Tuesday, October 17, 2023

रानभाजी व मराठवाडा विशेष खाद्य महोत्‍सवाचा ग्राहकांनी लाभ घ्‍यावा - जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत

 रानभाजी व मराठवाडा विशेष खाद्य

 महोत्‍सवाचा ग्राहकांनी लाभ घ्‍यावा

-         जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत

 

·         रानभाजी व खाद्य महोत्सवाचे 19 व 20 ऑक्टोबर रोजी आयोजन

·         19 ऑक्टोबर रोजी रानभाज्याच्या पाककलेचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त रानभाजी व मराठवाडा विशेष खाद्य महोत्‍सवाचे 19 व 20 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजन केले आहे. या महोत्सवाचे सकाळी 10 ते सायं. 6 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजन करण्‍यात आले आहे. या महोत्‍सवात सहभागी होवून ग्राहकांनी थेट शेतकऱ्याकडून रानभाजी व इतर शेतमाल खरेदी करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.  

 

रानभाज्‍यांमध्‍ये विविध प्रकारचे शरीराला आवश्‍यक असणारे पौष्टिक अन्‍नघटक असतात. तसेच या रानभाज्‍या नैसर्गिकरित्‍या येत असल्‍यामुळे त्‍यावर रासायनिक किटकनाशक / बुरशीनाशक फवारणी करण्‍यात येत नाही. या रानभाज्या पुर्णपणे नैसर्गिक असल्‍याने या संपत्‍तीचा योग्‍य वापर आवश्‍यक आहे. शहरी लोकांमध्‍ये याबाबत जागृती करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. यासाठी नांदेड येथे रानभाजी महोत्‍सव आयोजित करण्‍यात आला आहे.


या महोत्‍सवात जिल्‍हयातील शेतकरी गट व महिला गटांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. या महोत्सवात विक्रीच्‍या ठिकाणी  जिल्‍हयात उपलब्‍ध होणाऱ्या सर्व रानभाज्‍याचा समावेश आहे. यात प्रामुख्याने कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळू, कपाळफोडी, कुरडू, गुळवेल, तांदुळजा, रानमाठ, पांढरी वसु, गोखरु, बिव्‍याचे फुले, उंबर, चिवळ, भुई आवळी इ. कंदभाज्‍या व सेंद्रीय हिरव्‍या भाज्‍या, फळभाज्‍या व फूलभाज्‍या व ड्रँगन फ्रुट, सिताफळ व शेतकऱ्यांनी विविध उत्‍पादीत केलेला माल, सेंद्रीय उत्‍पादने, गुळ, हळद, लाकडी घण्‍याचे करडीचे तेल, मध, धान्य, विविध डाळी व केळीचे वेफर्स यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.

 

या महोत्सवात 19 ऑक्टोबर 2023 रोजी रानभाज्यांच्या पाककलेचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी स्पर्धकांनी यामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे व प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) अनिल गवळी यांनी केले आहे.

000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...