Wednesday, July 28, 2021

 

खरीप हंगाम पिक स्पर्धेच्या निकषात बदल ; शेतकऱ्यांना पिक स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन   

नांदेड (जिमाका) दि. 28 :- खरीप हंगामापासून पूर्वीच्या पिकस्पर्धेच्या निकषात शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने पिक स्पर्धा खरीप हंगाम 2021 राबविण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तर ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन पिकासाठी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत आहे. पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयाने केले आहे. 

पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यात भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन,  सात/बारा, आठ-अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषि कार्यालयात द्यावे लागणार आहे. राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागात शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, या उद्देशाने राज्यात कृषि विभागाच्यावतीने पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.  

सध्याच्या पीकस्पर्धेतील महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत. पिकस्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके ज्वारी, बाजरी, तुर, मुग, उडीद, सोयाबीन  असे  पिके आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 आहे. पीकस्पर्धेत सहभागी लाभार्थ्याचे शेतावर त्यापिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी 5    आदिवासी गटासाठी 4 राहिल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.  प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम 300 रुपये एवढी राहिल. 

पिकस्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस स्वरुप हे तालुका पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसे रुपये पहिले 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये तर तिसरे 2 हजार रुपये तर जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार, तिसरे बक्षिस 5 हजार रुपये, विभाग पातळीवर पहिले 25 हजार, दुसरे 20 हजार तर तिसरे 15 हजार रुपये, राज्य पातळीवर पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार, तिसरे 30 हजार रुपये राहिल. 

रब्बी हंगाम 2020 मध्ये पिकस्पर्धेसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे खरीप हंगाम 2021 साठी देखील जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुग व उडीद पिकांसाठी 31 जुलै पुर्वी तर इतर खरीप पिकांसाठी 31 ऑगस्ट पुर्वी अर्ज सादर करुन पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे  यांनी केले आहे.

*****

 

अकरावीच्या सामाईक प्रवेश परीक्षेचे  ऑनलाईन अर्ज करण्यास 2 ऑगस्टची मुदत   

नांदेड (जिमाका) दि. 28 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शासन निर्णय 28 मे व 24 जून 2021 नुसार इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात राज्यात सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) चे आयोजन करण्यात आले आहे. राज्य मंडळाची इयत्ता 10 वी परीक्षा सन 2021 पूर्वी उत्तीर्ण / प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने बुधवार 28 जुलै पासून 2 ऑगस्ट 2021 अखेर रात्री 11.59 पर्यंत https://cet.11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 178 रुपये अधिक बँकिंग चार्जेस / पेमेंट गेटवे चार्जेस असे शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरण्यासाठी पुढील माहिती नोंदवावी लागणार आहे. ई-मेल आयडी (उपलब्ध असल्यास), मोबाईल क्रमांक नोंदविणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांने परीक्षेचे माध्यम नोंदविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल परंतू सामाजिक शास्त्रे- इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल या विषयासाठी विद्यार्थ्यास अन्य एक माध्यम निश्चित करावे लागेल. 

राज्यमंडळाची इयत्ता 10 वी परीक्षा सन 2021 पूर्वी उत्तीर्ण, प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी इत्यादींनी फोटो आयडी, पासपोर्ट साईज फोटो, नमुना स्वाक्षरी इत्यादी कागदपत्रे स्कॅन करुन संगणक प्रणालीत अपलोड करावी लागणार आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या / कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका / शहराचा विभाग निश्चित करावा लागेल. दिव्यांग विद्यार्थ्यांनी अर्ज दिव्यांगत्वाचा प्रकार निवडून निश्चित करावा तसेच त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे संगणक प्रणालीत अपलोड करावी लागतील. प्रथम आवश्यक माहिती तयार / निश्तिच करुन ठेवावी व त्यानंतर इयत्ता 11 वी प्रवेशासाठी आयोजित सामाईक प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. 

ज्या विद्यार्थ्यांनी 20 व 21 जुलै कालावधीत संपूर्ण प्रक्रिया करुन सामाजिक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशील पूर्वीचा अर्ज क्रमांक व अर्ज भरताना नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून संकेतस्थळावर पाहता येईल. या प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रक्रिया पूर्ण करुन न शकलेल्या उमेदवारांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहिल. 

सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत यापूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा तपशील मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना या प्रक्रियेच्या तांत्रिक बाबीसंदर्भात अडचणी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी 9823 0098 41 या टोल फ्री क्रमांकावर सकाळी 10 ते सायं 7 यावेळेत संपर्क साधावा. हा क्रमांक संकेतस्थळावर होम पेजवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

राज्यमंडळाची इयत्ता 10 वी परीक्षा सन 2021 पूर्वी उत्तीर्ण / प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी, पालक व संबंधित अन्य घटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

*****

 

विमा कंपनीने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबाबत कार्यवाही करावी

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- नांदेड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत व ऑफलाईन अर्ज केलेले आहेत अशा एकुण 1 लाख 14 हजार 825 प्रकरणांबाबत संबंधित विमा कंपनीने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत त्वरीत कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. 

जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी एस. बी. नादरे, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. भेदे, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णीचे शास्त्रज्ञ डॉ. डी. ए. देशमुख, विमा कंपनीचे प्रतिनिधी सौरभ पारगल, शैलेंद्र शर्मा, रवी थोरात, गौतम कदम, नांदेड व देगलूरचे उपविभागीय कृषि अधिकारी आदी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनानंतर नैसर्गिक आपत्तीतून दिलासा मिळावा या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांने पुढे येऊन पीक विमा काढलेला आहे. नैसर्गिक आपत्तीतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पीक विमा हा मोठा आधार आहे. परिस्थितीचे गांभीर्य विमा कंपनीने लक्षात घेऊन जिल्ह्यातील 1 लाख 14 हजार 825 अर्जांचा तात्काळ निपटारा करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा कंपनीकडील प्राप्त अर्जांवर कृषि विभागाच्या समक्ष तात्काळ पंचनामे करुन संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी विमा कंपनीला दिल्या. 

पुढील काळात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान आल्यास विमाधारक शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांक 1800 103 5490 तसेच पिक विमा ॲपच्या माध्यमातून व ईमेल supportagri@iffcotokio.co.in द्वारे किंवा कृषि व महसूल विभागात प्रत्यक्ष अर्ज देऊन 72 तासात नुकसानीची पूर्व सूचना शेतकऱ्यांनी द्यावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी यावेळी केले.

*****

Tuesday, July 27, 2021

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 29 व 30 जुलै 2021 या कालावधीत 2 दिवसाचे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलास इमारत, कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी व कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करावेत. कंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन (स्काईप, व्हॉटसॲप, फोन आदीद्वारे) संपर्क साधून आपली ऑनलाईन मुलाखत घेतील. अधिक माहितीसाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर सपंर्क साधवा.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना जॉब सिकर ऑप्शनमध्ये नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जॉब सिकर ऑप्शन या लिंकवर क्लिक करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. नांदेड जिल्हा पंडित दीनदयाल ऑनलाईन जॉब Fair 3 मेळावा असे दिसेल. त्यातील Action या पर्यायाखालील दोन बटणांपैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल. तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील व क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. हा संदेश काळजीपूर्वक वाचून I Agree बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात उपलब्ध असलेली पदे (पदाचे नाव, शैक्षणिक अहर्ता, आवश्यक कौशल्य, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण) दिसेल. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्य यानुसार पदाची निवड करावी व अर्जाच्या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर एक संदेश दिसेल हा संदेश काळजी पूर्वक वाचून ओके बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यामध्ये आपला ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसेल अशी माहिती रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी दिली.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 213 अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 166 एवढी झाली असून यातील 87 हजार 460 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 51 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे मुखेड तालुक्यांतर्गत 1, देगलूर 1, लोहा 1 तर अँटिजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, नांदेड ग्रामीण 1, कंधार 1 असे एकूण 6 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, देगलूर कोविड रुग्णालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 51 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 39  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 128, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 144 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 51 हजार 198

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 49 हजार 93

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 166

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 460

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.99 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-43

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-51

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. सोमवार 2 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. 

यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 

गौण खनिज वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 27 :-जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध खनिजाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्री बेरात्री अवैध वाहतूक होत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघात घडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गौणखनिज वाहतूक करणाऱ्या चालक-मालकांनी आपल्या वाहनांवर तात्काळ जीपीएस यंत्रणा बसवून घ्यावी, अन्यथा अशा वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे. 

फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 133 नुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनासाठी जीपीएस यंत्रणा बसविण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. जिल्ह्यात तसेच प्रामुख्याने शहरात ट्रक, टिप्पर, हायवा आदी वाहनांनी गौणखनिजाच्या वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन केले आहे.

0000



 

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...