वृत्त क्र. 636
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला ग्रामीण व शहरी भागात उस्फूर्त प्रतिसाद
शहर व जिल्हयामध्ये ३.७० लक्ष अर्ज दाखल
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शांततेत पूर्ण करा ; कोणीही सुटणार नाही : जिल्हाधिकारी
नांदेड दि. २५ जुलै : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात शहर व ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत तीन लक्ष 70 हजार अर्ज दाखल झाले आहे. जवळपास 50 ते 60 टक्के अर्ज आणखी बाकी आहेत. मात्र अर्जदार महिलांनी उशीरही झाला तरी त्यांचा अर्ज ग्राह्य होणार असून त्यासाठी गोंधळ, गडबड करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
या योजने संदर्भात जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी अर्ज प्रक्रिये संदर्भात आज आढावा घेतला. एकूण तीन लक्ष 70 हजार अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणेने पात्र उमेदवारांची निवड पुढील काही दिवसात पूर्ण करावी. तसेच पात्र, अपात्र व त्रुटीच्या अर्जाची वर्गवारी तसेच चावडी वाचनाला गती द्यावी, असे निर्देश आज त्यांनी दिले.
रक्षाबंधनाला पहिला हप्ता देण्याबाबत राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे यंत्रणेने गतिशील होणे आवश्यक आहे. मात्र यासाठी कोणत्याही प्रकारे गावागावात गोंधळ किंवा गडबड होणार नाही याची काळजी घेण्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
लाभार्थी महिला भगिनींनी आपल्याला लाभ मिळणार नाही,अशी शंका मनात येऊ देऊ नये. सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळेल यासाठी शासन यंत्रणा दक्ष आहे. वेळेत अर्ज दाखल करा. मात्र शांततेत प्रक्रिया पार पाडा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नांदेड ग्रामीण व नांदेड शहर या दोन्ही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आता अर्ज भरण्याला गती आली असल्याचे आजच्या आढावा बैठकीत दिसून आले.
0000
No comments:
Post a Comment