Tuesday, October 17, 2023

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन सादर करण्याच्या वेळेत वाढ

 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी

नामनिर्देशन सादर करण्याच्या वेळेत वाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- राज्य निवडणूक आयोगाने 3 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमानुसार संगणक प्रणाली द्वारे निवडणूक प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. दिनांक 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहेत. त्यानुसार 16 ऑक्टोबरपासून संगणकप्रणालीद्वारे नामनिर्देशनाची प्रक्रीया सुरु झाली आहे.

 

नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणकप्रणालीद्वारे भरले जात आहे. मात्र त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहे. या तांत्रिक अडचण महा ऑनलाईनकडून दूर करण्यात आल्या आहेत. तरी 18 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी 11 ते दु. 3 वा पर्यतची वेळ सांय. 5.30 वाजेपर्यत वाढविण्यात आली आहे असे राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सुर्यकृष्णमूर्ती यांनी पत्रका द्वारे कळविले आहे.

0000

रानभाजी पाककला स्पर्धेचे 19 ऑक्टोबर रोजी आयोजन

 रानभाजी पाककला स्पर्धेचे 19 ऑक्टोबर रोजी आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- प्रकल्प संचालक, आत्मा व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने 19 व 20 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात 19 ऑक्टोबर रोजी रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांनी रानभाजी विशेष पाककला स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून जिल्हयातील सर्व महिला व पुरूषांनी सहभागी होऊन स्पर्धेचा लाभ घ्यावा. या स्पर्धेची नोंदणी 19 ऑक्टोबर रोजी दु. 2 वाजल्यापासून सुरु होईल. सहभागी स्पर्धकांमधून प्रथम, व्दितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिक स्वरूपात प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 

ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येतात. रानभाज्या या गुणधर्माने परिपूर्ण असल्याने, आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. या रानभाज्या वैविध्यपूर्ण असून काही औषधी वनस्पती म्हणूनही वापरल्या जातात. रानभाजी पासून विविध पदार्थ जसे कि, भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून, भाजून वरण भाजी आदी खाद्यान्न यापासून तयार केले जातात. रानभाज्या बाबत शहरातील नागरीकांमध्ये मोठी उत्सुकता असते. या भाज्यांची ओळख आणि त्याचे गुणधर्म जाणून घेण्याच्या अनुषंगाने चवळी, अळिंबी (मशरूम), पाथरी, तरोटा, घोळ, करटूले, बांबूचे कोंब, टाकळा, हरभऱ्याची कोवळी पाने, माठ, तांदूळजा, रान तोंडली, शेवग्याची पाने व फुले, कुरडू, सुरणाची कोवळी पाने, तेर अळू, भोकर, रताळ्याचे कोंब, रक्तकांचन, पाथरी, इ. रानभाज्या पासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांची पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

0000  

शासकीय रुग्णालय स्तरावर आवश्यक औषधी खरेदीची जलद कार्यवाही सुरु

 शासकीय रुग्णालय स्तरावर आवश्यक 

औषधी खरेदीची जलद कार्यवाही सुरु

नांदेड (जिमाका) दि. 17 :- नांदेड जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावर औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 10 ऑक्टोबर 2023 रोजी सखोल आढावा घेतला. या आढाव्यातील मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत रुपये 5 कोटी 90 लक्ष रुपये व आदिवासी उपयोजना सन 2023- 24 अंतर्गत 91 लक्ष 66 हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी एकूण 6 कोटी 81  लक्ष रुपयांची अर्थ संकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णय ५ ऑक्टोबर २०२३ नुसार व मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या ऑक्टोबर 2023 रोजीच्या निर्गमित आदेशान्वये औषधी, साहित्य, सामग्री खरेदीची कार्यवाही तातडीने करण्याचे सूचित केले होते. त्याअनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय स्तरावरून (ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दर करारानुसार २० टक्के मर्यादित अत्यंत आवश्यक असणारी औषधी खरेदीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. उर्वरित अनुदानातून औषधी व साहित्य, सामग्रीची खरेदी तातडीने उपलब्ध करून घेण्यासाठी या स्तरावरून 11 ऑक्टोबर 2023 ते 17 ऑक्टोबर २०२३ या दरम्यान अल्प कालावधीची जाहीर ई-निविदा प्रकाशित करण्यात आलेली आहे. यानुसार शासकीय रुग्णालयात औषधी उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही जलद करण्यात येत आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

रानभाजी व मराठवाडा विशेष खाद्य महोत्‍सवाचा ग्राहकांनी लाभ घ्‍यावा - जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत

 रानभाजी व मराठवाडा विशेष खाद्य

 महोत्‍सवाचा ग्राहकांनी लाभ घ्‍यावा

-         जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत

 

·         रानभाजी व खाद्य महोत्सवाचे 19 व 20 ऑक्टोबर रोजी आयोजन

·         19 ऑक्टोबर रोजी रानभाज्याच्या पाककलेचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त रानभाजी व मराठवाडा विशेष खाद्य महोत्‍सवाचे 19 व 20 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजन केले आहे. या महोत्सवाचे सकाळी 10 ते सायं. 6 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजन करण्‍यात आले आहे. या महोत्‍सवात सहभागी होवून ग्राहकांनी थेट शेतकऱ्याकडून रानभाजी व इतर शेतमाल खरेदी करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.  

 

रानभाज्‍यांमध्‍ये विविध प्रकारचे शरीराला आवश्‍यक असणारे पौष्टिक अन्‍नघटक असतात. तसेच या रानभाज्‍या नैसर्गिकरित्‍या येत असल्‍यामुळे त्‍यावर रासायनिक किटकनाशक / बुरशीनाशक फवारणी करण्‍यात येत नाही. या रानभाज्या पुर्णपणे नैसर्गिक असल्‍याने या संपत्‍तीचा योग्‍य वापर आवश्‍यक आहे. शहरी लोकांमध्‍ये याबाबत जागृती करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. यासाठी नांदेड येथे रानभाजी महोत्‍सव आयोजित करण्‍यात आला आहे.


या महोत्‍सवात जिल्‍हयातील शेतकरी गट व महिला गटांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. या महोत्सवात विक्रीच्‍या ठिकाणी  जिल्‍हयात उपलब्‍ध होणाऱ्या सर्व रानभाज्‍याचा समावेश आहे. यात प्रामुख्याने कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळू, कपाळफोडी, कुरडू, गुळवेल, तांदुळजा, रानमाठ, पांढरी वसु, गोखरु, बिव्‍याचे फुले, उंबर, चिवळ, भुई आवळी इ. कंदभाज्‍या व सेंद्रीय हिरव्‍या भाज्‍या, फळभाज्‍या व फूलभाज्‍या व ड्रँगन फ्रुट, सिताफळ व शेतकऱ्यांनी विविध उत्‍पादीत केलेला माल, सेंद्रीय उत्‍पादने, गुळ, हळद, लाकडी घण्‍याचे करडीचे तेल, मध, धान्य, विविध डाळी व केळीचे वेफर्स यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.

 

या महोत्सवात 19 ऑक्टोबर 2023 रोजी रानभाज्यांच्या पाककलेचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी स्पर्धकांनी यामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे व प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) अनिल गवळी यांनी केले आहे.

000

 प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या

जिल्हा अंमलबजावणी समितीची बैठक संपन्न


नांदेड (जिमाका) दि. 17 :- पीएम विश्वकर्मा योजनेत शहरी व ग्रामीण भागातील पात्र कारागीर यांनी सीएससी सेंटरवर नोंदणी करावी. या योजनेत नोंदणीसाठी कोणतीही फी आकारली नसून नोंदणी विनामुल्य आहे. या नोंदणीसाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, राशनकार्ड व बँक खाते तपशील आवश्यक आहे. तरी शासनाच्या या महत्वकांक्षी योजनेचा पात्र कारागीरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या जिल्हा अंमलबजावणी समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अग्रणी बँकेचे अनिल गचके, सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक प्रविण खडके यांची उपस्थिती होती. या बैठकीचे सुत्रसंचालन सदस्य सचिव तथा प्र. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर यांनी केले.

00000

Monday, October 16, 2023

 विशेष वृत्त


मुलींनो स्वातंत्र्य व जबाबदारीचे भान जपण्यातच भविष्यातील उज्ज्वल वाटा
- विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर
▪️नांदेड जिल्ह्यातील शेतीपासून ते प्रशासनात अपूर्व ठसा उमटविणाऱ्या
नवदुर्गांचा जिल्हा पोलीस विभागातर्फे विशेष सन्मान
  • एक हजार मुलींनी घेतली प्रेरणा
नांदेड, (जिमाका) दि. 16 :- शिक्षणाचे द्वार हे आपल्या जीवनाचा मार्ग समृद्ध करणारे असतात. आपल्याला नेमके काय व्हायचे आहे हे आगोदर ठरवून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा याचा विसर पडू देऊ नका. स्वातंत्र्याचा खरा अन्वयार्थ हा शिक्षणातून समृद्ध होत जातो. आपले स्वातंत्र्य ओळखून, वास्तवाचे भान ठेवून, स्वातंत्र्य जपण्यातच भविष्यातील उज्ज्वल वाटा आहेत. कोणत्याही स्थितीत आपल्या चारित्र्याशी तडजोड करू नका, असे वडिलकीचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी आज शालेय व महाविद्यालयीन मुलींना केले.
नांदेड जिल्ह्यातील शेतीपासून जिल्हा प्रशासनापर्यंत आपल्या कार्यातून अपूर्व ठसा निर्माण करणाऱ्या महिलांना जिल्हा पोलीसदलातर्फे “नवदुर्गा सन्मान” देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यात ते बोलत होते. नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून महिला सुरक्षा व जनजागृतीच्या उद्देशाने कुसूम सभागृह येथे मुलींसाठी हा विशेष उपक्रम घेतला होता. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, श्री. धरणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. यादव, अश्विनी जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुलींच्या मनात आत्मविश्वास व प्रेरणा देण्यासाठी नवदुर्गा सन्मानाचे आयोजन
-जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे
आपले घर, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलून प्रत्येक महिला ही सशक्त नारीची भूमिका निभावत आहे. बदलत्या परिस्थितीत महिलांवर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या या आलेल्या आहेत. स्वत:चा विकास व ध्येय साध्य करण्यासाठी आपल्यावर कुठले दडपण येत असेल, मनात भिती निर्माण होत असेल तर ती जुगारून आत्मविश्वासाने बोलायला शिका, असा मंत्र जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मुलींना दिला. सार्वजनिक जीवनात वावरतांना महिलांसाठी सुरक्षितेची भावना व वातावरण खूप अत्यावश्यक असते. ते वातावरण अश्वासीत ठेवण्याची जबाबदारी पोलीस विभागाने समर्थपणे पेलून धरली आहे. भरोसा सेल हा याच सुरक्षितेसाठी, मदतीसाठी तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. मुलींचा मनात आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने “नवदुर्गा सन्मान” हा उपक्रम आम्ही जिल्ह्यातील विविध भागातही घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले.
नशीब नव्हे तर कठोर परिश्रमच आपल्याला मोठे करतात
- दलजीत कौर जज
कोणत्याही व्यक्तीला कठोर परिश्रमाशिवाय यश साध्य करता येत नाही. मोठे होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी नशीब नव्हे तर कठोर परिश्रम आवश्यक असते यावर विश्वास ठेवून आपल्या ध्येयासाठी तत्पर रहा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज यांनी मुलींना केले. प्रत्येक ठिकाणी आपण सावधानता व चौकश असले पाहिजे. सदैव दक्ष असल्यास कोणत्याही अडचणी येऊ शकत नाहीत. कोणत्याही आव्हानात आपला आत्मविश्वास आपल्याला शक्ती देतो हे विसरू नका, असे त्यांनी सांगितले. मुलांशी मैत्री यात चुक नाही. मैत्रीमध्ये पावित्र्य हवे. याचबरोबर आपल्या पालकांचा विश्वास संपादन करणे हे मुलींनी विसरता कामा नये. तुमच्या सुरक्षिततेसाठी असंख्य कायदे असून अन्याय होत असल्यास तो सहन करू नका, असे दलजीत कौर जज यांनी सांगितले. यावेळी नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक निती सरकार यांनी मुलींशी संवाद साधला. तुम्हाला जे क्षेत्र निवडायचे आहे ते क्षेत्र तुम्ही निवडू शकता. आपण हे करू शकतो असा मनात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी देगलूर तालुक्यातील मेदनकल्लूर येथे बचतगटाच्या माध्यमातून पुदिना व कोथींबीरची यशस्वी शेती करणाऱ्या रफिया बी शेख आरीफ, किनवट तालुक्यातील पैंदा व परिसरात एकल शाळा चालविणाऱ्या छाया रामराव कांगणे, भरोसा सेल येथे कार्यरत सुचित्रा भगत, रामनगर परिसरात अनाथ मुलींचे वसतीगृह समर्थपणे चालविणाऱ्या प्रिती अनिल दिनकर, प्राध्यापक कल्पना जाधव, भाग्यश्री जाधव, स्नेहा पिंपरखेडे, किनवट येथील कोलाम जमातीच्या दामोबाई भिमराव कोडपे आणि नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज यांना त्यांच्या क्षेत्रातील अपूर्व योगदानाबद्दल “नवदुर्गा सन्मान” मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
00000














 न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांचा 18 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा दौरा  

                                                                                    

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहित करण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) न्यायाधीश उच्च न्यायालय व समिती सदस्य यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

 

बुधवार सकाळी 10.50 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे बैठकीस उपस्थिती. दुपारी. 1 ते 2 वा. राखीव. दुपारी 2 ते 4 वा. नागरिकांकडून पुरावे स्वीकारणे.  स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड . सायं. 4.10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 4.30 वा. राखीव.

0000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...