Thursday, May 4, 2017

जिल्हयातील सर्व न्यायालयात
8 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालत
लोकअदालतीच्या माध्यमातून प्रकरणे मिटविण्याची संधी

नांदेड दि. 4 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड तर्फे 8 जुलै, 2017 रोजी जिल्हा न्यायालय, नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे (138 एन.आय.अॅक्ट), बॅंक रिकव्हरी, दिवाणी प्रकरणे भूसंपादन प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, मनपा, नपा प्रकरणे, विद्युत आणि पाणीपट्टी प्रकरणे, तसेच विविध बॅंकांची, प्रलंबित दाखल पूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
विधिज्ञ, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, मनपा अधिकारी, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, विमा कंपन्यांचे अधिकारी, बॅंक अधिकारी संबंधित सर्व पक्षकार यांनी या राष्ट्रीय लोकअदालतीत आपली जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढ आपला पैसा, वेळ वाचवावा सदर राष्ट्रीय लोकअदालतीच्या रूपाने चालून आलेल्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी केले आहे.
मागील राष्ट्रीय लोकअदालतमध्ये मिळालेले यश पाहता यावेळी देखील ऱ्या मोठया प्रमाणावर प्रकरणे निकाली निघतील असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव न्या. एस.आर.नरवाडे यांनी व्यक्त केला असून पक्षकारांनी आपली प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयात दाखल पुर्व प्रकरणे जवळच्या तालुका विधी सेवा समितीकडे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड या कार्यालयाकडे फक्त एक अर्ज देवून आपले प्रकरण लोकअदालतीमध्ये ठेवण्याची विनंती करावी. यासाठी आपणास कुठलीही फिस आकारण्यात येणार नाही. आपले आपसातील वाद मिटविण्याची या लोकन्यायालयाच्या रुपाने सुवर्ण संधी चालून आली आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने केले आहे.

000000
समाज कल्याणच्या निवासी शाळेत प्रवेश सुरु 
            नांदेड दि. 4 :-   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत नायगाव खै. येथील अनुसूचित मुलांची शासकीय निवासी शाळेत शैक्षणिक सन 2017-18 साठी इयत्ता सहावी ते दहावी मधील सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  
            अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, विमाप्र व अपंग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी या शाळेत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्ज भरुन देण्याची अंतिम तारीख शनिवार 10 जून 2017 आहे. हे प्रवेश शासनाच्या सामाजिक आरक्षणानुसार ठरवून दिलेल्या टक्केवारी नुसार दिले जाणार आहेत, असे नायगाव खै. येथील अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक एम. बी. चरकेवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

