Monday, August 17, 2026

वृत्त क्रमांक 

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व उद्योजक मेळावा 

नांदेड दि. 17 ऑगस्ट :-  नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व परमविर चक्र कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वा. पासून परमविर चक्र कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था नायगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या उद्योजक मेळाव्यामध्ये आसरा फाउंडेशनचे श्रीमती रुपाली महावीर श्रीश्रीमाळ व श्रीमती ऐशवर्या प्रसाद कुलकर्णी हे येणार असून ते जिल्ह्यातील सूक्ष्म व ते लघु उद्योजकांना उद्योग व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणींबाबत जसे फंडिंगचे विविध प्रकार, लोन प्रपोजल, लोन प्रक्रिया यांची माहिती, आपला व्यवसाय कसा उभारावा आणि त्याची ओळख कशी निर्माण करावी, आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी सुधारायची तरुण व्यावसायिक व उद्योजकांना संवाद कौशल्य व खंबीरपणा टीमवर्क याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. 

या रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी मंगळवार 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. पासून परमविर चक्र कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था नायगाव येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे. 

आधिक माहितीसाठी संपर्क सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आनंदनगर रोड बाबानगर नांदेड ई-मेल आयडी nandedrojgar01@gmail.com दुरध्वनी क्र. 02462-251674 वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

Sunday, August 16, 2026

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्ण करुन घ्या.

 एक रिल पाण्यासाठी, एक रिल मातीसाठी!

‘रिल फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ राज्यस्तरीय रिल स्पर्धा.
स्पर्धेचे नियम व अधिक माहिती जाणून घ्या.

 तुमच्या कल्पनांना आकार द्या!

मृद व जलसंधारण विभागाच्या रिल चॅलेंजमध्ये माती आणि पाणी संवर्धनावर ३०-६० सेकंदांची क्रिएटिव्ह रिल बनवा!



माती आणि जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘रिल फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ ही राज्यस्तरीय रिल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून १५ ते १९ ऑगस्टदरम्यान रिल अपलोड करता येणार आहे.
अधिक माहिती व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेला QR कोड स्कॅन करा.
जिल्हास्तरावर प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. याशिवाय विजेत्यांना ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून उत्कृष्ट सहभागींना ई-सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
युवक, विद्यार्थी, इन्स्टाग्राम क्रिएटर्स, यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.


 

 मृद आणि जल संवर्धनावर रिल बनवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा...

वृत्त क्रमांक

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा

१५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह रील्स स्पर्धेचे आयोजन

नांदेड ,दि.१६ ऑगस्ट - मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन ‘रील्स स्पर्धेचे ‘आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इनस्टाग्राम (Instagram) च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या रील स्पर्धेत राज्यातील युवक - युवतींनी उत्सफूर्त सहभागी घ्यावा, असे आवाहन  करण्यात येत आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. 

रील स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आली असून  या स्पर्धेचा पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे असा ठेवण्यात आला आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी. व्हिडीओ/ रिलच्या सुरुवातीला व्हिडीओ / रिलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद सहभागी स्पर्धकांनी करणे आवश्यक आहे. स्पर्धाकांने Reel स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. स्पर्धकांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहील. यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil Save Water वापरणे अनिवार्य राहणार आहे.

रिल्स बनवण्यासाठी विषय

माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य असे रील्स बनवण्यासाठी विषय देण्यात आले आहेत.

रील्स करीता गुणांकन पद्धती पुढील प्रमाणे असणार आहे. विषय व संदेश - ३० गुण, कल्पकता -२५ गुण, प्रभावी सामाजिक संदेश - २० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता - १५ गुण, Instagram Engagement - १० गुण असे एकूण - १०० गुण असणार आहेत.  केवळ Likes किंवा Followers वर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media Engagement या दोन्हींचा समतोल ठेवण्यात येणार आहे. गुणांकानुसार विजेत्याची निवड करण्यात येईल.

विजेत्यांना बक्षीस

राज्यासाठी एकच अधिकृत हॅशटॅग #SaveSoilSaveWater वापरण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रिल्स आणि राज्यभरातून १० हजार रिल्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत डिजिटल स्वरूपात मृद व जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. रिल स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात प्रथम पुरस्कार ₹२५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार ₹१५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार ₹१० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष “युवा मृद-जलदूत” म्हणून गौरविण्यात येणार आहे

"एक Reel... मातीसाठी !, एक Reel... पाण्यासाठी !, एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी !" हा रिल्स प्रचारासाठी मुख्य संदेश आहे.

0000

 वृत्त क्रमांक

महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर

२१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन

नांदेड, दि.१६ ऑगस्ट:- शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे असून मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची थीम सेव सॉईल, सेव वॉटर, सीक्यूर टूमारो ( Save Soil, Save Water, Secure Tomorrow) अशी असून पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी कमाल ३ किलोमीटर (महा वॉकेथॉन) चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे.  शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात  १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान "जलसंधारण सप्ताह" आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान "जलसंधारण अभियान" आयोजित करण्यात येत आहे. तर २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे आयोजन करुन जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 

राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी हे असणार आहेत. या कार्यक्रमासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सर्व मंत्री, सर्व राज्यमंत्री, राज्यसभा/ लोकसभा/ विधानपरिषद/ विधानसभा सदस्य, सर्व जिल्हापरिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष, सर्व मा. महापौर / उपमहापौर, सर्व नगराध्यक्ष/उपनगराध्यक्ष, सर्व जिल्हापरिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत सदस्य, सर्व महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, सर्व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठीत व्यक्ती / डॉक्टर / कलाकार/ उद्योजक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब सदस्य, लायन्स क्लब सदस्य, रनिंग क्लब सदस्य, सायकलिंग क्लब सदस्य, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार कंपन्या, विविध क्रीडा संघटना, गुड मॉर्निंग ग्रुप्स, विविध व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था, महिला, राज्याचे नागरिक यांना सहभागी करण्यात येणार आहे.

महा वॉकेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तर प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000




Saturday, August 15, 2026

वृत्त क्रमांक

युवा शक्तीचा संकल्प: स्वच्छ आणि सुंदर भारत

माय भारत युवा केंद्र आणि मित्र संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता पंधरवडा’ यशस्वीरीत्या संपन्न

नांदेड दि. 15 ऑगस्ट :- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या माय भारत युवा केंद्र यांच्या पुढाकाराने व कै. सोपानराव तदलापूरकर क्रीडा मंडळ आणि श्री रामचंद्र युवा मंडळ, नांदेड यांच्या सहकार्याने १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘स्वच्छता पंधरवडा’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

देशभरात 'स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, समृद्ध भारत' या उद्देशाला समोर ठेवून घेतलेल्या या पंधरवडयात विविध स्पर्धा आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 राबविण्यात आलेले प्रमुख उपक्रम

स्वच्छता शपथ: कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्व स्वयंसेवकांनी व नागरिकांसोबत स्वच्छतेची प्रतिज्ञा व शपथ घेतली.

स्वच्छता पोस्टर प्रदर्शन: युवकांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक आणि संदेशपर पोस्टर्सचे खास प्रदर्शन भरवण्यात आले.

स्वच्छता रॅली : गावात जनजागृती निर्माण करण्यासाठी भव्य स्वच्छता रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

घरोघर जाऊन स्वच्छता संदेश: स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन नागरिकांना ओला-सुका कचरा व आरोग्याबाबत मार्गदर्शन करत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता : गावातील विविध सार्वजनिक स्थळे, परिसर व चौक श्रमदानातून पूर्णपणे स्वच्छ करण्यात आले.

मान्यवरांचे मार्गदर्शन व सहभाग

हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा मंडळाच्या अध्यक्षा साधना गायकवाड, सचिव नंदनी तदलापूरकर, तसेच सोहन तदलापूरकर, ऋषिकेश तदलापूरकर आणि यश तदलापूरकर यांनी विशेष व अथक परिश्रम घेतले. या उपक्रमाला संस्थाध्यक्ष कैलाश गायकवाड, माहेश्वरी गायकवाड आणि सांस्कृतिक कार्यप्रमुख शिवशंकर मूळे यांचे मार्गदर्शन लाभले. 

