Saturday, July 4, 2026

वृत्त क्रमांक

नांदेड जिल्हा रेशीम हब बनविणार -  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

रेशीम शेतकरी मेळावा व पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न

नांदेड, दि. ४ जुलै : जिल्ह्यात रेशीम शेतीला मोठी चालना देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून, येत्या काळात नांदेड जिल्ह्याला ‘रेशीम हब’ म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजित रेशीम शेतकरी मेळावा व पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे, नायब तहसीलदार सुनंदा कराळे, कपिल सोनटक्के, आरसेटीचे आशिष राऊत, बीआरएलएफचे दिनेश खडसे, ग्राम महसूल अधिकारी बालाजी केंद्रे, मनीषा टुले, सहाय्यक कृषी अधिकारी मनोहर वडवळे, सहायक कृषी अधिकारी अमोल आजने, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शेतकरी रत्नकर ढगे, तसेच जिल्ह्यातील  प्रगतशील रेशीम शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले की, जिल्ह्यात अनेक प्रगतशील शेतकरी प्रेरणादायी पद्धतीने रेशीम शेती करत असून, एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नव्याने रेशीम शेतीसाठी नोंदणी केली आहे. जिल्ह्याला रेशीम हब बनविण्याच्या दिशेने हा  मेळावा म्हणजे सुरुवात ठरणार आहे.

पारंपरिक पिकांच्या तुलनेत रेशीम शेती अधिक फायदेशीर व खात्रीशीर उत्पन्न देणारी असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून अभ्यासपूर्ण रेशीम शेती करण्याचे आवाहन केले. रेशीम शेतीतील अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय आणि जिल्हा प्रशासन कायम तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या डेमो प्रकल्प उभारणे, चॉकी व नर्सरी विकासाला चालना देणे, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि गावभेटीदरम्यान रेशीम उत्पादक शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणे आणि रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढील काळात माझा मुक्काम रेशीम शेतकरी यांच्या घरी करणे अशा विविध उपक्रमांवर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

सध्या पेरणीचे दिवस असून पाऊस सुरू असून सुद्धा जिल्ह्यातील 400 ते 450 शेतकरी उपस्थित असल्या बद्दल जिल्हाधिकारी यांनी सर्वांचे आभार मानले.

पूर्वी रेशीम उत्पादकांसाठी बाजारपेठेची मर्यादा होती; मात्र आता बीड आणि जालना येथे बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमात किनवट येथील 10 शेतकऱ्यांना त्यांच्या  हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पूर्वसंमती प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमात प्रगतशील रेशीम शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. या कार्यक्रमात जिल्ह्यात प्रथम पुरस्कार दाजीराव शिंदे जोमेगाव तालुका लोहा यांना देण्यात आला असून त्यांनी एका वर्षात 7लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न घेतले आहे त्या सोबत जिल्ह्यातील उत्कृष्ट अशा 24 शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी केले असून पुढील काळात रेशीम विभाग गावागावात जाऊन रेशीम शेतकरी वाढविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन गोडबोले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन नरोजी कोरके यांनी केले.

०००००














No comments:

Post a Comment

निमंत्रण पत्रिका भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प...