बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा
करण्यासाठी प्रयत्नशील रहावे - पालकमंत्री खोतकर
नांदेड दि. 20 :- बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा
करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य बँकेने शेतकऱ्यांना मदत
करण्याची भुमिका घ्यावी , असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन,
दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड
जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. वसंतनगर नांदेड
येथील दि. महाराष्ट्र
स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नांदेड शाखेचे उद्घाटन श्री. खोतकर यांच्या हस्ते आज झाले त्याप्रसंगी
ते बोलत होते.
यावेळी आमदार हेमंत
पाटील, आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर, ओमप्रकाश
पोकर्णा, अहमदपुरचे माजी आमदार बाळासाहेब पाटील, बॅकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष
डॉ. एम. एल. सुखदेवे, व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे
उपाध्यक्ष सुनिल कदम, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव
तिडके, प्रशासकीय मंडळाचे सदस्य के. एन. तांबे, अशोक मगदूम यांची प्रमुख उपस्थिती
होती.
पालकमंत्री खोतकर पुढे म्हणाले की, बँकेने स्वत:बरोबर ठेवीदार, कर्जदार, लाभार्थीचे हित जपले पाहिजे. प्रक्रिया
उद्योगाला पुढे आणण्यासाठी बँकांनी आर्थिक मदत करुन शेतीपुरक उद्योगाला चांगली गती
दयावी. शेतकऱ्यांची मुले उद्योग उभारणीत पुढे येतील त्यासाठी बँकांद्वारे प्रयत्न
करावेत. त्याद्वारे राज्य बँकेचे चांगले काम यातून घडू शकते. राज्य
बॅंकेतील ठेवीदारांच्या ठेवीत वाढ होत आहे हे बँकेच्यादृष्टिने चांगले आहे.
बँकेसाठी तारण महत्वाचे असून ज्या जिल्हा बँका बंद आहेत त्याबाबत राज्य शासनाने
जिल्हा मध्यवर्तीच्या बाजुने भुमिका घेतली आहे. सहकारी बँकेला राज्य बँक ही जवळची असून
राज्य बँकेला पुन्हा गतवैभव प्राप्त होत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे श्री. खोतकर
यांनी सांगितले.
आमदार हेमंत पाटील म्हणाले की, शेती उद्योगांना आर्थिक आधार
देण्याचे बँकेने काम केले आहे. प्रशासकीय मंडळ आल्यानंतर ठेवीदारांची खूप मोठी
विश्वासर्हता वाढली आहे. त्यामुळे बँकेला नावलौकीक मिळला आहे. काळानुसार
अत्याधुनिक सुविधा महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार नागेश पाटील
आष्टीकर म्हणाले, जिल्ह्यात बँकेची मोठी ओळख पद्मश्री शामराव कदम यांनी दिली आहे.
बँकेनी शेतकऱ्यांशी संलग्न राहून शेतकऱ्यांना मदत करावी.
माजी आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, बँकेचे सेवांबाबत
वेळोवेळी मार्गदर्शन असून ठेवीदारांना चांगला व्याजदर दिला जातो. बँकेच्या पुढील
प्रगतीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुखदेवे म्हणाले की , सन 2017 मधील या
पाचव्या बँकेचे उद्घाटन झाले आहे. या बँकेने प्रगती केली असून सहकार चळवळीत मोठे
योगदान दिले आहे. शेती, साखर, दुग्ध उत्पादनातून आर्थिक विकासात राज्य सहकारी बँक
जिल्हा बँकेबरोबर राहून मदत करणार आहे. ग्राहकाला चांगली सुविधा मिळण्यासाठी अत्याधुनिक
सुविधा बँकेद्वारे दिल्या जाणार आहेत. बँकींग सेवेद्वारे सहकार क्षेत्राला
पुर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्री. कर्नाड म्हणाले की, नांदेड येथील बँकेची 46 वी शाखा आहे. ही बँक
राज्याची शिखर बँक म्हणून ओळखली जाते. शेती, सहकारी संस्थांना राज्य बँकेने
प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज पुरवठा केला आहे. बँकेकडील ठेवीत एका वर्षात 45 टक्के
वाढ झाली आहे. ही विश्वासर्हता ठेवीदारांनी बँकेवर ठेवली आहे. या ठेवी परत कर्ज
रुपात वाटप केली जाणार आहे. बँकेची सेवा चांगली असून इतर बँकेशी स्पर्धा केली जात
नाही. जिल्हा बँकेला मदत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. बँकेतील अत्याधुनिक विविध
सेवांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
सुरवातील मान्यवरांच्या हस्ते वसंतनगर येथील या शाखेचे फित
कापून, दीप प्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. हॉटेल सिटी प्राईड येथे संपन्न
झालेल्या समारंभात आमदार हेमंत पाटील यांनी गोदावरी
अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्यावतीने 50 लाख रुपये
ठेवीचा पहिला धनादेश दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नांदेड शाखेत जमा
केला. नांदेड शाखेच्यावतीने पहिला गृह कर्ज धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात
आले. सुत्रसंचालन पंढीरानाथ बोकारे यांनी केले तर आभार नांदेड शाखेचे व्यवस्थापक
गुरुनाथ देशमुख यांनी मानले. यावेळी विविध संस्थेचे पदाधिकारी, प्रतिनिधी, नागरीक
उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment