Wednesday, February 4, 2026

वृत्त क्र. 166 

गटई कामगारांसाठी अनुदानावर पत्र्याचे स्टॉल योजनेची व्याप्ती 

अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील च्छुक लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा 

नांदेड, दि. 4 फेब्रुवारी : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सन 2025-26 करीता सुधारित मागणी नोंदविण्याकरीता गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेची व्याप्ती वाढवून निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. ग्रामपंचायत नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता अर्ज मागविण्यात येत असून सदरचा ऑफलॉईन अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड या कार्यालयात उपलब्ध आहे. 

अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) च्छुक लाभार्थ्यांनी सदरहू योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील नियम व अटी शर्तीची पुर्तता करुन अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज परीपुर्ण भरुन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांचे कार्यालयास सादर करण्यात यावा. राज्यातील गटई कामगारांना १०० टक्के अनुदान या तत्त्वावर पत्र्याचे स्टॉलवर कमाल 5 हजार रुपये इतके डीबीटीद्वारे अनुदान देण्यात येते ही अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील सुशिक्षीत बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे. 

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागातील 80 हजार व शहरी भागातील 1 लाखापेक्षा अधिक नसावे, अथवा अर्जदार दारीद्रय रेषेखालील असावा. अर्जदराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड किंवा महानगरपालिका, यांनी त्यास भाड्याने, कराराने खरेदीने, अगर मोफत, परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी. किंवा ती जागा त्यांच्या स्वमालकीची असावी. सदर योजनेची गटईस्टॉलसाठी जागा उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी गटई कामगाराची राहील. एकदा गटई स्टॉलची वाटप झाल्यानंतर सदर स्टॉलची विक्री करता येणार नाही. तसेच ते भाडे तत्त्वावर देता येणार नाही. तसेच स्टॉलचे हस्तांतरण करता येणार नाही. याबाबत अनियमितता झाल्यास सदर स्टॉल परत घेण्यात येईल. ज्या कारणासाठी गटई स्टॉल देण्यात आलेला आहे. त्या शिवाय इतर कोणत्याही कारणांसाठी वापरता येणार नाही. असे निदर्शनास आल्यास स्टॉल रद्द करुन अनुदान वसुल करण्यात येईल. एकदा लाभार्थ्यांना स्टॉलचा लाभ दिल्यानंतर स्टॉलची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील. स्टॉलचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीस देता येईल. 

अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) घटकांतील सुशिक्षीत बेरोजगार, इच्छुक लाभार्थ्यांकडुन सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता अर्ज मागविण्यात येत असुन सदरचा ऑफलाईन अर्ज, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. सुशिक्षीत बेरोजगार यांनी सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

0000


वृत्त क्र. 165 

ई-आर 1 त्रैमासिक विवरणपत्र ऑनलाईन भरण्याचे आवाहन   

नांदेड, दि. 4 फेब्रुवारी : जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्याकडे आपल्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या माहितीबाबतचे माहे डिसेंबर २०२५ अखेरचे ई-आर- १ (ER-1) त्रैमासिक विवरणपत्र जानेवारी/फेब्रुवारी 2026 च्या मुदतीत या कार्यालयाचे संकेतस्थळ www.mahaswayam.gov.in वर भरावयाची मुदत आहे. 

डिसेंबर- २०२५ अखेरचे ईआर १ (ER 9) त्रैमासिक विवरणपत्र भरल्याची प्रत माहे जानेवारी २०२६ च्या वेतन देयकसोबत जोडल्याशिवाय वेतन देयके स्विकारली जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी. 

जिल्ह्यातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना या कार्यालया मार्फत युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपले ईमेल आयडी, फोन नंबर, पॅन नंबर, टॅन नंबर नोंदवून आपली प्रोफाईल अद्यावत करावी. या बाबत काही अडचणी आल्यास या कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 02462-251674 वर संपर्क करावे, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नांदेड यांनी केले आहे.

000000

 वृत्त क्र. 164

शुक्रवारी ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन’ कार्यशाळा

नांदेड, दि. ४ फेब्रुवारी : राज्यात निर्यात क्षेत्रास चालना देणे, रोजगार निर्मितीला गती देणे तसेच निर्यात वाढीसाठी प्रत्येक जिल्ह्याला उत्तरदायी बनविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या ‘जिल्हा हे निर्यात केंद्र’ या उपक्रमास प्रोत्साहन देण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्य शासनामार्फत ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६’ अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत जिल्ह्यातील निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक यांच्यासाठी उद्योगवाढीच्या संधी, उत्पादनांची निर्यात क्षमता, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, तसेच डीजीएफटी (DGFT), निर्यात नोंदणी, धोरणे व सुलभ प्रक्रिया यासंदर्भात तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले आहेत.

या कार्यशाळेमुळे उद्योजकांना निर्यात क्षेत्रातील नव्या संधींची माहिती मिळून जिल्ह्यातील उद्योगांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळविण्यास मदत होणार आहे.

तरी नांदेड जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योजक, निर्यातक्षम उद्योगांचे प्रतिनिधी, बँक अधिकारी तसेच औद्योगिक विकासाशी संबंधित विविध शासकीय विभागांचे प्रमुख यांनी या एकदिवसीय कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शन सत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

०००००

 वृत्त क्र. 163

कर्मवीर दादासाहेब गायकवाड  सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत

शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतीविक्रेत्यांनी संपर्क करण्याचे आवाहन 

नांदेड दि.4 फेब्रुवारी :-  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील भूमिहीन, दारिद्ररेषेखालील शेतमजूर कुटूंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती शेतजमीन उपलब्ध करुन देण्याची योजना शासनाने सुरु केली आहे.

