Wednesday, May 3, 2017

एमएचटी- सीईटी 2017 परीक्षा आयोजनातील
विविध घटकांचे प्रथम प्रशिक्षण संपन्न
नांदेड, दि. 3 :- एमएचटी सीईटी 2017 या परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व शासकीय तंत्रनिकेतन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने परीक्षेसाठी नियुक्त उपकेंद्र प्रमुख, समवेक्षक, पर्यवेक्षक यांच्यासाठीचे प्रथम प्रशिक्षण वर्ग नुकतेच संपन्न झाले. येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात मंगळवार 2 मे 2017 रोजी प्रशिक्षण संपन्न झाले.  

प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी विभागीय प्राधिकारी तथा गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एल. एम. वाघमारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तहसिलदार ज्योती पवार या उपस्थित होत्या. परीक्षेचे जिल्हा संपर्क अधिकारी तथा प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे पी. डी. पोपळे यांनी बारावी नंतरचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील परीक्षेचा टप्पा महत्वाचा असल्याने परीक्षा सुरळीत संपन्न होण्यासाठी संबंधितांनी आपआपली जबाबदारी व्यवस्थीत पार पाडावी असे सांगितले. परीक्षेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बाबी पुढीलप्रमाणे आहे, जिल्ह्यात एकूण 27 परीक्षा केंद्र असून विद्यार्थी संख्या 8 हजार 42 इतकी आहे. गुरुवार 11 मे 2017 रोजी होणारी एमएचटी-सीईटी 2017 ही अभियांत्रिकी व औषध निर्माण शास्त्र (फार्मसी) व फार्मडी या अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा आहे. केंद्राची विभागणी एमएम, एमबी, बीबी अशी करण्यात आली आहे. जिल्हा केंद्र प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा होणार आहे.
एमएम केंद्रावर पेपर-1 गणित व पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री) असून सकाळी 9.15 पासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी 2 वा. परीक्षा संपणार आहे. एम. बी. केंद्रावर पेपर-1 गणित, पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री) आणि पेपर-3 (बायोलॉजी) आहे. सकाळी 9.15 वाजेपासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार असून सायं. 4.30 वा. परीक्षा संपणार आहे. बीबी केंद्रावर पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री ) व पेपर-3 (बायोलॉजी) असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर दुपारी 12 वाजेपासून प्रवेश मिळणार असून सायं. 4.30 वा. परीक्षा संपणार आहे.
सर्व परीक्षा केंद्रावर वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. दोन-तीन परीक्षा केंद्राच्या जवळपास एक वैद्यकीय पथक वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तैनात रहणार आहे. उपकेंद्र प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक उपकेंद्रावर "तक्रार निवारण समिती" कार्यरत असणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या दिवशी 144 कलम लागू करण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरुप बहुपर्यायी स्वरुपाचे असल्याने ओएमआर शीट उत्तरपत्रिकेवर केवळ काळ्या शाईचे बॉलपेन विद्यार्थ्यांना वापरता येणार आहे. परीक्षा केंद्रावरील व्यवस्थेचे, नियोजनाचे सुक्ष्म निरिक्षण करण्यासाठी राज्य सामायिक कक्षातर्फे निरीक्षक म्हणून केंद्राच्या संस्थेच्या प्रमाणात नेमण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावर मोबाईल, घडयाळ नेण्याची परवानगी नाही. तसेच इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक संयंत्र आणण्याची परवानगी नाही. 
प्रा. उश्केवार यांनी परीक्षेची रुपरेषा व जबाबदारीचे वाटप याबाबत प्रास्ताविकात माहिती दिली. प्रा. लोकमनवार व प्रा. दमकोंडवार यांनी दृकश्राव्य माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रथम प्रशिक्षणाचे सुत्रसंचलन प्रा. एस. आर. मुधोळकर यांनी केले तर आभार प्रा. बी. व्ही. यादव यांनी मानले.
परिक्षा आयोजनासाठी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा मंगळवार 9 मे 2017 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. प्रशिक्षणासाठी उपकेंद्र प्रमुख समवेक्षक, पर्यवेक्षक उपस्थित राहणार आहेत. जिल्हा संपर्क अधिकारी यांच्या मदतीला सात सहाय्यक जिल्हा संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत.

000000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...