Monday, March 2, 2026

वृत्त क्रमांक  262

सर्व पशुवैद्यकीय चिकित्सालये, तालुका व जिल्हा चिकित्सालये तसेच फिरते दवाखान्यांच्या कामकाजाच्या वेळा निश्चित

नांदेड, दि. 2 मार्च :- ग्रामीण भागातील पशुपालकांना सकाळच्या सत्रात पशुवैद्यकीय सेवा सुलभ व्हावी तसेच कार्यक्षेत्रातील गावांना नियमित भेटी देऊन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविता याव्यात, या उद्देशाने राज्यातील जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालये, तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालये, पशुवैद्यकीय दवाखाने व फिरते पशुवैद्यकीय दवाखाने यांच्या कामकाजाच्या वेळांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या दि. 28 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार दि. 1 मार्च 2026 पासून पुढील सुधारित वेळा लागू करण्यात आल्या आहेत.

सुधारित वेळापत्रक :

सोमवार ते शुक्रवार : सकाळी 8 ते दुपारी 1.30 व सायं. 3 ते 5

शनिवार : सकाळी 8 ते दुपारी 1

जिल्हा व तालुका स्तरावर विशेषज्ञ सेवा तसेच पशुपालकांना आकस्मिक प्रसंगी 24 तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व पशुपालक व शेतकरी यांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सखाराम बाबुराव खुणे यांनी केले आहे.

०००००

 वृत्त क्रमांक 261 

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त "अस्मिता महिला लीग" आयोजनात सहभागी होण्याचे आवाहन

नांदेड, दि. 2 मार्च :- भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांचेकडून प्राप्त पत्रानुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त "अस्मिता महिला लीग" आयोजनासंबंधी मानक कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्हयामध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरण, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, खेलो इंडिया, माय भारत, युवा कार्य, क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विदयमाने व सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या सहकार्याने 8 मार्च, 2026 रोजी "अस्मिता महिला लीग" स्पर्धाचे आयोजन सायन्स कॉलेज, नांदेड करण्यात आले आहे. 

या स्पर्धेचा मुख्य उददेश म्हणजे महिला खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, क्रीडा सहभाग वाढविणे व स्थानिक स्तरावर क्रीडा चळवळ बळकट करणे, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे, जिल्हास्तरावर क्रीडा संरचना व तांत्रिक क्षमता विकसित करणे हा आहे.

स्पर्धेची रचना क्रीडा प्रकारः अॅथलेटिक्स प्रस्तावित स्पर्धाः अ) धावण्याच्या स्पर्धा :100 मीटर, 200, 400 मीटर याबाबीचा समावेश असून यामध्ये वयोगटः 13 वर्षांखालील, 13 ते 18 वर्षे, 18 वर्षांवरील मुली व महिलांचा समावेश राहील. 

वय पडताळणी नोंदणीच्या वेळी पुढील कागदपत्रांच्या आधारे वय निश्चित करण्यात येईलः 1) आधारकार्ड (प्राधान्याने), 2) राज्य/केंद्रशासनाने दिलेला जन्म तारीख नमूद असलेला पुरावा, 3) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र इत्यादी नोंदणी दरम्यान खेळाडूंचे वय, वजन व उंची नोंदविणे आवश्यक राहील. यासाठी नांदेड जिल्हयातील मुली व महिला खेळाडूंनी ASMITA Portal वर आपली नांवे 07 मार्च, 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह अपलोड करणे बंधनकारक आहे. यामध्ये पहिला, दुसरा व तिसऱ्या विजेत्या खेळाडूंना मेडल देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

तरी नांदेड जिल्हयातील 13 वर्षांखालील, 13 ते 18 वर्षे, 18 वर्षांवरील मुली व महिलां खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने अस्मिता पोर्टलवर आपली नांवे अपलोड करावी व 08 मार्च,2026 रोजी सकाळी 7.30 वा. सायन्स कॉलेज, नांदेड येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक) 9657092794 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक  259

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

नांदेड, दि. 2 मार्च :- कै. शंकरराव चव्हाण नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा नुकताच घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, लातूरचे प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. नाना सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीस जिल्ह्यातील सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक तसेच ‘मैत्री’ व नॅशनल डेअरी स्कीम अंतर्गत कार्यरत सेवादाते उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातील पशुप्रजनन कार्य, दुग्ध उत्पादन वाढ तसेच विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प (टप्पा 2) अंतर्गत बाबनिहाय आढावा घेण्यात आला. यासोबतच किसान क्रेडिट कार्ड योजना, महाराष्ट्र गोजातीय प्रजनन कायदा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील प्रजननक्षम गाय व म्हैस वर्गीय जनावरांसाठी वंध्यत्व निवारण शिबिरे आयोजित करून कृत्रिम रेतनाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. अधिक दुध उत्पादन देणारी जनावरे तसेच मादी कालवडींची निर्मिती करण्यासाठी लिंगवर्गीकृत रेतमात्राचा वापर वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. दुग्ध उत्पादनवाढीसाठी विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत कृती आराखडा तयार करून प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

पशुधनातील विविध लसीकरण मोहिमांचा आढावा घेण्यात आला. लाळ-खुरकूत (FMD) लसीकरणाच्या आठव्या फेरीस सुरुवात करण्यात आली असून विहित मुदतीत लसीकरण पूर्ण करून ‘भारत पशुधन’ प्रणालीवर माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले. लिंगवर्गीकृत रेतमात्रासाठी जिल्हा नियोजन समितीकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात कृत्रिम रेतनाचे कार्य दुप्पट करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या नियंत्रित प्रजनन कार्यक्रमाच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. तसेच प्रधानमंत्री धनधान्य योजनेअंतर्गत उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक नियोजन व उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत लिंगवर्गीकृत रेतमात्राचा पुरवठा करण्यात आला. यासंदर्भात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना डॉ. स्वप्नील देशमुख (एबीएस जीनस) यांनी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले, डॉ. अरविंद गायकवाड, नॅशनल डेअरी स्कीमचे प्रकल्प समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर सोनटक्के, विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. सतीश खिल्लारे तसेच विभागातील सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

०००००

 वृत्त क्रमांक  258

सामाजिक न्याय विभागामार्फत विविध राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी

 15 मार्चपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 2 मार्च :- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सामाजिक न्याय विभागामार्फत विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारासाठी इच्छुक सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड कार्यालयाकडे 15 मार्च 2026 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, शाहू-फुले-आंबेडकर पारितोषिक,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.

सन 2024-25 व 2025-26 या आर्थिक वर्षांसाठी देण्यात येणाऱ्या वरील पुरस्कारांसाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांकडून 15 मार्च 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित वर्षासाठी विहित अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील. पुरस्कारासाठी पात्रतेचा कालावधी 01 जानेवारी ते 31 डिसेंबर असा विचारात घेण्यात येईल. सन 2024-25 या वर्षासाठी पात्रतेचा कालावधी 01 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 असा राहील. सन 2025-26 या वर्षासाठी पात्रतेचा कालावधी 01 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 असा राहील.

विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नांदेड येथे तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

00000

 मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

Sunday, March 1, 2026

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के चरणों में कोटि-कोटि नमन। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने बताया कि कैसे हमारे गुरुओं की सीख आज भी हमें सामाजिक एकता के सूत्र में पिरोती है।


 

“हिंद-दी-चादर” ३५० वा शहीदी समागम
मा. अमित शाह यांच्या ओजस्वी संबोधनातून गुरु साहिबांच्या शौर्य आणि धर्मनिष्ठेची उजळणी.
इतिहास आणि राष्ट्रभावना यांचा सशक्त संदेश संगतपर्यंत पोहोचला.



 

  भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR