गोदावरी
नदी संवर्धनासाठी
दिर्घकालीन
उपाययोजना कराव्यात
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 19 :- जिल्ह्यातील गोदावरी नदी संवर्धनासाठी दिर्घकालीन उपाययोजना तातडीने करण्याचे
निर्देश नांदेड जिल्हा पर्यावरण समितीची अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
यांनी दिले. नांदेड जिल्हा पर्यावरण समिती बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न
झाली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार डी. पी.
सावंत, आ. अमर राजुरकर, आ. हेमंत पाटील, आ. अमिता चव्हाण, मनपा आयुक्त गणेश देशमुख,
पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सुधीर शिवणीकर, डॉ. अर्जुन भोसले, सुरेश जोंधळे, मनपा
कार्यकारी अभियंता किरण शास्त्री, आरोग्य विभागाचे डॉ. अनिल पोपुलवार, उद्योग
निरीक्षक के. जी. पिल्लेवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे स. अ. कोटलवाड,
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी नामदेव दारसेवाड, राकेश
डफाडे आदींची
उपस्थिती होती.
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी
श्री. डोंगरे म्हणाले की , गणपती उत्सवादरम्यान गणेश मुर्ती विसर्जनाऐवजी
गणेशमुर्ती दान कराव्यात. विटभट्यांसाठी लागणाऱ्या मातीचा उपसा नदीकाठावरुन होवू
नये याबाबत कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आ. हेमंत पाटील यांनी
नांदेड शहरालगत असलेल्या गोदावरी नदीमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यावर नांदेड वाघाळा शहर
महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच नाल्यावर असलेले
अतिक्रमण हटविण्याबाबत सूचना केली. आ. डी. पी. सावंत यांनी प्लास्टीक पिशव्यांचा
वापरावर बंदी घालून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करण्याबाबत सुचित केले. आ.
अमर राजुरकर म्हणाले सामाजिक वनीकरण विभागामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे झाडे
नदीकाठी लावण्यात यावी. जेणेकरुन नदीकाठच्या जमिनीची धुप होणार नाही. आ. अमिता
चव्हाण यांनी नदीकाठी निर्माल्य व इतर घनकचरा विल्हेवाट व्यवस्थापन करण्याबाबत सूचना
केली.
यावेळी मनपा आयुक्त श्री.
देशमुख यांनी महापालिकेकडून
सांडपाणी तसेच प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबाबत करण्यात
येणाऱ्या उपाय योजनांची माहिती दिली. यावेळी झालेल्या
चर्चेत, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. शिवणीकर, डॉ. भोसले, सुरेश जोंधळे, आदींनी सहभाग
घेतला.
000000
No comments:
Post a Comment