0000000

लेख -

  वीज अंगावर पडू नये, यासाठी बचावाच्या उपाययोजना
दरवर्षी जगात विजा पडून होणाऱ्या मृत्‍युंचे प्रमाण खपूच जास्‍त आहे. नांदेड जिल्‍हयात वारंवार विजा पडून मोठया प्रमाणावर वित्‍त आणि जीवीतहानी झालेली आहे. ही बाब चिंतेचे कारण बनलेली आहे. याबाबत सखोल संशोधन करण्‍यासाठी भारतीय उष्‍णदेशीय मौसम विज्ञान संस्‍थान, पृथ्‍वी विज्ञान विभाग भारत सरकार, पुणे येथील दोन वरीष्‍ठ शास्‍त्रज्ञांनी नांदेड जिल्हयातील वीज प्रवण गावांना भेटी दिल्‍या होत्‍या. त्‍यांचा संशोधनाचा अहवाल जिल्‍हा प्रशासनास पाठविलेला होता. त्‍यांच्‍याद्वारे स्‍थापित करण्‍यात आलेल्‍या विजपात पूर्वसूचना  Lightning Information & Predicition System (LIPS) देणारी यंत्रणा व त्‍याचे सेंसर स्‍थापित करण्‍यात आले आहेत. एखादया ठिकाणी विजांचा कडकडाट होत असेल तर ही प्रक्रिया आजुबाजुला पसरते आणि ही यंत्रणा 200 कि.मी. परिक्षेत्रात याची पूर्व सूचना देते. त्‍यामुळे खबरदारी म्‍हणून तेथील यंत्रणेला दूरध्‍वनी, मोबाईल आणि व्‍हॉटस्अप प्रणालीवर संदेश प्रसारीत करुन जास्‍तीत जास्‍त एक ते दीड तास आधी याची पूर्वसूचना देवून संभावीत धोका आणि होणारी वित्‍त व जीवीतहानी टाळता येणे शक्‍य होते. हे संदेश आपल्‍याव्‍दारे सुद्धा पुढे प्रसारीत होणे आवश्‍यक आहे.
मान्‍सून सक्रिय होण्‍याच्‍या एक महिना अगोदर अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसाच्‍या काळात विजा कोसळण्‍याचे प्रकार सर्वाधिक घडतात. पाऊस पडण्‍याच्‍या आधी साधारणत: दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेच्‍या सुमारास आकाशात अचानक ढग जमतात आणि काही मिनिटात गडगडाटी वादळासह विजा चमकतात व मोठया आवाजासह कुठेतरी पडतात. याच कालावधीत शिवारात खरिपाची तयारी सुरु असते. त्‍यामुळे शेतात काम करीत असलेल्‍या शेतक-यांचा, मजुरांचा आणि जनावरांच्या अंगावर विजा पडून मृत्‍यू झाल्‍याच्‍या घटना नियमितपणे घडतात. उंच झाड हे कोसळणाऱ्या विजेला आकर्षित करतात त्‍यामुळे झाडाखाली आश्रय कोणत्‍याही परिस्थितीत घेवू नये.  याबाबत तहसीलस्‍तरावर वेळोवेळी घेण्‍यात येणा-या तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, सरपंच, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षण, वैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आदींना विजेबाबत माहिती दिल्यास व सूचना फलकावरही माहिती डकविल्‍यास मोठया प्रमाणावर जनजागृती होते.
विजापासून सुरक्षित राहण्‍यासाठी सूचविण्‍यात येत असलेल्‍या उपाययोजना पुढील प्रमाणे आहेत.      कोसळणारी वीज ही उंच वस्‍तूवर, ठिकाणावर कोसळते आणि धातूच्‍या वस्‍तूवर जास्‍त आकर्षित होते.
 हे टाळा :- एकटे उभे असलेले मोठे झाड आणि टेकडी किंवा डोंगराचा माथा येथे विजा चमकत असताना आश्रय घेणे टाळावे. सगळयात जास्‍त धोका झाडाखाली थांबल्‍यामुळे उद्भवतो ज्‍यांच्‍या फांदया छोटया व दूरपर्यंत पसरलेल्‍या असतात.  निर्जन ठिकाणी विखुरलेले झाडांचे समुह विजेला आकर्षित करतात.  झाडाच्‍या जवळ किंवा खाली उभे राहिल्‍यामुळे मनुष्‍याला अशा प्रकारे ईजा होण्‍याची, दगावण्‍याची शक्‍यता असते. धातुंच्‍या वस्‍तू जसे छत्री, चाकु, गोल्‍फ खेळावयाची छडी, भांडे विशेषत: हे जर का शरीराच्‍या वरच्‍या बाजुला  असल्‍यास विजा चमकत असताना दूर ठेवाव्‍यात.
अचानक होणा-या वीज वादळापासून स्‍वत:चा बचाव करण्‍यासाठी पुढील सूचना पाळाव्‍यात. तात्‍काळ मोकळया जागेवर यावे आणि दोन्‍ही पाय गुडघ्‍याजवळ घेउन त्‍यांना दोन्‍ही हातानी आवळुण ठेवावे तथा हनवटी जवळ घेतलेल्या गुडघ्‍यांवर टेकवावी.
विजा चमकत असताना किंवा वादळी परिस्थिती निर्माण झाल्‍यास काय करावे व   काय करु नये - विद्युत सुवाहक असणा-या वस्तुंपासुन दूर राहावे. यात आगीचे स्थान, वाहनाचे रेडीएटर्स, स्‍टोव्‍ह, धातुचे पाइप, धातुचे वाँश बेसीन, मोबाइल फोन इत्‍यादी. विजा चमकत असताना विद्युत प्‍लगमध्‍ये कोणत्‍याही ईलेक्ट्रॉनिक वस्‍तूची जोडणी देण्‍यात येवू नये. जसे हेयरडायर, विद्युत टुथब्रश, विद्युत रेझर. जर वीज आपल्‍या घरावर कोसळली तर त्‍यातील प्रभार प्‍लगच्‍या माध्‍यमातून विद्युत प्‍लगमध्‍ये येवू शकते. विजा चमकत असताना मोबाईल, इंटरनेट जोडणी असलेले संगणक, टिव्‍ही, दुरध्‍वनी यांचा वापर करु नये, वीज यामुळे आकर्षित होवू शकते. चारचाकी वाहन हे विजेपासून सुरक्षित ठेवणारे साधन आहे. विजा कडाडत असताना त्‍यातुन बाहेर येवू नये.
धातुंच्‍या वस्‍तू विजा चमकत असताना त्‍या घेवून बाहेर जावू नये. जसे छत्री, धातुंची भांडी इत्‍यादी. पाण्‍यात असल्‍यास त्‍वरीत बाहेर यावे. यात जर का होडी किंवा नाव असल्‍यास त्‍यातून लवकर बाहेर पडावे. विजा चमकत असताना जर आपण बाहेर आहात तर त्‍वरीत सुरक्षित आसरा घ्‍यावा. इमारत सुरक्षित आसरा ठरते. जर इमारत उपलब्‍ध नसल्‍यास गुफा, कपार हे सुरक्षित ठिकाण ठरतात. सुरक्षीत आश्रय उपलब्‍ध झालेच नाही तर उंचीच्‍या वस्‍तुंखाली आश्रय घेवू नका. जर ओसाड ठिकाणी झाड आहे तर त्‍यापासून सुरक्षित अंतर ठेवून जमिनिला टेकून बसा. उंचझाड वीजपाताला आकर्षित करतात. विजा चमकत असतांना विद्युत प्रभार जाणविल्‍यास अंगावरील केस उभे राहतात किंवा त्‍वचेला मुंग्‍या, झिणझिण्‍या आल्‍यासारखे वाटते. तेंव्‍हा समजून घ्‍यावे की, वीज आपल्‍यावर पडणार आहे यावेळी त्‍वरीत आपल्‍याला जमिनीवर बसलेल्‍या मुद्रेत जावे. या विविध उपाययोजनांमुळे वादळी वीज पडून होणाऱ्या मृत्‍युंचे प्रमाण कमी करण्‍यासाठी मदत होईल व वादळी विजांपासून आपला जीव वाचू शकेल.
- संकलन काशिनाथ र. आरेवार
 जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

                                                            000000

Wednesday, May 3, 2017

मानव विकास निर्देशाकांत मराठवाडा
अग्रेसर होईल यासाठी प्रयत्न करा - डॉ. भापकर
नांदेड येथील कार्यशाळेत ग्रामस्तरीय यंत्रणांशी साधला थेट संवाद

नांदेड दि. 3 :- मानव विकास निर्देशाकांत मराठवाडा अग्रेसर होईल यासाठी प्रयत्न  करा. या भुमिचे पाईक आहात, तर तिच्यासाठी झिजण्याची तयारी ठेवा. कामाशी प्रामाणिक राहिलात, तर त्यातून आरोग्य पर्यायाने आनंद लाभेल, असा मन मोकळा संवाद साधत विभागीय आयुक्त डॅा. पुरुषोत्तम भापकर यांनी आज येथे थेट ग्रामस्तरीय यंत्रणांना प्रेरीत केले. थेट विभागीय आयुक्तांनीच संवाद साधल्यामुळे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्यासह जिल्ह्यातील महसूल, विकास तसेच कृषी आदी यंत्रणांतील अधिकारी-कर्मचारी भारावून गेले. मराठवाडा विकासात्मक विविध कार्यक्रम विशेष मोहिम स्वरुपात राबविण्याच्या उद्देशाने डॅा. भापकर यांनी मराठवाड्याचा व्यापक दौरा सुरु केला आहे. त्यानिमित्ताने आज येथील ए. के. संभाजी मंगल कार्यालयात कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेस जिल्हा परीषद उपाध्यक्ष समाधान जाधव, शिक्षण व आरोग्य समिती सभापती माधवराव मिसाळे, समाज कल्याण समिती सभापती शिला निखाते यांच्यासह जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, सहायक जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड, विभागीय अप्पर आयुक्त विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपायुक्त (विकास) पारस बोथरा, उपायुक्त (पुरवठा) वर्षा ठाकूर, मनरेगांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, श्री. रेणापूरकर, तसेच उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, डीआरडीएचे प्रकल्प संचालक डॅा. सुधीर भातलंवडे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, तसेच तालुका कृषि अधिकारी, कृषी सहायक, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, सहायक प्रकल्पाधिकारी आदींची उपस्थिती होती.
मार्गदर्शनपर भाषणात डॅा. भापकर म्हणाले की, नांदेड जिल्हा आकाराने, विस्ताराने मोठा आहे. सोळा तालुक्यांचा जिल्हा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळही या जिल्ह्यात आहे. हे संख्याबळच आपली ताकद आहे. त्यामुळे मागे रहायचे नाही, या मनोधैर्याने प्रयत्न करा. प्रत्येक सैनिक हा सेनापती आहे, या सक्षमतेची जाणीव व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे. काही कारणांनी मराठवाडा प्रदेश मानव विकासात मागे आहे. शिक्षण या घटकासाठी प्रयत्न करण्यात आले. पण आता यापुढे शिक्षण, पाणी, शेती, स्वयंरोजगार यांच्यासह जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, आरोग्याचे कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याकडे सामर्थ्य आहे पण ते ओळखले पाहिजे. जे चांगले काम करतात, त्यांचा सन्मान करू. जे मध्येच आहेत, त्यांचे स्थान निश्चित करू. बाहेर आहेत, त्यांना कामाच्या प्रवाहात आणू. यातून काम करणाऱ्यांची संख्या वाढवू असेही त्यांनी सांगितले.
कामाशी प्रामाणिक राहतात त्यांचे आरोग्य चांगले राहते, ते अधिक आनंदी राहतात, असे सांगून डॅा. भापकर म्हणाले की, या कार्यशाळेचा उद्देशच हा आहे की, तुम्हाला आनंदाचा मार्ग शोधून द्यायचा आहे. भूमिपूत्र असाल, तर तुम्हाला या भुमीसाठी झिजण्याची तयारी ठेवा. सरकारचे "फ्लॅगशीप"चे कार्यक्रम हे समाजाचे कार्यक्रम आहेत. या प्रत्येक कार्यक्रमाशी आपल्या प्रत्येकाचा संबंध आहे. त्यामुळे या सर्व कार्यक्रमांच्या अंमलबजावणीच्या पातळीवर मराठवाड्याला अग्रेसर ठेवा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मनरेगा अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान, मनरेगा, वृक्षारोपण, स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, सात / बारा संगणकीकरण, ईपॉज मशीन व ईपीडीएमएस या विषयांच्या अनुषंगाने उपस्थितांशी प्रश्नोत्तरे करत, अडीअडचणी जाणून घेत मोकळा संवाद साधला. तसेच या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावाही घेतला.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, ग्रामीण भागात विकासासाठी काम करणाऱ्या यंत्रणांबरोबर थेट संवाद साधण्याचा हा अनोखा उपक्रम आहे. आपल्याकडे गुणवत्ता आणि आपण मनात आणले तर खूप काही साध्य करु शकतो. त्यामुळे योजना नागरिकांच्या दारात पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, ज्यातून अनेक घटकांचे स्थलांतर थांबेल. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत मिशन यासारख्या योजनांना आणखी गती दयावी लागेल, असेही नमूद केले.
सुरुवातीला कार्यशाळेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. उपायुक्त श्रीमती ठाकूर यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमात महसूल कर्मचारी संघटना यांच्यासह विविध घटकांनी डॉ. भापकर यांचा सत्कार केला. तत्पूर्वी कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे यांनीही स्वच्छ भारत मिशन, मनरेगा, या विषयी मार्गदर्शन केले. सहाय्यक वनसंरक्षक जी. एस. पवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक विजेता सोळंकी यांनी नांदेड जिल्ह्यातील यशस्वी योजनांविषयी सादरीकरण केले. उपजिल्हाधिकारी रोहयो श्री. कांबळे यांनीही मनरेगा विषयी मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी दिपाली मोतियेळे यांनी सूत्रसंचालन केले. अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आभार मानले.

