Friday, October 27, 2017

राष्ट्रीय एकता दौडमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड, दि. 27:- स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबर 2017 रोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय एकता दिवस व स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त नांदेड शहरात आयोजित राष्ट्रीय एकता दौडमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा होणार आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात करावयाच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी  अरुण डोंगरे बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, पोलीस उपाअधीक्षक विश्वभंर नांदेडकर, जिल्हा क्रिडा अधिकारी गंगालाल यादव , तहसीलदार किरण अंबेकर तसेच शिक्षण , राष्ट्रीय सेवा योजना, महानगरपालिका आदि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.   
दिनांक 31 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7-30 वाजता नांदेड शहरातील महात्मा गांधी पुतळा ते जुना मोंढा टावर या मार्गाने एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. यात पोलीस विभागासह इतर दलही सहभागी होणार आहेत दै अशाच प्रकारच्या राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन नांदेड शहरातही करण्यात येणार आहे. या दौडमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, खेळाडू, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी, सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, महिला, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी, उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी, नागरिक यांनी सहभागी होणार आहेत. यावेळी एकता दिवसाची शपथही देण्यात येणार आहे.  या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आवाहन केले आहे.

0000
उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारासाठी
सुक्ष्म, लघू उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन
        नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यातील लघु उद्योजकांकडून सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2017 या वर्षासाठी शुक्रवार 24 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळवले आहे.
      उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सुक्ष्म व लघु  उद्योगांना पुरस्कार दिले जातात. प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे  15 हजार रुपये व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते.
      जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी  पुढीलप्रमाणे अटी पुर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या  वेळीउद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी या कार्यालयाकडे स्थायीरित्या नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कमीतकमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी, थकबाकीदार असू नये. उद्योग घटकास यापूर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे. नांदेड जिल्हयातील लघु उद्योजकांनी मंगळवार 24 नोव्हेंबर 2017 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांचेकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.

000000
लोकशाही दिनाचे 6 नोव्हेंबर रोजी आयोजन
नांदेड, दि. 27 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकू घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्‍यात येतो. त्यानुसार सोमवार 6 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्‍याचे व न स्विकारण्‍याबाबतच्‍या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्‍यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्‍वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्‍यात येणार नाहीत. त्‍यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.
यादिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास  सुरुवात करण्यात येईल.  
न्यायप्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील  महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या उपक्रमात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल , असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000
  पिक संरक्षणासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 27 :-  कृषि विभागांतर्गत नांदेड, मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार या पाच तालुक्यांमध्ये तुर, कापुस पिकांसाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे पिकावरील किडीपासून संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
कपाशीवरील पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी बायफेनथ्रीन 10 इसी 16 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीसाठी फेनप्रोपॅथ्री 10 इसी 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. तुर शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी प्रती हेक्टरी 5 कामगंध सापळे 50 मीटर अंतरावर लावावेत, असे आवाहन नांदेड विभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

00000
कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या
शेती विषयक माहितीची ऑनलाईन नोंदणी
नांदेड, दि. 27 :- कापुस उत्पादक शेतकऱ्यांची शेती विषयक माहितीची नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे करण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीला कापुस पिकाबाबतची नोंदणी वगळता इतर दुसऱ्या कोणत्याही पिकाचे तुर, मुग, उडीद, सोयाबिन माहिती नोंदणी करण्याचे अधिकार नाहीत. कृषि उत्पन्न बाजार समितीकडे फक्त कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेती विषयक माहितीची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. खरेदी विक्री संघाकडे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती विषयक माहितीची नोंदणी यापुर्वी केली असल्यास या माहितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने फक्त कापुस उत्पादनाबाबतच्या माहितीची नोंद त्यामध्ये करावयाची आहे, असे राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेती विषयक माहितीच्या नोंदणी संदर्भात पुढील बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेती विषयक माहितीची नोंदणी ही अधिकृत नोंदणी धारकाकडून म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फतच करण्यात येत आहे. इतर दुसऱ्या ठिकाणी ही नोंदणी होणार नाही. नोंदणी ही खाजगी व्यक्ती, संस्थाकडून अथवा स्वयं ऑनलाईन नोंदणी करण्याची व्यवस्था नाही. कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेती विषयक माहितीची नोंदणी ही फक्त कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फतच करण्यात येत असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, ही सेवा नि:शुल्क आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाद्वारे सोयाबीन, मुग, उडीद, तुर उत्पादक शेतकऱ्यांची शेती विषयक माहितीची नोंदणी खरेदी विक्री संघामार्फत केली जाते. खरेदी विक्री संघाकडे शेतकऱ्यांनी अशी नोंदणी केली असल्यास ही नोंदणी गृहीत धरुन कृषी उत्पन्न बाजार समिती स्तरावर फक्त कापुस पिकाबाबतच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या सात/बाराचा उतारा व पीक पेरा याबाबीचा समावेश करणे अनिवार्य आहे. Neml संगणक प्रणालीमध्ये यापुर्वी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती विषयक माहितीची नोंदणी केली असल्यास ही माहिती Fetch करण्याची व्यवस्था ही प्रणालीमध्ये करण्यात आलेली आहे. अशी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड क्रमांक त्या शेतकऱ्यांची शेती विषयक पुर्व नोंदणी झालेल्या माहितीचे विवरण दिसुन येईल. खरेदी विक्री संघामार्फत कापुस पिकाबाबतची नोंदणी केली जात नाही. या प्रणालीमध्ये कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेती विषयक माहितीची नोंदणी करण्याची सुविधा ही फक्त कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फतच करण्यात येणार आहे.

000000
हमी भावाने मुग, उडीद, सोयाबीन
खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु   
नांदेड, दि. 27 :- केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडमार्फत हमी भावाने मुग-उडीद खरेदीसाठी देगलूर, धर्माबाद, बिलोली येथे केंद्र सुरु आहेत. तसेच सोयाबीनसाठी नांदेड, लोहा, देगलूर, धर्माबाद, बिलोली, हदगाव, मुखेड, भोकर येथे खरेदी केंद्र सुरु आहेत. खरेदी केंद्रावर माल विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु आहे.
 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी सोबत सात-बाराचा उतारा, सन 2017-18 चा पिकपेऱ्याची नोंद असलेला आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बॅक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत आणावी. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना माल खरेदी केंद्रावर आणण्यासाठी भ्रमणध्वनीवर संदेश मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी आपला माल 12 टक्के पर्यंत ओलावा असलेला, काडी कचरा विरहीत, स्वच्छ, FaQ दर्जाच्या असल्याची खात्री करुन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी रामप्रसाद दांड यांनी केले आहे.

0000000
माझी कन्या भाग्यश्री योजनेवर
मंगळवारी विविध स्पर्धांचे आयोजन
नांदेड, दि. 27 :- महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयामार्फत माझी कन्या भाग्यश्री सुधारीत योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या मुली व मुलांसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ (निबंध स्पर्धा), स्त्री भृण हत्या (वक्तृत्व स्पर्धा), महिला सक्षमिकरण (घोषवाक्य स्पर्धा) या स्पर्धेचे आयोजन मंगळवार 31 ऑक्टोंबर 2017 रोजी सकाळी 11 वा. नांदेड जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाचे सभागृह येथे करण्यात आले आहे.
जिल्हा स्तरावरील प्रथम दोन क्रमांकांना विभागस्तरावर तर विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकांना राज्यस्तरावर सहभागाची संधी देण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील प्रथम दोन क्रमांकांना पालकमंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तर विभागीय स्तरावरील व राज्य स्तरावरील प्रथम क्रमांकास मुख्यमंत्री व मंत्री महिला व बाल विकास विभाग यांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे. जास्तीतजास्त मुला व मुलींनी या तिन्हीही स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.वि.) यांनी केले आहे.

00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...