वृत्त क्र. 635
एक ऑगस्टपासून महसूल सप्ताह साजरा करण्याची प्रशासनाची तयारी
नांदेड दि. २५ जुलै : प्रशासनाचा कणा असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले आहे. शासनाच्या पथदर्शी व अभिनव योजनांचा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी ही या सप्ताहाची वैशिष्ट्ये असणार आहे.
महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुकास्तरावर समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये एक ऑगस्टला शुभारंभ सप्ताह कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, दोन ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, तीन ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, पाच ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी, 6 ऑगस्ट ला एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा, तर सात ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता समारंभ घेण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त शासन व सामान्य नागरिक यांना जोडणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन या सप्ताहामध्ये करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच एक बैठक निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. यामध्ये महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या सप्ताहात हीरहिरीने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.
000000
No comments:
Post a Comment