Wednesday, May 3, 2017

मानव विकास निर्देशाकांत मराठवाडा
अग्रेसर होईल यासाठी प्रयत्न करा - डॉ. भापकर
नांदेड येथील कार्यशाळेत ग्रामस्तरीय यंत्रणांशी साधला थेट संवाद

नांदेड दि. 3 :- मानव विकास निर्देशाकांत मराठवाडा अग्रेसर होईल यासाठी प्रयत्न  करा. या भुमिचे पाईक आहात, तर तिच्यासाठी झिजण्याची तयारी ठेवा. कामाशी प्रामाणिक राहिलात, तर त्यातून आरोग्य पर्यायाने आनंद लाभेल, असा मन मोकळा संवाद साधत विभागीय आयुक्त डॅा. पुरुषोत्तम भापकर यांनी आज येथे थेट ग्रामस्तरीय यंत्रणांना प्रेरीत केले. थेट विभागीय आयुक्तांनीच संवाद साधल्यामुळे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्यासह जिल्ह्यातील महसूल, विकास तसेच कृषी आदी यंत्रणांतील अधिकारी-कर्मचारी भारावून गेले. मराठवाडा विकासात्मक विविध कार्यक्रम विशेष मोहिम स्वरुपात राबविण्याच्या उद्देशाने डॅा. भापकर यांनी मराठवाड्याचा व्यापक दौरा सुरु केला आहे. त्यानिमित्ताने आज येथील ए. के. संभाजी मंगल कार्यालयात कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेस जिल्हा परीषद उपाध्यक्ष समाधान जाधव, शिक्षण व आरोग्य समिती सभापती माधवराव मिसाळे, समाज कल्याण समिती सभापती शिला निखाते यांच्यासह जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, सहायक जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड, विभागीय अप्पर आयुक्त विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपायुक्त (विकास) पारस बोथरा, उपायुक्त (पुरवठा) वर्षा ठाकूर, मनरेगांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, श्री. रेणापूरकर, तसेच उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, डीआरडीएचे प्रकल्प संचालक डॅा. सुधीर भातलंवडे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, तसेच तालुका कृषि अधिकारी, कृषी सहायक, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, सहायक प्रकल्पाधिकारी आदींची उपस्थिती होती.
मार्गदर्शनपर भाषणात डॅा. भापकर म्हणाले की, नांदेड जिल्हा आकाराने, विस्ताराने मोठा आहे. सोळा तालुक्यांचा जिल्हा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळही या जिल्ह्यात आहे. हे संख्याबळच आपली ताकद आहे. त्यामुळे मागे रहायचे नाही, या मनोधैर्याने प्रयत्न करा. प्रत्येक सैनिक हा सेनापती आहे, या सक्षमतेची जाणीव व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे. काही कारणांनी मराठवाडा प्रदेश मानव विकासात मागे आहे. शिक्षण या घटकासाठी प्रयत्न करण्यात आले. पण आता यापुढे शिक्षण, पाणी, शेती, स्वयंरोजगार यांच्यासह जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, आरोग्याचे कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याकडे सामर्थ्य आहे पण ते ओळखले पाहिजे. जे चांगले काम करतात, त्यांचा सन्मान करू. जे मध्येच आहेत, त्यांचे स्थान निश्चित करू. बाहेर आहेत, त्यांना कामाच्या प्रवाहात आणू. यातून काम करणाऱ्यांची संख्या वाढवू असेही त्यांनी सांगितले.
कामाशी प्रामाणिक राहतात त्यांचे आरोग्य चांगले राहते, ते अधिक आनंदी राहतात, असे सांगून डॅा. भापकर म्हणाले की, या कार्यशाळेचा उद्देशच हा आहे की, तुम्हाला आनंदाचा मार्ग शोधून द्यायचा आहे. भूमिपूत्र असाल, तर तुम्हाला या भुमीसाठी झिजण्याची तयारी ठेवा. सरकारचे "फ्लॅगशीप"चे कार्यक्रम हे समाजाचे कार्यक्रम आहेत. या प्रत्येक कार्यक्रमाशी आपल्या प्रत्येकाचा संबंध आहे. त्यामुळे या सर्व कार्यक्रमांच्या अंमलबजावणीच्या पातळीवर मराठवाड्याला अग्रेसर ठेवा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मनरेगा अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान, मनरेगा, वृक्षारोपण, स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, सात / बारा संगणकीकरण, ईपॉज मशीन व ईपीडीएमएस या विषयांच्या अनुषंगाने उपस्थितांशी प्रश्नोत्तरे करत, अडीअडचणी जाणून घेत मोकळा संवाद साधला. तसेच या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावाही घेतला.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, ग्रामीण भागात विकासासाठी काम करणाऱ्या यंत्रणांबरोबर थेट संवाद साधण्याचा हा अनोखा उपक्रम आहे. आपल्याकडे गुणवत्ता आणि आपण मनात आणले तर खूप काही साध्य करु शकतो. त्यामुळे योजना नागरिकांच्या दारात पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, ज्यातून अनेक घटकांचे स्थलांतर थांबेल. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत मिशन यासारख्या योजनांना आणखी गती दयावी लागेल, असेही नमूद केले.
सुरुवातीला कार्यशाळेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. उपायुक्त श्रीमती ठाकूर यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमात महसूल कर्मचारी संघटना यांच्यासह विविध घटकांनी डॉ. भापकर यांचा सत्कार केला. तत्पूर्वी कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे यांनीही स्वच्छ भारत मिशन, मनरेगा, या विषयी मार्गदर्शन केले. सहाय्यक वनसंरक्षक जी. एस. पवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक विजेता सोळंकी यांनी नांदेड जिल्ह्यातील यशस्वी योजनांविषयी सादरीकरण केले. उपजिल्हाधिकारी रोहयो श्री. कांबळे यांनीही मनरेगा विषयी मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी दिपाली मोतियेळे यांनी सूत्रसंचालन केले. अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आभार मानले.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...