्या आधुनिक तंत्रांचा अवलंब करून चाऱ्याची साठवणूक करावी. पशुधनाचे संरक्षण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असून, विभाग कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे."

डॉ. किरण पाटील 

भा.प्र.से.आयुक्त पशुसंवर्धन, 

महाराष्ट्र राज्य.

Monday, April 20, 2026

वृत्त क्रमांक

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदविण्याचे युवक-युवतींना आवाहन 

नांदेड  दि. 20 एप्रिल :- भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अंतर्गत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आलेली आहे. या इंटर्नशिप योजनेसाठी 18 ते 25 वयोगटातील पूर्ण वेळ शिक्षण, कौशल्य किंवा नोकरीत नसलेला भारतीय युवावर्ग पात्र आहे. या योजनेअंतर्गत भारतातील नामांकित कंपन्यांमध्ये युवकांना ६ ते ९ महिन्यांचे प्रशिक्षण (इंटर्नशिप) दिले जाणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा आर्थिक सहायता 9 हजार रुपये व एकरकमी सहायता 6 हजार रुपये देण्यात येणार आहे. 

या इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदवण्यासाठी https://pminternship.mca.gov.in या वेबसाईटवरील Register now या टॅबवर क्लिक करून उमेदवारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी उमेदवारांच्या आधार क्रमांकास मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक असून आधार लिंक मोबाइल क्रमांक वर ओटीपी पाठवण्यात येतो त्यानंतरच उमेदवारांची नोंदणी होऊ शकते. 

जिल्ह्यातील 18 ते 25 वयोगटातील जास्तीत पात्र युवक-युतीने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत नोंदणी करून प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून घ्यावी व अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड या कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आनंदनगर रोड बाबानगर नांदेड येथे ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दूरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

वृत्त क्रमांक

माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळावा 

नांदेड  दि. 20 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व हिरकणी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 22 एप्रिल 2026 सकाळी 10 वा. पासून हिरकणी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजकांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार असून जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांनी 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वा.पासून हिरकणी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था माहुर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.रा.म. कोल्हे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे. 

आधिक माहितीसाठी संपर्क सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आनंदनगर रोड बाबानगर नांदेड. दुरध्वनी क्रमांक ०२४६२-२५१६७४ येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्रमांक

अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाची पहाटे मोठी कारवाई

नांदेड, दि. 20 एप्रिल:- सोमवारी पहाटे अवैध वाळू उत्खनन प्रकरणात महसूल प्रशासनाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणारे तीन इंजिन व एक बोट जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट करून उद्ध्वस्त करण्यात आले. जप्त व नष्ट करण्यात आलेल्या साहित्याची अंदाजे किंमत सुमारे १३ लाख रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वात मौजे भनगी येथे करण्यात आली. अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राचे होणारे नुकसान, पर्यावरणीय हानी तसेच शासनाच्या महसुलाचे होणारे नुकसान लक्षात घेता प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही धडक कारवाई केली.

या मोहिमेत नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, मंडळ अधिकारी श्रीकृष्ण येलमाटे, कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, शिवानंद स्वामी, सय्यद मोसीन तसेच ग्राम महसूल अधिकारी मनोज सारपे, मनोज जाधव, गजानन होळगे, रमेश गिरी, राजेश बरोडा, महेश जोशी, गोपीनाथ कल्याणकर, पोलीस कर्मचारी श्री नागरगोजे आणि महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांनी सहभाग घेतला.

प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महसूल विभागाने दिला आहे.

00000







 

  वृत्त क्रमांक

भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धतीबाबत

 22 एप्रिल रोजी विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

नांदेड, दि. 20 एप्रिल:- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत अभियान स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान” (CRT) बाबत कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने माहे एप्रिल 2026 मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळा घेण्याचे नियोजन केले होते.  त्यानुसार 1,8,15 एप्रिल रोजी डिजीटल शेतीशाळा संपन्न झाल्या असून चौथी विशेष डिजीटल शेतीशाळा 22 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. 

सदरील शेतीशाळेस कृषि विभाग अंतर्गत उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, कृषी ताई व कृषी सखी तसेच पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पशुसंवर्धन विकास अधिकारी, पशुसंवर्धन पर्यवेक्षक व पशुसखी हे उपस्थित राहतील. तसेच प्रत्येक गावात एका मध्यवर्ती ठिकाणी  शेतकरी एकत्रित उपस्थित राहतील असे नियोजित आहे.

पाणी फाउंडेशन द्वारे संचलित डिजिटल शेती शाळा हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे, जिथे तज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीक निहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम आणि युट्युबच्या माध्यमातून दिले जाते.

यापूर्वी दिनांक १, ८ व १५ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या डिजिटल शेतीशाळेच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता पुढील सत्र भाग ४ भात शेतीचे लागवड तंत्र : भाताची थेट पेरणी (DSR), श्री पद्धत आणि भात लावणी साठी यांत्रिकी पद्धत बाबत नियोजित दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी मार्गदर्शन मिळणार आहे. 

 तरी शेतकरी बंधू-भगिनी, शेतकरी गट, FPOs आणि महिला बचत गटांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. चला, हवामान बदलाला सामोरे जात, आपल्या शेतीला अधिक शाश्वत आणि समृद्ध बनवूया.   

उपरोक्त शेती शाळा नियोजित दिनांक दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सदर डिजिटल शेतीशाळा खाली दिलेल्या यु ट्यूब चॅनेल द्वारे आपण डिजिटल शेती शाळा बघू शकता- 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प- https://www.youtube.com/live/mEgTBeO_yP8?si=0M2ezKHv6OmCUOWf

कृषी विभाग महाराष्ट्र शासन- https://www.youtube.com/live/2JKciiYL0I?si=l21CrYi7oyDEk3Xu  

पाणी फाउंडेशन- https://www.youtube.com/live/nF-20hUunAo?si=iE-MYbPJ21SCCWiH 

या डिजिटल शेती शाळांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा  तसेच प्रत्येक गावातील जास्तीत जास्त शेतक-यांनी विशेषत: बिलोली, देगलूर, किनवट, धर्माबाद या तालुक्यातील गावांमधील शेतक-यांनी डिजिटल शेतीशाळेसाठी आपल्या घरातून ऑनलाईन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे. 

00000

  भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR