Monday, March 3, 2025

दि. 1 मार्च 2025

वृत्त क्रमांक 247

ग्रंथ जीवनावर प्रभाव पाडणारे मोलाचे साधन -  माजी खासदार डॉ व्यंकटेश काब्दे 

 दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवाचा समारोप 

नांदेड दि.01 मार्च2025 -ग्रंथ वाचनामुळे मनुष्याचा सर्वा‍गिण विकास होतो.  जीवनावर प्रभाव पाडणारे उत्कृष्ट साधन म्हणजे ग्रंथ आहेत. यासाठी  सर्वांनी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी केले. 

ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने बहुउद्देशिय सांस्कृतिक संकुल, श्री.गुरुगोबिंदसिंगजी स्टेडीयम परिसर, नांदेड येथे दोन दिवसीय नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप डॉ. काब्दे यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.

या समारोपास माजी आमदार तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ॲड गंगाधर पटने, निर्मल प्रकाशनचे निर्मलकुमार सुर्यवंशी, ज्ञानेश्वर वडगांवकर, निवृत्त  जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ.काब्दे पुढे म्हणाले की, आपणास माता पिता जन्म देतात जीवन घडवितात ते शिक्षक व ग्रंथ यांनीच माझे जीवन घडवीले आहे.बालपणापासूनच इयत्ता तिसरी चौथीत असल्यापासून मी छोटे वाचनालय चालवायचो. मान्यवरांच्या लेखांचे टिपण काढून ते संकलित करायचो. साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांचे  मार्गदर्शन घ्यायचो. वाचक चळवळ ही मोलाची आहे पुस्तकापेक्षा मोबाईलचे आकर्षण सध्या जास्त्‍ आहे. पुस्तकामध्ये सर्व काही अर्थपूर्ण असते. म्हणून ग्रंथालय चळवळ महत्वाची आहे. वाचनालयात युवकांना वाचनाची आवड वाढवा.मोबाईलसुध्दा हितकारक असून मोजके जे पाहिजे ते मुलांना बघु द्या असे त्यांनी सांगितले.  

यावेळी माजी आ.ॲड.गंगाधर पटने म्हणाले की,व्यस्त जीवनशैली असतानाही सर्वजण ग्रंथालय चळवळ समृध्द करणारेंचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी एक कविता सादर केली. 

निर्मलकुमार सुर्यवंशी म्हणाले आपण सर्वांनी ज्ञानदानाचे व्रत घेतले आहे.ग्रंथाचा प्रचार प्रसार करा वाचनाची‍ गोडी लावा.ग्रंथालय चळवळीची ज्योत विझू देवू नका. आपण  या चळवळीचे खरे शिल्पकार आहोत. ग्रंथालय हे ज्ञानाचे व महापुरुष घडविणारे मंदिर आहे . ग्रंथालय चळवळीची ही पालखी आपल्या खाद्यांवर आहे यासाठी सर्वांनी वाचनसंस्कृती समृध्द करण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ.काब्दे यांच्या हस्ते ग्रंथालय चळवळीस मोलाचे सहकार्य करणारे उत्कृष्ट ग्रंथपाल,तालुका ग्रंथालयाचे प्रतिनिधी कर्मचारी माधवराव जाधव,गोविंद  फाजगे,भगवान बनसोड,शिल्पा पाठक,कैलाशचंद्र गायकवाड, संजय पाटील,अजय  वट्टमवार, उत्तम घोरपडे, कुमार देशमुख ,चंपतराव डाकोरे आदींचा यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. 

प्रारंभी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सुर्यवंशी,कैलाशचंद्र गायकवाड,अजय वट्टमवार,संजय पाटील आदीनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन बालाजी नार्लेवाड यांनी केले. या समारंभास जिल्हयातील वाचनालयातील पदाधिकारी व ग्रंथपाल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सुर्यवंशी यांनी केले.

0000





दि. 1 मार्च 2025

 वृत्त क्रमांक 246

घराघरात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेचा प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे - डॉ.पृथ्वीराज तौर

नांदेड, दि. १ मार्च:- उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय कार्यालय नांदेड आयोजित नांदेड ग्रंथोत्सव 2024 दुसऱ्या दिवशी परिसंवाद या कार्यक्रमात" मराठी भाषा संवर्धन आणि घराघरातील प्रयत्न" या विषयावर परिसंवाद संपन्न झाला.

मराठी भाषा संवर्धन आणि घराघरातील प्रयत्न या विषयावर माननीय डॉ. पृथ्वीराज तौर (स्वा.रा.ति.म.विद्यापीठ नांदेड,)हे या विषयावर परिसंवाद या कार्यक्रमात बोलत असताना घराघरात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेचा प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे सध्याच्या काळात मराठी भाषा गुदमरते आहे ही दुर्दैवाची बाब असून आपण आपली बोलीभाषा बोलली पाहिजे. 

कोणतीही भाषा सामान्य माणसावर तग धरून जिवंत राहते. चांगली मराठी भाषा बोलण्यासाठी एम.ए. मराठी होण्याची गरज नाही सामान्य माणूसही चांगली भाषा बोलू शकतो . आपला मराठी भाषेवर विश्वास राहिला पाहिजे पण आज दुर्दैवाची बाब ही आहे की, आपण आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकवीत आहोत त्यामुळे आम्ही आम्हाला फसवत आहोत.

 प्रख्यात जयंत नारळीकर,अच्युत गोडबोले असे अनेक विद्वान माणसे मराठी भाषा हे ज्ञान भाषा व्हावी म्हणुन त्यांनी ऑटोकाठ प्रयत्न करून आपले सर्व साहित्य मराठीतून लिहिले सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून एखादी भाषा ज्ञान भाषा बनते तेव्हा सर्वांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य केले पाहिजे. सर्वांनी या दृष्टीने प्रयत्न केला तो दिन सोनियाचा असेल असे विचार डॉ. पृथ्वीराज तौर यांनी प्रकट केले.

 या परिसंवादात शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमतीसुचिता खल्लाळ यांनी सांगितले की, आज मराठी भाषेची अस्मिता कमी होत आहे काय. याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मराठी भाषेची प्रतिष्ठा व अस्मिता कमी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. डॉ. प्रा. शारदा कदम 

 बहिर्जी महाविद्यालय वसमत यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी अनेक साधुसंतांनी व महापुरुषांनी मोलाचे योगदान दिले आहे. घरात दोन तास मोबाईल शिवाय, एक तास वाचन करणे गरजेचे आहे. वाचन संस्कृती वाढण्यासाठी वाचकांना बळ द्या त्याचे कौतुक करा व पुरस्कार देऊन गौरव करा. वाचनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. हजारो वर्षाची परंपरा आहे ती भाषा उन्नत कशी राहील याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महंत  प्रभाकर बाबा कपाटे नांदेड यांनी तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल  सूर्यवंशी यांनी सर्वांचे आभार मानले मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास चंद्र गायकवाड,अजय वट्टमवार, संजय पाटील, गोविंद फाजगे, संतोष इंगळे पाटील, शिवाजी हंबीरे, माधवराव जाधव, निर्मल कुमार सूर्यवंशी, उत्तम घोरपडे इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

०००००





दि. 1 मार्च 2025

विशेष लेख 

 नांदेड ; न्यू स्पोर्ट हब... 

नांदेड येथे 21, 22 व 23 फेब्रुवारी २०२५ ला झालेल्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेने नांदेडच्या क्रीडा जगताला नवी उभारी दिली आहे. क्रीडा क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे.या स्पर्धेने क्रीडाप्रेमींच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवला. उत्कृष्ट आयोजन, उच्च दर्जाची व्यवस्था आणि स्पर्धामधील चुरस यामुळे ही स्पर्धा एक व्यावसायिक आयोजन ठरली. दुसरीकडे यानिमित्ताने नांदेडने स्वतःला एक प्रमुख क्रीडा हब म्हणून सिद्ध केले आहे.

 व्यावसायिक आयोजन 

स्पर्धेचे आयोजन हे केवळ व्यावसायिक पातळीवरच नव्हे, तर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले.यामध्ये स्पर्धकांच्या सोयीसाठी प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला. स्पर्धेचे मैदान, पंचाची नियुक्ती, तांत्रिक सुविधा, खेळ साहित्य, मैदाने यांचे आधुनिक व्यवस्था,आणि स्पर्धेच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन यामुळे हा सोहळा अधिक भव्यदिव्य तर  ठरलाच. पण गुणवत्तेच्या पातळीवर व्यावसायिक आयोजनही ठरले.या स्पर्धेचे नियोजन देशातील मोठ्या क्रीडा स्पर्धांना लाजवेल असे होते. महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी देखील यावेळी क्रीडा स्पर्धा असलेली ठिकाणे आणि ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी स्वच्छता व मैदान तयार करण्यासाठी केलेली मदत लक्षवेधी ठरली. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून केलेली योजना स्पर्धेच्या यशाचा मुख्य आधार होती.

 निवास आणि भोजन –सर्वोत्तम 

असे म्हणतात आनंद आणि समाधानाचा मार्ग पोटातून जातो. त्यामुळेच सहभागी खेळाडूंना आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या निवास आणि भोजन व्यवस्थेने आयोजकांनी सर्वांचे मन जिंकले. खेळाडूंसाठी अत्यंत स्वच्छ आणि आरामदायी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. या व्यवस्थेमुळे स्पर्धकांना कोणत्याही त्रासाविना आपला खेळ सादर करता आला.

भोजन व्यवस्थाही वाखाणण्याजोगी होती. पौष्टिक आणि आरोग्यदायी आहार खेळाडूंना मिळावा याची विशेष काळजी घेतली गेली. खेळाडूंसाठी संतुलित आहार उपलब्ध करून देण्याचे नियोजन हे अत्यंत प्रभावी होते, ज्याचा सकारात्मक परिणाम खेळाडूंच्या ऊर्जेवर आणि कामगिरीवर दिसून आला.

 नांदेड स्पोर्ट्स बेस्ट डेस्टिनेशन 

या भव्य स्पर्धेच्या आयोजनामुळे नांदेड आता क्रीडा जगतात एका महत्त्वाच्या स्थळी रूपांतरित होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या धडपडीत शहराने अशा  २४ दर्जेदार राष्ट्रीय व राज्य स्पर्धांचे वर्षभरात आयोजन करून भविष्यातील क्रीडा स्पर्धांसाठी स्वतःला आदर्श स्थळ म्हणून सिध्द केले आहे. यामध्ये १८ राज्य व राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन एका कॅलेंडर वर्षातील आहे.नांदेडमध्ये असलेली क्रीडा संरचना, उत्तम सुविधा आणि खेळाडूंसाठी पोषक वातावरण यामुळे येत्या काळात नांदेड महाराष्ट्रातील एक प्रमुख क्रीडा हब बनण्याच्या मार्गावर आहे.

 क्रीडा प्रेमींसाठी पोषक वातावरण 

या स्पर्धेने स्थानिक क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण केले आहे. महसूल विभागाच्या दर्जेदार खेळाडूंनी यामध्ये वर्णी लावली. स्वतः खो -खो च्या राष्ट्रीय कर्णधार असणाऱ्या प्रियंका इंगळे यांनी आयोजनाचे, मैदानाच्या तयारीचे कौतुक केले. या स्पर्धेमुळे भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी नांदेड एक उत्कृष्ट केंद्र म्हणून विकसित होईल, अशी आशा आहे.

 भवीष्यातील नांदेडचा क्रीडा विकास 

या स्पर्धेच्या यशानंतर नांदेडमध्ये भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी अधिक योजना आखण्याची गरज आहे.

यामध्ये आधुनिक क्रीडा संकुल उभारणे, प्रशिक्षकांची संख्या वाढवणे आणि खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्याची पावले उचलली तर नांदेड महाराष्ट्राच्या क्रीडा नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल.

 आठवणींचा अमूल्य ठेवा 

"आयुष्यभराच्या आठवणी" या स्पर्धेने केवळ खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले नाही, तर ती नांदेडच्या क्रीडा परंपरेला चालना देणारी स्पर्धा ठरली. उत्तम आयोजन, उत्कृष्ट व्यवस्था आणि संस्मरणीय क्षण यामुळे ही स्पर्धा सर्वांच्या मनात कायमची कोरली गेली.

ही स्पर्धा यशस्वी झाल्यामुळे भविष्यात नांदेडमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा भरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे नांदेड महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात नव्या उंचीवर पोहोचेल, यात शंका नाही!

 राज्यस्तरीय स्पर्धांमुळे  मैदानांचे अद्यावतीकरण 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय इनडोअर हॉलमध्ये बॅडमिंटन आणि टेबल टेनिस, तसेच बुद्धिबळाचे प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. तसेच आउटडोरला बास्केटबॉलची दोन मैदाने आणि स्केटिंग रिंग अंतर्गत दोन्ही प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे, ही सुविधा अद्यावत झाली.

  श्री.गुरुगोविंद सिंघ जी स्टेडियममध्ये क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार आहे. या मैदानावरील स्टेडियम वरील रंगरंगोटी करण्यात आली तसेच आऊटफिल्ड अद्यावत करण्यात आले. या राज्यस्तरीय स्पर्धेतील खेळाडूंना या मैदानावर खेळताना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शैल्याचा फील होता. या खेळाडूच्या माध्यमातून राज्याला या मैदानाची क्षमता कळली. दर्जेदार स्पर्धेसाठी या मैदानाची शिफारस कानोकानी झाली.

इंदिरा गांधी मैदान, मनपा,या ठिकाणी खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, थ्रो बॉलचे मैदान तयार झाले.

सायन्स कॉलेजच्या अथलेटिक्स सिंथेटीक ट्रॅक, व्हॉलीबॉलचे मैदान, खो -खो चे मैदान,इन्डोअर व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस,त्याचबरोबर आऊटडोरला लॉन टेनिसचे मैदान अद्यावत झाले. 

पीपल्स कॉलेजचे फुटबॉल मैदान, बास्केटबॉल कोर्ट तयार आहेत.

नांदेड क्लबच्या ठिकाणी लॉन टेनिसचे मैदान उपलब्ध आहेत.

खालसा स्कूल या ठिकाणी हॉकीचे मैदान उपलब्ध आहे.

दशमेश स्कूल या ठिकाणी हॉकीचे टर्फचे मैदान उपलब्ध आहे. ही अद्यावत झालेली मैदाने या पुढेही अशाच पद्धतीने खेळाडूंना उपलब्ध होईल. यासाठी सर्व स्थानिक प्रशासनांनी त्याची निगा राखावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

 महसूलचे टीमवर्क ठरले विजेते... 

या संपूर्ण स्पर्धेच्या मध्यवर्ती एक नेतृत्व होते. एक कोअर टीम होती. या कोअर टीमच्या डोक्यामध्ये अगदी पहिल्याच दिवशी स्पर्धा यशस्वी कशी करायची याचा रोड मॅप होता. प्रचंड आत्मविश्वासाने ही टीम कार्यरत होती. या टीमची ऊर्जा होती तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि आताचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले. या टीमची पहिली तपासून अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या थर्मामीटरने व्हायची... आणि मग सूत्रधार निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व त्यांची कोअर टीम गडावरचे दोर कापल्याप्रमाणे समस्येचे समाधान काढूनच शांत व्हायचे.या टीम मध्ये प्रत्येकाने आपले काम चोख बजावले. सांस्कृतिक स्पर्धा तर दर्जेदार रंगमंचावरील कार्यक्रमाची साखर पेरणी होती या साठी टीमने केलेली धडपड ७० एमएमच्या पडद्यासारखी नजरेत भरणारी होती. ही अविरत मेहनत, धडपड महिन्याभराची होती. यामध्ये प्रत्येक गोष्टीची बारकाईने उपाययोजना करण्यात आली होती. हिमालयासारखे टीम वर्क एखादी स्पर्धा शंभर टक्के यशस्वी करण्यास कारणीभूत ठरले ! हॅट्स ऑफ टू टीम रेव्हेन्यू !!

प्रवीण टाके

 जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

९७०२८५८७७७




















Friday, February 28, 2025

 वृत्त क्रमांक 245

बालकांची विशेष आरोग्य तपासणी मोहिम सुरु

आज उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार राज्यस्तरीय उदघाटन
नांदेड दि. 28 फेब्रुवारी :- राज्य शासनाने संपूर्ण राज्यात “राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम" अंतर्गत विद्यार्थ्यांची विशेष तपासणी मोहिम या महत्वाकांक्षी अभियानाची घोषणा केलेली आहे. त्यानुसार या मोहिमेच्या शुभारंभ संपूर्ण राज्यामध्ये 1 मार्च 2025 रोजी इंदिरा गांधी मॉडेल स्कूल, औंध, पुणे येथून होणार आहे. या मोहिमेचे उदघाटन राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सकाळी 8.30 वाजता होणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमास राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एक शाळा व जिल्हा स्तरावरील एक शाळा दूरभाष्य प्रणाली व्हीसीद्वारे सोहळ्यास मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने नांदेड जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकिय शाळा, शासकीय अंगणवाडयामधील 0 ते 18 वर्षापर्यंतच्या बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी दरम्यान आजारी आढळून आलेल्या बालकांवर त्वरीत निशुल्क उपचार व संदर्भ सेवा तसेच आवश्यकतेनुसार नंतर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
त्यानुसार आरबीएसके कार्यक्रमाच्या मोहिमेचे उद्घाटन 1 मार्च 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता प्राथमिक शाळा क्र.4 व माध्यमिक शाळा नांदेड वाघाळा महानगरपालीका जंगमवाडी नांदेड तसेच तालुकास्तरावरील शारदा भवन हायस्कूल अर्धापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरबन भोकर, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोली, मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल देगलूर, ग्रीन फील्ड नॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज धर्माबाद, अनुसुचित जाती मुलाची शाळा हादगाव, जिल्हा परिषद नेहरू नगर हिमायत नगर, मनोविकास प्राथमिक शाळा, कंधार, सरस्वती विद्या मंदिर किनवट, जिल्हा परिषद शाळा लोहा, अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकिय शाळा माहूर, श्री सरस्वती विद्या मंदिर मुदखेड, जिल्हा परिषद हायस्कूल मुखेड, लिटिल स्टेप इंग्लिश स्कूल नायगाव, व कस्तुरबा गांधी बालिका वि‌द्यालय उमरी इत्यादी शाळांत स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या हस्ते पार पडणार आहे.
00000

 वृत्त क्रमांक 244

साहित्यातून जगण्याची दिशा मिळते -जेष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख

 वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक

 शालेय शिक्षणापासून वाचन संस्कृती जोपासावी- ॲड.गंगाधर पटने 

नांदेड दि. 28 फेब्रुवारी :- मध्ययुगीन काळातील चक्रधर स्वामीच्या लीळाचरित्र आद्यग्रंथापासून मराठी साहित्यांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे.जेष्ठ साहित्यिकांच्या साहित्यातूनच जीवनमूल्यांची शिकवण, आध्यात्मिक साहित्य, तत्वज्ञान यांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. यातून सहिष्णूता, जगण्याचे तत्वज्ञान आपल्याला मिळत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यातून समाज सुधारणेचे बळ मिळालेले आहे. अशा महान संत, महात्म्याचे साहित्य प्रत्येकांनी आपल्या घरात ठेवले पाहिजे, ते प्रत्येकांनी वाचले पाहिजे यामुळे पुढील पिढी सुसंस्कृत निर्माण होईल, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी केले. 

ग्रंथोत्सव 2024 चे आयोजन जिल्हा ग्रंथालयात करण्यात आले होते. यावेळी बोलत होते. यावेळी अध्यक्ष भगवंत क्षीरसागर,जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तथा माजी.आ.ॲड.गंगाधर पटने, सहाय्यक ग्रंथालय संचालक, छत्रपती संभाजीनगर सुनील हुसे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, संपादक डॉ. राम शेवडीकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

थोर साहित्यिकांचे विचार, साहित्य प्रत्येकांच्या घरात आवश्यक आहे. ग्रंथात परिवर्तन करण्याची शक्ती आहे. सामाजिक विकृतीचा अभ्यास जाणून घ्यायचा असेल तर ग्रंथ वाचले पाहिजे. ग्रंथाचे सामर्थ्य प्रचंड असून त्यांची जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्रीकांत देशमुख यांनी केले. 

वाचन संस्कृतीचे संवर्धन, वाचन संस्कृतीला बळ देणारा ग्रंथोत्सव आहे. आताच्या काळात एआय, सोशल मिडीया यामुळे वाचन संस्कृतीला खूप मोठे आवाहन आहेत. परंतु या आव्हानाच्या काळातळी वाचन संख्या दिवसेंदिवस वाढविणे हे आपले कर्तव्य आहे. सध्या साहित्य मराठी परिषदेवर सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. लोकांच्या स्पर्धासाठी पुस्तके आसुसलेले आहेत. गावातील ग्रंथालयात असलेली पुस्तकांची माहिती सर्व नागरिकांना होण्यासाठी ग्रंथालयांनी धार्मिक कार्यक्रमात यांची माहिती सांगावी. सोशल मिडीयावर याबाबत प्रसार करावा.उठा जागे व्हा ग्रंथालय चळवळीत जागे व्हा, असे आवाहन सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी केले. 

वाचन संस्कृती शालेय स्तरापासून झाली पाहिजे. वाचनाबाबत शिक्षकांमध्ये जनजागृती असली पाहिजे. तर वाचन संस्कृती टिकेल असे मत माजी.आमदार ॲड.गंगाधर पटने यांनी व्यक्त केले. 

माणसाच्या जडणघडणीत ग्रंथाचे अन्यय साधारण महत्व आहे. ग्रंथ माणस घडवितात. ग्रंथ आहेत म्हणून आपण आहोत. ग्रंथालयात ज्ञानाच्या शाखा असून ते आपल्या आयुष्याचे मार्गदर्शक आहेत. संत परंपरा, शिकवण ग्रंथाच्या माध्यमातून मिळत असते असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. भगवंत क्षीरसागर यांनी केले. 

नांदेड ग्रंथोत्सवाला आज पासून सुरुवात झाली. 28 फेब्रुवारी व 1 मार्च दोन दिवस हा ग्रंथोत्सव होत आहे. सकाळी 8.30 ला उपजिल्हाधिकारी अजय शिंदे ज्येष्ठ पत्रकार राम शेवडीकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दींडी काढण्यात आली. ग्रंथ पूजन करण्यात आले. ग्रंथदिंडी मध्ये विद्यार्थी विविध सांस्कृतिक मंडळे आणि भजनी मंडळे देखील सहभागी झाले होते. आयटीआय चौकातून निघालेली ही ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली होती.

शनिवारी पुस्तक प्रदर्शनाला भेट दया 

या ठिकाणी शुक्रवार व शनिवारी मोठया प्रमाणात पुस्तक प्रदर्शन लागले आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेडकरांनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात  परिसवांद “मराठी भाषा सवंर्धन आणि घराघरातील प्रयत्न”चे आयोजन करण्यात येईल. दुपारच्या सत्रात “ग्रंथचळवळीतील दलित व ग्रामीण,बाल साहित्याचे योगदान” हा परिसवांद घेण्यात येणार आहे. समारोप अध्यक्ष माजी खासदार तथा साहित्यिक डॉ.व्यंकटेश काब्दे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नांदेड, संभाजीराव धुळगुंडे, माजी आमदार तथा अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघाचे ॲड . गंगाधर पटने, निर्मल प्रकाशनचे प्रकाशक निर्मलकुमार सुर्यवंशी यांची उपस्थिती राहणार आहेत. नांदेड मधील नागरिकांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदी करावे व ग्रंथोत्सवाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले आहे.

ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकांचे पुस्तक विक्री व प्रदर्शनी दालने राहणार आहेत. या महोत्सवाचे लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांनी केले आहे.कार्यक्रमचे सूत्रसंचलन ज्येष्ठ साहित्यिक नारायणराव शिंदे यांनी केले.

०००००












 वृत्त क्रमांक 243

गोरक्ष लोखंडे यांचा दौरा

 

नांदेड दि. 28 फेब्रुवारी : महाराष्ट‍्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे 1 ते 3 मार्च या कालावधीत नांदेड दौऱ्यावर येत आहेत.

 

1 मार्च रोजी त्यांचे आगमन होणार असून दुपारी 12 वा. जिल्हा समाज कल्याण अधिकारी  जिल्हा परिषद नांदेड यांच्या अंतर्गत असणाऱ्या आश्रमशाळांना ते भेटी देणार आहेत. 2 मार्चला सकाळी 11 वा. सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या अधिनस्त असणाऱ्या वसतीगृहांना ते भेटी देणार आहेत. 3 मार्चला संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील तर सायं 6 वा. संविधानाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी कुसूम सभागृह येथे ते उपस्थित राहतील. त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह येथे असेल.

0000

वृत्त क्रमांक 242

संडे ऑन सायकल रॅलीमध्ये

मोठया संख्येने सहभागी व्हावे 

नांदेड दि. 28 फेब्रुवारी : आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने फिट इंडिया मुव्हमेंट फिटनेस का डोस आधा घंटा रोज अंतर्गत संडे ऑन सायकल रॅलीचे आयोजन 2 मार्च,2025 रोजी करण्याबाबत केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. 

त्यानुसार नांदेड जिल्हयात जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेडच्या वतीने दि.02 मार्च,2025 रोजी सकाळी 6.30 वा. फिट इंडिया मुव्हमेंट फिटनेस का डोस आधा घंटा रोज अंतर्गत संडे ऑन सायकल रॅलीचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम मुख्य प्रवेशद्वार येथून करण्यात आले आहे. 

या रॅलीचा मार्ग स्टेडीयम मुख्य प्रवेशद्वार येथून सुरुवात होवून आयटीएम कॉलेज मार्गे-आयटीआय चौक- श्रीनगर- वर्कशॉप कॉर्नर मार्गे आनंदनग- वसंतराव नाईक पुतळा (नागार्जुना हॉटेल)- अण्णाभाऊ साठे चौक मार्गे- आयटीएम व श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम मुख्यद्वार नांदेड येथे समाप्त होईल. 

फिट इंडिया मुव्हमेंट फिटनेस का डोस आधा घंटा रोज यामुळे आपले शरीर निरोगी, तंदुरुस्त व बळकट राहण्यास मदत होईल याकरीता फिटनेस जनजागृती करणेकरीता जिल्हयातील खेळाडू मुले-मुली, शारीरिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रमुख, विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी व विविधि विभागाचे अधिकारी/ कर्मचारी, नागरीक, महिला व क्रीडाप्रेमी यांनी या संडे ऑन सायकल रॅलीमध्ये आपल्या सायकलीसह मोठया संख्येने सहभागी व्हावे. व वेबसाईड (https://fitindia.gov.in/cyclothon.2024) यावर ऑनलाईनद्वारे आपली नोंदणी करावी. व अधिक माहितीकरीता श्री. बालाजी शिरसीकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक) यांचेशी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेभंरे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक   BH सिरीज वाहनधारकांनी थकीत कर तातडीने भरावा ;  अन्यथा विशेष तपासणी मोहिमेत कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन नांदेड,...