Saturday, July 4, 2026

वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यात मृद व जलसंधारण विभागाच्या 1 लाख बांबू लागवड मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

नांदेड दि.४ जुलै :- सन 2026 च्या पावसाळी हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी 37 लाख 50 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या व्यापक अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन, जलसंधारण तसेच जिल्ह्यातील हरित क्षेत्रात भरीव वाढ करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी मृद व जलसंधारण विभागाला 1 लाख बांबू लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट दिले आहे.

या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी मृद व जलसंधारण विभागामार्फत पूर्ण झालेल्या नाला खोलीकरण व इतर जलसंधारण कामांच्या परिसरात बांबू लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, या मोहिमेचा शुभारंभ आज, 04 जुलै 2026 रोजी मौजे सालेगाव, ता. धर्माबाद, जि. नांदेड येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या शुभहस्ते बांबूच्या रोपांची लागवड करून करण्यात आला.

यावेळी उपविभागीय अधिकारी राऊत, तहसीलदार श्रीमती स्वामी, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. कांबळे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री. मोरे, IGSSS संस्थेचे अधिकारी, मौजे सालेगावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणारी ही मोहीम जलसंधारणाच्या कामांना पर्यावरणपूरक बळ देण्याबरोबरच मृदा संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, कार्बन शोषण आणि ग्रामीण भागातील हरित क्षेत्राच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नाला खोलीकरण करण्यात आलेल्या कामांच्या दोन्ही काठांवर बांबू लागवड करण्यात येणार असून, बांबूच्या मजबूत व विस्तृत मुळव्यवस्थेमुळे मातीची धूप कमी होण्यास, नाल्याच्या काठांची स्थिरता राखण्यास तसेच जलसंधारणाच्या कामांचे दीर्घकालीन संरक्षण करण्यास मदत होणार आहे. यामुळे जलसंधारणाच्या संरचनांची परिणामकारकता वाढण्यासह परिसराच्या पर्यावरणीय समतोलालाही चालना मिळणार आहे.

आगामी काळात जिल्ह्यात मृद व जलसंधारण विभागामार्फत पूर्ण झालेल्या विविध नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध तसेच इतर जलसंधारण कामांच्या परिसरात NGO मार्फत मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करण्यात येणार असून, 1 लाख बांबू लागवडीचे उद्दिष्ट निश्चित कालावधीत पूर्ण करण्याचा विभागाचा मानस आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. तसेच वृक्षलागवडीबरोबरच त्यांचे संवर्धन आणि संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

०००००





No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ : योजनेचा लाभ मिळेपर्यंत पीककर्जावर व्याज न आकारण्याचे सहकार विभागाचे आदेश #शेतकरी...