Monday, February 16, 2026

 वृत्त क्रमांक

ड्रोन, व्हिडिओ कॅमेरे व झूम वेबकास्टद्वारे 

भौतिकशास्त्राच्या पेपरवर जिल्याव तील सर्व परीक्षा केंद्रावर कडेकोट नजर 

- जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

नांदेड दि. 16 फेब्रुवारी :- इयत्ता 12 वीच्या सकाळ सत्रातील भौतिकशास्त्र विषयाचा पेपर आज जिल्ह्यात सुरळीत पार पडला. या दिवशी जिल्ह्यातील एकूण 109 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे पूर्णवेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात आले होते. ड्रोन व व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या सहाय्यानेही केंद्रांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी दिली.

पोलीस यंत्रणेने ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे कोणत्याही परीक्षा केंद्राबाहेर अनधिकृत जमाव आढळून आला नाही. जिल्ह्यात शिक्षण विभागाची सहा पथके परीक्षेवर लक्ष ठेवून होती. शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे यांच्या पथकाने नरसिंह उच्च माध्यमिक विद्यालय, मुखेड तालुक्यातील उमरदरी येथे भेट दिली असता दोन परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळून आले. त्यांच्यावर मंडळ नियमावलीप्रमाणे कॉपी प्रकरण नोंदविण्यात आले.

उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रामचंद्र पाचंगे यांनी कंधार तालुक्यातील श्री बालाजी उच्च माध्यमिक विद्यालय, बोरी खुर्द येथे भेट दिली असता एक परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळला. तसेच उपशिक्षणाधिकारी (योजना) माधव शिंगडे यांनी माहूर तालुक्यातील श्री शंकरराव चव्हाण उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टा येथे भेट दिली असता तीन परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळले.

तहसीलदार मुखेड राजेश जाधव यांनी महात्मा फुले महाविद्यालय, मुखेड येथील परीक्षा केंद्रावर एका परीक्षार्थ्याविरुद्ध गैरप्रकाराची कारवाई केली. आजच्या भौतिकशास्त्राच्या पेपरसाठी नोंदणीकृत 24 हजार 527 परीक्षार्थ्यांपैकी 24 हजार 206 परीक्षार्थी उपस्थित होते. उपस्थितीची टक्केवारी 98.69 इतकी होती.

झूम वेबकास्ट, ड्रोन व व्हिडिओ चित्रीकरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सात परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळून आले. संबंधित परीक्षार्थ्यां विरुध्द मंडळाच्या नियमांनुसार कारवाई करण्यात आली असून संबंधित केंद्रसंचालक व बैठे पथकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची नक्कल न करता आत्मविश्वासाने व आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी, तसेच नागरिकांनी परीक्षा केंद्र परिसरात गर्दी करू नये. केंद्र परिसरात भारतीय न्याय संहितेचे कलम 163 लागू असल्याने त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   नांदेडमध्ये 13 ते 18 मार्च कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन;  महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री...