Friday, June 7, 2019


शासकीय ईबीसी वसतीगृहातील
प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु
नांदेड, दि. 7 :- शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह मालेगाव रोड तथागत नगर नांदेड येथे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 8 वी, 11 वी, पदवी प्रथम वर्षे कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी नूतन प्रवेश तसेच वर्ग 9 वी, 10 वी, 12 वी, पदवी द्वितीय आणि तृतीय व पदवीत्तर द्वितीय वर्षे पुर्नप्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज 11 ते 30 जून 2019 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून मागविण्यात येत आहेत.
अर्जासोबत वार्षिक परीक्षेच गुणपत्रक सन 2018-19 या वर्षाचे वार्षिक उत्पन्नाचे तहसिलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्राच्या सत्यप्रती साक्षांकित करुन प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज व नियमावली कार्यालयीन वेळेत 11 ते 30 जून पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयात मिळतील. या कालावधीत संपूर्णपणे भरलेले अर्ज कागदपत्रांसह स्विकारले जाणार आहेत.
प्रवेश अर्जाची किंमत 10 रुपये असून अर्ज विद्यार्थ्यांने समक्ष घेऊन जावेत. विद्यार्थ्यांची प्रवेशाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वसतीगृह नियमीत सुरु होईल. वसतीगृहात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 500 रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. शासनाकडून वसतीगृहास निवासाची, भोजनाची विनामुल्य सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार वसतीगृहात प्रवेश दिला जातो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 20 टक्के जागा राखीव आहेत. या वसतीगृहात प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 30 जून 2019 ही असून या तारखेनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. चूक किंवा अपूर्ण माहितीचे अर्ज तसेच कागदपत्रांची पूर्तता न केलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची संबंधीत विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन गृहप्रमुख शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी केले आहे.
वसतीगृहातील प्रवेशासाठी एकूण 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे. माध्यमिक विभाग (8,9 ,10 वी)- 40 जागा, पूर्नप्रवेशाच्या जागा- 32, नुतन प्रवेशाची विद्यार्थी संख्या- 8, खुला संवर्गासाठी- 6, राखीव- 2. उच्च माध्यमिक विभाग ( 11 12 वी )- 40 जागा, पूर्नप्रवेशाच्या जागा- 23, नुतन प्रवेशाची विद्यार्थी संख्या- 17, खुला संवर्गासाठी- 14, राखीव- 3. वरिष्ठ महाविद्यालय विभाग (पदवी/पदव्युत्तर)- 20 जागा, पूर्नप्रवेशाच्या जागा- 13, नुतन प्रवेशाची विद्यार्थी संख्या- 7, खुला संवर्गासाठी- 6, राखीव- 6 याप्रमाणे रिक्त जागेचा तपशिल आहे.
000000


महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा
नांदेड, दि. 7 :- राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक बांधकाम उपक्रम वगळून), कृषि व फलोत्पादन मंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार 8 जून 2019 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
शनिवार 8 जून 2019 रोजी मुंबई येथून हेलिकॉप्टरने सकाळी 9.30 वा. कळका हेलिपॅड ता. कंधार जि. नांदेड येथे आगमन व वाहनाने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा जाहिर सत्कार व मातोश्री द्रोपदाबाई गायकवाड पाटील सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- कळका ता. कंधार जि. नांदेड. दुपारी 1.30 वा. कार्यक्रम स्थळ येथून कळका हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 1.45 वा. कळका हेलिपॅड जि. नांदेड येथे आगमन व हेलिकॉप्टरने डिगसळ ता. कळंब जि. उस्मानाबादकडे प्रयाण करतील.
0000

Thursday, June 6, 2019


सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
चला क्षयरोगमुक्त भारत बनवू या !
नांदेड, दि. 6 :- गेल्या 50 वर्षापासून क्षयरोग नियंत्रणासाठी देशामध्ये सर्वच स्तरावरुन प्रयत्न करण्यात येत आहेत. तरी सुध्दा दर दीड मिनिटाला एका क्षयरुग्णाचा मृत्यू व अंदाजे 10 लाख क्षयरुग्णांची दरवर्षी नोंद होत नसल्याचे आणि त्यापैकी बरेच रुग्ण क्षयरोगाचे निदानापासून व औषधोपचारापासून वंचित आहेत. 
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राज्यामध्ये सन 2003 पासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत क्षयरोग तसेच एमडीआर/एएक्सडीआर क्षयरोग निदानाच्या अद्यावत सुविधा, संपूर्ण औषधोपचाराच्या सोयी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. कार्यक्रमातंर्गत आजपर्यंत निक्षय सॉफ्टवेअर मार्फत 69 हजार 499 इतक्या क्षयरुग्णांची नोंद राज्यातील खाजगी वैद्यकीय क्षेत्रातून करण्यात आलेली आहे. तर शासकीय यंत्रणेमार्फत 1 लाख 40 हजार 627 इतक्या क्षयरुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. 
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम - नॅशनल स्टॅटेजी प्लॅन सन 2017 ते 2025 नुसार कार्यक्रमात उपलब्ध अद्यावत सुविधा व औषधोपचार सेवा सार्वजनिक तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील क्षयरुग्णांसाठी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे धोरण आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या 16 मार्च, 2018 च्या अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद कार्यक्रमातंर्गत होणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. सन 2025 पर्यंत भारत क्षयमुक्त करण्याचे धोरण केंद्र सरकारतर्फे ठरविण्यात आलेले आहे. यासाठी अधिसूचना लागू करण्यात आली असून यामध्ये क्षयरोगाचे प्रमाण कमी करणे व त्यामुळे होणारे मृत्यू रोखणे हा या अधिसूचनेचा मुख्य उद्देश आहे. 
समाजातील प्रत्येक क्षयरुग्ण लवकरात लवकर शोधून योग्य व संपूर्ण औषधोपचार करण्याची नितांत गरज आहे. राज्यामध्ये खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये जवळपास निम्म्याहून जास्त क्षयरुग्ण उपचार घेत आहेत. क्षयरुग्णांना पूर्णपणे बरे करणे हा उद्देश साध्य करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे कार्यक्रमातंर्गत विविध सुविधा व उपक्रम राबविले जातात. उदा. निक्षय सॉफ्टवेअरमध्ये क्षयरुग्णांच्या नोंदणीची सोय, नि:शुल्क रोगनिदान व औषधोपचार, निक्षय पोषण योजनेतंर्गत क्षयरुग्णाची उपचार पूर्ण होईपर्यंत रु. 500 पोषण आहारासाठी ही आर्थिक मदत रुग्णाच्या खात्यात जमा करणे, क्षयरुग्णाची नोंद कार्यक्रमातंर्गत करणाऱ्या वैदयकीय व्यावसायिकास रु. 500 मानधन व क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण करुन घेतल्यास पुन्हा रु. 500 मानधन, क्षयरुग्णाचा उपचार यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उपचार सहाय्यकास ड्रग सेसिंटिव्ह क्षयरुग्णामागे 1 हजार रुपये व एमडीआर रुग्णामागे 5 हजार रुपये मानधन, रुग्णांना आवश्यक तपासण्यांसाठी रु. 500 मानधन इ. सुविधा देण्यात येत आहेत. क्षयरुग्णाला कुठल्याही प्रकारचा खर्च न येता त्याने त्याचे औषधोपचार योग्य व पूर्णपणे घेणे व तो बरा होणे हा उद्देश आहे.
क्षयरुग्णांची नोंद करावी
सर्व सार्वजनिक व खाजगी रुग्णालये, वैदयकीय व्यवसायिकांनी क्षयरोग रुग्णांची माहिती निक्षय (https://nikshav.in) या संकेतस्थळावर नोंद करावी. म्हणजे क्षयरुग्णांना व खाजगी व्यावसायिकांना वरील सगळ्या सुविधांचा लाभ घेता येईल. 16 मार्च 2018 रोजीच्या भारत सरकारच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार क्षयरोग हा एक नोटिफायबल आजार असून त्याविषयी शासनास कळविणे बंधनकारक असल्याचे घोषित केलेले आहे. सर्व सार्वजनिक तसेच खाजगी रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक यांनी त्यांच्याकडे निदान झालेले / उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांची नोंद शासनाकडे करणे आवश्यक असल्याने सदर क्षयरुग्णांची माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना ( जिल्हा व शहर क्षयरोग अधिकारी, जिल्हा आरोग्य, मुख्य वैदयकीय अधिकारी, महानगरपालिका इ.) कळविणे बंधनकारक आहे. क्षयरुग्णांची नोंद न केल्यास संबंधित सर्व सार्वजनिक व खाजगी रुग्णालयांना व वैद्यकीय व्यावसायिकांना भारतीय दंडसंहिता (1860 च्या 45) च्या कलम 269 आणि 270 च्या अंतर्गत शिक्षा होऊ शकते.
औषध विक्रेत्यांसाठी आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडील 30 ऑगस्ट, 2013 च्या परिपत्रकाप्रमाणे औषधे व प्रसाधने कायदा 1945 या मध्ये सुधारणा करुन क्षयरोगावरील औषधांचे विक्रीसाठी विहित नमुन्यामध्ये क्षयरुग्णांची माहिती ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार सर्व खाजगी दवाखाने / सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक / वैद्यकीय प्रयोगशाळा, सर्व औषध निर्माते, (फार्मासिस्ट, केमिस्ट आणि ड्रगिस्ट), अशासकीय संस्थामार्फत चालविली जाणारी रुग्णालये वा दवाखाने, सर्व सार्वजनिक दवाखाने/रुग्णालये/वैदयकीय अधिकारी यांचेकडून क्षयरुग्णांच्या नोटिफिकेशनसाठी शासकीय यंत्रणेकडे माहिती येणे अपेक्षित आहे.
क्षयरुग्णांना व इतर सर्वांना क्षयरोग व क्षयरोग संदर्भातील सोयी सुविधा यांची माहिती देण्यासाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत क्षयरोग हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहे. सर्वांनी या टीबी हेल्पलाईन क्रमांकाचा- 1800116666 निश्चीत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी, नांदेड  यांनी केले आहे.                                                           
000000


अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील
युवकांसाठी सैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण 
नांदेड, दि. 6 :- सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील युवक-युवतींसाठी सैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम मंजुर करण्यात आला आहे. प्रक्षिणाचा कालावधी तीन महिन्याचा असुन हे प्रशिक्षण श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे होणार आहे. प्रशिक्षणासाठी  राहणे, भोजन, गणवेश, मैदानी चाचणीचे प्रशिक्षण लेखी चाचणीचे प्रशिक्षण मोफत देण्यात येते.  
पुढील प्रशिक्षण सत्र 15 जून 2019 पासुन सुरू होणार आहे. त्यानुसार प्रशिक्षणासाठी  प्रशिक्षणार्थीची निवड करावयाची आहे. अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील युवक युवतींसाठी सैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी पात्रतेच्या अटी शर्ती पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील असावा. उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष असावे. उंची - पुरुष = (165 सेमी) महिला = (155 सेमी) असावी. छाती फुगवता - पुरुष = (79 सेमी) फुगवुन = (84 सेमी) असावी. शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी पास. उमेदवार हा शारीरिक मानसिक दृष्टया निरोगी असावा.
आवश्यक कागदपत्रे- जातीचे प्रमाणपत्र,रहिवाशी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्राची सत्यप्रत देणे, दहावी व बारावीचे गुणपत्रे आवश्यक आहे. अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील युवक / युवतींनी सोमवार 10 जून 2019 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अर्धापुर रोड, ग्यानमाता हायस्कुल समोर, नांदेड येथे मुळ कागपत्रासह साक्षांकित प्रतीसह अर्ज सादर करावा स्वत: उपस्थित राहावे. हजर राहणाऱ्या उमेदवारांना जाण्या- येण्याचा भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन तेजस माळवदकर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.
00000