आयोजक: माय भारत युवा केंद्र, नांदेड. सहकार्य: कै. सोपानराव तदलापूरकर क्रीडा मंडळ आणि श्री रामचंद्र युवा मंडळ.

00000




 वृत्त क्रमांक

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे वितरण

नांदेड, दि. १५ ऑगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ची नांदेड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील जवळपास १३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, सुमारे १०६ कोटी २५ लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या योजनेच्या जिल्ह्यातील ७ लाभार्थी शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्ती (बेबाक) प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी तसेच आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन केले. योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्येही कर्जमुक्ती प्रमाणपत्र वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमास खासदार डॉ. अजित गोपछडे, महापौर श्रीमती कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक सीमा देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रियंका कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000





वृत्त क्रमांक

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते भूमी अभिलेख विभागाला 45 लॅपटॉपचे वितरण

नांदेड, दि. १५ ऑगस्ट : भूमी अभिलेख विभागाचे कामकाज अधिक हायटेक, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला 45 अद्ययावत लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते हे लॅपटॉप संबंधित विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ‘गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थापन’ या योजनेतून हे आधुनिक लॅपटॉप खरेदी करण्यात आले आहेत. यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी नांदेड जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, महापौर श्रीमती कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक सीमा देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रियंका कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर , पदाधिकारी, कर्मचारी आदीची उपस्थिती होती.  

डिजिटल सेवांना मिळणार गती-पालकमंत्री

भूमी अभिलेख विभागाचा थेट संबंध शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाशी येतो. जमिनीची मोजणी, सिमांकन, डिजिटल सातबारा, मिळकत पत्रिका (Property Cards), ई-फेरफार आदी महत्त्वाच्या सेवा आता मोठ्या प्रमाणात ऑनलाइन आणि तंत्रज्ञानाधारित झाल्या आहेत. अद्ययावत संगणकीय उपकरणांमुळे या कामांना आणखी गती मिळणार आहे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. 

नवीन लॅपटॉपच्या उपलब्धतेमुळे मोजणी प्रकरणांचा वेळेत निपटारा, ऑनलाइन फेरफार व मिळकत पत्रिकांच्या नोंदींमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यास तसेच प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यास मदत होणार आहे. परिणामी नागरिकांना जलद, सुलभ आणि विनाविलंब डिजिटल सेवा उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे.

भूमी अभिलेख विभागातील कामकाजाचे आधुनिकीकरण करून नागरिकांना अधिकाधिक सेवा घरबसल्या आणि वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून शासनाचे आभार

अद्ययावत संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, नांदेड येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री अतुल सावे तसेच जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. नवीन लॅपटॉपमुळे क्षेत्रीय कामकाजासह प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होणार असल्याच्या भावना यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

00000




वृत्त क्रमांक

पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची बैठक संपन्न 

नांदेड दि. 15 ऑगस्ट :- जिल्ह्यातील आरोग्यविषयक उपक्रम अधिक लोकाभिमुख, गतिमान व बळकट करण्यासाठी तसेच आरोग्य सेवांच्या दर्जात गुणात्मक व परिणामकारक सुधारणा घडवून आणण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. 

महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय १४ मे २०२६ च्या अनुषंगाने जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या "जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती"च्या या बैठकीस खासदार डॉ. अजित गोपछडे, महापौर श्रीमती कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड,  जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर तसेच इतर मान्यवर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी कर्मचारी उपस्थिती होते. 

या बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्य विषयक कार्यक्रमांचा आढावा आणि माहिती सादर करण्यात आली. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक मानके (NQAS) कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवांचे व आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण करणे, आरोग्य संस्थांद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावणे आणि नागरिकांना सुलभरीतीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, माता बाल संगोपन कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) पोषण पुनर्वसन केंद्र (NRC), राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम (NCD), महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेतर्गंत टोल फ्री क्रमांक १०८ व १०२ रुग्णवाहिका सेवा, तसेच सर्वात महत्वाचे महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या माझ गावं-आरोग्य संपन्न गाव इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. 

या बैठकीत जिल्ह्यातील माता व बाल आरोग्य विषयक सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी करणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि राज्य शासनाचे आरोग्य धोरण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करणे, रुग्ण व नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे गुणात्मक व तात्काळ निराकरण करणे, विविध आरोग्य संस्था व विभागांतर्गत योग्य समन्वय प्रस्थापित करणे आणि आरोग्य उपक्रमांमध्ये लोकसहभाग अधिक व्यापक करणे, जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचा गुणांकन दर्जा (Quality Standards) सुधारण्यावर विशेष भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी दिल्या. 

जिल्ह्यात माता व बाल आरोग्य विषयक सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी दिल्या.  

या बैठकीच्या समितीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी आरोग्य विषयक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

00000






 वृत्त क्रमांक

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आधार सेवा केंद्राचे उद्घाटन

नागरिकांना मिळणार एकाच ठिकाणी सुविधा

आधार नोंदणी, दुरुस्ती व अद्ययावतीकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध 

नांदेड, दि. 15 ऑगस्ट :- नांदेड शहरातील नागरिकांना आधारशी संबंधित विविध सेवा सुलभ आणि जलदगतीने एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत आधार सेवा केंद्र महावीर चौक, मल्टीपर्पज हायस्कूलजवळ, वजीराबाद येथे सुरू करण्यात आले आहे. या आधार सेवा केंद्राचे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, यूआयडीएआय मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक कुलदीप गहलोत, ऑपरेशनल मॅनेजर आधार सेवा केंद्राचे गंगाधर गिरी आदीची उपस्थिती होती.

नागरिकांना आधारशी संबंधित कामांसाठी विविध ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आधार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. महावीर चौक, मल्टीपर्पज हायस्कूल, बंदा घाट रोड, वजीराबाद येथे बीएलएस इंटरनॅशनल लि. यांच्या माध्यमातून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या केंद्रामध्ये आधार नोंदणी, बंद पडलेले आधार पुन्हा कार्यान्वित करणे, बोटांच्या ठशांशी संबंधित समस्या सोडविणे तसेच नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आदी तपशीलांमध्ये दुरुस्ती व अद्ययावतीकरणाच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. नागरिकांना आधारशी संबंधित विविध सेवांबाबत आवश्यक मार्गदर्शनही या केंद्रामार्फत करण्यात येणार आहे.

आधार हे विविध शासकीय योजना, बँकिंग, शैक्षणिक प्रक्रिया तसेच इतर नागरिक सेवांसाठी महत्त्वाचे ओळखपत्र आहे. त्यामुळे नागरिकांनी आधारमधील आपली माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. नवीन आधार सेवा केंद्रामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचणार असून, आधारशी संबंधित आवश्यक सेवा आणि मार्गदर्शन या ठिकाणी उपलब्ध होणार असून यांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. 

सदर आधार सेवा केंद्रामध्ये पाच ते पंधरा वयोगटातील सर्व मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करणे अनिर्वाय असून ही सेवा 30 सप्टेंबर 2026 पर्यंत विनामूल्य आहे. तसेच सदर आधारसेवा केंद्रामध्ये ज्या व्यक्तींचे जन्मतारखेत किंवा नावामध्ये बदल करण्याची मुदत संपली आहे. तसेच ज्यांचे आधार कार्ड तात्पुरते निलंबित किंवा बंद पडले यासाठी पूर्वी मुंबईच्या कार्यालयात जावे लागत होती सर्व सेवा आता नांदेड येथील या आधार केंद्रात उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निरज धामणगावे यांनी सहकार्य केले.  

00000








वृत्त क्रमांक   पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व उद्योजक मेळावा   नांदेड दि. 17 ऑगस्ट :-   नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार...