Tuesday, April 23, 2024

 वृत्‍त क्र. 378 

वृत्‍त क्र. 377

 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 तास मद्य विक्री बंद

 

नांदेड, दि. 23 एप्रिल :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 26 एप्रिल रोजीचे मतदान लक्षात घेऊन बुधवार 24 एप्रिल ते शुक्रवार 26 एप्रिलचे मतदान संपेपर्यत दारू विक्री बंद राहील. 48 तास दारुची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अन्य मतदार संघातही 48 तासाची मद्यविक्री बंद राहील.

 

जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक प्रक्रीया कार्यान्वित आहे. निर्धारित कार्यक्रमानुसार हिंगोली लोकसभा -15 व नांदेड लोकसभा -16 साठी मतदान 26 एप्रिल 2024 रोजी तर मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार आहे. यावेळी निवडणुकीसंदर्भात होत असलेल्या मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी व शांततासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) तसेच महाराष्ट्र विदेशी मद्य रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या इ.  नियम 1969 च्या नियम 9 A (2) (C) (1) महाराष्ट्र देशी मद्य नियम 1973 च्या नियम 26 (1) (C) (1) तसेच महाराष्ट्र ताडी दुकाने अनुज्ञप्ती देणे आणि ताडी झाडे छेदने नियम 1968 च्या नियम 5 (A) (1) महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम 142 (1) तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ अनुज्ञप्ती मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी  दिले आहेत.

 

हा आदेश नांदेड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदान होत असलेल्या ठिकाणी मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर म्हणजे 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते 26 एप्रिल 2024 रोजी मतदान संपेपर्यतमतदानाचा दिवशी 26 एप्रिल रोजी संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी 4 जून 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. तसेच लोहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्राच्या तीनही बाजूला असलेल्या कार्यक्षेत्रात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी लोहा विधानसभा मतदार संघ क्षेत्रामधून नांदेड जिल्ह्यातील इतर क्षेत्रात मद्य अवैधरित्या वाहतूक, विक्री होण्याची शक्यता आहे. तसेच लोहा व कंधार तालुक्यातील ठराविक कार्यक्षेत्रात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होत आहे. 


या आदेशाचे उल्लंघन करुन मद्यविक्री करीत असल्याचे  आढळून आल्यास संबंधित अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई  करण्यात येईल यांची नोंद घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

00000

दि. 22.4.2024

वृत्‍त क्र. 376

24 एप्रिलला उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी

 

नांदेड दि. २२ : 16-लोकसभा नांदेड निवडणुकीतील पात्र 23 उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी 24 एप्रिलला होत आहे. या बैठकीला उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीने उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खर्च सनियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या यापूर्वी १२ एप्रिल व १८ एप्रिलला  दोन खर्च तपासण्या झाल्या आहेत. 24 एप्रिलला सकाळी 11 ते सायं 6 वाजेपर्यंत कै. डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भवन कॅबिनेट बैठक कक्ष तळमजला जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे ही अंतिम तपासणी आहे. या तपासणीसाठी दोन्ही खर्च निवडणूक निरीक्षक  डॉ. दिनेश कुमार जांगिड, मग्पेन भुतीया उपस्थित राहणार आहेत.

लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1951 च्‍या कलम 77 नुसार निवडणुकीच्‍या वेळेस प्रत्‍येक उमेदवार एकतर स्वतः किंवा प्रतिनिधीद्वारे सर्व खर्चाचा स्‍वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्‍यक आहे.

अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळावेळी निर्गमीत केलेल्‍या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करणाऱ्या कायद्याच्‍या आवश्‍यकतांचे अनुपालन करण्‍यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्‍यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्‍या कलम 10 क अन्‍वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्‍या कालावधीसाठी निरर्ह ( अपात्र ) ठरविण्‍यास पात्र असेल याची नोंद घ्‍यावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी  यांनी केले आहे.

00000

दि. 22.4.2024

  वृत्‍त क्र. 375

26 एप्रिलच्या मतदानाची प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात

 नागरिकांनी यावेळी 'रेकॉर्ड ब्रेक ' मतदान करण्याचे प्रशासनाचे आवाहन

 शुक्रवारला सुटी, निवारा, प्रथमोपचार, प्राथमिक सुविधा पूर्ण

 

नांदेड दि.२२ : लोकशाहीच्या पर्वातील सर्वात मोठी लोकसभा निवडणूक  26 एप्रिल रोजी होत आहे.सकाळी सात वाजता पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत 26 एप्रिल रोजी मतदान करता येणार आहे. शासनाने 26 एप्रिलला सुटी घोषित केली असून मतदानाची सर्व तांत्रिक प्रक्रिया तसेच सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. आज या संदर्भात सर्व विभाग प्रमुखांचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतला.

मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. आपला मताधिकार बजावणे लोकशाहीमध्ये महत्त्वपूर्ण असून यावर्षी जिल्हावाशीयांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, मुख्य लेखा अधिकारी जनार्दन पक्वाने यांच्यासह अन्य सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

आजच्या बैठकीत प्रामुख्याने मतदान दिवसाच्या शेवटचे 72 तास, 48 तास व 24 तासापूर्वी आणि मतदानाच्या दिवशी करावयाच्या कारवाईबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये मतदान घडवून आणणाऱ्या मनुष्यबळाची उपलब्धता व प्रशिक्षण, मतदान केंद्रावरील पायाभूत सुविधा, कायदा आणि सुव्यवस्था, निवडणूक काळातील पैशांचा गैरवापर, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मुबलक प्रमाणातील उपलब्धता, निवडणूक खर्चावरील सनियंत्रण, मतदारांची जनजागृती, पोलिंग एजंटच्या येणाऱ्या तक्रारी, माध्यमांसाठी निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या प्राधिकार पत्रांचे वाटप, मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाला नियमित द्यावयाची माहिती, मतदानाच्या वेळी नियमानुसार होणारे मतदान शंभर मीटरच्या आत मधील प्रचार बंदी, मोबाईल वापरावरील बंदी, याबाबतचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

प्रामुख्याने पुढील काही दिवसात कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भातही आढावा यावेळी घेण्यात आला. रात्रीच्या तपासणी वाढवण्यात याव्यात, फिरत्या पथकांकडून तपासणी कसून करण्यात यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

00000



Monday, April 22, 2024

 


 वृत्‍त क्र. 374

उन्हाला घाबरु नका, मतदानासाठी बाहेर पडा !

प्रतिक्षालयासोबतच वैद्यकीय व्यवस्थाही मतदाराच्या दिमतीला

आरोग्य विभाग सज्ज प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोचार पेटी

नांदेड दि. 22 एप्रिल :- नांदेड लोकसभेसाठी 26 एप्रिलला मतदान होत आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर गेले आहे. यामुळे अनेक मतदार उन्हात बाहेर पडण्याचे टाळून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आता घाबरण्याची गरज नसून आरोग्य विभागाने प्रत्येक केंद्रावर प्रथमोचार पेटी ठेवली आहे. याशिवाय एखाद्याला जास्त गरज भासल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात दाखल करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने घाबरून न जाता 26 एप्रिलला मतदानासाठी घराबाहेर पडावे व मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

एप्रिल महिना अर्धा पालटला असून जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली आहे. 26 एप्रिलला मतदानाच्या दिवशी मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदारांच्या आरोग्याची प्रशासनाकडून काळजी घेतली जाणार आहे.  आरोग्य विभागाच्यावतीने प्रत्येक मतदार केंद्रावर प्रथमोपचार पेटीची सोय केली आहे. तसेच मतदानादरम्यान मतदारांची प्रकृती खालावली आणि त्यांना उपचारासाठी आरोग्य संस्थेत आणले तर शासनाच्या प्रत्येक आरोग्य संस्थेत मतदानाच्या दिवशी डॉक्टर कार्यरत राहणार असून ते मतदारांच्या प्रकृतीची काळजी घेणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचार किट ठेवण्यात आली आहे. पॅरासिटामोट, ओआरएस आणि प्रथमोपचारासाठी लागणारे सर्व साहित्य असलेली किट तयार करण्यात आली आहे.  प्रत्येक मतदान केंद्राला ही किट वाटप करण्यात आली आहे. तरी सर्व मतदारांनी उन्हाला न घाबरता मतदानासाठी बाहेर पडावे व मतदान करावे. मतदारांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले. 

तसेच नागरिकांनी तीव्र उन्हापासून बचाव होण्यासाठी वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळच्या वेळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात करावेत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे. अधून मधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी. अस्वस्थ वाटल्यास ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावा. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

00000

  वृत्‍त क्र. 373

शेकडोंच्या समुदायाने केला मतदानाचा संकल्प ;नांदेडच्या परेड मैदानात रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी 

 गीत, गायन,पोवाडा, पथनाटय, ओव्या, रिल्समधून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन 

नांदेड दि. २२ एप्रिल : 26 एप्रिल रोजी नांदेड येथे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने आज विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला साद घातली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांने किमान 50 मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा संकल्प आज शेकोडोंच्या संख्येने, उपस्थित कर्मचाऱ्यांनी नांदेड पोलीस परेड ग्राउंडवर केला.

सोमवारची सकाळ पोलीस परेड ग्राउंडवर नांदेड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या हजारोच्या एकत्रिकरणाने उल्हासित झाली होती. शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, बचत गटांचे सदस्य ,शाळकरी विद्यार्थ्यांच्या जोश पूर्ण सादरीकरणाने वातावरण भारावून गेले होते. निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर मोठ्या संख्येने दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनात व महानगरामध्ये मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. आज या दोघांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद व मनपा कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.       

स्वीपच्या सर्वात मोठ्या उपस्थितीच्या या कार्यक्रमांमध्ये नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी आलेले खर्च निरीक्षक डॉ. दिनेशकुमार जांगिड, खर्च निरीक्षक मग्पेन भुटिया यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, माधव सलगर यांच्यासह जिल्हा परिषदेचे, मनपाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.     

 कार्यक्रमाची सुरुवात लेझीम पथकाच्या स्वागताने झाली. त्यानंतर मतदान जनजागृती पोवाडा सादर करण्यात आला. राज्याच्या सदिच्छा दूत डॉ. सानवी जेठवाणी यांनी यावेळी उपस्थिततांपुढे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर हदगाव तालुक्यातील उमरी येथील विद्यार्थ्यांनी अप्रतिम पथनाट्य सादर केली. मतदान वाढविण्यामध्ये आपले योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून तालुकास्तरावरून निवड झालेल्या तीन विद्यार्थ्यांची भाषणे लक्षवेधी ठरली. एमजीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे नृत्य यासोबतच एनसीसी, स्काऊट -गाईडच्या विद्यार्थ्यांचे पथसंचलन बचत गटांच्या महिलांसाठी व अंगणवाडी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन, तसेच स्वीप उपक्रमांतर्गत मतदान वाढीसाठी बनविण्यात आलेले स्लोगन, रिल्स, शॉर्ट फिल्म, ओव्या, स्वीप प्रश्नमंजुषा आधीच स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

 जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,सीईओ मीनल करनवाल यांनी यावेळी बचत गट व अंगणवाडी महिलांनी लावलेल्या स्टॉलला भेटी दिल्या. तसेच त्यांच्या स्पर्धेनंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. प्रत्येक गावातून व वार्डातून मोठ्या संख्येने मतदान होण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली. यावेळी मैदानावर साकारलेली संस्कार भारतीची प्रबोधनात्मक रांगोळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सान्वी जेठवानी व श्री. प्रलोभ कुलकर्णी यांनी केले.

शहरी लोकसंख्या मागे राहू नये

महानगरपालिकेचे कर्मचारी आयोजनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरवेळी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान होते. मात्र शहरी मतदान कमी होत असल्याची सार्वत्रिक ओरड आहे. नांदेडमध्ये प्रत्येक नागरिकाने याची नोंद घ्यावी. गावात राहणाऱ्या माणसाला मतदानाबाबत जी जाणीव आहे तीच जाणीव ठेवून शहरी भागातही मतदान मोठ्या संख्येने व्हावे, अशी अपेक्षा यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांनी व्यक्त केली आहे.

0000


















  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...