Friday, February 28, 2025

 वृत्त क्रमांक 241

परीक्षांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू 

नांदेड दि. 28 फेब्रुवारी : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या इयत्ता 10 व 12 वी परीक्षा सध्या सुरू असून शहरातील ज्या शाळांमध्ये या परीक्षा सुरू आहेत त्या परिसरात शांतता राखण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शहरातील 8 शाळांमध्ये या परीक्षा होत असून सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 यावेळेत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या कालवधीत शांतता पाळावी व प्रतिबंधात्मक बाबी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  

000000

 वृत्त क्रमांक 240

तो मुलगा तुमचा तर नाही ना ?

संपर्क साधण्याचे प्रशासनाचे आवाहन   

नांदेड दि. 28 फेब्रुवारी : धनगरवाडी येथील लहूजी साळवे निराधार बालकाश्रमामध्ये 13 वर्षाच्या शिवा मारोती चव्हाण या बालकाला दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पालकाचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे या बालकाच्या पालकत्वाचा दावा करणाऱ्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

 

बालगृहात दाखल झाल्यापासून शिवा मारोती चव्हाण याच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. या मुलाशी नाते असणाऱ्या कोणीही अधिकृतपणे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. पी. रंगारी यांनी केले आहे.

0000



 वृत्त क्रमांक 239

महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण

तीन जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन   


नांदेड दि. 28 फेब्रुवारी : महिला व बाल कल्याण विभागामार्फत स्थापन करण्यात येणाऱ्या महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण समितीवरील अध्यक्ष व दोन सदस्य यासाठी नियुक्ती करण्यास्तव नागरिकांमधून नामांकने मागविण्यात येत आहेत. 6 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

या समितीचे अध्यक्ष व दोन सदस्य निवडायचे आहेत. त्यातील एक सदस्य विधी विभागाशी संबंधित असावा. दुसरा सदस्य हा एसी, एसटी, ओबीसी या पैकी एका गटातील असावा. तर अध्यक्ष पदासाठी सामाजिक कार्याचा पाच वर्षाचा अनुभव असावा. जिल्हास्तरावरील या समितीसाठी 6 मार्च 2025 पर्यंत जिल्हा माहिला व बालकल्याण विकास कार्यालय महात्मा फुले मार्केट मागे गणेशनगर रोड नांदेड यांच्याकडे अर्ज सादरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0000

वृत्त क्रमांक 238

युवकांनी रोजगारासोबतच स्वयं रोजगार निर्मितीवर भर द्यावा – उपायुक्त विद्या शितोळे 

·         अभ्यासासोबत कौशल्य आत्मसात करणे आवश्यक
·         मेळाव्यात 386 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड
                                                                                         
नांदेड दि. 28 फेब्रुवारी :- रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याची संधी मिळत आहे. युवकांनी या संधीचा आवश्य लाभ करुन घ्यावा. तसेच युवकांनी रोजगारासोबतच स्वयंरोजगार निर्मितीवरही भर द्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभाग छ. संभाजीनगरच्या उपायुक्त विद्या शितोळे यांनी केले.
 
आज यशवंत महाविद्यालयात रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे ॲड . उदयरावजी निंबाळकर, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे संचालक डॉ. सुर्यप्रकाश जाधव, प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार, उपप्राचार्य कविता सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.
 
या रोजगार मेळाव्यात पुणे, छ.संभाजीनगर येथील 12 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यात एकूण 620 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यापैकी प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांची संख्या 386 आहे. 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार करावयाच्या कार्यवाहीत रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत 100 रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळणार असून नाव मेळाव्यात नोंदणी केल्यानंतर मुलाखत कशी द्यावी, कसे बोलावे, संस्था किंवा कंपनीचे प्रतिनिधी काय प्रश्न विचारतात अशा अनेक गोष्टीचा अनुभव मिळणार आहे .
 
तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रोजगार उपलब्ध होण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थी व विद्यार्थीनीनी स्वयंरोजगारासाठी विविध महामंडळे कार्यरत असून या महामंडळाच्या माध्यमातून उद्योग उभारणी करता येणार आहे. त्यामुळे युवकांनी आपण स्वयंरोजगार निर्माण करुन इतरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे माध्यम बनावे असेही आवाहन त्यांनी केले. तसेच यापुढील रोजगार मेळाव्यात विविध महामंडळे व योजनांचे स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त विद्या शितोळे यांनी दिली. यामुळे अनेक युवक-युवतींना रोजगार व शासकीय योजना संबंधी माहिती मिळण्यास मदत होईल.
 
पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या अनेक योजना असून उद्योग उभारणीसाठी उद्योग विभागामार्फत या योजनांसाठी मार्गदर्शन करण्यात येते. तसेच अनेक योजनांमध्ये लाभार्थ्यांना अनुदान मिळते. त्यामुळे युवकांनी रोजगाराच्या मागे न धावता स्वयंरोजगार उभारुन इतरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले .
 
यावेळी रोजगार स्वयंरोजगाराच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे संचालक डॉ. सुर्यप्रकाश जाधव यांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यशवंत महाविद्यालयाचे डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांनी केले.
00000







वृत्त क्रमांक 237

संतांच्या शिकवणीतून मराठवाड्याला संघर्षशीलतेचा मंत्र मिळाला : अजित पवार 

 उमरज : कलशारोहण सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांची भेट 

नांदेड ( उमरज ता. कंधार ) दि. २८ फेबुवारी : स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठवाड्याला सहजासहजी काही भेटले नाही.तरीही मराठवाड्याने संघर्ष सोडला नाही.सहनशक्ती आणि संघर्षशीलता मराठवाड्याच्या संतांनी दिलेली शिकवण आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड व परभणी जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत.नांदेड वरून हेलिकॉप्टरने जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील धाकटे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणारे श्री.क्षेत्र उमरज येथील प्राचीन श्री. संत नामदेव महाराज संस्थान मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त 108 कुंडी विष्णूयाग यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता. अडीचशे वर्षाची परंपरा आणि सात मठाधिपतीनी आत्तापर्यंत या ठिकाणी आध्यात्मिक कार्य केले आहे. यासाठी या परिसरातील हजारो भाविक उपस्थित झाले होते.आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त भाविकांशी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला.

यावेळी मंचावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळे, तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा प्रवक्ते देवकीनंदन जी ठाकूर महाराज,संत नामदेव महाराज संस्थान उंबरजचे श्री.संत महंत एकनाथ नामदेव महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आगमनानंतर येथील नामदेव महाराज समाधीचे व विठ्ठल रखुमाई मंदिराचे दर्शन घेतले. संस्थांच्यावतीने त्यांचे आगमनाप्रती स्वागत करताना खोबऱ्याच्या भव्य हाराने परंपरेनुसार स्वागत करण्यात आले.

यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील संत परंपरेचा गौरव केला. मराठवाड्याची भूमी संतांची ,कलावंतांची, शूरांची व विरांची असून मराठवाड्याला संघर्षाशिवाय सहजासहजी काही मिळाले नाही. मात्र संतांच्या शिकवणीतून संघर्षशीलता व संयम हे गुण या ठिकाणच्या मातीमध्ये आले आहे. संतांच्या शिकवणीतून सर्वधर्मसमभावाचा मंत्र बुलंद व्हावा. या ठिकाणचा आध्यात्मिक सोहळा सामाजिक एकोप्याची नांदी ठरावी, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. नामदेव महाराज संस्थानच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात येईल ,अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. 

संस्थांच्या ट्रस्टीने त्यांना काही निवेदन यावेळेस सादर केले. तत्पूर्वी त्यांनी मंदिर परिसरात भेट देऊन समाधी दर्शन घेतले. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही संबोधित केले.

तत्पूर्वी, आज सकाळी नांदेड येथील श्री. गुरुगोविंद सिंह जी नांदेड विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागताला  प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.बालाजी कल्याणकर आ.आनंद शंकर तिडके, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर त्यांनी नांदेड येथील पवित्र श्री.हुजूर साहिब गुरूद्वारा अबचलनगर जाऊन दर्शन घेतले. गुरुद्वारा येथील ट्रस्टीमार्फत त्यांचे स्वागत करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमरज येथून त्यांनी नांदेड कडे प्रयाण केले रात्री उशिरा ते नांदेड विमानतळावरून मुंबईला परत जाणार आहेत.

000000







नांदेड ग्रंथोत्सवाला आज पासून सुरुवात झाली. २८ फेब्रुवारी व १ मार्च दोन दिवस हा ग्रंथोत्सव होत आहे. सकाळी ८.३०ला ग्रंथ दींडी काढण्यात आली. या ठिकाणी मोठया प्रमाणात पुस्तक प्रदर्शन लागले आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेडकरांनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.




































 






 नांदेड येथील पवित्र श्री.हुजूर साहिब गुरूद्वारा अबचलनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घेतले. ते नांदेड , परभणी जिल्हयाच्या एका दिवशीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या सोबत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.








  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...