Monday, August 17, 2026

वृत्त क्रमांक 

‘जलसंधारण दिना’ निमित्त ‘जय महाराष्ट्र’ ‘दिलखुलास’ मध्ये 

मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत 

मुंबई, दि. १७ : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण विषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्यासाठी यंदापासून त्यांच्या जयंतीदिनी, २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जलसंधारणाच्या कामांना व्यापक लोकसहभागाची जोड देत जलसुरक्षित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणारी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रसारित करण्यात येणार आहे. 

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या विशेष मुलाखतीचे मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण करण्यात येणार आहे. याचबरोबर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून २०, २१ आणि २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल ॲपवर मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्नती जगदाळे यांनी केले आहे. 

अधिकृत समाजमाध्यमे :

 X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

 Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 जलसंधारणाच्या विविध उपक्रमांची माहिती

या विशेष मुलाखतीत सचिव जितेंद्र पापळकर राज्यातील जलसंधारणाच्या कामांची सद्यस्थिती, शासनाच्या विविध योजना आणि भविष्यातील नियोजनाबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.०, माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, लघुसिंचन प्रकल्प, सिमेंट बंधारे तसेच विविध मृदसंधारणाची कामे याबाबतही ते मार्गदर्शन करणार आहेत. 

राज्यातील जलसंधारणाच्या कामांना अधिक परिणामकारक स्वरूप देताना पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन, पाणी अडविणे व जिरविणे, भूजल पुनर्भरण आणि भूजल पातळीत वाढ यावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यासाठी गावनिहाय जलआराखडा, स्थानिक जलस्रोतांचे नियोजन आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व शाश्वत पद्धतीने वापर याबाबत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ मुलाखतीत माहिती देण्यात येणार आहे.

 लोकसहभागातून जलसुरक्षित महाराष्ट्र

जलसंधारणाच्या कामांना लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी लोकसहभागाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. शासनाच्या प्रयत्नांना ग्रामस्थ, शेतकरी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध सामाजिक संस्थांच्या सक्रिय सहभागाची जोड मिळाल्यास जलसुरक्षित महाराष्ट्राचे उद्दिष्ट अधिक वेगाने साध्य होऊ शकते. गावागावांत जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्यासाठी स्थानिक पातळीवरील सहभागाचे महत्त्वही सचिव पापळकर या मुलाखतीतून अधोरेखित करणार आहेत.

 भविष्यातील जलव्यवस्थापनावर भर

हवामान बदल, अनियमित पर्जन्यमान आणि वाढती पाण्याची गरज या पार्श्वभूमीवर भविष्यातील जलव्यवस्थापनासाठी शासनाचा दीर्घकालीन दृष्टिकोनही या मुलाखतीत स्पष्ट करण्यात येणार आहे. जलस्रोतांचे संवर्धन, भूजल पुनर्भरण, पाण्याची उपलब्धता वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा शाश्वत वापर यासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. 

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश केवळ घोषवाक्य न राहता तो लोकचळवळीचा भाग व्हावा, यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. जलसंधारण दिनाच्या निमित्ताने जलसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारून जलसुरक्षित महाराष्ट्राच्या निर्मितीत प्रत्येकाने योगदान द्यावे, हा संदेश या विशेष मुलाखतीतून देण्यात येणार आहे.

००००



वृत्त क्रमांक 

‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2026’मध्ये आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

नांदेड, दि. 17 ऑगस्ट : कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2026’ अंतर्गत 14, 15 व 16 ऑगस्ट 2026 या तीन दिवसांत विविध सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच नागरिकांकरिता आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या तीन दिवसांत आरोग्य शिबिरांमध्ये 310 रुग्णांची विविध आजारांसाठी तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्य सेवा, मार्गदर्शन व पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये 128 रुग्णांची फिजिओथेरपी व अॅक्युपंक्चर उपचार देण्यात आले, 83 रुग्णांची नेत्र तपासणी, 7 रुग्णांची इंडोस्कोपी तपासणी तसेच 92 रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली.

मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी

रामेश्वर नाईक कक्षप्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष मंत्रालय मुंबई यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर राबविण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील या उपक्रमाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2026’च्या आयोजक डॉ. सान्वी जेठवाणी, अध्यक्ष सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड यांचे या उपक्रमास मोलाचे सहकार्य लाभले.

मान्यवरांची शिबिरास भेट

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे, खासदार डॉ. अजितजी गोपछडे,  महापौर सौ. कविता मुळे, , मा. रामेश्वर नाईक कक्षप्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष मुंबई, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील तसेच नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी आरोग्य शिबिरास भेट देऊन शिबिरातील आरोग्य सेवा व व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी मान्यवरांनी शिबिरामध्ये नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवा, वैद्यकीय तपासण्या, निदान व उपचार व्यवस्थेची सविस्तर माहिती घेतली. तसेच शिबिरातील विविध आरोग्य सेवा केंद्रांना भेट देऊन नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली.

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार, सुलभ व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मान्यवरांनी शिबिराचे आयोजक, समन्वयक, आरोग्य सेवा देणाऱ्या विविध संस्था तसेच त्यांच्या प्रतिनिधींचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

विविध यंत्रणांचा प्रभावी समन्वय

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत मुंडे, समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे आणि समन्वयक संभाजी लोंढे यांनी शहरातील खासगी रुग्णालये, वैद्यकीय शैक्षणिक संस्था व विविध सेवाभावी संस्थांशी सातत्याने समन्वय साधून शिबिरांचे नियोजन, आयोजन आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली.

आरोग्य संस्थांचे मोलाचे योगदान

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संलग्नित सनराईज ग्लोबल हॉस्पिटल, नांदेड येथील डॉ. त्र्यंबक दापकेकर व त्यांचे सहकारी, नांदेड फिजिओथेरपी कॉलेज, पांगरीचे असोसिएट डायरेक्टर डॉ. विजय भारतीया, आरोग्य भारती नांदेड, लायन्स नेत्र रुग्णालय जंगमवाडी नांदेड येथील डॉ. सुलोमान व त्यांचे सहकारी, गॅलक्सी हेल्थकेअर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट नांदेडद्वारा संचालित फिरते इंडोस्कोपी रुग्णालयातील डॉ. नितीन जोशी व त्यांचे सहकारी तसेच गुरु सेवा प्रतिष्ठान व साई अॅक्युपंक्चर उपचार केंद्र नांदेड येथील डॉ. शकुंतला झंवर व डॉ. मल्लेश कर्रे तसेच सप्तरंग सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवक यांचे मोलाचे योगदान लाभले.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तीन दिवस चाललेल्या या आरोग्य शिबिरांना शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः गरजू नागरिकांना त्यांच्या परिसरातच विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या, निदान, उपचार, वैद्यकीय मार्गदर्शन आणि पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध झाल्याने हा उपक्रम लोकाभिमुख व परिणामकारक ठरला.

जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि विविध वैद्यकीय व सेवाभावी संस्थांच्या समन्वयातून भविष्यातही नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा लोकाभिमुख आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

0000





वृत्त क्रमांक 

आपणच आपला गावआराखडा तयार करा ; 

वनोपजाचे संरक्षण विक्रीतून गावाला समृद्ध करा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड दि. 17 ऑगस्ट :- प्रत्यक्ष फिरून शिवारफेरी पूर्ण करा, आपल्या गावाला काय हवं त्याचा आराखडा तयार करा, वनोपजाचे संरक्षण व विक्रीतून गावाला समृद्ध करा, रासायनिक खते व औषधी टाळून जीवामृत, दसपर्णी अर्क वापरा, खर्च कमी करून उत्पन्न वाढवा, गटशेती करा, सामूहिक वनसंपत्तीचे नियोजन, जैवविविधतेचे संवर्धन, लघुवनोपजाचे व्यवस्थापन, पारंपरिक ज्ञानाचा वापर आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून घेणे हेच आजच्या कार्यशाळेचं फलित आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारित नियम 2012 यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक वनहक्क अंमलबजावणी व व्यवस्थापन समिती (CFRMC) प्रशिक्षण कार्यशाळेत किनवट येथे मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय यांच्यावतीने किनवट पंचायत समिती सभागृहात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी बी. सरवनन, तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांची प्रमुख उपस्थिति होती.

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री कर्डिले असे म्हणाले की, निसर्गातील जीवसृष्टीची विविधता म्हणजे जैवविविधता होय. किनवट परिसरातील जंगले, बांबू, साग, विविध औषधी वनस्पती, वाघ, बिबट्या, अस्वल, लांडगा , हरीण, मोर, विविध पक्षी व कीटक हे सर्व मिळून त्या परिसराची जैवविविधता तयार करतात. तेव्हा याची जपणूक झाली पाहिजे.

याप्रसंगी पांढरकवडा येथील उमेद संस्थेचे सचिव अमीत कुलकर्णी यांनी ग्रामसभा सक्षमीकरण, गडचिरोली येथील सृष्टी संस्थेचे संयोजक केशव गुरनाळे यांनी आर्थिक सक्षमीकरण, यवतमाळ येथील जिल्हा व्यवस्थापक रुपेश श्रृपवार यांनी वन हक्क कायदा जनजागृती, सहायक बालाजी नरवाडे यांनी वनहक्क कायदा, वन परिक्षेत्राधिकारी धीरज मदने यांनी वन संरक्षण व संसाधन व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. आदी कर्मयोगी उत्तम कानिंदे यांनी प्रास्ताविक , सूत्रसंचालन केले व आभार मानले.

याप्रसंगी सहायक प्रकल्पाधिकारी प्रदीप नाईक, विस्तार अधिकारी (पं) कैलास गायकवाड, जिल्हा कन्व्हर्जन समिती सदस्य तुकाराम पेंदोर , गजानन डवरे, देवगिरी कल्याण आश्रम जळगावचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. उत्तम धुमाळे, जिल्हा सचिव विश्वनाथ नखाते, सामाजिक कार्यकर्ते विजय पवार, वनपाल मनोज गुरसाळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी वनहक्क तालुका व्यवस्थापक महेश राठोड व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे गणेश कटकमवार यांनी परिश्रम घेतले.

000000



वृत्त क्रमांक 

सामूहिक वनहक्कांच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करा

किनवट पंचायत समिती सभागृहात विशेष बैठक ; 

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

नांदेड दि. 17 ऑगस्ट :- सामूहिक वनहक्क प्राप्त गावांमध्ये वनहक्कांचे संवर्धन व प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी ‘सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडा’ तयार करण्याबाबत आज किनवट येथील पंचायत समिती सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन यांच्या नियोजनातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले. 

बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सामूहिक वनहक्कांचे संवर्धन, व्यवस्थापन तसेच त्याचा गावांच्या विकासासाठी प्रभावी वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. सामूहिक वनहक्कांचा आराखडा लवकरात लवकर तयार करून त्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून वनसंपत्तीचे संवर्धन, उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि ग्रामस्थांच्या सहभागातून विविध विकासकामांचे नियोजन करण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी बी. सरवनन, तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, गट विकास अधिकारी जयश्री वाघमारे, वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने, जिल्हा वनहक्क समितीचे सदस्य तसेच देवगिरी कल्याण आश्रमचे प्रांत उपाध्यक्ष उत्तमराव सुपाते, डॉ. उत्तम धुमाळे, किनवटचे तुकाराम पेंदोर, नमिता गेडाम, गजानन डवरे, जिल्हा सचिव विश्वनाथ पधाने आदी उपस्थित होते.

आराखड्याला प्राधान्य 

सामूहिक वनहक्क प्राप्त गावांचा आराखडा तयार करताना ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेऊन वनसंपत्तीचे संवर्धन आणि उपजीविकेच्या साधनांचा विकास करण्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी बैठकीत दिली.

000000






 विशेष लेख 

जलसंधारणातून घडवूया बारमाही हिरवा महाराष्ट्र

पाऊस पडतो तेव्हा आपण आनंदतो; पण तोच पाऊस वाहून जातो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब जमिनीवर थांबविणे, तो जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, हीच आजच्या महाराष्ट्राची सर्वात मोठी गरज आहे. म्हणूनच यंदा २१ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जलसंधारण दिन हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता लोकसहभागाची नवी सुरुवात ठरली पाहिजे.

महाराष्ट्र शासनाने माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी, म्हणजेच २१ ऑगस्टला दरवर्षी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयामागे जलसंधारण क्षेत्रातील सुधाकरराव नाईक यांच्या योगदानाचे स्मरण आणि जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. या दिवशी जलपूजन, विविध जलसंधारण कामांचे भूमिपूजन व लोकार्पण, श्रमदान, जनजागृती, उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.याच पार्श्वभूमीवर राज्यात जलसंधारण दिनाच्या निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात शासकीय कार्यालयांमध्ये मृद व जलसंधारणाची शपथ घेऊन या लोकचळवळीची सुरुवात करण्यात आली. २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’, रील्स स्पर्धा, जलपूजन, श्रमदान आणि जनजागृतीचे उपक्रम नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी आयोजित केले जात आहेत. 

जलसंधारण म्हणजे काय

पावसाचे पाणी शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात जमिनीवर अडविणे, त्याचा वेग कमी करणे, जमिनीत मुरविणे, भूजलाचे पुनर्भरण करणे, जलस्रोतांची साठवण क्षमता वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, याला व्यापक अर्थाने जलसंधारण म्हणता येईल. जलसंधारण म्हणजे केवळ बंधारा बांधणे नव्हे. पाण्याचा प्रत्येक थेंब जिथे पडतो, तिथेच त्याचा अधिकाधिक उपयोग करणे, ही त्यामागची मूलभूत संकल्पना आहे.

महाराष्ट्रासाठी ही बाब अधिक महत्त्वाची आहे. राज्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे ५२ टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. पावसाचे भौगोलिक आणि कालिक वितरण असमान आहे. काही भागात अतिवृष्टी होते, तर काही भागात पावसाची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे ‘पाणी आहे, पण योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी नाही’ हीच मोठी समस्या आहे. जलसंधारणातून या विसंगतीवर मात करता येते.

महाराष्ट्राच्या जलसंधारणाची मुळे

महाराष्ट्रात जलसंधारणाची परंपरा नवी नाही. गावागावातील तलाव, बंधारे, पाझर तलाव, विहिरी आणि पारंपरिक जलव्यवस्थापन ही ग्रामीण जीवनाची पूर्वापार साधने आहेत. ही परंपरा थेट छत्रपती शिवरायांचा काळापर्यंत जाते. गड किल्ल्यावर पावसाचे पाणी साठवण्याची मोठी परंपरा आहे. यावर महाराष्ट्राने शिवकालीन पाणी साठवण योजनाही सुरु केली आहे. आधुनिक शासकीय पातळीवर मात्र जलसंधारणाला स्वतंत्र संस्थात्मक दिशा मिळाली ती स्वतंत्र जलसंधारण विभागाच्या स्थापनेमुळे.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीही 1972 च्या दुष्काळानंतर जलसंधारण माध्यमातून ‘जलक्रांन्ती’ घडवून आणली होती. त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवून पाणलोट क्षेत्र वाढवले मोठ्या धरणांपेक्षा बॅरेजेसला महत्व दिले.

जलयुक्त शिवारातून नव्या पर्वाला सुरुवात

जलसंधारणाला मोठ्या प्रमाणावर लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या दृष्टीने २०१४ नंतरचा काळ महत्त्वाचा ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ५ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. या योजनेतून पुढे हजारो हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली. लक्षावधी टीएमसी पाणी साठा निर्माण झाला. हजारो गावे पाणीदार झाली. त्यांचा शाश्वत विकास झाला.

आज जलयुक्त शिवार २.०च्या माध्यमातूनही जलसंधारण, जलसाक्षरता, लोकसहभाग आणि उपलब्ध भूजलाच्या शाश्वत वापरावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनीही स्पष्टपणे सांगितले आहे की, महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणातून परिवर्तन घडविणे आवश्यक आहे.

योजनांची ताकद, लोकसहभागाची साथ

महाराष्ट्राने जलसंधारणासाठी अनेक मार्ग स्वीकारले आहेत. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला २०१६ मध्ये सुरुवात करून शेतकऱ्यांना स्वतःची संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्याची संधी देण्यात आली.

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही संकल्पना तर जलसंधारण आणि शेती यांची सांगड घालणारी आहे. धरणातील गाळ काढल्यामुळे जलाशयाची साठवण क्षमता वाढते आणि तोच गाळ शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. २०२४ मध्ये ही योजना कायमस्वरूपी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  याशिवाय विहीर पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नाला खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट बंधारे, गॅबियन बंधारे, वनराई बंधारे, सलग समतल चर, शेततळी, जलस्रोतांमधील गाळ काढणे, बांधावर वृक्ष व बांबू लागवड अशा असंख्य उपाययोजना राज्यात राबविल्या जात आहेत.

देशातील प्रेरणादायी उपक्रम

राजस्थानच्या अलवरमध्ये पारंपरिक ‘जोहड’ या पावसाच्या पाण्याच्या साठवण संरचनांचे पुनरुज्जीवन करून गावकऱ्यांनी जलव्यवस्थापनाचे प्रभावी मॉडेल उभे केले. जलतज्ज्ञ आणि ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील लोकसहभागातून कोरड्या प्रदेशात जलस्रोत पुनरुज्जीवित झाले आणि अरवरीसारख्या नद्यांना पुन्हा प्रवाह मिळाला.

महाराष्ट्रात राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार ही दोन उदाहरणे तितकीच प्रेरणादायी आहेत. राळेगणसिद्धीत नाला बांध, गली प्लगिंग, समतल चर, पाझर तलाव आणि लोकसहभागातून दुष्काळी गावाचा कायापालट झाला. हिवरे बाजारने पाण्याचे बजेट, पिकांचे नियोजन, ठिबक सिंचन, भूजल पुनर्भरण आणि जलसंधारण यांची सांगड घालत जलसुरक्षेचे आदर्श मॉडेल निर्माण केले.

नागरिकांनी काय करायचे

शासन आपले काम करीत आहे; परंतु जलसंधारणाची खरी यशोगाथा नागरिकांच्या सहभागाशिवाय पूर्ण होणार नाही. या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या छतावरील पाणी साठविण्याची किंवा जमिनीत मुरविण्याची व्यवस्था करावी. गावांनी पाण्याचा ताळेबंद तयार करावा. शेतकऱ्यांनी शेततळी, बांधबंदिस्ती, विहीर पुनर्भरण, ठिबक-सिंचन आणि पिकांच्या पाण्याच्या गरजेनुसार नियोजन करावे. गावातील नाले, तलाव, बंधारे आणि पारंपरिक जलस्रोत यांची स्वच्छता व देखभाल करावी. शक्य तेथे श्रमदान करावे. पाणी वाया जाणार नाही, याची प्रत्येक कुटुंबाने काळजी घ्यावी.आणि पावसाळा सुरु आहे. वृक्ष लागवडीत कुटूंबाने दरवर्षी एक या प्रमाणे वृक्ष लागवड करावी.

जलसंधारण हा केवळ मृद व जलसंधारण विभागाचा विषय नाही; तो कृषीचा, ग्रामविकासाचा, पर्यावरणाचा, अर्थव्यवस्थेचा आणि भविष्यातील पिढ्यांचा विषय आहे. कारण पाणी वाचले तर शेती वाचेल, शेती वाचली तर गावाची अर्थव्यवस्था वाचेल आणि गाव समृद्ध झाले तर महाराष्ट्र समृद्ध होईल.

म्हणून २१ ऑगस्टचा जलसंधारण दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस न राहता प्रत्येकाच्या मनात एक संकल्प निर्माण करणारा दिवस ठरू दे. चला !जलसंधारणातून ‘बारमाही हिरवा महाराष्ट्र!’

 घडवू या ! 

प्रवीण टाके

उपसंचालक (माहिती)

विभागीय माहिती कार्यालय

छत्रपती संभाजीनगर मो.क्र.9702858777




वृत्त क्रमांक 

नांदेड येथून मिळालेला कामाचा अनुभव सदैव सोबत राहील : उपसंपादक अलका पाटील

उपसंपादक अलका पाटील यांची हिंगोली जिल्हा माहिती कार्यालय येथे बदली

नांदेड, दि. 17 ऑगस्ट : नांदेड जिल्ह्यात काम करताना वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राज्य शासनाच्या प्रसिद्धीविषयक कामाच्या निमित्ताने मिळालेला अनुभव, सहकाऱ्यांसोबत केलेले प्रयत्न आणि या काळात निर्माण झालेले स्नेहबंध कायम स्मरणात राहतील, अशा भावना जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथून बदलीनिमित्त कार्यमुक्त होताना उपसंपादक श्रीमती अलका राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या.

जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे उपसंपादक पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती अलका राजेंद्र पाटील यांची जिल्हा माहिती कार्यालय हिंगोली येथे बदली झाली आहे. हिंगोली येथे बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी त्यांना आज जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथून कार्यमुक्त करण्यात आले.  

त्यांच्या बदलीनिमित्त श्रीमती पाटील यांना प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, कार्यालयातील वरिष्ठ लिपिक काशिनाथ आरेवार, लिपिक-टंकलेखक अनिल चव्हाण, अहेमद इस्माईल बेग, वाहन चालक रामकिशन तोकले, शिपाई चंद्रकांत गोधने यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नांदेड येथील सेवाकाळात त्यांनी राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम तसेच विकासकामांच्या प्रसिद्धीचे काम प्रभावीपणे पार पाडले. प्रसिद्धीविषयक काम करताना प्रसारमाध्यमांशी समन्वय साधत शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

नांदेड येथील सेवाकाळातील सहकाऱ्यांचा स्नेह, वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि कामातून मिळालेला अनुभव हीच पुढील वाटचालीची शिदोरी राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

श्रीमती अलका पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2009 मध्ये मुख्यालय मुंबई येथे नियुक्ती झाली होती. त्यानंतर सन 2011 मध्ये त्यांची नांदेड जिल्हा माहिती कार्यालयात लिपिक-नि-टंकलेखक पदावर बदली झाली. सन 2020 मध्ये विभागीय मर्यादित परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची माहिती सहायक पदावर नियुक्ती झाली. पुढे त्यांनी उपसंपादक म्हणून जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे सेवा बजावली.

0000

वृत्त क्रमांक 

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व उद्योजक मेळावा 

नांदेड दि. 17 ऑगस्ट :-  नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व परमविर चक्र कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वा. पासून परमविर चक्र कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था नायगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या उद्योजक मेळाव्यामध्ये आसरा फाउंडेशनचे श्रीमती रुपाली महावीर श्रीश्रीमाळ व श्रीमती ऐशवर्या प्रसाद कुलकर्णी हे येणार असून ते जिल्ह्यातील सूक्ष्म व ते लघु उद्योजकांना उद्योग व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणींबाबत जसे फंडिंगचे विविध प्रकार, लोन प्रपोजल, लोन प्रक्रिया यांची माहिती, आपला व्यवसाय कसा उभारावा आणि त्याची ओळख कशी निर्माण करावी, आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी सुधारायची तरुण व्यावसायिक व उद्योजकांना संवाद कौशल्य व खंबीरपणा टीमवर्क याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. 

या रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी मंगळवार 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. पासून परमविर चक्र कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था नायगाव येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे. 

आधिक माहितीसाठी संपर्क सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आनंदनगर रोड बाबानगर नांदेड ई-मेल आयडी nandedrojgar01@gmail.com दुरध्वनी क्र. 02462-251674 वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ #शेतकरीकर्जमाफी #शेतकरीकल्याण