वृत्त
प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत
आता प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील 511 गावात दृकश्राव्य प्रणालीद्वारे होणार उद्घाटन
नांदेड (जिमाका) दि. 17 :- ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने परंपरागत चालत आलेल्या कौशल्याल्यासमवेत नवीन तंत्रकुशलतेची जोड देऊन प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र राज्यातील 511 गावात सुरू होत आहेत. या महत्त्वाकांक्षी कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 ऑक्टोबर रोजी सायं. 4 वा. दृकश्राव्य प्रणालीद्वारे केला जाणार आहे. राज्यातील या 511 केंद्रापैकी नांदेड जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी हे केंद्र सुरू होत आहेत.
ग्रामीण भागातून शहरी भागात रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी व्हावे हा उद्देश प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामागे निश्चित करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या गावातच स्वयंरोजगाराच्या दृष्टीने पारंपारिक कौशल्यासह नवीन रोजगाराची क्षेत्र तपासून त्या अनुरूप त्यांना तंत्र कौशल्य मिळावे त्यासाठी या केंद्रात विविध प्रशिक्षण व कार्यानुभव दिला जाईल.
यात नांदेड तालुक्यातील धनेगाव, अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, धर्माबाद तालुक्यातील येताळा, हदगाव तालुक्यातील तामसा, हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथे सोलारपंप तंत्रज्ञ, शिवनकाम या विषयातील कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. भोकर तालुक्यातील वाकड, देगलूर तालुक्यातील हानेगाव, लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे फॅब्रिकेशन वेल्डींग, फिटर, मल्टी स्किल, नायगाव तालुक्यातील नरसी येथे फिल्ड टेक्निशीयन, उमरी तालुक्यातील शिंदी येथे शिवनकाम, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे इलेक्ट्रीशीयन, इनर्व्हटर, मुदखेड तालुक्यातील बारड येथे इलेक्ट्रीकल, फॅब्रिकेशन, माहूर तालुक्यातील वाई व किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे डाटा इन्ट्री ऑपरेटर, शिवणकाम, कंधार तालुक्यातील कुरूळा येथे इलेक्ट्रीकल तंत्रज्ञ, बिलोली तालुक्यातील कासराळी येथे शिवनकाम व डाटा इन्ट्री आदी कौशल्य शिकविली जाणार आहेत. यासाठी युवा विकास सोसायटी परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रा. या संस्थांची निवड करण्यात आली आहे.
000000
No comments:
Post a Comment