Sunday, May 20, 2018


स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचा सत्कार सोहळा
शासकीय सेवेत काम करतांना
जनसेवेच्या कामांची जाणीव ठेवावी   
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 20 :- शासकीय सेवेत आपण खुर्चीवर बसतो तेंव्हा समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. लोकांच्या अडचणी ऐकुण त्यांचे प्रश्न सोडविले तर त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होतो. शासकीय सेवेत काम करतांना जनसेवेच्या कामांची जाणीव ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्यसेवेतील विविध परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून आई-वडील, नातेवाईकांसह परीक्षेतील यशस्वीतांचा सत्कार जिल्हा प्रशासनातर्फे डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आज करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी श्री डोंगरे बोलत होते.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, मनपा आयुक्त लहुराज माळी, केंद्रीय उत्पादन शुल्कचे सहाय्यक आयुक्त धीरजकुमार कांबळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सबीनवार, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. व्ही. प्रसाद, जी. रमेश राव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे, तहसिलदार किरण अंबेकर, सुरेश घोळवे, अरुणा संगेवार, सुरेखा नांदे, सुनीत शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.   
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे परिश्रम समजून घेणे आवश्यक आहे. परीक्षेची तयारी यशस्वी विद्यार्थ्यांशी चर्चा करुन केल्यास मनातील भिती, अतीउत्साह कमी होतो आणि अभ्यासाची पद्धत समजण्यास मदत होते. कोणतेही काम अवघड नाही, सकारात्मक रहा, परिस्थितीला दोष देऊ नका त्यातून चांगला मार्ग निवडला पाहिजे. समाजाने आपल्याला बरेच काही दिले आहे, समाजाचे आपण देणे लागतो याची जाणीव ठेवून यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट लोकसेवा केली पाहिजे. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी जीद्य, परिश्रमाने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत आहेत. "उज्ज्वल नांदेड" अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणी सोडविण्याचे प्रयत्न केले जात आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासन चांगल्या गोष्टीसाठी आपल्या सोबत असल्याचे सांगून श्री. डोंगरे यांनी चांगले संस्कार दिलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचे अभिनंदन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना यशासाठी शुभेच्छा दिल्या.     
विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद म्हणाले, स्पर्धा परीक्षेकडे अनेक मुले जात आहेत. विद्यार्थ्यांनी आपला कल लक्षात घेऊन त्याप्रमाणे क्षेत्र निवडावे. जीवनात आत्मविश्वास कमी होऊ न देता सकारात्मक राहणे आवश्यक आहे, असेही सांगितले.
पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना म्हणाले, परीक्षेबद्दल भिती न बाळगता स्वत:ला ओळखून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. यशस्वी विद्यार्थ्यांनी कशा आभ्यास केला यापेक्षा त्यांनी काय चुका केला याची माहिती घ्यावी त्यामुळे तुमच्या त्या चुका होणार नाहीत. इतरांशी तुलना करु नका. कुठलाही न्युनगंड न ठेवता परीक्षा दिल्यास यश मिळण्यास मदत होते.   
भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेले डॉ. चव्हाण म्हणाले, तीव्र व कठीण स्पर्धा परीक्षेची जाणीव ठेवून पहिल्या प्रयत्नात परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी ठेवावी. नुसती स्वप्ने पाहून नका, काटेकोर नियोजन करा. ध्येय उच्च ठेवा त्यासाठी मार्गदर्शन, नियोजन, प्रेरणा आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अशिष येरेकर म्हणाले, गरीब परिस्थिती असली तरी पालकांनी मुलांवर विश्वास ठेवावा. काय अभ्यास केला यापेक्षा कसा अभ्यास केला हे महत्वाचे आहे. इच्छा शक्तीच्या जोरावर संधी भरपूर मिळतात. गुणवत्ता वाया जाऊ देऊ नका. सकारात्मक राहून दृष्टिकोन विकसित करणे महत्वाचे आहे, असे सांगितले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेले दिग्वीजय बोडके, डॉ. सुयश चव्हाण, रोहन घुगे, श्रीनिवास पाटील, शिष येरेकर. MBA –ENT राज्यातून पहिली आलेली दिव्या गोवर्धन बियाणी, जेईई देशातून तिसरा आलेला पार्थ सतीश लटुरिया. राज्यकर निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण शिवाजी जाकापुरे, कु. नेहा पवार, अमोल किशनराव हनवते, विवेक मधुकरराव क्षिरसागर, योगेश टोंपे, गाडेवाड माणिक रामचंद्र, कु. गिरे मीरा अशोकराव, सुमित्रा मसलगे, महंमद अरीफ, अभिजित देशमुख, अजय वाघमारे, रवी खिल्लारे, मुंजेष कांबळे. कृषि सेवा परीक्षेविठ्ठ किशनराव मखपल्ले- मंडळ कृषी अधिकारी, कर सहाय्यक परीक्षेगंगाधर शेषेराव पाटील, कु.भाग्यश्री गंगाधर मोरे, कु. चंद्रसेना शिवाजी सुर्यवंशी, व्यंकटी नंदकिशोर पुयड, कु. अंजली काळे. पोस्टल असिस्टंट- लक्ष्मण शिवाजी सोळुंके. मंत्रालय लिपीक परीक्षा- कु. चंद्रसेना शिवाजी सुर्यवंशी, सविता गणेशराव मंगरुळे, तेलंगे राजश्री दिगांबर, सुरेखा सटवा आंबेपवाड, ज्योती कावळे, कु. लक्ष्मी चिटटेबोईनवाड, कु. भाग्यश्री कांबळे, काळोजी परसराम शिंदे. पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा लक्ष्मण शेन्नेवाड, कु.गायत्री कांबळे, कु.राधाबाई एम.केंद्रे यातील उपस्थित विद्यार्थ्यांचा पालक, कुटुंबासह सत्कार करण्यात आला.  
प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची संकल्पना सांगितली. यावेळी उपस्थित अधिकारी, परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रा. सचिन नरगंले, सुनिल हुसे यांनी केले.
आभार मीना सोलापूरे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन संजय कर्वे, अजय वट्टमवार, कोडींबा गादेवाड, आरती कोकुलवार, संजय पाटील, श्रीनिवास शेजूळे, मनोज अरुडवार, संजीव कार्लेु, सोपान यनगुलवाड, बाळू पावडे, रघुवीर श्रीरामवार, दत्ता सीरमवाड यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.  
000000


Saturday, May 19, 2018


मुदखेड, धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार
समितीच्या निवडणूक गणाचे आरक्षण जाहिर  
नांदेड, दि. 19 :- राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांचे आदेशान्वये मुदखेड व धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक गणाची आरक्षण सोडत लॉटरी पद्धतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन येथे काढण्यात आली.  
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या 15 गणापैकी 5 गणाचे आरक्षण लॉटरी पद्धतीने निश्चित करण्यात आले. महिलांसाठी- 2 गण, इतर मागासवर्गीय- 1, विमुक्त जाती / भटक्या जमाती- 1 , अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती- 1 गण. यानुसार पंधरा गणाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्याचा गणनिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समिती : गणाचे नाव- ( कंसात आरक्षण ) पुढील प्रमाणे आहे. राजापूर (इतर मागासवर्गीय), धानोरा बु (सर्वसाधारण), सालेगाव (महिला), आटाळा (महिलांसाठी), जारीकोट (विमुक्त जाती / भटक्या जमाती), चिकना (सर्वसाधारण), कारखेली (सर्वसाधारण), येवती (सर्वसाधारण), येताळा (सर्वसाधारण), पाटोदा बु (सर्वसाधारण), अतकुर (सर्वसाधारण), रत्नाळी (सर्वसाधारण), बाळापूर (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती), नायगाव ध. (सर्वसाधारण), आलूर (सर्वसाधारण).
मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समिती : गणाचे नाव- ( कंसात आरक्षण ) पुढील प्रमाणे आहे. पांढरवाडी  (सर्वसाधारण), शेंबोली (सर्वसाधारण), पार्डी वैजापूर (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती), निवघा (सर्वसाधारण), निवघा (विमुक्त जाती / भटक्या जमाती), खांबाळा (सर्वसाधारण), मुदखेड, (सर्वसाधारण), मुदखेड (सर्वसाधारण), मुदखेड (महिला), इजळी (सर्वसाधारण), चिकाळा (सर्वसाधारण), डोणगाव (इतर मागासवर्गीय), डोणगाव (सर्वसाधारण), पांगरगाव (महिला), पिंपळकौठा चोर (सर्वसाधारण). याप्रमाणे धर्माबाद व मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गणाचे आरक्षण करण्यात आले.
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे (सुधारणा) नियम 2017 मधील तरतुदी तसेच अधिनियम, 1963 चे कलम 13, 14 व 14-अ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार या आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्राचे गणांमध्ये विभाजन करुन प्रत्येक गणात साधारणत: समान खातेदार संख्या विभागण्यात येणार असल्याने गणामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावांची माहिती यावेळी देण्यात आली.   
000000


उभारी उपक्रमांतर्गत कौशल्य विकास व उद्योजकता रोजगाराभिमुख प्रशिक्षण
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांनी
तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 19 :- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांनी प्रशिक्षण संस्थेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवुन तांत्रिक प्रशिक्षण घ्यावे व स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली उभारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात 1 जानेवारी 2012 ते 31 मार्च 2018 या कालावधीतील आत्महत्याग्रस्त 751 कुटुंबांचा 15 नोव्हेंबर 2017 व 4 एप्रिल 2018 या दिवशी सर्व्हे करण्यात आला. त्यात शासनाच्या विविध योजनांची मागणी करणाऱ्या कुटुंबांची निश्चिती करुन त्यांना लाभ देण्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम आखण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणुन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथील सभागृहात जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या झालेल्या सर्वेक्षणात उभारी उपक्रमांतर्गत कौशल्य विकास व उद्योजकता रोजगाराभिमुख प्रशिक्षणासाठी मागणी केलेल्या 306 कुटुंबातील किमान आठवी ते बारावी उत्तीर्ण असणाऱ्या पाल्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  
               
या कार्यशाळेत प्रमुख वक्ते नरेंद्र चव्हाण (चेअरमन, डॉ. शंकरराव चव्हाण बायो शुगर, डोंगरकडा), मल्लिकार्जुन सोपल (सेंटर हेड-ICICI Bank Academy for Skills, नरसोबावाडी, ता. शिरोळ जि. कोल्हापुर) यांचे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी आत्मनिर्भर होण्याच्यादृष्टीने बहुमोल मार्गदर्शन लाभले. नरेंद्र चव्हाण यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिला व मुलींसाठी बचत गटामार्फत विविध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे नमुद करुन तांत्रिक प्रशिक्षणासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
त्यासाठी ICICI Bank Academy for Skills, नरसोबावाडी, ता. शिरोळ जि. कोल्हापुर येथे मोफत रहिवासी व व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत (उदा. विद्युत व घरगुती उपकरणांची दुरुस्ती, रेफ्रिजरेशन व ए.सी. दुरुस्ती, पंपसेट व मोटर्स रिपेअर इ.) प्रशिक्षण देऊन पाल्यांना आत्मनिर्भर कसे होता येईल या दृष्टीने पुर्ण मार्गदर्शन केले जाते. तसेच सदर प्रशिक्षण संस्थेमार्फत तीन महिन्याचा रहिवासी अभ्यासक्रम, भोजन व राहण्याची व्यवस्था निःशुल्क करण्यात येत असुन त्याकरिता ICICI Bank Academy for Skills, नरसोबावाडी, ता. शिरोळ जि. कोल्हापुर-416104 (मोबाईल क्र. 08554986343, 09175043070) या पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या संस्थेच्या नागपुर येथील शाखेत फक्त मुलींचे प्रशिक्षण केंद्र असुन नरसोबाची वाडी येथे मुलांसाठी निवासी प्रशिक्षणाची सोय आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच महसुल कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सोपान गुंडाळे यांनी केले तर आभार तहसिलदा किरण आंबेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, नायब तहसिलदार नितेशकुमार बोलोलु, श्रीमती जया अन्नमवार, श्रीमती शिला डाफणे, विजय चोथवे, राजीव ढवळे यांनी परिश्रम घेतले.             
000000000


संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी
सतर्कता, समन्वय, तत्परतेने प्रयत्न करावेत
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 19 :-  आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रणासाठी संघटीत आणि वेळेत प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी अधिक सतर्कता, समन्वय व तत्परतेने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या.  
मान्‍सून 2018 च्‍या अनुषंगाने पुर्वतयारी आढावा बैठक डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भवन येथे जिल्‍हाधिकारी डोंगरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त लहूराज माळी, अप्पर जिल्‍हाधिकारी संतोष पाट, निवासी उपजिल्‍हाधिकारी जयराज कारभारी, कृषि, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महानगरपालिका, पोलीस, आरोग्य आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पावसाळयात उद्भवणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देण्‍यासाठी आणि सावधगिरीच्‍या उपाययोजनांचा आढावा संबंधत विभागकडघेऊन जिल्‍हाधिकारी श्री डोंगरे म्हणाले, पाझर तलाव,द्या आणि पाण्‍याच्‍या साठवणुकीचे मोठे, मध्‍यम आणि लघु प्रकल्‍प पावसाळयात फुटु नये अथवा ओव्‍हरफ्लो होन गावांना धोका होऊ नये यादृष्‍टीने उपाययोजना कराव्यात. पावसाळयात उत्‍पन्‍न होणाऱ्या साथीच्‍या रोगराईंना वेळीच थांबविण्‍यासाठी प्राथमिक आरोग्‍य केंद्रात मुबलकपणे औषध आणि ब्लिचिंग पावडरची साठवणुक सुरक्षितपणे ठेवावी त्‍याच योग्‍य उपयोग व्‍हाव. महानगरपालिका व नगरपरिषदांनी नालेसफाई तसेच अतिक्रमण दकरावेत. सर्व प्रमुख यंत्रणांनी 1 जून ते 30 सप्‍टेंबर या मान्‍सून कालावधी नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावीत. हवाई मार्गाने शोध व बचाव कार्य करण्‍याची आवश्‍यकता भासल्‍यास जिल्ह्यातील स्‍थायी व अस्‍थायी हेलिपॅडची विस्‍तृत माहिती स्‍थानि पातळीवरुन तहसीलदार यांनी 25 मे पुर्वी उपलब्‍ध करुन त्‍यांचे अक्षांस व रेखांश दयावेत. पाटबंधारे विभागाने धरणनिहाय समन्‍वय अधिकारी नेमणूक करावीत. तहसीलस्‍तरावर मान्‍सुन पुर्व तयारी आढावा बैठक वेळीच आयोजित करुन पुर परिस्थिती प्रतिबंधक कामे मान्‍सून पुर्वी पुर्ण करावत आणि स्‍थानि शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे चाल मोबाईल संपर्क अदयावत करावीत. दरवर्षी होणा-या विजपातामुळे होणारे मृत्‍यु कमी करण्‍यासाठी जनजागृती आणि बचाव कार्याचे रंगीत प्रशिक्षण पर्ण करण्‍याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी यावेळी दिले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाबाबत व केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनासंबंधी केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.                
000000


ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने
दारु विक्री बंदचा आदेश
नांदेड, दि. 19 :- जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी 27 मे रोजी मतदान व 28 मे रोजी मतमोजणी होत आहे. त्यासंबंधी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.
मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2 एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल / बिआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेली गावे याठिकाणी मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर सायं 6 वाजेपासून अनुज्ञप्ती बंद ठेवण्याची तारीख व ठिकाणी 26 मे 2018 रोजी व मतदानाचा दिवस 27 मे रोजी संपुर्ण दिवस. मतमोजणी होत असलेल्या शहर / गावात मतमोजणीचा दिवस 28 मे रोजी मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे.
000000


Friday, May 18, 2018

जागतीक उच्च रक्तदाब दिवस साजरा
        नांदेडदि. 18 :- श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांचे मार्गदर्शनाखाली जागतीक उच्च रक्तदाब दिवस साजरा करण्यात आला. यावेळी 110 रुग्णांची रक्तदाब तपासणी करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गुंटूरकर यांनी शासकीय रुग्णालयातील मधुमेह व उच्च रक्तदाब मोफत तपासणी व उपचाराबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपकसिंह हजारी, डॉ. व्ही. टी. कुलदिपक, डॉ. एच. के. साखरे, डॉ. अर्चना तिवारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांनी केले.
00000
सैनिकी मुलांचे वसतीगृहात
चौकीदार पदासाठी भरती
        नांदेडदि. 18 :- सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णूपुरी विदयापीठ परिसर, नांदेड येथे कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या  स्वरुपात 8 हजार 911 रुपये मानधनावर पुर्णवेळ चौकीदार पदासाठी भरती होणार आहे. पात्रता- उमेदवार हा माजी सैनिक/ इतर नागरीक,  शारीरीक, मानसीकरित्या सुदृढ, लिहीता-वाचता येणे अनिवार्य आहे. राहण्याची सोय वसतीगृहात उपलब्ध आहे. गरजुंनी अर्ज कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नवीन तहसिल कार्यालय परिसर, चिखलवाडी कॉर्नर, नांदेड येथे बुधवार 30 मे 2018 पर्यत सादर करावीत. अधिक माहितीसाठी 02462-245510 या दुरध्वनीवर संपर्क करावा, असे  आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
0000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...