Monday, June 3, 2019


नांदेड शहराचे अन् माझे जुने ऋणानुबंध
                                 - महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव
नांदेड, दि. 3 :- माझे महाविद्यालयीन शिक्षण नांदेडमध्ये झाले असून या शहराचे अन्‍ माझे जुने ऋणानुबंध आहेत, या शहराने मला खूप काही दिले आहे, या शहराचा मी कायम ऋणी आहे, असे भावनिक उद्गगार महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे काढले.
अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील-चिखलीकर, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे, संचालक के.एम. जोशी,  माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,  संचालक कैलास काला हे उपस्थित होते.
महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव पुढे म्हणाले,  अभिनव भारत शिक्षण संस्था एक संस्कारमय, शिस्तप्रिय शिक्षण संस्था असून या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेल्या अनेकांचे आयुष्य घडले आहे. अशा संस्थेचा इतर शिक्षण संस्था आदर्श घेऊन शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही बाब अभिनंदनीय आहे.

शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांवर मात करण्यासाठी,  त्यावरील उपाययोजना शोधण्यासाठी या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे शिक्षण द्यायलाच हवे. वृक्षारोपण, स्वच्छ भारत अभियान या अभियानांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष कृतीशील सहभाग वाढायला हवा, असे सांगून राज्यपाल श्री. राव यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो-करोडो युवकांना आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग दाखविला आहे. याच माध्यमातून या संस्थेनेही त्यांच्या संस्थेत कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासाठी पुढे यावे, कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत या संस्थेने त्यांच्याच आवारात विविध प्रशिक्षण पाठ्यक्रम सुरू करावेत जेणेकरून येथील विद्यार्थ्यांनाही त्यांच्या पुढील भविष्यासाठी उद्योग क्षेत्राकडे वळता येईल, आत्मनिर्भर होता येईल.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे यांनी संस्थेच्या वाटचालीविषयी तसेच उपक्रमांविषयी माहिती दिली. आभार प्रा. शिवणीकर यांनी मानले.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
00000



आपत्ती व्यवस्थापनात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची
                                - महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव

नांदेड, दि. 3 :- प्रगत देशांमध्ये सामाजिक शिस्त, देशाप्रतीचे प्रेम, आदर नागरी कर्तव्यांचे काटेकोर पालन आणि आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण तयारी या तीन गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले जाते आणि त्याला अनुसरूनच आपली जीवनशैलीही पाळली जाते. प्रगत देश या सर्व गोष्टींसाठी अत्यंत जागरुक असतात आणि आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन याविषयीची जनजागृती यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते, असे प्रतिपादन महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत मंच येथे दि. 3 जून ते 12 जून या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर, आव्हान-2019 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख तसेच विशेष कार्य अधिकारी डॉ. अतुल साळुंके, महामहीम राज्यपाल महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बी. वेणूगोपाल रेड्डी, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी हे उपस्थित होते.  

राज्यपाल चे. विद्यासागर राव पुढे म्हणाले ,सध्याच्या काळात प्रत्येक राष्ट्राने आपत्ती व्यवस्थापनाकरिता नेहमीच सज्ज राहायला हवे. खरे तर आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक धडे शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच देणे,  ही काळाची गरज आहे.  भारत देश हा विकसनशील देशांमधील अग्रेसर देश आहे.  एकविसाव्या शतकातील सर्वात तरुण देश म्हणून भारताकडे सबंध जग पहात आहे.  अशा या टप्प्यावर भारताकडे असलेल्या युवा शक्तीचा वापर राष्ट्रहितासाठी प्रगतीसाठी योग्य मार्गाने होणे गरजेचे आहे.  
महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष कौतुक करताना म्हणाले की,  राष्ट्रउभारणीत राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका अत्यंत आवश्यक व मोलाची आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशन अभियानामध्ये या विद्यार्थ्यांचा खूप चांगला उपयोग होणार आहे. हेच युवक - युवती उद्याचे देशाचे भविष्य आहे. या विद्यार्थ्यांना या वयात दिले जाणारे प्रशिक्षण त्यांच्या पुढील आयुष्यभरासाठी उपयुक्त व दिशादर्शक ठरणार आहे. त्यामुळे दरवर्षी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथका तर्फे अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात यावीत, मात्र त्याचबरोबरीने दरवर्षी सुरक्षा कवायतही (Security Drill) आयोजित करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षण शिबिरात राज्याच्या विविध महाविद्यालयांमधून आलेल्या 800 मुले व 600 मुलींचे राज्यपाल श्री. राव यांनी विशेष अभिनंदन केले आणि त्यांना आवाहनही केले की,  या प्रशिक्षणाचा सर्वार्थाने लाभ घ्या आणि समाजाला उपयोगी पडेल असे काम करा. जिल्हा प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांची निश्चितच मदत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमापूजनाने व तद्नंतर दीपप्रज्वलनाने या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात झाली.  त्याचबरोबर एनएसएसच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व विद्यापीठ गीत गाऊन येथील वातावरण अधिक उत्साही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ. अतुल साळुंखे यांनी केले. या प्रास्ताविकात त्यांनी राज्यभरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाच्या विविध कामगिरीबाबतचा विस्तृत अहवाल महामहीम राज्यपाल श्री. चे. विद्यासागर राव , उपस्थित मान्यवर तसेच विद्यार्थ्यांना सादर केला.
शेवटी आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठातील संचालक डॉ. शिवराज बोकडे यांनी केले.
विद्यापीठ परिसरात महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते
विविध कार्यक्रम संपन्न
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या या भेटीदरम्यान महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसही भेट दिली. त्याचप्रमाणे त्यांनी एनडीआरएफच्या आपत्ती व्यवस्थापन प्रदर्शनास भेट दिली. त्यानंतर त्यांच्या हस्ते श्री. गुरू गोविंद सिंघजी अध्यासन संकुलाच्या इमारतीचे भूमीपूजन संपन्न झाले. त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर व प्राणी संग्रहालयाच्या नूतन इमारतीचेही उद्घाटन महामहीम राज्यपाल श्री. चे . विद्यासागर राव यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे ,विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. दीपक शिंदे, तसेच श्री. गुरू गोविंदसिंघजी अध्यासन व संशोधन केंद्राच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष लड्डू सिंघजी महाजन प्रा. भगवंत सिंघजी गुलाटी,  निरंजन रवींद्र सिंघजी, सरदार रणवीर सिंग, प्रा. गुरुबच्चन सिंग विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता अरुण पाटील, अभियंता कनिष्ठ अभियंता हिरामण वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती.
00000




श्री गुरु गोविंदसिंघजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्र इमारतीचे
भूमीपूजन व कोनशिला अनावरण महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते संपन्न  

नांदेड, दि. 3 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या परिसरातील श्री गुरू गोविंदसिंघजी अध्यासन  संकुल व संशोधन केंद्र इमारतीचे भूमीपूजन व कोनशिला अनावरण महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल  चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले.  तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या परिसरात महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.  
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे ,विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, अध्यासन केंद्राचे समन्वयक  डॉ. दीपक शिंदे, तसेच श्री. गुरू गोविंदसिंघजी अध्यासन व संशोधन केंद्राच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष लड्डू सिंघजी महाजन प्रा. भगवंत सिंघजी गुलाटी,  निरंजन रवींद्र सिंघजी, सरदार रणवीर सिंग, प्रा. गुरुबच्चन सिंग विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता अरुण पाटील, अभियंता कनिष्ठ अभियंता हिरामण वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती.
000000




  विशेष वृत्त एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम पुढील टप्प्...