Sunday, July 21, 2019


अर्धापूर न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न
न्यायिक कार्यात सक्षम राहून काम केल्यास
न्यायदानासाठी मोलाचे योगदान राहील
-         न्यायमुर्ती प्रसन्न वराळे
नांदेड,दि. 21 :- न्यायिक कार्यात सक्षम राहून काम केल्यास समाजाच्या न्यायदानासाठी मोलाचे योगदान राहील. यातून एकमेकांच्या सहकार्यातून न्यायदानाचे पवित्र कार्य पुढे जाणार असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती प्रसन्न वराळे यांनी अर्धापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक अ. धोळकिया हे होते. यावेळी अर्धापूर न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्रीमती मयुरा यादव, अर्धापूर अभियोक्ता संघाचे अध्यक्ष किशोर देशमुख, आमदार श्रीमती अमिताताई चव्हाण आदिंची उपस्थिती होती.   
न्यायालयाच्या संख्येत वाढ म्हणजे सामाजिक प्रश्न वाढत असल्याचे सांगून न्यायमुर्ती वराळे म्हणाले, एखाद्या वादाचे निराकरण सामोपचाराने मिटत नसेल, तर अशा अपरिहार्य परिस्थितीत शोषित व्यक्ती न्याय मंदिरात प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी येतो.  या प्रकरणात जलद न्याय देण्याच्या प्रयत्नात लोकन्यायालय व ग्राम न्यायालयातून न्याय हा प्रभावीपणे व तात्काळ मिळतो. त्यातून पारंपारिक न्यायालयावरचा भार कमी होतो. लोकन्यायालयात जास्तीत-जास्त प्रकरणे यशस्वीपणे निपटारा होत आहेत, असेही सांगितले.  
न्यायमुर्ती वराळे पुढे म्हणाले, आपल्या संविधानाने न्याय व्यवस्था व समानता यांना एकासुत्रात आणले आहे. देशाची राज्यघटना ही मुलतत्व मानून न्याय व्यवस्था अधिक समाजाभिमूख होईल. राज्य घटनेच्या विधीद्वारे स्थापित व संचलित अशी स्वयंरचना घेऊन न्याय व्यवस्था कार्यान्वित आहे.  बदलणारे कायदे समाजातील बदलानुसार असल्याचे सांगून बदलते कायदे हे समाजातील अपेक्षांचे तसेच नव्याने होणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. युवा वकिलांनी नव्या कायद्‌याकडे लक्ष दयावे आणि सक्षम रहावे. तसेच मानवी व प्राण्यांचे हक्क, सामाजिक जबाबदारी व अधिकार याबाबत विचार मांडले. पर्यावरण, अपुरे पर्जन्यमान, पाणीसाठा याबाबत जागरुक राहून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचाही संदेश दिला.
प्रस्ताविकात प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया म्हणाले, न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात न्यायालय असावे. यातून अर्धापूर तालुक्यातील न्यायालयाची निर्मिती झाली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती श्री गवई यांच्या हस्ते 25 एप्रिल 2009 रोजी या न्यायालयाची निर्मिती झाल्याची माहिती दिली. न्याय आपल्या दारी या उपक्रमामध्ये नांदेड जिल्ह्याला सृजनशील प्रयोग करण्याची संधी मिळाली आहे. राज्यात निवडक तालुक्यात  ग्रामन्यायालयाची निर्मिती झाली आहे. त्यात अर्धापूर तालुक्याला बहुमान मिळालेला होता. कासारखेडा येथे यशस्वीरित्या ग्रामन्यायालय संकल्पना यशस्वी झाली. आता तामसा येथे ग्रामन्यायालय चालू असल्याचे सांगून नांदेड जिल्हा दिवाणी व फौजदारी खटल्याच्या तडजोडीत निपटारा करण्यात आघाडीवर असल्याचे सांगितले. अर्धापूर येथील सुसज्ज या इमारतीचे बांधकाम 50 वर्षाच्या पुढचा विचार करुन नियोजनबध्द झाल्याचे सांगितले. प्रलंबित खटल्याचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी अभिवक्ता संघाच्या सदस्यांनी सहकार्य करण्याचे सूचविले, असे न्या. धोळकिया यांनी सांगितले.  
सुरुवातील अर्धापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अर्धापूर अभियोक्ता संघाचे किशोर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन गजानन पिंपरखेडे यांनी केले तर न्यायाधीश श्रीमती यादव यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमास न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी, नागरिक आदींची उपस्थिती होती.
00000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 23.15 मि.मी. पाऊस



नांदेड, दि. 21 :- जिल्ह्यात  रविवार 21 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 23.15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 370.42 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 181.63 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 19.19 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 21 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 23.75 (172.14), मुदखेड- 26.67 (239.67), अर्धापूर- 33.00 (174.32), भोकर- 30.25 (180.70), उमरी- 34.67 (210.45), कंधार- 25.17 (182.33), लोहा- 24.83 (149.54), किनवट- 26.43 (182.10), माहूर- 34.75 (236.09), हदगाव- 11.57 (135.27), हिमायतनगर- 12.67 (106.02), देगलूर- 2.00 (134.32), बिलोली- 29.20 (252.40), धर्माबाद- 12.00 (146.65), नायगाव- 31.60 (216.00), मुखेड- 11.86 (188.13). आज अखेर पावसाची सरासरी 181.63 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 2906.13) मिलीमीटर आहे.
00000

Saturday, July 20, 2019

कृषि विभागाच्यावतीने अनुदानावर गोदाम बांधकाम



            नांदेड दि. 20 :- कृषि विभागाच्यावतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये गोदाम बांधकामासाठी लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या आधीन राहुन शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छूक लाभार्थ्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकंडून अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यताप्राप्त डिझान / स्पेसिफीकेशन खर्चाच्या अंदाजपत्रकासह तालुका कृषि अधिकारी यांचेकडे 10 ऑगस्ट  2019 पर्यंत सादर करावा.
या योजनेतर्गत ज्या ठिकाणी गोदामांची व्यवस्था नाही ज्या गावात हा कार्यक्रम राबविण्यात येतो अशा परिसरात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य  अंतर्गत गोदाम बांधकाम कार्यक्रम देण्यात येतो. या योजनेअंतर्गत कमाल 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12.50 लक्ष रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे.
             अटी शर्तीच्या आधीन राहुन शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रस्ताव बँक कर्जाशी निगडीत असून च्छू शेतकरी उत्पादक संघ / कंपनी, केंद्र शासनाची ग्रामीण भांडार योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे असावा.  लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने निवड करण्यात येईल. वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषाप्रमाणे लाभार्थ्यांनी जागेची निवड करावी त्याची खात्री  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी हे करतील.
या योजनेचा एकदाच लाभ देण्यात येईल. बांधकाम चालु आर्थिक वर्षात पुर्ण करणे बंधनकारक आहे. अपुर्ण बांधकाम, मंजूर डिझाईन, स्पेसिफिकेशनमध्ये बदल केल्यास अनुदान देय राहणार नाही. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषि माल साठवणूकीसाठी शेतकऱ्यांना योग्य माफक दरात करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक  कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

अर्धापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे रविवारी उद्घाटन


            नांदेड, दि. 20 :- अर्धापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांचे हस्ते रविवार 21 जुलै 2019 रोजी सकाळी 10.30 वा. संपन्न होणार आहे.
            मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती किशोर सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया राहणार आहे. अर्धापूर अभिवक्ता संघाचे किशोर देशमुख, अर्धापूर येथील दिवाणी न्यायाधीश क स्तर मयूरा यादव यांची उपस्थिती राहील, अशी माहिती प्रबंधक जिल्हा न्यायालय नांदेड यांनी दिली आहे.
000000

माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन



             नांदेड, दि. 20 :- सैनिक कल्याण विभागाच्यावतीने माजी सैनिक / विधवा त्यांच्या पाल्यांसाठी असलेल्या विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज 15 सप्टेंबर 2019 पर्यंत  मागविण्यात येत आहे.  
राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, वादन, नर्तन इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच देश / राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्य  आदींना विशेष गौरव पुरस्कार आर्थिक स्वरूपात देण्यात येतो. 
राष्ट्रीय पातळीवर कामगीरीसाठी 10 हजार रुपये   आंतरराष्ट्रीय पातळीसाठी 25 हजार रुपयाचा पुरस्कार, शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्याची तरतूद माजी सैनिकांसाठी असलेल्या कल्याणकारी  निधीमध्ये आहे. 
         दहावी व बारावी परीक्षे 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून विभागात पहिल्या पाच मुलांमध्ये येणाऱ्या पाल्यासांठी,  पदवी पदव्यूत्तरमध्ये विद्यापीठात सर्वप्रथम येणाऱ्या माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्याना एक रक्कमी  गौरव पुरस्कार 10 हजार रुपये देण्यात येतो. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.   जिल्हयातील सर्व पात्र माजी सैनिकांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे  संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
00000

मार्शल व्ही ए पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड, दि. 20 :- एअर मार्शल व्ही ए पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी जिल्हयातील पात्र माजी सैनिक / विधवा यांची पाल्य दहावी व बारावीमध्ये सर्वाधिक गुण घेवून उत्तीर्ण झाले आहेत त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज 15 सप्टेंबर 2019 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
एअर मार्शल व्ही ए पाटकर विशेष गौरव पुरस्कार हा शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यामधून दहावी व बारावी बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकी एका पाल्यास दिला जातो.  या पुरस्काराची रक्कम 5 हजार रुपये आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.  
000000

Friday, July 19, 2019

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 18.18 मि.मी. पाऊस



नांदेड, दि. 20 :- जिल्ह्यात शनिवार 20 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 18.18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 290.95 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 158.48 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 16.76 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 20 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 18.75 (148.39), मुदखेड- 10.00 (213.00), अर्धापूर- 2.33 (141.32), भोकर- 29.00 (150.45), उमरी- 37.33 (175.78), कंधार- 30.17 (157.16), लोहा- 19.83 (124.71), किनवट- निरंक (155.67), माहूर- 0.50 (201.34), हदगाव- 0.29 (123.70), हिमायतनगर- निरंक (93.35), देगलूर- 25.17 (132.32), बिलोली- 49.60 (223.20), धर्माबाद- 19.67 (134.65), नायगाव- 33.60 (184.40), मुखेड- 14.71 (176.27). आज अखेर पावसाची सरासरी 158.48 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 2535.71) मिलीमीटर आहे.
00000
  

राज्यात एकाचवेळी झालेल्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन लाखांहून अधिक नागरिकांच्या सहभागातून जलसंधारण...