Wednesday, March 4, 2026

 वृत्त क्रमांक  268

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन  

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची पत्रकार परिषदेत माहिती    

नांदेड दि. 4 मार्च :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्यामध्ये शासनाच्या सुचनेप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील सर्व मंडळस्तर व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात महसूल विषयक प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच लोकसेवा हक्क कायद्यानुसार प्रमाणपत्रांचे वितरण, सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  

तालुक्यातील मंडळ स्तरावर या शिबिराचे आयोजन शनिवार 7 व 14 मार्च 2026 रोजी करण्यात आले आहे. तसेच एप्रिल महिन्यात तालुक्यातील मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन शुक्रवार 10,17,24 एप्रिल व गुरूवार 30 एप्रिल 2026 रोजी करण्यात आले आहे. नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर शिबिराचे आयोजन शुक्रवार 8 मे, मंगळवार 12 मे तर शुक्रवार 15 मे 2026 रोजी करण्यात आले आहे.  

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत सर्वसामान्य जनतेला विविध सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यात महसूल विषयक प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढण्यात येणार आहेत. अभिलेख दुरूस्ती हेल्प डेस्क, लोकसेवा हक्क कायदा- तात्काळ सेवा, अकृषिक तरतुदी संदर्भातील सुधारणांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. भूसंपादन केलेल्या व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्यावत केले जाणार आहे. Ease of Doing Business सुधारणा व नागरी सुविधा एक खिडकी व्यवस्था तसेच ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक, पी.एम. किसान, तक्रार निवारण यासह इतर सेवा या शिबिरात उपलब्ध आहेत.

या अभियानांतर्गत पूर्व तयारीच्या अनुषंगाने शाासन निर्णयातील तरतुदीनुसार भोगवटदार वर्ग दोन जमिनी भोगवटदार वर्ग एक मध्ये परावर्तीत करण्यात आल्या किंवा नाहीत याची तपासणी मंडळ स्तरावर करुन अशा काही जमिनी वर्ग एक मध्ये परावर्तीत करणे बाकी असल्यास त्याबाबत वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पूर्वतयारीच्या कालावधीत प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.  

जिवंत सात/बारा मोहिमेंतर्गत शासनामार्फत सुचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने सर्व गावांमध्ये सात/बारा वाचन पूर्ण करुन प्रलंबित नोंदीच्या याद्या तयार करून त्याअनुषंगाने दुरूस्तीबाबत कार्यवाही शिबिरापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.  

सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज शिबिरापूर्वी भरून समितीच्या बैठकीचे आयोजन करुन लाभ मंजूर करुन घेणे.   

तुकडेबंदी कायद्याविरुद्ध 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्रमाणभूत सीमेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार व हस्तांतरणाबाबत गावनिहाय यादी तयार करणे.  

नोंदणीकृत दस्ताच्या आधारे रद्द झालेली, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनामुळे सात/बारा मधील इतर अधिकारातील खरेदीदारांचे नाव, इतर अधिकारात नोंदविलेले शेरे, तसेच नव्याने प्राप्त अर्जाविषयी फेरफार घेणे, अनोंदणीकृत व्यवहाराविषयी गावनिहाय माहिती गोळा करुन नोंदणीसाठी नोंदणी विभागाकडे पाठविणे, सात/बारा अद्यावत करुन शिबिराच्या दिवशी अद्यावत सात/बाराचे वाटप करण्यात येणार आहे. 

मंडळ स्तरावरील सर्व शाळांचा आढावा घेऊन दाखले वाटप न झालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करुन शाळेमध्येच विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. शिबिराच्या दिवशी त्या दाखल्याचे वाटप करण्यात येणार आहे. 

शासन निर्णयानुसार उपविभागीय स्तरीय समितीने शिबीर आयोजित करुन मंडळातील पाणंद रस्त्याच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतला उपलब्ध करुन द्यावे. मंडळातील सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे वाटपासाठी बाकी राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करुन तसेच संबंधीत शासन निर्णयातील तरतुदीनुसार पूर्वतयारीच्या कालावधी प्रक्रिया पूर्ण करावी व शिबिरात पट्टे वाटप करावे आदी मार्गदर्शक सुचना शिबिराच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने निर्गमीत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.  

00000





वृत्त क्रमांक  267

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना प्रशिक्षण 

नांदेड दि. 4 मार्च :- आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात 1 एप्रिल 2026 पासून सुरु होणाऱ्या 114 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरीता विविध स्पर्धा परिक्षेची तयारीकरिता प्रवेश देण्यासाठी 27 मार्च 2026 तत्पूर्वी कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसुचित जमाती) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आली आहेत, असे आवाहन कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी केले आहे.
 
प्रशिक्षण सत्रात नौकऱ्यासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करून घेण्यात येते तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले जाते. पात्र इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार 27 मार्च 2026 पर्यंत शैक्षणिक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत.
 
कार्यालयाचा पत्ता आदिवासी उमेदवारांकरीता, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या बाजुस गोकुंदा ता. किनवट जि.नांदेड पिन कोड-431811 असून अधिक माहितीसाठी संपर्क दुरध्वनी क्रमांक :- 9881524643, 7219709633, 9518997868, 02469-221801 आहे.
 
प्रवेशाच्या अटी
उमेदवार अनुसुचित जमाती पैकी (एस.टी) प्रवर्गातील असावा. नांदेड जिल्हयातील व इतर जिल्हयातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीत कमी शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: राहाण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी तीन महिने पंधरा दिवस असुन शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदवीधरांना द.मा. 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा-उमेदवारांचे वय दिनांक 27 मार्च 2026 रोजी 18 वर्षे पूर्ण असावे व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन संबंधीत प्रशिक्षणार्थीचे बँक खातेमध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थीचे बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. आपण यापूर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा सदर प्रशिक्षण सत्र अर्ध्यातुन सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही, असेही आवाहन कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी केले आहे.
000000

आज पत्रकार परिषद

सर्व सन्माननीय संपादक,पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी, छायाचित्रकार

महोदय,

आज बुधवार दि. ४ मार्च रोजी दुपारी ४ वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डीले हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा-१) संदर्भात पत्रकारांना माहिती देणार आहेत. त्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

जिल्हा माहिती अधिकारी,

नांदेड

पत्रकार परिषद 

वेळ :आज दुपारी ४ वा

ठिकाण :जिल्हाधिकारी बैठक हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड

00000


 https://meet.google.com/hpw-sgmb-qsv

पत्रकार बैठक करिता लिंक

जे माध्यम प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही लिंक...

Tuesday, March 3, 2026

 वृत्त क्रमांक  266

प्रेस नोट

आज दि. 03 मार्च 2026 रोजी सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील एकूण 50 नागरिक दुबई, शारजाह, कतार, बहरीन, सौदी अरेबिया या ठिकाणी असून ते सर्व सुरक्षित असल्याबाबतची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे.

Monday, March 2, 2026

 वृत्त क्रमांक  265

दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे

क्रीडा सवलतीचे गुण प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. मार्च :- फेब्रुवारी-मार्च 2026 च्या दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन बुधवार 15 एप्रिल 2026 पर्यंत सादर करण्याचे आवाहन लातूर विभागीय मंडळाने केले आहे.

 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना व एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्यात येतात. यासाठीचा शासन निर्णय दिनांक 20 डिसेंबर 2018 रोजी निर्गमीत करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावीअसेही आवाहन केले आहे.

 

या शासन निर्णयानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून क्रीडा प्रस्ताव तसेच एन.सी.सी. स्काऊट गाईड इत्यादी प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडून दरवर्षी विभागीय मंडळाकडे सादर केले जातात. त्याअनुषंगाने फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इ.१० वी व इ. १२ परीक्षेस प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दि. १५ एप्रिल २०२६ पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे आपले सरकार पोर्टलव्दारे ऑनलाईन पध्दतीने पाठवावयाचे आहेत. तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईडचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी विभागीय मंडळांकडे प्रचलित पध्दतीने दि. १५ एप्रिल २०२६ पर्यंत पाठवावयाचे आहेत.

 

सर्व जिल्हा कीडा अधिकारी, सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक व सर्व संबंधित घटकांनी या बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावीअसेही आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक  264

 प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या   

·    पाळीव किंवा भटके प्राणी, पक्ष्यांना सुकाओला रंग लावू नका

 

नांदेड दि. 2 मार्च :-  प्राण्यांना सणांची समज नसते. त्यांच्यासाठी मोठा आवाज, अचानक अंगावर येणारे रंग, पाण्याचे फुगे आणि आक्रमक वर्तन अत्यंत भीतीदायक आणि जीवघेणे ठरू शकते. रासायनिक रंगांमुळे त्यांची त्वचा आणि डोळे जळू शकतात. नागरिकांनी हा रंगांचा सण साजरा करत असतांना भटके कुत्रे, मांजर, गुरे, पक्षी किंवा पाळीव प्राणी यांना कोणत्याही प्रकारचा ताण, इजा किंवा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

 

होळी हा आनंद, मैत्री आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला सण आहे. यंदा हा सण मंगळवार 3 मार्च 2026 रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. भारतीय जीवजन्तु कल्याण बोर्ड (AWBI) च्या मार्गदर्शक सूचनुनुसार

 

नागरिकांनी हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की प्राण्यांना वेदना, दुखापत किंवा त्रास देणे हा प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा कायदा, 1960 (Prevention of Cruelty to Animals Act, 1960) अंतर्गत शिक्षेस पात्र गुन्हा आहे. तसेच सण दयाळूपणे साजरा करणे हे केवळ आपले नैतिक कर्तव्यच नाही तर प्राण्यांच्या कल्याणाशी संबंधित कायद्यानुसार बंधनकारक देखील आहे.