000000
मराठवाडा विकासात्मक विविध कार्यक्रम विशेष मोहिम स्वरुपात राबविण्याबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी बुधवारी नांदेड येथे जिल्ह्यातील महसूल तसेच विकास, कृषि, सामाजिक वनीकरण यासह विविध यंत्रणांसाठी कार्यशाळा घेतली. ए के संभाजी मंगल कार्यालय येथे झालेल्या या व्यापक कार्यशाळेत बोलताना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, तसेच याप्रसंगी उपस्थित जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे आदी. कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, शिक्षण आणि आरोग्य समिती सभापती माधवराव मिसाळे, समाज कल्याण सभापती शिला निखाते यांच्यासह विविध नगरपालिकांचे नगराध्यक्षही उपस्थित होते. ( छाया - विजय होकर्णे नांदेड  )










राष्ट्रीय लोकअदालतीच्या आयोजनासाठी
विविध प्रकरणाबाबत आढावा बैठक संपन्न
नांदेड, दि. 3  :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये 8 जुलै 2017 रोजी राष्ट्रीय लोकअदालत जिल्हयातील सर्व न्यायालयात संपन्न होणार आहे. त्याअनुषंगाने नुकतीच प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड यांच्या निजकक्षात 2 मे 2017 रोजी बैठक संपन्न झाली.
लोकअदालतीत दिवाणी प्रकरणे, तडजोडपात्र अशी फौजदारी प्रकरणे, वितरण कंपनींची प्रकरणे तसेच मनपा नगरपालीका यांची पाणीपट्टी प्रकरणे, विविध विमा कंपन्यांची प्रकरणे विविध बॅंकांची प्रलंबित दाखल र्व प्रकरणे सामजस्याने निकाली काढण्यात येणार आहेत. आढावा बैठकीत विमा प्रकरणे बॅंक प्रकरणे तडजोडीने जास्तीतजास्त प्रमाणात निकाली काढण्यासाठी न्या. . एल. यावलकर, न्या. जी. बी. गुरव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव न्या. डी. टी. वसावे तसेच जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. मिलींद एकताटे,  जिल्हा सरकारी कील अॅड. अमरिकसिंघ वासरीकर, न्यायालयीन व्यवस्थापक एम. के. आवटे, विधीज्ञ, विविध विमा कंपन्यांचे बॅंकांचे विधी सल्लागार, विमा अधिकारी, बॅंकांचे अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली.
यामध्ये सदरील प्रकरणे चालविणारे विधीज्ञ, उपस्थित अधिकारी यांनी प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी विचारलेल्या विविध अडचणींच्या समस्यांचे सविता बारणे यांनी इतर न्यायाधीशांची विस्तृत चर्चा करून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. ही राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून या सुवर्णसंधीचा संबंधित पक्षकारांनी फायदा रुन घ्यावा, असेही आवाहन सर्व न्यायाधीशाच्यावतीने करण्यात आले.

                                                               000000
एमएचटी- सीईटी 2017 परीक्षा आयोजनातील
विविध घटकांचे प्रथम प्रशिक्षण संपन्न
नांदेड, दि. 3 :- एमएचटी सीईटी 2017 या परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व शासकीय तंत्रनिकेतन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने परीक्षेसाठी नियुक्त उपकेंद्र प्रमुख, समवेक्षक, पर्यवेक्षक यांच्यासाठीचे प्रथम प्रशिक्षण वर्ग नुकतेच संपन्न झाले. येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात मंगळवार 2 मे 2017 रोजी प्रशिक्षण संपन्न झाले.  

प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी विभागीय प्राधिकारी तथा गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एल. एम. वाघमारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तहसिलदार ज्योती पवार या उपस्थित होत्या. परीक्षेचे जिल्हा संपर्क अधिकारी तथा प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे पी. डी. पोपळे यांनी बारावी नंतरचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील परीक्षेचा टप्पा महत्वाचा असल्याने परीक्षा सुरळीत संपन्न होण्यासाठी संबंधितांनी आपआपली जबाबदारी व्यवस्थीत पार पाडावी असे सांगितले. परीक्षेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बाबी पुढीलप्रमाणे आहे, जिल्ह्यात एकूण 27 परीक्षा केंद्र असून विद्यार्थी संख्या 8 हजार 42 इतकी आहे. गुरुवार 11 मे 2017 रोजी होणारी एमएचटी-सीईटी 2017 ही अभियांत्रिकी व औषध निर्माण शास्त्र (फार्मसी) व फार्मडी या अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा आहे. केंद्राची विभागणी एमएम, एमबी, बीबी अशी करण्यात आली आहे. जिल्हा केंद्र प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा होणार आहे.
एमएम केंद्रावर पेपर-1 गणित व पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री) असून सकाळी 9.15 पासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी 2 वा. परीक्षा संपणार आहे. एम. बी. केंद्रावर पेपर-1 गणित, पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री) आणि पेपर-3 (बायोलॉजी) आहे. सकाळी 9.15 वाजेपासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार असून सायं. 4.30 वा. परीक्षा संपणार आहे. बीबी केंद्रावर पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री ) व पेपर-3 (बायोलॉजी) असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर दुपारी 12 वाजेपासून प्रवेश मिळणार असून सायं. 4.30 वा. परीक्षा संपणार आहे.
सर्व परीक्षा केंद्रावर वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. दोन-तीन परीक्षा केंद्राच्या जवळपास एक वैद्यकीय पथक वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तैनात रहणार आहे. उपकेंद्र प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक उपकेंद्रावर "तक्रार निवारण समिती" कार्यरत असणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या दिवशी 144 कलम लागू करण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरुप बहुपर्यायी स्वरुपाचे असल्याने ओएमआर शीट उत्तरपत्रिकेवर केवळ काळ्या शाईचे बॉलपेन विद्यार्थ्यांना वापरता येणार आहे. परीक्षा केंद्रावरील व्यवस्थेचे, नियोजनाचे सुक्ष्म निरिक्षण करण्यासाठी राज्य सामायिक कक्षातर्फे निरीक्षक म्हणून केंद्राच्या संस्थेच्या प्रमाणात नेमण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावर मोबाईल, घडयाळ नेण्याची परवानगी नाही. तसेच इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक संयंत्र आणण्याची परवानगी नाही. 
प्रा. उश्केवार यांनी परीक्षेची रुपरेषा व जबाबदारीचे वाटप याबाबत प्रास्ताविकात माहिती दिली. प्रा. लोकमनवार व प्रा. दमकोंडवार यांनी दृकश्राव्य माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रथम प्रशिक्षणाचे सुत्रसंचलन प्रा. एस. आर. मुधोळकर यांनी केले तर आभार प्रा. बी. व्ही. यादव यांनी मानले.
परिक्षा आयोजनासाठी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा मंगळवार 9 मे 2017 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. प्रशिक्षणासाठी उपकेंद्र प्रमुख समवेक्षक, पर्यवेक्षक उपस्थित राहणार आहेत. जिल्हा संपर्क अधिकारी यांच्या मदतीला सात सहाय्यक जिल्हा संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत.

000000

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ #जलसंधारणदिन #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रीलस्पर्धा #WalkForWater #WaterConservationDay...