‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ चा लाभ घेण्यासाठी ‘आधार’ संलग्न करा.
#शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #आधार #महाराष्ट्रशासन #शेतकरी #महाराष्ट्र #MahaDGIPR #GovernmentScheme #FarmerWelfareWednesday, July 1, 2026
विशेष लेख -1 दिनांक 01.07.2026
बळीराजासाठी आश्वासक पाऊल...
v पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खरीप हंगामाची लगबग
सुरू झाली आहे. बळीराजा
पेरणीच्या कामात व्यस्त आहे. अशा मोक्याच्या वेळी राज्य सरकारने ३६ हजार ५८५ कोटी
रुपयांची 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी
कर्जमुक्ती योजना २०२६' जाहीर करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारी
दिली आहे. राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देणारा हा ऐतिहासिक निर्णय
आहे. ही केवळ एक कर्जमाफी नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य
निर्माण करण्याचा विश्वास आहे.
प्रशासकीय पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा
मेळ घालून राबवण्यात येणारी ही योजना शेतकऱ्यांना पुन्हा सन्मानाने बँकिंग
प्रवाहात आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. या योजनेच्या नावामागील प्रेरणा,
त्यातील धोरणात्मक तरतुदींची सविस्तर माहिती आपण घेऊया.
महाराष्ट्र वारंवार अतिवृष्टी, गारपीट
आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जात असतो, ज्यामुळे शेतकरी कर्जाच्या
दुष्टचक्रात अडकतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, शेती क्षेत्रात 'दीर्घकालीन
संरचनात्मक सुधारणा' (Long-term Structural Changes) सुचवण्यासाठी
मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली
उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशींनुसार केवळ
तात्पुरती मदत न देता, शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करण्याच्या
उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक आदर्श
प्रशासक, रयतेचे कल्याण करणाऱ्या लोकमाता होत्या. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती
वर्षाचे औचित्य साधून या योजनेचे नामकरण करत सरकारने त्यांच्या लोककल्याणकारी
कार्याला अभिवादन केले आहे.
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी
कर्जमुक्ती योजना २०२६' हा सरकारने महाराष्ट्राच्या ५६ लाख शेतकरी
कुटुंबांना सन्मानाने जगण्यासाठी दिलेला आधार आहे. ३६ हजार ५८५ कोटी रुपयांच्या या
गुंतवणुकीमुळे ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढेल. शेती क्षेत्राला हवी असलेली
स्थिरता प्राप्त होईल. 'बळीराजाचे राज्य' खऱ्या अर्थाने अवतरण्यासाठी
आणि शेतकऱ्याला पुन्हा स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने टाकलेले एक आश्वासक आणि
दूरगामी असेच हे पाऊल आहे.
-डॉ. श्याम टरके,
सहायक संचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय, लातूर
वृत्त क्रमांक
एसआयआर कार्यक्रमांतर्गत सिडको भागात
उपविभागीय अधिकारी डॉ. खल्लाळ व तहसीलदार वारकड यांनी दिल्या भेटी
नांदेड दि. 1 जुलै:- मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम एसआयआर अंतर्गत नांदेडचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी सिडको भागातील रामनगर येथील विविध ठिकाणी भेटी देऊन नाव नोंदविण्यासाठी आवश्यक फॉर्म वाटपाचा शुभारंभ केला व या कामाचा आढावा घेतला. यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सूरज स्वामी यांचे सह नियुक्त कर्मचारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचे विशेष पुनरिक्षण कार्यक्रम एस आय आर राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने 87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत बीएलओ यांच्याकडून मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आवश्यक फार्मचे वाटप करून व त्यांची माहिती भरून घेण्याचे काम 30 जून 2026 पासून सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी सिडको भागातील रामनगर परिसरातील यादी भाग क्रमांक २०८ मधील मतदारांना भेटी दिल्या व कामासंबंधी समाधान व्यक्त केले.
यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सुरज स्वामी, बीएलओ पर्यवेक्षक कालिदास जाधव, एस एम देवरे, संतोष जाधव, दिलीप कोणापुरे, गोविंद क्षीरसागर आदी उपस्थित होते. यावेळी अश्विनी अनिल पद्मावार, अनिल रामदास पद्मावार, हनुमंत शंकरराव भोसकर , गिरीश हनुमंतराव भोसकर यांना मान्यवराच्या उपस्थितीत एस आय आर संबंधी इम्युनरेशन फॉर्म वाटप करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
00000
वृत्त क्रमांक
नवतंत्रज्ञान व जोड व्यवसायातून शेतीची प्रगती साधा - संदीप माळोदे
जिल्हा परिषदेत कृषी दिन उत्साहात साजरा
पिक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांचा सन्मान
नांदेड , दि. 1 जुलै :- शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती अधिक उत्पादनक्षम करावी. तसेच शेतीला पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय यांसारख्या जोड व्यवसायांची जोड देऊन आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध कृषी व पूरक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि पंचायत समिती, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कै. वसंतराव नाईक जयंती व कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पूनम पवार, पोखरणी येथील कृषी विज्ञान केंद्राचे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, कापूस संशोधन केंद्राचे डॉ. अरविंद पंडागळे, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवणकर, डॉ. शिवाजी शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, उपविभागीय कृषी अधिकारी सुप्रिया वायवळ, आत्माचे उपविभागीय कृषी अधिकारी गुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या खेती बचाओ - धरती बचाओ अभियानांतर्गत जिल्हाभर जनजागृती सुरू असून शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करून सेंद्रिय शेतीचा स्वीकार करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, पोखरणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी केले. व्यापक जनजागृतीमुळे जिल्ह्यात अद्याप सुमारे ९५ टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नसल्याने दुबार पेरणीचे संकट कमी राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विज्ञान केंद्रात माती व पाणी परीक्षणाची सुविधा उपलब्ध असून अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा, असेही त्यांनी आवाहन केले.
शेतकऱ्यांनी घरच्या बियांणाचा वापर करावा- कळसाईत
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांचा वापर करावा. जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊनच पेरणी करावी. मागील वर्षी शेतकऱ्यांना सुमारे नऊशे कोटी रुपयांच्या पीक विम्याचा लाभ मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. यावर्षी हळद पिकाचाही पीक विमा योजनेत समावेश करण्यात असून, पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १४ जुलै असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांपर्यंत कृषीविषयक माहिती पोहोचविण्यासाठी गावनिहाय व्हॉट्सॲप गट तयार करण्यात आले असून या गटांवर उपलब्ध होणाऱ्या माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेअंतर्गत जिल्ह्यात 900 शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून पुढील काळात प्रत्येक गावात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
कपाशीचे उत्पादन वाढविण्यासाठी 3 बाय 1.5 फूट अंतरावर लागवड करून रोपांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात सुमारे 5 लाख 100 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच संभाव्य एल निनोच्या सावटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घ्यावयाची खबरदारी, पीक नियोजन आणि पाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करत त्यांनी स्वतः रचलेली जनजागृतीपर कविता सादर केली. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या सादरीकरणाला उपस्थित शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. अरविंद पंडागळे आणि डॉ. माधुरी रेवणकर यांनीही शेतकऱ्यांना आधुनिक शेती, पीक व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रगतिशील शेतकरी तसेच बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील लाभार्थ्यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.
पिक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आलेल्याची नावे
कृषी दिनाच्या कार्यक्रमात सन 2025 च्या खरीप हंगाम पिकस्पर्धा विजेते शेतकऱ्यांचा केला सन्मान करण्यात आला. यात सोयाबीन या पिकासाठी जिल्हास्तर सर्वसाधारण गटासाठी शेख अजीम शेख खाजामोईद्दीन रा. निचपूर ता. किनवट, पीराजी बाबाराव आरसुळे रा. एकदरा ता. नांदेड, ज्ञानेश्वर पुर्भाजी आढाव रा. हद्दीदापूर ता. नांदेड यांना प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आहे. तर आदिवासी गटात माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथील युवराज प्रकाश तोडसाम यांचा प्रथम क्रमांक आहे. मुग या पिकासाठी लोहा तालुक्यातील दापसेड येथील गोविंद मारोती होळगे तर उडीद या पिकासाठी विश्वनाथ गोविंदराव होळगे यांचा प्रथम क्रमांक आहे. मका पिकासाठी बाबय्या संतोबा कोरडेवाड रा. किनी ता. भोकर यांचा प्रथम, प्रणीतरेड्डी नरसिंहरेड्डी मूल्यलवाड यांचा द्वितीय क्रमांक आहे. तूर या पिकासाठी धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी येथील दिगबंर शंकर कपाटे यांचा प्रथम तर हणमंतराव मारोती वारले यांचा द्वितीय क्रमांक आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या आज मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
00000
.jpeg)
वृत्त क्रमांक
'अमृत' संस्थेतर्फे ग्रामीण भागात 'ईव्ही चार्जिंग स्टेशन' उभारणीचे आवाहन ; उद्योजकतेसह रोजगाराची सुवर्णसंधी
नांदेड दि. 1 जुलै:- महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) च्या वतीने ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामीण व निमशहरी भागात उद्योजकतेला चालना देण्यासाठी 'अमृत ईव्ही (EV) चार्जिंग स्टेशन' उभारणीची योजना सुरू करण्यात आली असून, यासाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज व नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.
हा उपक्रम 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मधील एका अभिमानास्पद प्रवासाचा भाग आहे. "जिथे ऊर्जा हरित... तिथे भविष्य सुरक्षित!" आणि "ग्रीन एनर्जी, ग्रीन अर्थ, आपले भविष्य सुरक्षित अर्थ" हे ब्रीद घेऊन ही योजना राबवली जात आहे. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) वाढती संख्या लक्षात घेता ग्रामीण भागात चार्जिंग पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि त्याद्वारे स्थानिक युवकांना हक्काचा व्यवसाय मिळवून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
ईव्ही चार्जिंग स्टेशनचे महत्त्व आणि फायदे:
पर्यावरण आणि इंधन बचत: या स्थानकांमुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन हवा स्वच्छ राहण्यास मदत होईल. तसेच पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी होऊन वाहनधारकांच्या खर्चात मोठी बचत होईल.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी: ग्रामीण भागात हे चार्जिंग स्टेशन सुरू झाल्याने नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.
शासनाचा भक्कम पाठिंबा: शासकीय योजना, आकर्षक अनुदान (सबसिडी) आणि प्रोत्साहनामुळे या व्यवसायातील गुंतवणूक सुरक्षित राहील आणि कमी जोखमीमध्ये अधिक नफा मिळवणे शक्य होईल.
मिळणारे सहकार्य आणि वैशिष्ट्ये:
या उपक्रमांतर्गत निवडक उमेदवारांना 'अमृत' संस्थेमार्फत विशेष व्यावसायिक व तांत्रिक मार्गदर्शन लाभणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या स्टेशनसाठी देखभालीचा खर्च अत्यंत कमी असून, वाढत्या मागणीमुळे हा एक उच्च नफा देणारा स्थिर व्यवसाय ठरणार आहे.
इच्छुकांनी येथे संपर्क करावा:
हरित ऊर्जेचा वापर वाढवून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि या व्यावसायिक सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.
नांदेड कार्यालय पत्ता: अमृत कार्यालय, अवैधनाथनगर नगर, कॅनल रोड, नांदेड.
संपर्क क्रमांक (नांदेड): ७३९१०६५४७२ (7391065472)
मुख्य कार्यालय संपर्क: ९७३०१५१४५० (9730151450)
अधिकृत संकेतस्थळ: www.mahaamrut.org.in
00000
वृत्त क्रमांक
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी
शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन
नांदेड 1 जुलै :- प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी माहे जुलै ते डिसेंबर 2026 या महिन्यात तालुका शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट महिना सुरुवात होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येईल. तरी अपॉईटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी यांची नोंद घेवून शिबिर कार्यालयास उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांतराव साळी यांनी केले आहे.
तालुकानिहाय कॅम्पचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. कंधार येथे 3 जुलै, 3 ऑगस्ट, 3 सप्टेंबर, 5 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर, 2 डिसेंबर 2026 या दिवशी आहे. धर्माबाद येथे 6 जुलै, 6 ऑगस्ट, 7 सप्टेंबर, 7 ऑक्टोबर, 5 नोव्हेंबर, 4 डिसेंबर 2026 दिवशी आहे. किनवट 9 जुलै, 10 ऑगस्ट, 9 सप्टेंबर, 9 ऑक्टोबर, 12 नोव्हेंबर, 10 डिसेंबर 2026 या दिवशी आहे. मुदखेड येथे 13 जुलै, 13 ऑगस्ट, 11 सप्टेंबर, 12 ऑक्टोबर, 16 नोव्हेंबर, 14 डिसेंबर यादिवशी आहे. माहूर येथे 16 जुलै, 17 ऑगस्ट, 16 सप्टेंबर, 16 ऑक्टोबर, 18 नोव्हेंबर, 16 डिसेंबर या दिवशी आयोजन करण्यात येणार आहे. हदगांव येथे 20 जुलै, 20 ऑगस्ट, 21 सप्टेंबर, 21 ऑक्टोबर, 20 नोव्हेबर, 21 डिसेंबर यादिवशी आहे. धर्माबाद येथे 23 जुलै, 25 ऑगस्ट, 24 सप्टेंबर, 23 ऑक्टोबर, 25 नोव्हेंबर, 23 डिसेंबर या दिवशी आहे. हिमायतनगर येथे 27 जुलै, 27 ऑगस्ट, 28 सप्टेंबर, 28 ऑक्टोबर, 27 नोव्हेंबर, 28 डिसेंबर 2026 या दिवशी आहे. किनवट येथे 30 जुलै, 31 ऑगस्ट, 30 सप्टेंबर, 30 ऑक्टोबर, 30 नोव्हेंबर, 30 डिसेंबर 2026 या दिवशी आयोजन करण्यात आले आहे. यानुसार शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्ती साठी तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
00000
वृत्त आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्यांत करावी– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांची ...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...




.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)