वृत्त क्रमांक
पावसाळ्यातील आजार, काळजी आणि उपाययोजना : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांचे आवाहन
नांदेड दि. 2 जुलै : पावसाळा सुरू झाला की निसर्ग बहरतो, मात्र याच काळात दूषित पाणी आणि डासांमुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी केले आहे. आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात सर्व प्रकारच्या उपाययोजना राबविल्या जात असून, नागरिकांच्या सतर्कतेमुळे आजारांवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पावसाळ्यात उद्भवणारे प्रमुख आजार
पावसाळ्याच्या दिवसांत प्रामुख्याने खालील आजार पसरण्याचा धोका असतो:
जलजन्य आजार : दूषित पाण्यामुळे डायरिया (अतिसार), गॅस्ट्रो, कावीळ (हिपॅटायटीस ए आणि ई), आणि विषमज्वर (टायफॉइड).
कीटकजन्य आजार : साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती झाल्यामुळे मलेरिया (हिवताप), डेंग्यू आणि चिकनगुनिया.
इतर आजार : लेप्टोस्पायरोसिस (दूषित पाणी व उंदरांच्या मूत्राद्वारे पसरणारा आजार) आणि फ्लू (सर्दी, खोकला, ताप).
प्रतिबंधात्मक उपाययोजना (काय काळजी घ्यावी?)
आरोग्य उत्तम राहण्यासाठी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी खालील त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
पाण्याचे शुद्धीकरण आणि स्वच्छता :
पाणी नेहमी उकळून आणि गाळून प्यावे. पिण्याच्या पाण्याच्या साठवणुकीची भांडी नियमित स्वच्छ करावीत आणि ती झाकून ठेवावीत. विहिरी व पाण्याच्या टाक्यांमध्ये नियमितपणे टी.सी.एल. (ब्लिचिंग पावडर) चा वापर करावा.
डास उत्पत्ती केंद्रांचे निर्मूलन (कोरडा दिवस) :
घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नका. टायर, कुलर, नारळाच्या करवंट्या, तुटलेली भांडी त्वरित नष्ट करा. आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस' (Dry Day) म्हणून पाळावा, ज्यामध्ये घरातील पाणी साठवण्याची भांडी पूर्णपणे रिकामी करून पुसून वाळवावीत. झोपताना डासदाणीचा वापर करावा.
वैयक्तिक स्वच्छता व अन्न सुरक्षा:
जेवणापूर्वी आणि शौचावरून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शिळे, उघड्यावरील अन्नपदार्थ किंवा कापलेली फळे खाणे टाळावे. नेहमी गरम आणि ताजे अन्न खावे. पावसाच्या साचलेल्या पाण्यात चालणे टाळावे. अपरिहार्य कारणास्तव जावे लागल्यास पाय साबणाने स्वच्छ धुवावेत.
जिल्हा आरोग्य विभागाची सज्जता
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधसाठा, ओ.आर.एस. (ORS) पाकिटे, पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गावोगावी सर्वेक्षणाचे कामही सुरू करण्यात आले आहे.
महत्त्वाचे आवाहन
"पावसाळ्यात कोणताही ताप, उलट्या किंवा जुलाब झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. घरगुती उपचार किंवा मेडिकलमधून स्वतः औषधे घेण्याऐवजी, त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत तपासणी व उपचार करून घ्यावेत." - डॉ. संतोष सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड
00000

No comments:
Post a Comment