Thursday, February 26, 2026

लेख

हिंद-दी-चादर : संत-गुरुंच्या वारशातच खरी एकता

भारतीय इतिहासात अशा काही अद्वितीय विभूती होऊन गेल्या, ज्यांनी केवळ एका धर्माचे नव्हे, तर संपूर्ण मानवतेचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिखांचे नववे गुरू, ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादूर साहिबजी हे अशाच अजोड त्यागाचे आणि धैर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने नागपूर आणि नांदेडनंतर आता नवी मुंबईतील ओवे मैदान, खारघर येथे त्यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचे भव्य आयोजन २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून, गुरु तेग बहादूरजींच्या विचारांतून राष्ट्रीय एकात्मतेची वीण अधिक घट्ट करण्याचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक उपक्रम आहे.
नवी मुंबईच्या खारघर येथील ओवे मैदानावर या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सुमारे ५ लाख भाविकांची क्षमता असलेल्या या मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला असून, मुख्य मंडपात ८० हजार भाविकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लंगर व्यवस्थेसाठी २.५ लाख भाविकांचा विचार करण्यात आला असून आरोग्य सेवेच्या दृष्टीने ५ तात्पुरती वैद्यकीय केंद्रे व १ फिरते आयसीयू केंद्र कार्यान्वित असेल. याशिवाय, जवळील रुग्णालयांमध्ये ३५० खाटा आणि ७५ आयसीयू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३० पार्किंग स्थळांची निश्चिती करून विशेष मार्ग योजना आखण्यात आली आहे, जेणेकरून हा सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल.
सतराव्या शतकात दिल्लीच्या चांदणी चौकात गुरु तेग बहादूर साहिबजींनी दिलेले बलिदान हे जगाच्या इतिहासातील अशा प्रकारचे पहिलेच बलिदान होते, जे स्वतःसाठी नसून दुसऱ्याच्या श्रद्धेच्या रक्षणासाठी दिले गेले होते. गुरुजींचा इतिहास हा केवळ संघर्षाचा इतिहास नसून, तो सामंजस्य आणि सलोख्याचा महान वारसा आहे. त्यांनी आपल्या पदभ्रमणातून संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधण्याचे कार्य केले. समाजात पसरलेली भीती दूर करून त्यांनी ‘निर्भय’ जगण्याचा संदेश दिला. 'ना कोणाला घाबरवावे, ना कोणाचे भय बाळगावे', हा त्यांचा उदात्त विचार आजही भारतीय लोकशाहीचा आणि मानवी मूल्यांचा पाया ठरतो.
विशेष म्हणजे महाराष्ट्राचे आणि शीख परंपरेचे नाते अत्यंत जुने आणि घट्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि गुरु तेग बहादूरजींचे धर्मरक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही महापुरुषांनी जुलूमशाहीविरुद्ध लढा देताना नैतिक मूल्यांची कधीही पायमल्ली होऊ दिली नाही. खारघर येथील या समागमाच्या निमित्ताने हा सांस्कृतिक सेतु अधिक भक्कम होताना दिसत आहे. गुरुजींनी शिकवलेला ‘सर्वधर्मसमभाव’ केवळ शब्दांत नसून त्यांच्या कृतीत होता. त्यांचे विचार 'गुरु ग्रंथ साहिब'मध्ये समाविष्ट असून, ते आजही जगाला संयम, करुणा आणि मानवतेची शिकवण देतात.
आज जगभरात धार्मिक असहिष्णुता आणि तणावाचे वातावरण असताना गुरु तेग बहादूर साहिबजींचा संदेश अधिकच प्रासंगिक ठरतो. त्यांनी दिलेले बलिदान ही केवळ इतिहासातील एक घटना नसून, मानवतेसाठी दिलेला शाश्वत संदेश आहे. त्यांचा खरा इतिहास जगासमोर आणणे म्हणजे केवळ एका महान गुरूंचे स्मरण नव्हे, तर भारतीय लोकशाही, संविधानिक मूल्ये आणि मानवी हक्क यांची पुनःप्रतिज्ञा होय. गुरुजींचे योगदान ‘सारबत दा भला’ अर्थात सर्वांच्या कल्याणाच्या संकल्पनेतून सामाजिक सलोख्याचा पाया घालणारे आहे. या कार्यक्रमातून येणाऱ्या पिढीला केवळ माहितीच नव्हे, तर एक मोठी प्रेरणा मिळेल. महाराष्ट्राने हा सोहळा यशस्वी करून देशाला पुन्हा एकदा हेच दाखवून दिले आहे की, संत-गुरुंच्या वारशातूनच खरी राष्ट्रीय एकता जन्म घेते. अशा या सोहळ्याला आपण सर्वांनी मिळून उपस्थित राहून प्रेरणा घेऊ या.
लेखन व संकलन – सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर - (९०४९९८७२९८)
****


No comments:

Post a Comment

  नवी मुंबई हिंद दी चादर श्री गुरू तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्ताने खारघर येथील कार्यक्रम #हिंददीचादर #श्रीगुर...