Tuesday, June 20, 2017

महाविद्यालयात प्रवेशाच्‍या वेळीच मतदार यादीत नोंदणीस सुरुवात
जास्तीत जास्त तरुणांच्‍या सहभागाचे जिल्हाधिकारी डोंगरे यांचे आवाहन
                नांदेड दि. 20 :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तरूण व पात्र प्रथम मतदारांची (वयोगट 18 ते 21) नोंदणी करण्‍याकरीता जिल्‍हयात प्रत्‍येक महाविद्यालयात मतदार यादीत नाव नोंदणीसाठी सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे. या मोहिमेत जिल्‍हयातील जास्‍तीत जास्‍त तरूण व पात्र प्रथम मतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन नांदेडचे जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केले आहे. 
महाविद्यालयीन प्रवेशाच्‍या वेळी नोंदणी
                दिनांक 1  जानेवारी 2017 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्‍या नवीन पात्र मतदारांना महाविद्यालयात प्रवेशाच्‍या वेळीच मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करता येतील. अर्जासोबत बोनाफाईड व वास्‍तव्‍याच्‍या ठिकाणासाठी जोडपत्रात माहिती दयावी लागेल. नोंदणीसाठी लागणारे कोरे अर्ज व जोडपत्र जिल्‍ह्यातील सर्व महाविद्यालयात पुरेशा प्रमाणात उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेले आहेत.  सर्व विद्यार्थ्‍यांनी प्रवेशाचे वेळी कोरे अर्ज मागून घेवून ते परिपूर्ण भरून महाविद्यालयातच जमा करावेत.
शाळा / महाविद्यालयात विविध स्‍पर्धांचे आयोजन
                मतदार नोंदणीबाबत तरुणांमध्‍ये जागृती व्‍हावी या दृष्‍टीने प्रत्‍येक तालुक्‍यात चित्रकला स्‍पर्धा, रांगोळी स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आलेले आहे.

8 जुलै व 22 जुलै रोजी विशेष मोहिम
                या मोहिमे अंतर्गत 8 जुलै व 22 जुलै या दिवशी जिल्‍हयातील सर्व मतदान केद्रावर विशेष शिबिर आयोजित करण्‍यात येणार आहेत. या दिवशी जिल्‍हयातील सर्व  बीएलओ हे त्‍यांच्‍या केंद्रावर हजर राहून अर्ज स्‍वीकारतील.

 वय 21 पेक्षा जास्‍त असल्‍यास नोंदणीचे वेळी प्रतिज्ञापत्र आवश्‍यक
                मतदाराची दुबार नोंदणी होवू नये यादृष्‍टीने ज्‍या व्‍यक्‍तीचे वय 21 पेक्षा जास्‍त असेल त्‍यांना अर्ज करतांना अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दयावे लागेल. एखादया मतदाराची नोंदणी पुर्वीच झालेली असेल व नवीन वास्‍तव्‍याच्‍या ठिकाणी नोंदणी करावयाची असल्‍यास पूर्वीच्‍या ठिकाणी नाव वगळण्‍यासाठी अर्ज सादर केल्‍याचा पुरावा सादर करावा लागेल. मतदारांना नोंदणीसाठी अडचण होवू नये यादृष्‍टीने सर्व अर्जाचे नमूने सुटसुटीत व सोपे करण्‍यात आलेले आहेत.
            या मोहिमेत जिल्ह्यातील तरुणांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवावा. अधिक माहिती व तपशीलासाठी संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक कार्यालयाचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले आहे. मोहिमेबाबत अधिक माहिती व तपशील आवश्यक असल्यास उपजिल्हा निवडणूक कार्यालय, नांदेड- दूरध्वनी क्र. 02462-235762 येथेही संपर्क साधता येईल.

0000000
बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा
करण्यासाठी प्रयत्नशील रहावे - पालकमंत्री खोतकर
नांदेड दि. 20 :-  बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य बँकेने शेतकऱ्यांना मदत करण्याची भुमिका घ्यावी , असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. वसंतनगर नांदेड येथील दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नांदेड शाखेचे  उद्घाटन श्री. खोतकर यांच्या हस्ते आज झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.
 यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर, ओमप्रकाश पोकर्णा, अहमदपुरचे माजी आमदार बाळासाहेब पाटील, बॅकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे, व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनिल कदम, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, प्रशासकीय मंडळाचे सदस्य के. एन. तांबे, अशोक मगदूम यांची प्रमुख उपस्थिती होती.  
पालकमंत्री खोतकर पुढे म्हणाले की, बँकेने स्वत:बरोबर  ठेवीदार, कर्जदार, लाभार्थीचे हित जपले पाहिजे. प्रक्रिया उद्योगाला पुढे आणण्यासाठी बँकांनी आर्थिक मदत करुन शेतीपुरक उद्योगाला चांगली गती दयावी. शेतकऱ्यांची मुले उद्योग उभारणीत पुढे येतील त्यासाठी बँकांद्वारे प्रयत्न करावेत.  त्याद्वारे  राज्य बँकेचे चांगले काम यातून घडू शकते. राज्य बॅंकेतील ठेवीदारांच्या ठेवीत वाढ होत आहे हे बँकेच्यादृष्टिने चांगले आहे. बँकेसाठी तारण महत्वाचे असून ज्या जिल्हा बँका बंद आहेत त्याबाबत राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्तीच्या बाजुने भुमिका घेतली आहे. सहकारी बँकेला राज्य बँक ही जवळची असून राज्य बँकेला पुन्हा गतवैभव प्राप्त होत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे श्री. खोतकर यांनी सांगितले.   
आमदार हेमंत पाटील म्हणाले की, शेती उद्योगांना आर्थिक आधार देण्याचे बँकेने काम केले आहे. प्रशासकीय मंडळ आल्यानंतर ठेवीदारांची खूप मोठी विश्वासर्हता वाढली आहे. त्यामुळे बँकेला नावलौकीक मिळला आहे. काळानुसार अत्याधुनिक सुविधा महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
 आमदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले, जिल्ह्यात बँकेची मोठी ओळख पद्मश्री शामराव कदम यांनी दिली आहे. बँकेनी शेतकऱ्यांशी संलग्न राहून शेतकऱ्यांना मदत करावी.
माजी आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, बँकेचे सेवांबाबत वेळोवेळी मार्गदर्शन असून ठेवीदारांना चांगला व्याजदर दिला जातो. बँकेच्या पुढील प्रगतीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.  
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुखदेवे म्हणाले की , सन 2017 मधील या पाचव्या बँकेचे उद्घाटन झाले आहे. या बँकेने प्रगती केली असून सहकार चळवळीत मोठे योगदान दिले आहे. शेती, साखर, दुग्ध उत्पादनातून आर्थिक विकासात राज्य सहकारी बँक जिल्हा बँकेबरोबर राहून मदत करणार आहे. ग्राहकाला चांगली सुविधा मिळण्यासाठी अत्याधुनिक सुविधा बँकेद्वारे दिल्या जाणार आहेत. बँकींग सेवेद्वारे सहकार क्षेत्राला पुर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.  
प्रास्ताविकात श्री. कर्नाड म्हणाले की,  नांदेड येथील बँकेची 46 वी शाखा आहे. ही बँक राज्याची शिखर बँक म्हणून ओळखली जाते. शेती, सहकारी संस्थांना राज्य बँकेने प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज पुरवठा केला आहे. बँकेकडील ठेवीत एका वर्षात 45 टक्के वाढ झाली आहे. ही विश्वासर्हता ठेवीदारांनी बँकेवर ठेवली आहे. या ठेवी परत कर्ज रुपात वाटप केली जाणार आहे. बँकेची सेवा चांगली असून इतर बँकेशी स्पर्धा केली जात नाही. जिल्हा बँकेला मदत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. बँकेतील अत्याधुनिक विविध सेवांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.   
सुरवातील मान्यवरांच्या हस्ते वसंतनगर येथील या शाखेचे फित कापून, दीप प्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. हॉटेल सिटी प्राईड येथे संपन्न झालेल्या समारंभात आमदार हेमंत पाटील यांनी गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्यावतीने 50 लाख रुपये ठेवीचा पहिला धनादेश दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नांदेड शाखेत जमा केला. नांदेड शाखेच्यावतीने पहिला गृह कर्ज धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुत्रसंचालन पंढीरानाथ बोकारे यांनी केले तर आभार नांदेड शाखेचे व्यवस्थापक गुरुनाथ देशमुख यांनी मानले. यावेळी विविध संस्थेचे पदाधिकारी, प्रतिनिधी, नागरीक उपस्थित होते.

000000

Monday, June 19, 2017

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त
खादी वापरण्याच्या सुचना
             नांदेड दि. 26 :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुधवार 21 जुन 2017 रोजी खादी गणवेश वापरण्याबाबत शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने परिपत्रकान्वये विविध विभागांना निर्देशित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी परिपत्रकात नमुद केल्यानुसार सुचनाचे अनुपालन करावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळवण्यात आले आहे.
            बुधवार 21 जुन रोजी आयोजित आंतराराष्ट्रीय योगदिनासाठी खादी योगा ड्रेससह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योगा किटमध्ये खादी टॉप, खादी पायजामा, खादी मट, खादी नपकिन, खादी सूत हार, आदी या प्रकारची किट 1 हजार 750 रुपयात उपलब्ध आहे.

000000
जमीन महसूल अधिनियमात सुधारणा
 तरतुदीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध
नांदेड दि. 19 :- राज्य शासनाने महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 42 ब मध्‍ये सुधारणा केली आहे. या सुधारीत तरतदीची माहिती जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्‍या  nanded.nic.in या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
अशा मंजूर विकास योजनेमध्‍ये, अथवा प्रादेशिक विकास योजनेमध्‍ये  धारकांच्‍या जमिनी असतील त्‍यांना संबंधीत तहसिलदारामार्फत नोटीसा पाठविण्‍यात येणार आहेत. जमीनधारकांनी स्‍वतः संपर्क साधून अर्ज केल्‍यास अशी प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून त्‍यांना जमिनी अकृषिक झाल्‍याबद्दलची सनद प्रदान करण्‍यात येणार आहे.  
राज्य शासनाने 5 जानेवारी 2017 रोजी राजपत्रात प्रसिध्‍द केलेल्या अध्‍यादेशाद्वारे ज्‍या ठिकाणी अंतिम विकास आराखडा प्रसिध्‍द झाल असेल त्‍याठिकाणी विविध प्रयोजनासाठी नमूद केलेल्‍या जमीनींचा त्‍या प्रयोजनासाठी वापर करण्‍यासाठी बिगर शेतीची परवानगी घेण्‍याची आवश्‍यकता असणार नाही. अशा जमीनी संबधात तह‍सीलदार यांचेकडे रूपांतरीत कर ,अकृषिक आकार व जमीन वर्ग- 2 ची असल्‍यास निर्धारीत केलेला नजराणा भरणा केल्‍यास अशी जमीन आपोआप त्‍या विकास आराखडयातील मंजूर प्रयोजनासाठी अकृषिक झाली आहे असे समजण्‍यात येईल अशी सुधारणा करण्‍यात आली आहे.
        तसेच कलम 42 (क) मध्‍ये खालील दुरूस्‍तीनूसार ज्‍या ठिकाणी प्रादेशिक विकास योजना मंजूर असेल किंवा प्रारूप आराखडा प्रसिध्‍द केला असेल अशा ठिकाणी सुध्‍दा अशा आराखडयातील मंजूर प्रयोजनासाठी वरील प्रमाणे रक्‍कमेचा भरणा केल्‍यास अशी जमीन आपोआप अकृषिक झाली असे समजण्‍यात येईल. त्‍यामुळे यापुढे अशा विकास योजनेत किंवा प्रादेशिक विकास योजनेत समाविष्‍ट असलेल्‍या जमीनीसाठी अकृषिक परवानगीची आवश्‍यकता असणार नाही.

000000
गोदावरी नदी संवर्धनासाठी
दिर्घकालीन उपाययोजना कराव्यात
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 19 :- जिल्ह्यातील गोदावरी नदी संवर्धनासाठी दिर्घकालीन उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश नांदेड जिल्हा पर्यावरण समितीची अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. नांदेड जिल्हा पर्यावरण समिती बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.    
यावेळी आमदार डी. पी. सावंत, आ. अमर राजुरकर, आ. हेमंत पाटील, आ. अमिता चव्हाण, मनपा आयुक्त गणेश देशमुख, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सुधीर शिवणीकर, डॉ. अर्जुन भोसले, सुरेश जोंधळे, मनपा कार्यकारी अभियंता किरण शास्त्री, आरोग्य विभागाचे डॉ. अनिल पोपुलवार, उद्योग निरीक्षक के. जी. पिल्लेवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे स. अ. कोटलवाड, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी नामदेव दारसेवाड, राकेश डफाडे आदींची उपस्थिती होती.   
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की , गणपती उत्सवादरम्यान गणेश मुर्ती विसर्जनाऐवजी गणेशमुर्ती दान कराव्यात. विटभट्यांसाठी लागणाऱ्या मातीचा उपसा नदीकाठावरुन होवू नये याबाबत कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.  
यावेळी आ. हेमंत पाटील यांनी नांदेड शहरालगत असलेल्या गोदावरी नदीमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यावर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच नाल्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याबाबत सूचना केली. आ. डी. पी. सावंत यांनी प्लास्टीक पिशव्यांचा वापरावर बंदी घालून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करण्याबाबत सुचित केले. आ. अमर राजुरकर म्हणाले सामाजिक वनीकरण विभागामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे झाडे नदीकाठी लावण्यात यावी. जेणेकरुन नदीकाठच्या जमिनीची धुप होणार नाही. आ. अमिता चव्हाण यांनी नदीकाठी निर्माल्य व इतर घनकचरा विल्हेवाट व्यवस्थापन करण्याबाबत सूचना केली. 
यावेळी मनपा आयुक्त श्री. देशमुख यांनी महापालिकेकडून सांडपाणी तसेच प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबाबत करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. शिवणीकर, डॉ. भोसले, सुरेश जोंधळे, आदींनी सहभाग घेतला.   
000000


पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा दौरा
           नांदेड, दि. 19 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
            मंगळवार 20 जुन 2017 रोजी जालना येथून मोटारीने सकाळी 9.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वा. दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या नांदेड येथील नवीन शाखेचे उद्घाटन. स्थळ - प्लॉट न. 180, वसंतनगर, शारदानगर बसस्टॉपजवळ नांदेड. सकाळी 10.45 वा. दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या नांदेड येथील नवीन शाखेचे उद्घाटनासंबंधीत समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- हॉटेल सिटी प्राईड, नमस्कार चौक, विमानतळ रोड, नांदेड. दुपारी 12.30 वा. नांदेड जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाच्या विभाग प्रमुखांची बैठक. स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. सायं. 6 वा. नांदेड येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.   

00000
ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा
           नांदेड, दि. 19 :-  राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार 30 जुन 2017 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            शुक्रवार 30 जुन 2017 रोजी सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत राखीव. सकाळी 9 वा. आयपीडीएस योजनेअंतर्गत तरोडा नाका ता. नांदेड , लोहा, कंधार, बिलोली व DDUJY योजनेअंतर्गत 33 केव्ही उपकेंद्र अमराबाद (बारसगाव) ता. अर्धापूर, हळदा ता. कंधार, कासारखेडा ता. नांदेड, चंडोला, जांब ता. मुखेड, लोहगाव ता. बिलोली, ढोलउमरी ता. उमरी, घोगरी ता. हदगाव, मालबोरगाव ता. किनवट, पोटा ता. हिमायतनगर व येताळा ता. धर्माबादचे भुमीपुजन. स्थळ- अधीक्षक अभियंता, महावितरण यांचे कार्यालयाचे प्रांगण.  दुपारी 11 ते 1 वाजेपर्यंत जनतेच्या तक्रारी स्वीकारण्यास्तव राखीव वेळ. स्थळ- अधीक्षक अभियंता महावितरण नांदेड यांचे कार्यालयाचे प्रांगण. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत लोकप्रतिनिधी समवेत बैठक स्थळ- अधीक्षक अभियंता महावितरण यांचे कार्यालयातील सभागृह. दुपारी 4 वा. पत्रकार परिषद. दुपारी 4.30 वा. नांदेड येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

000000

  विशेष वृत्त एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम पुढील टप्प्...