या योजनेअंतर्गत शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरडवाहू शेत जमीनीसाठी प्रति एकर 5 लाख रुपये मर्यादेच्या आत तसेच बागायती शेतजमीनीसाठी प्रति एकर 8 लाख रुपये मर्यादेच्या आत जिल्हास्तरीय समितीमार्फत वाटाघाटी करुन मोबदला अदा करण्यात येतो. जिल्ह्यात शेतजमीन विक्री करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकरी व व्यक्तीनी आवश्यक कागदपत्रांसह शेतजमीन विक्रीचे प्रस्ताव सादर करावेत.

आवश्यक कागदपत्रे –विहित नमुन्यातील अर्ज, सातबारा उतारा, नमुना आठ-अ, शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर नोटरी सह विहित नमुन्यातील शपथपत्र, भूमि अभिलेख कार्यालयाचा पोटहिस्सा मोजणी अहवाल, तलाठी यांचे निर्विवाद प्रमाणपत्र, मुल्यांकन प्रमाणपत्र, बँकेचे बेबाकी प्रमाणपत्र, कुटुंबातील सदस्यांचे नाहरकत प्रमाणपत्र, मागील 13 वर्षाचे फेरफार संबंधी पुरावे (सर्च रिपोर्ट), इतर आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना, शपथपत्रांचे नमुने व अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.  

00000

Tuesday, February 3, 2026

  वृत्त क्र. 162

५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

नांदेड, दि. ३ जानेवारी :- राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा, या उद्देशाने शासनाने अत्याधुनिक ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार जुनी कागदपत्रांवर आधारित पडताळणी प्रक्रिया बंद करून ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अनुदानित एकविध क्रीडा संघटना, पदाधिकारी तसेच संबंधित खेळाडूंनी अनिवार्यपणे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

सदर शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी व या प्रणालीचा लाभ तळागाळातील खेळाडूंपर्यंत पोहोचावा, यासाठी क्रीडा संचालनालयामार्फत पुढीलप्रमाणे कार्यवाही तातडीने राबविण्यात येत आहे.

क्रीडा संघटनांसाठी अनिवार्य कार्यवाही :

आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा अधिनस्त असलेल्या तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या सर्व अधिकृत क्रीडा संघटनांना शासन निर्णयातील तरतुदींची तात्काळ माहिती देणे बंधनकारक आहे.

स्पर्धा संपल्यानंतर ७ दिवसांच्या आत अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी व गुणपत्रिका विहित नमुन्यात .xlsx फाईल स्वरूपात ‘क्रीडा ई-प्रमाण’ पोर्टल (https://sports.maharashtra.gov.in/) वर अपलोड करणे आवश्यक आहे.

सदर माहिती संबंधित अधिकृत पदाधिकाऱ्यांनी डिजिटल स्वाक्षरी (DSC) करून प्रमाणित करणे बंधनकारक राहील.

दंडात्मक तरतूद :

निर्धारित ७ दिवसांच्या मुदतीत माहिती ब्लॉकचेनवर अपलोड न करणाऱ्या संघटनांचा समावेश स्मार्ट कॉन्ट्रॅक्टद्वारे स्वयंचलितपणे ‘डिफॉल्टर’ यादीत करण्यात येईल.

अशा परिस्थितीत खेळाडूचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित क्रीडा संघटनेची राहील, याची स्पष्ट नोंद घ्यावी.

खेळाडूंच्या नोंदणीबाबत :

जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना नवीन प्रणालीची माहिती देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

खेळाडूंनी आधार-संलग्न आयडीद्वारे ‘क्रीडा ई-प्रमाण’ पोर्टलवर लॉग-इन करून नोंदणी करणे अनिवार्य आहे.

खेळाडूंनी सादर केलेली माहिती व क्रीडा संघटनांनी ब्लॉकचेनवर अपलोड केलेला रेकॉर्ड हॅश (Record Hash) यांची प्रणालीद्वारे स्वयंचलित पडताळणी होणार असल्याने, यापुढे खेळाडूंना प्रत्यक्ष विभागीय कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही.

000000000

Monday, February 2, 2026

 वृत्त क्र. 161

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन 

नांदेड दि. 2 फेब्रुवारी :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी फेब्रुवारी-2026 महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 160

माजी सैनिकांसाठी करार पद्धतीने रेल्वे भरती

नांदेड दि. 2 फेब्रुवारी :- साऊथ सेन्ट्रल रेल्वे भरती नांदेड डिव्हिजन मार्फत POINTSMAN पदावर करार पद्धतीने शीघ्र रेल्वे भरती घेण्यात येणार आहे. इच्छुक माजी सैनिकांनी मुळ कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे प्रत्यक्ष येऊन आपला अर्ज सादर करावा. शुक्रवार 6 फेब्रुवारी 2026 अगोदर कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. पेमेंट बेसिक 18 हजार रुपये अधिक डीए, टीए, एचआरए दिले जाईल. 

इच्छूक माजी सैनिकांनी zswonanded@gmail.com या मेलवर नाव कळवावे व अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावा. माजी सैनिकाने कमीत कमी 15 वर्ष सैन्यसेवा केलेली असावी. शिक्षण किमान 10 वी पास किंवा आयटीआय, एनसीव्हीटी असावी. वय 55 वर्षा पेक्षा कमी असावे. निवड झाल्यानंतर आरोग्य चाचणी घेण्यात येईल, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

0000

वृत्त क्रमांक   पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व उद्योजक मेळावा   नांदेड दि. 17 ऑगस्ट :-   नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार...