Sunday, December 24, 2017



जलयुक्त शिवार पत्रकार पुरस्कारासाठी
26 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

            नांदेड, दि. 19 :- महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात वृत्तपत्रातून तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाव्दारे जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांना राज्य शासनाच्यावतीने गत वर्षीपासून राज्य, विभाग तसेच जिल्हा या तीन स्तरांवर पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीच्या सन 2016-17 च्या पुरस्कारासाठी पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका विहित नमुन्यात   दि. 26 डिसेंबर 2017 पर्यंत तीन प्रतीत संबंधित स्तरावरील निवड समितीकडे कार्यालयीन दिवशी सादर करण्याचे आवाहन जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर  यांनी पत्रकाव्दारे केले आहे.  
 जलयुक्त शिवार अभियानाबाबत जनजागृती, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करून पाणी प्रश्न सोडविण्यासात योगदान देणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात येतो. गत वर्षीपासून या पुरस्काराला सुरूवात करण्यात आली असून यासंबंधीचा शासन निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दि. 28 सप्टेंबर 2016  दि. 24 आक्टोबर 2016  9 ऑगस्ट 2017  रोजी निर्गमीत केले आहेत.
राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागीय स्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार तर जिल्हा स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावाने पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतील साप्ताहिके व पाक्षिकांतील लिखाणाचा विचार केला जाईल. या पुरस्कारासाठी मुद्रित माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम असे गट करण्यात आले आहेत. दि. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत प्रसिध्द झालेल्या बातम्यांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल.
मुद्रित माध्यम गटासाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येतील. यामध्ये जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाला 31 हजार, व्दितीय क्रमांकास 21 हजार,तृतीय क्रमांकास 15 हजार, विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकाला 50 हजार, व्दितीय क्रमांकाला 35 हजार, तृतीय क्रमांकाला 25 हजार तर राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाला 1 लाख,व्दितीय क्रमांकाला 71 हजार, तृतीय क्रमांकाला 51 हजार असे बक्षीस देण्यात येते, या स्पर्धेत विजेत्या सर्वांना स्मृतीचिन्ह देण्यात येते. तसेच इलेक्ट्रानिक माध्यमातील मराठी वृत्तकथा प्रसारित करणाऱ्यांना राज्यस्तरावर तीन पुरस्कार देण्यात येतात. त्यामध्ये प्रथम क्रमांकास 1 लाख रुपये, व्दितीय क्रमांकास 71 हजार तर तृतीय क्रमांकास 51 हजारांचे बक्षीस देण्यात येते. याच बरोबर प्रत्येक विजेत्यास स्मृती चिन्ह देण्यात येते.
मुद्रित माध्यम गटासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तंभलेखक, मुक्त पत्रकार या पुरस्कार स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असतील. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रसिध्द केलेल्या साहित्याचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल. उमेदवारास ज्या स्तरावरील पारितोषिकासाठी अर्ज करावयाचा आहे, त्या स्तरावरील समितीच्या सदस्य सचिवांकडे अर्ज करता येईल. मात्र कोणत्याही एका पारितोषिकासाठीच अर्ज करता येईल. एका वृत्तपत्राच्या एका आवृत्तीच्या एकाच पत्रकारास या स्पर्धेत भाग घेता येईल. एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी संबंधित जिल्ह्यातून प्रसिध्द होणारी वृत्तपत्रे, नियतकालिके यांमध्ये प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच विचार केला जाईल.
पुरस्कारासाठी मागील पाच वर्षाची कामगिरी, त्याची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. सलग दोन वर्षे एकाच पत्रकारास पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका स्विकारली जाणार नाही.
स्पर्धेत भाग घेत असलेल्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेशिकेसोबत कोणाचेही शिफारस पत्र जोडण्याची आवश्यकता नाही. पुरस्कारासाठी पाठवायच्या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाची कागदपत्रे त्यांच्या दोन प्रतीसह पाठवावे लागतील. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका त्यासोबत पाठविलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे आवश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड केलेली कागदपत्रे, न वाचता येणाऱ्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही, अशा प्रवेशिका रद्द समजल्या जातील.
पुरस्कार पात्रतेच्या अटी व शर्तीच्या अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दि. 9 ऑगस्ट 2017 रोजी निर्गमीत केलेला शासन निर्णय पाहावा. प्रत्येक स्तरावरील पुरस्कारासाठी एकापेक्षा अधिक प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. तरी दि. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत प्रसिध्द झालेल्या बातम्यांच्या कात्रणांसह आपल्या प्रवेशिका दि. 26 डिसेंबर 2017 पूर्वी पोहोचतील या बेताने जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथे  पाठवाव्यात. उशीरा आलेल्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही.
**** 

Saturday, December 23, 2017

किनवट येथील महाआरोग्य शिबिराची तयारी पुर्ण
जीवनात एखाद्या कार्यामुळे जे समाधान
मिळते ते रुग्णसेवेतून मिळते
                     - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 23 :- जीवनात एखाद्या कार्यामुळे जे समाधान मिळते ते रुग्णसेवेतून मिळते, अन्य कुढल्याही कामातून मिळत नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे मार्गदर्शन व संयोजनाने तसेच नांदेड जिल्हा प्रशासन व निरामय सेवा फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 24 डिसेंबर रोजी कोठारी (चि.) ता. किनवट येथील अटल मैदानावर आयोजित ग्रामीण महाआरोग्य शिबिराच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी रु डोंगरे यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण, कार्यशाळा संपन्न झाली.
या शिबीराची तयारी र्ण झाली आहे. राज्याच्या विविध भागातील नामांकीत डॉक्टरांची टीम किनवट येथे दाखल होत आहे. शिबीराचे नेटके संयोजन वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा लाभक्षेत्र विकासमंत्री गिरीष महाजन त्यांच्या टीमकडून होत आहे. महाआरोग्य या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी, नागरीक, अंगणवाडी कार्यकर्ते विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिबीर यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत 50 हजारांच्या जवळपास रुग्णांची पूर्वतपासणी करण्यात आली आहे. जनसेवेसाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत सर्वच विभागांची मदत मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी ही चांगली संधी माहूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर भोकर तालुक्यातील रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. या शिबीरात एक ते दिड लाखांच्यावर तपासणी, उपचार पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.
            याप्रसंगी माजी खासदार डी. बी. पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी अजित कुंभार, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रविण घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. कोंडेकर, तहसीलदार नरेंद्र देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी जहरवाल, गटविकास अधिकारी सुहास कारेगावे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, अशोक पाटील सर्यवंशी, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा लाभक्षेत्र विकासमंत्री गिरीष महाजन यांचे स्वीय सहाय्यक संदिप जाधव, विशेष कार्यकारी अधिकारी आरोग्यदूत रामेश्वर नाईक, महाआरोग्य शिबीर समन्वयक डॉ. यशवंत पाटील तसेच आदि विविध विभागाचे विभाग प्रमखांची यावेळी उपस्थिती होती.

0000

Friday, December 22, 2017

वैद्यकीय शिक्षण मंत्री
गिरीष महाजन यांचा सुधारीत दौरा
नांदेड, दि. 22 :- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 24 डिसेंबर 2017 रोजी नाशिक येथून नंदीग्राम एक्सप्रेसने सकाळी 8.10 वा. किनवट रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने किनवट महाआरोग्य शिबिराकडे प्रयाण व किनवट येथील महाआरोग्य शिबिरास उपस्थिती. दुपारी 1.35 वा. किनवट रेल्वेस्थानक येथून नंदीग्राम एक्सप्रेसने नाशिककडे प्रयाण करतील. 

00000
दारु विक्री बंदचे आदेश
नांदेड, दि. 22 :- जिल्ह्यातील  नांदेड तालुक्यातील नागापूर, धर्माबाद तालुक्यातील येलापूर, मुदखेड तालुक्यातील वरदडा तांडा, हिमायतनगर तालुक्यातील वाईतांडा या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार 26 डिसेंबर रोजी मतदान बुधवार 27 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होत आहे. त्यासंबंधी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.
मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2 एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल / बिआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचा आदेश दिले आहे.
यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेली गावे याठिकाणी मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर सायं 6 वाजेपासून अनुज्ञप्ती बंद ठेवण्याची तारीख व ठिकाणी 25 डिसेंबर 2017 रोजी वरीलप्रमाणे व मतदानाचा दिवस 26 डिसेंबर रोजी संपुर्ण दिवस. मतमोजणी होत असलेल्या शहर / गावात मतमोजणीचा दिवस बुधवार 27 डिसेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे

000000
हमी भावाने तूर विक्रीसाठी
शेतकऱ्यांनी नोंदणी करावी
नांदेड, दि. 22 :- केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमीभावाने हंगाम सन 2017-18 मध्ये तूर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरु आहे. खरेदी विक्री संघामार्फत देगलूर, मुखेड, बिलोली, धर्माबाद, नांदेड, लोहा, भोकर, हदगाव येथे नोंदणी सुरु आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत नायगाव व किनवट येथे नोंदणी सुरु आहे. हमी भावाने तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. तूर खरेदीचे शेतकरी पेमेंट ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी सात / बाराचा उतारा पिक पेऱ्याची नोंद असलेला, आधार कार्डची झेरॉक्स प्रत व बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
नाताळ, नववर्षानिमित्त विविध
अनुज्ञप्त्या बंद करण्याच्या वेळेत सूट
नांदेड, दि. 22 :-  गृहविभागाने नाताळ व नववर्षानिमित्त 24, 25 व 31 डिसेंबर 2017 रोजी राज्यातील विविध मद्य विक्री अनुज्ञप्त्या निर्धारीत वेळेनंतर रात्री उशीरापर्यंत उघड्या ठेवण्यास शासन मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक एन. व्ही. सांगडे यांनी दिली आहे.
रविवार 24, 25 डिसेंबर व 31 डिसेंबर या कालावधीत अनुज्ञप्तीचा प्रकार- एफएल-2 (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान), एफएलडब्ल्यू-2, एफएलबीआर-2 रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 1 वाजेपर्यंत शिथिल करावयाचा कालावधी आहे. एफएल-3 (परवाना कक्ष) पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत आणि आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत. ई-2 रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत. एफएल-4 पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत आणि आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत. नमुना ई (बीआर बार) रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत. सीएल-3 "क" वर्ग नगरपालिका व जिल्हा परिषद क्षेत्रात (कॅन्टॉनमेट वगळून) रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत आणि त्याव्यतिरिक्त इतर क्षेत्रात रात्री 23.59 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 1 वाजेपर्यंत. या वेळेच्या शिथिलतेच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था याचा विचार करुन जिल्हाधिकारी आवश्यकतेनुसार वेळेतील शिथीलता नाकारु शकतील, असे सहसचिव, गृह विभाग यांचे पत्रात नमूद केले आहे.
000000


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 22 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून बुधवार 27 डिसेंबर पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 6 वाजेपासून शुक्रवार 26 जानेवारी 2018 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 

00000

  विशेष वृत्त एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम पुढील टप्प्...