 

नियमांचे पालन करा

·  पाळीव प्राणी, भटके प्राणी आणि पक्षी यांच्यावर सुका किंवा ओला रंग लावणे टाळा.

·  प्राण्यांवर पाण्याचे फुगे फेकू नका किंवा रंगीत पाणी उडवू नका, कारण यामुळे ते घाबरू शकतात आणि त्यांना गंभीर दुखापत होऊ शकते.

·  आपले पाळीव प्राणी घरात किंवा सुरक्षित आणि शांत ठिकाणी असल्याची खात्री करा आणि भटक्या प्राण्यांना गर्दीच्या किंवा गोंधळाच्या ठिकाणांपासून दूर राहण्यास मदत करा.

· सण साजरा केल्यानंतर परिसराची स्वच्छता राखा आणि प्राण्यांच्या पोटात हानिकारक पदार्थ जाऊ नयेत यासाठी रंगांचे अवशेष, प्लास्टिकचा कचरा आणि फुगे गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावा.

·    होळी प्राण्यांना अनुकूल आणि दयाळूपणे साजरी करण्याबाबत लहान मुले, मित्र आणि शेजाऱ्यांमध्ये जनजागृती करा.

·    एखाद्या प्राण्याच्या अंगावर रंग पडल्यास किंवा त्याला दुखापत झाल्यास, स्वच्छ पाण्याने तो भाग हळुवारपणे धुवा आणि त्वरित पशुवैद्यकीय मदत घ्या.

·   केवळ मानवांसाठी नैसर्गिक रंगांचा वापर करा आणि शांततापूर्ण, पर्यावरणपूरक आणि क्रूरता मुक्त उत्सवाला प्रोत्साहन देऊन जबाबदारीने सण साजरा करा.

 

या होळीमध्ये आपण उत्साहापेक्षा सहानुभूती, गोंधळापेक्षा दयाळूपणा आणि हानी पेक्षा मानवतेला प्राधान्य देऊ या. खऱ्या अर्थाने रंगतदार होळी तीच असते ज्यामध्ये कोणत्याही सजीव प्राण्याला दुखापत होत नाही. "सुरक्षित खेळा. दयाळूपणे खेळा. क्रूरतेशिवाय होळी साजरी करा." असे आवाहन SPCA समिती आणि जिल्हा प्रशासन नांदेड यांच्यावतीने केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 263 

‘आयोग आपल्या दारी’

नांदेड येथे द्वितीय अपीलांचा विशेष अपील निर्गत कार्यक्रम 9 ते 13 मार्च दरम्यान

नांदेड, दि. 2 मार्च :- राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांच्या संकल्पनेतून ‘आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नांदेड येथे द्वितीय अपीलांचा विशेष अपील निर्गत कार्यक्रम 9 ते 13 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

राज्य माहिती आयोग, छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडे माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 19 (3) अंतर्गत प्रलंबित द्वितीय अपीलांचा शिघ्र निपटारा व्हावा तसेच अपीलार्थी, जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या वेळेची बचत व्हावी, या उद्देशाने नांदेड जिल्ह्याशी संबंधित द्वितीय अपीलांची सुनावणी नांदेड मुख्यालयी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सन 2024 व सन 2025 या कालावधीत आयोगाकडे सादर करण्यात आलेली व अद्याप प्रलंबित असलेली नांदेड जिल्ह्यातील एकूण 1136 द्वितीय अपीलांची सुनावणी या विशेष कार्यक्रमांतर्गत मा. राज्य माहिती आयुक्त, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांचेसमोर होणार आहे.

ही सुनावणी 9 ते 13 मार्च 2026 दरम्यान कॅबिनेट हॉल, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व संबंधितांना आयोगाकडून सुनावणी नोटीस पोस्टाने पाठविण्यात आलेल्या आहेत. तसेच सुनावणी बोर्ड (वादसूची) आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

संबंधित अपीलार्थींनी www.sic.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपल्या अपील क्रमांकानुसार सुनावणीची तारीख व वेळ तपासून सुनावणीस व्यक्तिशः उपस्थित राहावे, असे आवाहन आयोगाचे उपसचिव रा. चो. सरवदे यांनी केले आहे.

००००००



  भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR