Friday, July 26, 2024

 वृत्त क्र. 638

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम

नांदेड, दि. 26 जुलै :- खरीप हंगाम सन 2024 पिक स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. 


राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. 


वंचित, दुर्लक्षित तसेच पौष्टीक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञान वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिक स्पर्धामध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून खरीप हंगाम पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. त्यानुसार कृषि विभागामार्फत खरीप हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी मूग,उडीद,ज्वारी,बाजरी,तूर व सोयाबीन या  पिकासाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. 


मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, तूर व सोयाबीन ही पिक स्पर्धेतील पिके आहे.  या स्पर्धेसाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे आवशक्य आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पीकस्पर्धामध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. 


अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र -अ). ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन. 7/12, 8-अ उतारा. जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास). पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा. बँक खाते चेक / पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत ही आवश्यक कागदपत्रे आहेत.  


अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

खरीप हंगामामध्ये पिकस्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील. मूग,उडीद 31 जुलै. ज्वारी,बाजरी,तूर व सोयाबीन - 31 ऑगस्ट. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल – प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.


स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये राहील व आदीवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहील. 


बक्षिस स्वरूप

सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसाठी रुपये पुढीलप्रमाणे आहेत. स्पर्धा पातळी तालुका पातळीवर पहिले 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये, तिसरे 2 हजार रुपये. जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार रुपये, दुसरे 7 हजार रुपये, तिसरे 5 हजार रुपये तर राज्य पातळीवर पहिले 50 हजार रुपये, दुसरे 40 हजार रुपये, तिसरे 30 हजार रुपये राहिल, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

00000

 वृत्त क्र. 637 

नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह

मानवनिर्मित वस्तू उडविण्यास प्रतिबंध

 

नांदेड दि. 26 जुलै :- जिल्ह्यातशहरातगुरुद्वारा परिसर व श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळाच्या 10 कि.मी परिघ क्षेत्रात 26 ते 30 जुलै 2024 या कालावधीत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1)  नुसार ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. 30 जुलै 2024 रोजी अतिमहत्वाच्या व्यक्ती हे नांदेड जिल्हा येथील कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टिने जिल्हादंडाधिकारी राऊत यांनी याबाबतचा आदेश  निर्गमीत केला आहे.

00000

 विशेष लेख 

Thursday, July 25, 2024

 वृत्त क्र. 636

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला ग्रामीण व शहरी भागात उस्फूर्त प्रतिसाद

 शहर व जिल्हयामध्ये ३.७० लक्ष अर्ज दाखल

 अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शांततेत पूर्ण करा ; कोणीही सुटणार नाही : जिल्हाधिकारी

नांदेड दि. २५ जुलै : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात शहर व ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत तीन लक्ष 70 हजार अर्ज दाखल झाले आहे. जवळपास 50 ते 60 टक्के अर्ज आणखी बाकी आहेत. मात्र अर्जदार महिलांनी उशीरही झाला तरी त्यांचा अर्ज ग्राह्य होणार असून त्यासाठी गोंधळ, गडबड करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

या योजने संदर्भात जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी अर्ज प्रक्रिये संदर्भात आज आढावा घेतला. एकूण तीन लक्ष 70 हजार अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणेने पात्र उमेदवारांची निवड पुढील काही दिवसात पूर्ण करावी. तसेच पात्र, अपात्र व त्रुटीच्या अर्जाची वर्गवारी तसेच चावडी वाचनाला गती द्यावी, असे निर्देश आज त्यांनी दिले.

रक्षाबंधनाला पहिला हप्ता देण्याबाबत राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे यंत्रणेने गतिशील होणे आवश्यक आहे. मात्र यासाठी कोणत्याही प्रकारे गावागावात गोंधळ किंवा गडबड होणार नाही याची काळजी घेण्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 लाभार्थी महिला भगिनींनी आपल्याला लाभ मिळणार नाही,अशी शंका मनात येऊ देऊ नये. सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळेल यासाठी शासन यंत्रणा दक्ष आहे. वेळेत अर्ज दाखल करा. मात्र शांततेत प्रक्रिया पार पाडा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नांदेड ग्रामीण व नांदेड शहर या दोन्ही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आता अर्ज भरण्याला गती आली असल्याचे आजच्या आढावा बैठकीत दिसून आले.
0000

 वृत्त क्र. 635

एक ऑगस्टपासून महसूल सप्ताह साजरा करण्याची प्रशासनाची तयारी 

नांदेड दि. २५ जुलै : प्रशासनाचा कणा असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले आहे. शासनाच्या पथदर्शी व अभिनव योजनांचा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी ही या सप्ताहाची वैशिष्ट्ये असणार आहे.

महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुकास्तरावर समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये एक ऑगस्टला शुभारंभ सप्ताह कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, दोन ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, तीन ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, पाच ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी, 6 ऑगस्ट ला एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा, तर सात ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता समारंभ घेण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त शासन व सामान्य नागरिक यांना जोडणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन या सप्ताहामध्ये करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच एक बैठक निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. यामध्ये महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या सप्ताहात हीरहिरीने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.

000000

 वृत्त क्र. 634

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल

नांदेड दि. 25 जुलै :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै 2024 आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी पुरवणी परीक्षा 16 ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. तथापि 26 जुलै 2024 रोजी राज्याच्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे 26 जुलै रोजी होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. या वेळापत्रकातील बदलाची सर्व संबंधित माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सहसचिव मेधा निरफराके यांनी केले आहे.

इयत्ता दहावी पुरवणी परीक्षा शुक्रवार 26 जुलै 2024 रोजी सकाळी 11 ते 1 वाजता विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 (72-2) या विषयाची परीक्षा बुधवार 31 जुलै 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधीत होणार आहे. तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा शुक्रवार 26 जुलै 2024 रोजी होणारी सकाळ सत्र 11 ते 2 या कालावधीत होणारी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन व अन्नशास्त्र व तंत्रज्ञान तसेच एम.सी.व्ही.सी पेपर-2 या विषयाची परीक्षा शुक्रवार 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळ सत्रात 11 ते 2 या कालावधीत होईल. तसेच इयत्ता 10 व 12 वी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या बदलाची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी असेही राज्य मंडळ, पुणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

0000

  वृत्त क्र. 633

जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख रुजू

नांदेड दि. 25 जुलै :-जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख यांची पदस्थापना शासन आदेशान्वये करण्यात आली आहे. त्या अन्वये डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख या 16 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषद नांदेड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर रुजू झाल्या आहेत.

आरोग्य सेवेतील कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून यापुर्वी त्या वाशिम येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व सांगली येथे जिल्हा हिवताप अधिकारी तसेच सातारा येथे तालुका आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत होत्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड या पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांचा विविध आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेवून मार्गदर्शन केले. या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना केल्या. जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही त्यांनी बैठकीत सांगितले.

0000




  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...